Monday, 14 July 2025

चिठ्ठी ना कोई संदेश....






 

युट्युब वर गाणे ऐकत होते. त्यात जगजीत सिंग यांची चिठ्ठी ना कोई संदेश’ ही गल ऐकली. ती मला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेली. आयुष्य मावळलेल्या काही स्त्रिया आठवल्या आणि ज्यांच्या जोडीदाराचे आयुष्य मावळले, अशाही काही स्त्रिया आठवल्या. त्यांच्या माझ्या वयातील अंतर साधारण ४०-५० वर्षांचे असावे. आयुष्य फार उशिरा उलगडत माणसाला. ..ऐकलेली एक जुनी कविता आठवली

मन वाचावे पाण्याचे, क्षण वेचावे गाण्याचे  

मग लागते कळू, हळूहळू अंतरंग हे जगण्याचे

 जगण्याचं हे अंतरंग समजून घेण्यासाठी खरोखर फार वेळ जावा लागतो. संघर्ष व्हावा लागतो, एकमेकांवरचा अविश्वास, संशय, तू तू – मी  मी मग त्यातून पुढे फुलणारा विश्वास, ‘तुझ माझ्याशिवाय आणि माझं तुझ्याशिवाय काही होऊ शकत नाही’, हे जडणारतू नात आणि मग त्या बहरलेल्या, पिकलेल्या संसाराला लागलेली गोड फळे; असं काहीसं चित्र मला माझ्या सभोवती बघायला मिळतं.

 आपल्या पुरुषत्त्वाचा आयुष्यभर अहंगंड बाळगणारे, ‘माझ्या पत्नीवरती मी माझा अधिकार गाजवतो आहे, ती माझी आहे आणि म्हणून मी तिला हवं तसं वागवू शकेल, मी तिला मारझोड करू शकेल, मी तिला टाकून बोलू शकेल, मी तिचा अपमान करू शकेल’, अशा एका विचित्र मानसिकतेने जगणारे पुरुष जेव्हा पत्नी आयुष्याच्या सांजवेळेकडे झुकायला लागते; क्वचित प्रसंगी रुग्णालयामध्ये अखेरच्या घटकांसाठी भरती होते; त्या वेळेला हातबल होताना आणि तिच्याशिवाय माझं काहीच खरं नाही असं अनुभवताना खूप जवळून पाहिले आहेत. काही वेळेला रुग्णालयामध्ये असलेले पुरुषही आयुष्याकडे मागं वळून पाहताना, खरंच आपण किती चुकलो! आपल्या साथीदाराने आपल्याला किती भक्कम साथ दिली, याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सुद्धा पाहिले आहे. अगदी सिंहासारख्या छातीनं सातत्याने वावरणारे पुरुष जेव्हा एखाद्या कमळात अडकलेल्या भुंग्याप्रमाण संवेदनशील होतात, आपल्या साथीदाराच्या प्रेमाबद्दल, त्यागाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करायला लागतात; तो क्षण आयुष्याचा फार सुंदर क्षण असतो ! फक्त एवढंच वाटतं, आयुष्याने इतकं सरतासरता एकमेकांचं महत्त्व पटवून देण्यापेक्षा, थोडं आधी पटवून दिल तर आयुष्य अधिक सुकर, सुलभ आणि आनंददायी होऊ शकत.

 अशाही काही जोड्या आहेत की ज्यांनी सुरुवातीपासूनच एकमेकांप्रती प्रेम, विश्वास, समर्पण व्यक्त केले. मग त्यांना स्वतःच्या संसारासाठी संघर्ष करावा लागत नाही. ते एक ताकद होऊन उभे राहतात, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ! त्यांचा संसार हा खऱ्या अर्थाने अनेकांना सोबत घेऊन जाणारा, वेगळी दिशा देणारा, अनेकांचे कल्याण करणारा असा होतो.

 हे दोन टोक ज्या वेळेला मी पाहते आणि आजची युवा पिढी पाहते तेव्हा त्यांना सांगावं वाटतं, अरे पाऊल तर उचला. चालायला लागा. आपल्या हृदयात दुसऱ्याला थोडी जागा द्या आणि मग बघा आयुष्याची खुमारी कशी वाढायला लागते. फक्त मी’, माझं जीवन’, माझी स्पेस’, माझं करिअर’, माझा पैसा’ याचभोवती घुटमळत राहू नका. आजच्या काळात मुले आणि मुली दोघही या टोकाला जाताना दिसतात. मी’, मी पेक्षा थोडस जेव्हा आम्हीबद्दल बोलायला लागतोना तेव्हा आयुष्याचं अंतरंग खुलं व्हायला लागतं. अहो, आम्ही हा शब्द लिहायचा म्हणला तरी  मी चा निदर्शक असलेला ‘म हलन्त करावा लागतो, त्याचा पाय मोडावा लागतो, त्याला अर्ध्यावर आणून ठेवावं लागत. मग खऱ्या आयुष्यामध्ये जर आपण थोडासा अहंकार सोडू शकलो, थोडी दोन पाऊल पुढे जाऊ शकलो तर या आम्हीतला गोडवा या विरघळलेल्या अहंकारामध्ये आपसूकपणे जाणवायला लागतो. या आम्ही’चं हळू हळू ‘आपण व्हायला लाग. कुटुंब विस्तारत जातं. माणसं हवीहवीशी वाटायला लागतात. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे हे संत तुकारामानी आणि ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ हे ग.दि. माडगुळकर यांनी जीवनाचे सनातन सत्यच सांगितलेले आहे. मात्र त्यातून जरतारी वस्त्र विणण्याची किमया ‘कुटुंब’च करू शकते.

कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. ती विस्कळीत झाली तर आपलं जगणं सुखकर आणि आनंददायी होच शकत नाही. कारण आपल्या देशाचा स्वभाव हा ‘कौटुंबिक जीवन आणि ‘सामाजिक जीवन’ हे समांतर असावं, एकमेकात मिसळूनच चालावं अशा प्रकारचा आहे.पल्या नजीकच्या काळातला इतिहास आपण पाहिला तर अनेक कुटुंब त्याची साक्ष देतात. त्यांच्या त्याग आणि समर्पणाने समाजाची उंची वाढलेली आहे, समाजाचे प्रश्न सोडवून विकासाची गती वाढवलेली आहे. मग आपला स्वभाव सोडून जगणं आपल्याला परवडेल का? एकत्र कुटुंब पद्धती कडून, विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण आलोत. या विभक्त कुटुंब पद्धती कडून एकल माणसाच्या आयुष्याकडे आपण येणार आहोत का? आणि असेच जर येणार असू तर मानसिक आजारांचे बळी आपण फार लवकर ठरणार आहोत. हे टाळायचं असेल, आयुष्य फुलवायचं असेल तर थोडासा मी पण सोडा आम्हीपणा जपा आणि मग बघा आयुष्य कसं सुगंधी होते ते !

अगदीच आयुष्य संपल्यावर चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहा तुम चले गए’ असे म्हणण्याची वेळ येण्याआधी, आपण जर एकमेकांशी संवाद साधला आणि पुढच्या ठेच मागचा शहाणा या न्यायाने जर पुढची पिढी शिकली तर हा समाज सुदृढ व्हायला वेळ लागणार नाही. बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा आपल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी, खुल्या मनानं सशक्त घरात आणि मुक्त आकाशात जगण्यासाठी या युवा पिढीला हार्दिक शुभेच्छा!

हे गणराया, प्रत्येक मंगल कार्य तुझ्यापासूनच सुरू होतं. आजच्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने तुझ्या चरणी एक प्रार्थना -

घडो जीवांचा संवादू |

दे विश्व हे सुखे नांदू ||

 

वृंदा आशय 

 

7 comments:

  1. अगदी खरं आहे, वेळीच प्रेमाची कबुली देणे हेच म्हणावं लागेल.

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहेस वृंदा 👌👌

    ReplyDelete
  3. खरंच आहे आयुष्य म्हणजे व्यक्त होण, संवादी, प्रवाही राहणं....!

    ReplyDelete
  4. अंतरंग खुलवण्याचे, सुगंधित करण्याचे मर्मच जणू तू सांगितलेस.... लहानांपासून थोरांपर्यंत डोळे उघडण्याचे काम हा तुझा संवाद करतो ....अश्रूंची झाली फुले !

    ReplyDelete
  5. विविध माध्यमांतून वाचकांनी आत्मीयतेने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

    ReplyDelete
  6. खुप छान, वृंदा, जिलनातल हे कटुसतय आहे,वेळ संपल्यावर च भान येत,वर्तमान कधिही सुखावह वाटत नाही,भूतकाळ सुधारता येत नाही,शेवटी सर्व भोग प्रापतनाचे,न टाळता येण्यासारखे.

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर .. आमच्या युवा पिढीला नक्कीच विचार करायला लावणारा लेख आहे..👌
    आयुष्य गीत आहे गाणे म्हणून जाऊ..

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...