Friday, 23 July 2021

गुरुपौर्णिमा : अनुभवाचे चांदणे

गुरुपौर्णिमा : अनुभवाचे चांदणे.....

नमस्कार ! रसिक वाचकांसाठी मी घेऊन येत आहे, दुसरा ब्लॉग ‘प्रासंगिक या शीर्षकाने. बऱ्याच वेळेला मला तुमच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलावे वाटते. मात्र ‘योग रहस्य’ या ब्लॉगमधील योगसूत्रांमध्ये खंडही नको, आणि इतर विषय मध्ये आणून त्याचा प्रवाहही बदलणे बरं वाटलं नाही. त्यामुळे ‘प्रासंगिक’ हा दुसरा ब्लॉग सुरु करत आहे. नावाप्रमाणेच इथे कधीतरी भेटायला येईल. कधी काही वेगळं सुचलं, खूप उत्कटत्वाने काही बोलावे वाटलं, तर अवश्य इथे भेटूयात. आजचं निमित्त गुरुपोर्णिमा !       

‘गुरुपौर्णिमे’चा उत्सव प्रत्येक माणसानं साजरा केला पाहिजे. कारण हा उत्सव असतो आपल्या स्वत:च्या घडण्याचा. उत्सव असतो आपल्याला घडण्याची संधी देणा-यांविषयी आणि घडवणा-यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. कृतज्ञतेचा अभाव कृतघ्नता निर्माण करतो. म्हणून कृतज्ञतेचा हा उत्सव साजरा करता आलाच पाहिजे.

‘फॅशन की इस दौर में गॅरेन्टी की इच्छा न करे’, असं स्पष्टपणे सांगितलेले असतानाही आपण टिकाऊ, उत्तम दर्जाच्या आणि ब्रँडेड वस्तूंचा शोध घेतोचना. मग जो माणूस वर्षानुवर्षे, दशकानुदशके या समाजात वावरतो, ज्याच्या अस्तित्वाचा सकारात्मक – नकारात्मक परिणाम त्याच्या सभोवतीच्या माणसांवर, परिसरावर घडत असतो त्याची घडण जाणीवपूर्वक घडवणं हे तर फारच आवश्यक आहे, नाही का? या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या घडण्याचं आत्मपरीक्षण, घडवल्या जाणा-या प्रक्रियेचं निरीक्षण आपल्याला करता येतं. ते केलं पाहिजे. हा संस्कार माझ्यावर झाला तो माझे काका कै. ना. वि. देशपांडे यांच्या वर्तणुकीतून आणि कार्यकर्तृत्वातून. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !

या जगामध्ये, आपले आई-वडील हे आपले पहिले गुरू होत. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझे आई-वडील, सौ. जयश्री देशपांडे आणि श्री. विजय देशपांडे यांना साष्टांग दंडवत घालते. कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलंच वागायचं हे व्रत ते आयुष्यभर जोपासत आलेत, त्यातूनच मनाच्या निर्मलतेचा वारसा आम्हा भावंडांना, त्यांनी सहजतेने दिला. माझ्या सासूबाई सौ. रंजना जोशी आणि सासरे श्री. चंद्रकांतराव जोशी यांनी प्रत्येक कामात माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून, सातत्याने प्रोत्साहन देत मला साथ दिली, चुकलं-माकलं माफ करून नव्यानं शिकवलं तेंव्हा या गुरुंनाही दंडवत ! मला तंत्रज्ञान शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे आणि शेवटी माझे संबंधित कामं स्वत:च करून देणारे माझे पतिराज, श्री. आशय जोशी यांची मी ऋणी आहे.

आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतात, जी आपल्याला घडवण्यामध्ये मोठाच हातभार लावतात. औपचारिक शिक्षणातही असतात आणि अनौपचारिक जीवनातही असतात. मला अजूनही आठवते, माझी पहिली शाळा, शिशुविहार! देशपांडे बाईंसोबत हात धरून आम्ही शाळेमध्ये जायचो. त्यांची सुट्टी की आमचीही बुट्टी असायची. छोट्या स. भु. शाळेमध्ये जोशी मॅडमनी केलेले स्वागत, आजारपणात कुलकर्णी मॅडमनी केलेली मदत, या सगळ्या गोष्टी मनामध्ये स.भु. बाबतचा जिव्हाळा पहिल्यापासूनच निर्माण करून गेल्या. शारदा मंदिर कन्या प्रशालेत अभ्यासाचे विशेष वेड लावलं ते, आमच्या मराठीच्या न्यायाधीश बाईंनी. सगळ्याच शिक्षिका प्रोत्साहन देणा-या. कथाकथन, काव्यवाचन, निबंध, वक्तृत्व अशा अनेक स्पर्धांसाठी तयारी करून घेणा-या, कौतुक करणा-या आणि चुकलं की वेळप्रसंगी कानही पिळणा-या. अशा सगळ्या शिक्षकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष, श्री. गोविंदभाई श्रॉफ, प्राचार्य जीवन देसाई सर आणि आम्हाला त्यावेळी शिकवणारे सर्व गुरुजन आणि स.भु.चे समृद्ध ग्रंथालय यांचा माझ्या घडण्यामध्ये मोठा हातभार आहे. पुणे विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर आणि त्यांच्या सोबतच्या संपूर्ण स्टाफनी केलेली मदत, विशाल जयकर ग्रंथालयानी दाखवलेला मार्ग, मोलाचा ठरलेला आहे. इं. भा. पा. महिला कला महाविद्यालयात डॉ.लता मोहरीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करत असताना गुणवत्तेच्या आग्रहाची बीजे आपसूक पेरली गेली.

या सगळ्या प्रवासात, प्राचार्य राम शेवाळकर सर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांच्या व्याख्यानांनी आणि विचारांनी मनाची मशागत केली. त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन आयुष्य रसरशीतपणे जगण्याची प्रेरणा देऊन गेले. श्री. अरविंद केंद्राच्या प्रा. रामेश्वर राठी सरांनी ही प्रेरणा आयुष्यभर जोपासायला शिकवली. तन-मनाचा मेळ असला तरच तन्मय होता येतं हा संस्कार केला, योग विद्या धामचे कुलगुरु श्री. विश्वासराव मंडलिक सरांनी आणि गुरुमाता पोर्णिमाताईंनी. ज्यांच्या नजरेचाही धाक वाटावा असे मा. न्या. नरेंद्र चपळगावकर सर आणि प्रा. डॉ. सुधीर रसाळ सर जबाबदारीची जाणीव करून देत गेले. त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनी तन्मयतेने कार्यरत व्हायला शिकवले.  

मी व्याख्याता म्हणून रुजू झाल्यापासून स.भु. शिक्षण संस्थेच्या तीन अध्यक्षांचा आणि स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तीन प्राचार्यांचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला. माझ्या जडण-घडणीला त्यांनी पैलू पाडले. कै. बापूसाहेब काळदाते सरांचे बैठकीतले खडे बोल कर्तव्याबाबत कायम जागरूक ठेवायचे. कै. प्रा. दिनकर बोरीकर सरांनी तर कामाच्या इतक्या संधी दिल्या की स्वत:लाच स्वत:चा परिचय होत गेला. विद्यमान अध्यक्ष मा. रामचंद्र भोगले सर यांचा कामातील नेमकेपणा, अचूकता, वेळेचा काटेकोरपणा, आणि वास्तववादी दृष्टी, काम कसे करावे, याचे माझ्यावर संस्कार करत जाते. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश राठी सर तर इतकं भरभरून कौतुक करतात की माझं बालपण माझ्याजवळ रेंगाळत राहतं.

प्राचार्य डॉ. बी. वाय. क्षीरसागर सर यांच्या काळात माझी नोकरीच नवीन होती. ज्या आत्मीयतेने आणि करारीपणाने त्यांनी अनेक गोष्टींची ओळख करून दिली, त्यातून कर्तव्य आणि हक्क या दोन्हींचेही भान विकसित होत गेले. प्राचार्य  डॉ. जे. एस. खैरनार सर यांच्या काळात स्वत:च्या क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळाली. अर्थात सरांनी दाखवलेला विश्वास त्यापाठीमागे होता. विद्यमान प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर यांची नियोजन क्षमता अफाट आहे. योग्य काम आणि योग्य माणूस यांची सांगड घातल्यास गती वाढून प्रगती होते, हे त्यांचे सूत्र आहे. गुणवत्तेशी तडजोड न करणारी त्यांची वृत्ती महाविद्यालयाची प्रगती साधेल. स. भु. शिक्षणसंस्थेने जोपासलेली मूल्यनिष्ठा विद्यार्थ्यांपर्यंत पाझरत गेली आणि ‘मूल्यनिष्ठेची जोपासना’ ही स.भु.ची ओळख बनली.

स.भु.च्या बाहेरही मला खूप काही शिकायला मिळाले. कलावती आईंच्या उपासनेतील हस्तक काकू, या उपासनेमधील सोपेपणा आणि काकूंच्या स्वभावातील गोडवा यांनी देवाविषयीचं मनातलं प्रेम वाढवले. गोरटे येथील दासगणू परिवाराच्या गार्गी ताई आणि सर्व उच्चशिक्षित उपासकांमुळे ‘बुद्धी’ आणि ‘भक्ती’ यांचा कसा सुंदर मेळ घालता येतो, याचा प्रत्यय आला. वैद्यकशास्त्रातले डॉ. प्रदीप गुजराती आणि वैद्य शंतनू मुळे यांच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या पद्धतीने, कार्यशैलीने आणि रुग्णांबाबतच्या जिव्हाळ्याने मला प्रभावित केले. ‘स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थे’चे अध्यक्ष डॉ. सु. भि. वराडे यांच्या स्मरणशक्तीने, व्यासंगाने आणि कार्याशी व्यक्त होणा-या बांधिलकीने मला स्तिमित केले. ‘भारतीय शिक्षण मंडळा’चे श्री. मुकुलजी कानिटकर यांच्या कणखर भूमिकेने, अभ्यासाने मी अवाक् झाले. ‘पुनरुत्थान विद्यापीठा’च्या कुलगुरु मा. इंदुताई काटदरे तर मला ज्ञानाचे तीर्थक्षेत्रच वाटतात !  या विद्यापीठाकडे मला बोट धरून घेऊन जाणा-या कै. ल. का. मोहरीर सरांना तर मी विसरूच शकत नाही. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे गुरुवर्य डॉ. प्रभाकर मांडे सर आणि अखिल भारतीय पातळीवरचे संघटक श्री. श्रीधरजी पराडकर सर मला कार्यरत ठेवणा-या आणि आशीर्वचन देत राहणा-या अमोघ शक्ती आहेत.

घडवणा-या या सगळ्या गुरुजनांमध्ये मला एक समान धागा सापडला – तो म्हणजे ते ‘अनुभव’ घेऊ देतात. अनुभवाला कसे हाताळावे, कसे सामोरे जावे याचं मार्गदर्शन करतात. काहीही झाले तरी घाबरू नका, माघारी फिरू नका, आम्ही सोबत आहोत, पाठीशी आहोत हा विश्वास निर्माण करतात. आणि ‘अनुभव हाच गुरू’ यावर एकसाथ शिक्कामोर्तब करतात.

अनुभव हाच खरा गुरू आहे, पण केंव्हा? अनुभवाकडे अर्थात होऊन गेलेल्या गोष्टींकडे, ( भू-भव – होणे, घडणे ; अनु – मागोमाग जाणे) आम्ही डोळसपणे पाहतो तेंव्हा. विचक्षण बुद्धीने त्या अनुभवाचे विश्लेषण करतो तेंव्हा. त्याच त्या गोष्टी साचेबद्धपणे न उगाळता त्यातून नवीन काही शिकण्याची तयारी ठेवतो तेंव्हा. कामावर कोणासाठी अवलंबून न राहता स्वत:च सगळे करतो तेंव्हा. इतरांच्याही अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवतो तेंव्हा. मला आलेला नसेल तरी दुस-याला आलेला कोणत्याही क्षेत्रातला अनुभव खरा असू शकेल, ही श्रद्धा बाळगतो तेंव्हा. केवळ माहिती गोळा न करता, कौशल्य अवगत करून त्याचे ज्ञानात रुपांतर करतो तेंव्हाच ‘अनुभव हा खरा गुरू होतो’. तो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरताना तंत्रज्ञानाला आपल्यावर स्वार होऊ न देता त्याला साधन बनवता आले पाहिजे म्हणजे आयुष्य अनुभवानं सधन होतं. ही सारी सृष्टी, तिच्याशी निगडित आमच्या प्रथा – परंपरा आमची गुरुमाऊलीच आहे. या गुरुमाऊलीने संस्कृतीचे सार-संचित आमच्या हाती दिले आहे. आमचे नातेवाईक, मित्रपरिवार, सगेसोयरे यांच्या साथीने या संस्कृतीमध्ये आम्ही जगतो आणि जागतोही!

हे सगळे घडण्यासाठी अनुभव घेण्याची, सर्वस्व झोकून देऊन प्रत्येक काम परिपूर्ण करण्याची सवय स्वत:ला लावावी लागते. वयासह वाढत जाणारी ही ‘सवय’ माणसाला प्रगल्भ करते. सहजतेकडे नेते. तो त्याचा स्वभाव घडवते. हा स्वभाव ‘भव’ आणि ‘भाव’ यामध्ये ऐक्य घडवतो. हा भाव परमेश्वरचरणी अर्पण करता आला की आयुष्याचं सोनं होतं. हा परीसस्पर्श गुरू करतात, म्हणून सर्व गुरुंना मनोभावे वंदन!

वृंदा – आशय    

 

 

  

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...