सुसंगती सदा घडो | सुजनवाक्य कानी
पडो |
कलंक मतीचा झडो | विषय सर्वथा
नावडो ||
तुम्ही - आम्ही पंडित कवी मोरोपंतांचा हा श्लोक ऐकतच लहानाचे
मोठे झालो आहोत. या श्लोकामधले केवळ शब्दच नाही तर त्यातले
मूल्य, त्यातले संस्कार आपल्यापर्यंत पोहोचले; आपल्यामध्ये रुजले गेले. हे संस्कार रुजवत आणि
फुलवत गेल्याने आजही आपण आपल्यापुरते तरी एका सुरक्षित जगामध्ये
वावरत आहोत.
मोरोपंतांचा हा श्लोक ऐकला की वाटतं, “हं, लहान मुलांना हे
सांगावं लागतं. कारण त्यांना संगत कशी धरायची, कोणाशी मैत्री करायची, कुठे जायचं, कुठे टाळायचं हे
काही कळत नाही. म्हणून पालकांना सजग राहावं लागतं. थोडा अजून विचार करताना
जाणवते, किशोरवयीन मुलांसाठी हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण वयाचा हा टप्पाच
मुळात मोहात पाडणारा आहे. श्रेयस आणि प्रेयसाच्या संघर्षात ज्याचा विजय
होईल त्याच्याकडे मुले खेचली जाणार आणि म्हणून याही टप्प्यावर मुलांसोबत पालकांनी
हातात हात घालून उभं असलंच पाहिजे.
पण
गंमत म्हणजे आताचा काळच असा आहे की, हे वचन ऐकते तेव्हा असं वाटतं हे आता
स्वतःलाही अगदी सजगपणाने पुन्हा पुन्हा बजावून सांगायला पाहिजे. आपण आपल्याच
संगतीमध्ये सुयोग्य आहोत की नाही हे तपासून पाहायला पाहिजे.
का
बदललाय काळ एवढा की या वयातही माणसाला असुरक्षित वाटावं? का घडतय असं? साधारणपणे
सगळ्यांनाच असे जाणवते, आपण जिथे वावरतो आहोत, आपण जे वैभव पाहिलेले आहे त्या
वैभवाला तडा जाणाऱ्या काही गोष्टी घडायला लागल्या की मन कळवळून जातं. हे वैभव प्राणपणानं जपणारी जी माणसं आपण पाहिलेली असतात, अनुभवलेली असतात
आणि हे घडू नये म्हणून छातीठोकपणे उभी राहिलेली असतात त्यांच्या
छत्रछायेखाली आम्ही सुरक्षित होतो. मात्र आपापल्या क्षेत्रात आता आघाडीवर उभे
राहण्याची वेळ ही आपली प्रत्येकाची आहे.
एकवेळ आपण दूषित
अन्नाचा, प्रदूषित वातावरणाचा सामना करू शकतो. त्याला पर्याय देता येतो.
औषधोपचार करता येतो. पण प्रदूषित मनांचं काय? मनं अशी प्रदूषित व्हायला लागतात, तेव्हा वाटतं समाजानं
स्वतःचा विचार स्वतःच करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आम्ही कशाला चांगलं
म्हणतोय? कशाला वाईट म्हणतोय? कशाच्या आधारे गुणवत्ता
ठरवतोय? आम्हाला नेमकं करायचं काय, सातत्याने चालायचं की ऊर
फुटेस्तोवर धावायचं आणि पोहोचायचं कुठे?
गोंधळलेले मन शांत होऊन
निश्चित निर्णय घेण्यासाठी, आत्मविश्वासाने सुयोग्य
पावले उचलण्यासाठी आधी स्वत:ची संगत धरली पाहिजे.
स्वत:ला ओळखले पाहिजे. व्यक्ती, कुटुंब, संस्था, समाज, प्रदेश आणि देश या सगळ्याच पातळ्यांवर संगत धरताना आपल्याला
सजग राहावे लागेल. व्यक्तीपासून देशापर्यंत वर उल्लेख केलेल्या प्रत्येकच घटकाचा एक
विशिष्ट स्वभाव असतो. त्या स्वभावानुसारच तो चालू शकतो. तसा चालला तरच ‘स्वधर्म’
सांभाळला जातो. स्वधर्म सोडून वर्तन व्हायला लागले की काय घडते, हे भारतीयांना सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इतरांची
संगतही अशीच धरावी जी आपला स्वधर्म सोडायला भाग पाडणार
नाही. चुकीच्या संगतीतील नकारात्मक ऊर्जा
आपल्यावर एकप्रकारे हल्ला करते. त्यामुळे पावलोपावली आपली संस्कृती आपल्याला जे
अनेक विधिनिषेध सांगते त्यामागचे मर्म कळायला लागते.
कलियुगाच्या नावाखाली, चुकीच्या गोष्टीना ‘हे
असंच चालते सगळीकडे’ असे म्हणत आओ मिलीभगत करूनच
जगायचे ठरले तर ऱ्हासास आणि पर्यायाने विनाशास आपण जबाबदार ठरू. ज्या जगात आमची मुलं वावरणार आहेत ते जग आम्ही
सुंदर केलं नाही तर आमच्या मुलांचं भविष्य सुंदर आणि सुरक्षित राहू शकत नाही. समाज म्हणून
चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करण्याची, समाज म्हणून चुकीच्या गोष्टींवर बहिष्कार
टाकण्याची, समाज म्हणून सगळे भेद विसरून अत्यंत
सामर्थ्यशाली पद्धतीने माणूस म्हणून उभी राहण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. काळ आम्हाला
सावध करतोय. या काळाच्या हाका जर आम्ही नाकारल्या तर आयुष्याची असंवेदनशीलता
आणि मूल्यहीनता वाट्याला आलेल्या जगात आपल्या मुलांना वावरावे लागेल. बऱ्याच वेळा आपले
मूल्यमापन केले जाते ते आपल्या संगतीवरून. टोपलीतला एक जरी आंबा सडका असला तर
चांगले आंबेही नासून जातात. इतर आंब्यांमुळे तो एक आंबा चांगला झाल्याचे ऐकिवात
नाही. म्हणून सुसंगती ‘सदा’ घडो !
वृंदा आशय

खूप छान लिहिलं आहेस वृंदा
ReplyDeleteताई फारच छान लिहीलंय, अंतर्मुख झालो वाचतांना…
ReplyDeleteखुप सुंदर.
ReplyDeleteआपणा सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!
ReplyDeleteछान लिहितेस 👌👌
ReplyDeleteछान
ReplyDelete