Wednesday, 6 August 2025

भोळा भाव देवा ...


 श्रावण महिना लागला की सत्यनारायण करण्याचे वेध लागतात. प्रत्येकाची दिनचर्या पाहून, काम पाहून, कधी सत्यनारायण करता येईल, याची आमच्याकडे चांगलीच चर्चा रंगते. यावेळेस १५ ऑगस्टच्या आसपास करूया अशा निर्णयावर आम्ही आलो आणि अचानकपणे ०३ ऑगस्टला सत्यनारायण करण्याचं ठरलं.  सगळ्यांचीच मनं जुळली आणि सत्यनारायणाची पूजा निश्चित झाली. सुट्टी असल्यामुळे माझ्या यजमानांनी आणि लेकीने सगळ्या सामानाची जुळवाजुळव केली. भाजी तेवढी राहिली होती. “म्हणलं चला, आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भाजी घ्यायला मी जाईल”. 

घराची सगळी काही स्वच्छता झाल्यानंतर पहाटे सिग्मा हॉस्पिटल जवळ भाजी घेण्यासाठी म्हणून आम्ही गेलो. साधारण साडेआठचा वेळ असेल. तुलनेने गर्दी कमी होती, भाज्या पण कमी कमी दिसत होत्या. तेवढ्यात एका बाईने आवाज दिला. माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याच ठिकाणी भाजी घ्यावी, असं वाटलं.

 “गवार कशी दिली?"

"३० रुपये पाव."

"हिशोबाने लावा, अर्धा किलो घ्यायची आहे मला आणि बाकी बरंच काही घ्यायचं आहे अजून." 

 "बरं ३५ ला घ्या."

माझा चेहरा कसानुसा. मी म्हणलं, "दंड करताय की काय ?"

तिच्यासोबतची दुसरी नुसतीच बघत होती.

 "म्हणजे २५ म्हणायचं होतं का तुम्हाला", मीच आपलं विचारून घेतलं.

 दुसरीने पहिलीला सावध केलं. २५-२५ म्हणजे ५० रू. मिळतील बघ.

 आणि पहिली चाचरत म्हणाली, नाही मी अर्धा किलोचा भाव सांगितला! 

पण दुसऱ्या बाईने तिला सावध केल्याने आता ती सावरली होती. हो, घ्या की २५ ला. बऱ्याच भाज्या घेतल्या गेल्या. हिशोब करायला त्यांना अवघड जात होतं. तरीही नेटाने हिशोब करण्याची पद्धत पाहून  मी भारावून गेले. मध्येच हिशोब चुकला तर मी म्हणायचे, “अगं, इतके कसे झाले?”. चुकलं असेल ताई, तुम्ही पण करून बघा की, ..माझ्यावर विश्वास बसल्याचं ते सुरेख द्योतक तिच्या निरागस चेहे-यातून प्रतिबिंबित होत होतं ! “देवा, गेले यांच्याकडे १०-२० रू. जास्ती तरी काही हरकत नाही रे,” माझ्या अंतर्मनाने मला ग्वाही दिली. कारण त्यांचा मला फसवण्याचा, लुबाडण्याचा कुठेच हेतू नव्हता. उलट जेवढे आपल्या हक्काचे पैसे आहेत, तेवढेच मिळावेत, हा प्रयत्न होता. शिवाय गिऱ्हाईक हातचं जाऊ नये म्हणून देता आली तर त्यातही कुठे तरी सूट द्यावी, ही धडपड होती. क्षणार्धात पैशाच्या व्यवहाराची जागा आम्हाला एकमेकींना आनंदित करता यावे, या भावनेने घेतली आणि मी थक्क झाले! 


तिच्याकडे पालेभाजी मिळाली नाही म्हणून पुढच्या भाजीवालीकडे गेले. कोथिंबीर, पालेभाजी घेऊन झाली आणि थोडीशी ताटकळत उभी राहिले ते भुईमुगाच्या शेंगांसाठी. तिच्याकडे थोड्याच भुईमुगाच्या शेंगा होत्या. दुसऱ्या एकीने आधीच अर्धा किलो सांगितलेल्या, आणि मी ही म्हणाले अर्धा किलो द्या. तेव्हा ती बाई तिच्या नवऱ्याला सांगत होती, “या बाईंना आधी द्या आणि मग उरलेल्या त्यांना द्या”, असं ती दोनदा म्हणाली. तिथं किंचित गर्दी जास्त असल्यानं, तिच्या नवऱ्यानं, ‘काय हवंय, असं मला पुन्हा विचारलं.” तेव्हा मी म्हणलं मी शेंगांसाठी थांबले आहे. पण आधी त्यांना द्या आणि मग मला द्या. माझ्या या उत्तराने भाजीवाल्या बाईच्या चेहेऱ्यावर कौतुकाचं हसू पसरलं. ती चटकन म्हणाली, “काय करू बाई, त्यांनी आधी नंबर लावलाय ना.” 

मी त्यांना म्हणलं, "अहो, अगदी बरोबर आहे तुमचं. तसंच व्हायला पाहिजे". भाजीवालीतला हा प्रामाणिकपणा पाहून माझा जीव खरोखर सुखावला. कुठे शिकलेले आम्ही लोक रांगेत पुढे जाण्यासाठी धडपडणारे, नाना गोष्टींनी आपलाच नंबर आधी कसा लागेल, याचा सतत प्रयत्न करणारे आणि कुठे ती कमी शिकलेली बाई, न्याय मिळावा, न्याय देता यावा याच्यासाठी आग्रह असणारी!


 तिथून घरी आले. आमच्या स्वयंपाकवाल्या संगीता मावशींना फोन केला, “आज तुम्हाला सुट्टी बरं का. पण जाता जाता सत्यनारायणाच्या दर्शनाला मात्र आवर्जून या.” मावशी आनंदाने म्हणाल्या, "येऊन जाते". दर्शन घेतलं की त्यांचं सुरू, “ताई, तुम्ही सकाळची सुट्टी दिली. मी संध्याकाळी येते बरं का! अहो, त्याची काही आवश्यकता नाही, मी म्हणाले. “नाही, तुम्ही पुन्हा उद्या सकाळी उपास असल्याने सुट्टी देताल. मी संध्याकाळी येतेच बाई”. आपलं काम आपणच करावं आणि आपल्याला विनाकारण सुट्टी मिळू नये, सुट्टी मिळालीच तर त्याच्या बदल्यात इतर वेळी काम करावे ही जी जाणीव त्यांच्या ठिकाणी रुजलेली आहे, ही जाणीव मलाच जागं करून गेली. कामचुकार माणसांच्या घोळक्यामध्ये वावरत असताना मला ही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित माणसं, जीवनाचं तत्त्वज्ञान देणारी वाटतात.


 इतक्यात दारावर दुसरी भाजीवाली आली. स्वयंपाक करताकरता सासूबाई म्हणाल्या, “अगं काही हवंय का? “, मी म्हणलं “अहो आई, पोपटी मिरच्या तेवढ्या मिळाल्या नाहीत. पण त्या काही या सविता मावशींकडेही नाहीत. मग मी काही नको म्हणून सांगितलं त्यांना." “अगं, तू आणलंस आता सगळं. पण कसे आहे, आपण तिला हसून बोललो ना की, ती पण हसून बोलते. छान वाटतं बघ. एकदम नाही कसं म्हणणार ना?" जीवनाचं किती सुरेख तत्त्वज्ञान, ‘आपण जे देतो तेच परतून येतं’. या न्यायानं आम्ही जर कोणासाठी अपशब्द वापरले, चुकीचे विचार केले तर आमच्याकडे तेच परतून येणार. नाही म्हणावं पण तेही गोडी गुलाबीनं, हसून. हे शक्य नाही का?, आहे. त्याच्यासाठी मन निर्मळ ठेवावे लागेल.


 तेवढ्यात आमच्या भांडेवाल्या सविता मावशी आल्या. त्यांना मी सांगितलं, “मावशी, पंचाईत होऊ नये  म्हणून मी सकाळीच भांडे घासून घेतलेले आहेत. आमची जेवणं झाल्यावर तुम्ही दुपारी मात्र या बरं का, विसरू नका. जाता जाता या आणि प्रसादही घ्या, तेव्हा”, स्वत:ची काळजी घेत मी त्यांना आग्रहाने सांगितलं. “अरेच्चा! तुम्हाला भांडे घासावे लागले का, हा त्यांच्या चेहेऱ्यावरचा भाव मी टिपत होते तोवर, “बरं बाई, मग मी  धुणं धुऊन घेते”, असं म्हणत त्यांनी कामाला सुरुवात केली. धुणं झाल्यावर पडलेले थोडे भांडेही घासले, आणि पुन्हा दोन तासांनी बाई हजर! “मी तुम्हाला म्हणलं होतं ना, येते म्हणून!” जेवण झाल्या झाल्या पुन्हा एकदा घराची सगळी स्वच्छता झाली. “अगं, काल तिची तब्येत बरी नव्हती, तरी सत्यनारायण आहे म्हणून, तिने सगळे पंखे वगैरे पुसून दिले", सासूबाईंनी मला मध्येच सांगितले.   


भारतीयांच्या मनात हा जो प्रामाणिकपणा आहे, आणि तो जो धार्मिक संस्कारातून फुललेला आहे, तो पाहता मला वाटायला लागतं, ‘भारत राजकीय दृष्ट्या एक नव्हता, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या तो एक होता’, या विधानाचा अर्थ मला कळायला लागतो. त्याचे प्रत्यंतर मला सर्वसामान्य माणसांच्या सहज वागणुकीतून अनुभवायला मिळतं. कारण एरवी कितीही मागे लागलं, “मावशी, स्वच्छता करा, स्वच्छता करा, तरी, “बाई, मला सर्दी होती”, “बाई, मला शिंका येतात”, म्हणणाऱ्या मावशी ‘सत्यनारायण’ आहे म्हणलं, की मग मात्र, आपण, “मावशी राहू द्या, तुम्हाला त्रास होतो ना, असं म्हणलं तरी, “नाही, करते ना, उद्या तुमच्याकडे सत्यनारायण आहे. तब्येतीची कुरकुर काय नेहमीचीच”, असं म्हणून दोन कामं अधिकचे करतात. 


किती सुरेख आहे हे सगळं, जीवनाला सुंदर करणारं ! मला वाटलं होतं, ‘केवळ सत्याची उपासना माणसाला नारायणाच्या जवळ नेते, पण लक्षात आलं की माणसाच्या मनातला हा ‘भोळा भाव’ त्याला प्रामाणिकपणाच्या, सत्याच्या आणि परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातो. वारकरी संप्रदायांने उगाच नाही ‘नामभक्तीचा’ मार्ग सांगितला आणि आपलं काम करता करता, ‘सुखे येतो घरा नारायण’ हा दिलासा दिला. 


सत्यनारायणाची पूजा छान झाली, मन समाधानी झालं. जीवनातलं सभोवातीचं सत्याचं प्रतिबिंब मनाला पुलकित करून गेलं. मात्र अजून एक कटू सत्य अस्वस्थ करून गेलं. रांगोळीने सजवताना आणि जेवायला वाढताना मुलांचीही छान साथ मिळाली. जेवणं झाल्यावर मात्र कोणी आवरायचं, म्हणून आमच्या मुलांमध्ये चाललेली चुरस आणि काम कसं टाळता येईल हा त्यांचा स्वभाव दिसला, शिवाय एकाला काम सांगितलं तर दुसऱ्याने म्हणावं, “आई, तू ‘डिस्क्रीमीनेशन’ करते, तेव्हा मला वाटायला लागलं, खरोखर शिक्षण आपल्याला कामापासून, कर्तव्यापासून दूर नेते का? ‘श्रमप्रतिष्ठा’ हे मूल्य आम्ही पार विसरून गेलोत का? अशा वेळी शिराढोणकर काकूंची वाक्ये मला फार आठवतात, त्या म्हणाल्या होत्या, “अगं, तुम्ही आजकाल डबल डिग्री घेता; पण तुम्हाला झाडायची लाज का वाटते ते मला कळत नाही. घर झाडलं म्हणजे तुमचं शिक्षण गळून पडतं की काय? बाईचा वावर कसा असावा, ‘घराचा कोपरा न् कोपरा लख्ख उजळावा’, अगदी कान्या-कोपऱ्यातून तिचं अस्तित्व जाणवलं पाहिजे.” 


आपण आता थोडासा बदल करावा आणि म्हणावं, बाईचंच काय, माणसाचं अर्थात स्त्री आणि पुरुष या दोघांचंही अस्तित्व घरादाराच्या काना-कोपऱ्यातून, कार्यालयाच्या काना-कोपऱ्यातून, त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या परस्पर संबंधातून, त्यांच्या परस्पर सामंजस्यातून, परस्पर सहकार्यातून  प्रतिबिंबित झालं पाहिजे, कारण तो भारताचा स्वभाव आहे!


शिक्षण सर्वाना मिळालंच पाहिजे, यात वादच नाही. मात्र शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या नादात, त्याची गुणवत्ता आम्ही हरवून बसलेलो आहोत. टोकाच्या विचारधारांचे समर्थन करत जीवनाचे संतुलन गमावून बसलो आहोत. मी खरा की तू खरा या वादात, ‘Life is a game of 6 & 9, in his place everyone is correct & fine’ हे तत्त्वच विसरून गेलेलो आहोत. शिक्षणाचं प्रतिबिंब जीवनात पडलं तर नवल नाहीच. अडचण तिथे होते जेंव्हा आम्ही बिंबावर काम करण्याऐवजी प्रतिबिंबावरच करायला लागतो!


 जीवनात औपचारिक शिक्षणाबरोबरच, अनौपचारिक शिक्षण, पारंपरिक शहाणपण फार मोठी भूमिका 

निभावत असतात, हे आम्ही सोयीस्कररित्या विसरलेलो आहोत. आमची ढासळती कुटुंबव्यवस्था आणि विविधतेचा खुल्या मनानं स्वीकार न करता भेदांचा बडिवार माजवणारी, विस्कळीत होत जाणारी समाजव्यवस्था त्याचंच प्रत्यंतर देते.      


शिक्षणाच्या क्षेत्रात अनेकविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्याचा प्रघात आम्ही राबवलेला आहे तो ज्ञान घेण्यास ‘पैसा’ अडसर ठरू नये म्हणून. मात्र हा मूळ उद्देश विसरून आम्ही फक्त शिष्यवृत्त्यांच्या मागे धावत आहोत. ज्या वेळेला आत्म्याला विसरून केवळ शरीर सजवलं जातं, तेव्हा ते जगणं प्रेतवत  असतं, हे आम्ही का विसरतोय? आमची ज्ञानसंस्कृती ही ‘गुरुकुल’ संस्कृती आहे. आमच्याकडे ‘भक्ती चळवळ’, ‘प्रबोधन चळवळ’ ज्यांनी केली ते ‘संत’ आणि ‘समाज सुधारक’ ज्ञानाचे उपासक होते. ‘जितुका भोळाभाव तितुका अज्ञानाचा स्वभाव’, अशी स्पष्ट चेतावणी आम्हाला १६-१७ व्या शतकातच मिळाली. तरी २१ व्या शतकातही शहाणं न होण्याचा विडाच आम्ही उचललाय की काय? आमच्यातला भोळा अर्जुन, गोंधळलेला अर्जुन आम्ही किती काळ जोपासत बसणार आहोत? तक्षशिला आणि नालंदासारखी समृद्ध ज्ञानपरंपरा आम्हाला होती, तेव्हा सगळे जग आमच्या पायाशी लोळण घेत होतं. आज जगाच्या बाजारीकरणामध्ये उतरून आम्ही जर या ‘ज्ञाना’ची उपेक्षा करणारा असू तर मानवी जीवनाला ज्ञानक्षेत्र शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाला त्याच्या सामर्थ्याची आठवण देणा-या आर्य चाणक्यांची आज इथे नितांत आवश्यकता आहे. मात्र चाणक्य पुन्हा जन्माला येणार नाहीत. ते आमच्या संस्कृतीने, आमच्या शिक्षणाने आमच्यामध्ये पेरलेले आहेत; ते चाणक्य आम्हाला जागवता आला पाहिजेत.


समाजजीवनाच्या एका प्रचंड मंथनानंतर आम्ही ज्ञानाच्या सहाय्याने तरून बाहेर आलेलो आहोत. आज मात्र चंगळवादात स्वत:ला हरवून बसत आम्ही सत्य, सौंदर्य, मांगल्य आणि ज्ञानाचे पावित्र्य जीवनातून वजा करून बसलो आहोत. ‘ज्ञानापासी प्रेम चांग’ हे सांगणारा मार्ग सर्वसामान्य माणसाला कठीण अशा मुक्तीचे दरवाजे सहजतेने उघडून देतो. कारण, ‘सा विद्या या विमुक्तये’ ही आमची दृढ श्रद्धा आहे.


प्रेमाचे लक्षण 

भारी विलक्षण 

जैसी ज्याची भक्ती

तैसा नारायण 


हा मंत्र मानणारी भारतीय संस्कृती ज्ञान, भक्ती, वैराग्यातून सायुज्य मुक्तीकडे नेते, हे  शाश्वत सत्य  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळातही खरंच आहे. 


मानवापासून महामानवापर्यंतचा जो प्रवास, आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून याच देशात घडलेला आहे; या प्रवासानं भारतीय संस्कृतीला जे दान दिलेले आहे ते दान स्वीकारण्याची पात्रता आम्ही आमच्यात निर्माण करणार की नाही?


 या ठिकाणी शिक्षणच पुन्हा एकदा आपल्याला दिशा देऊ शकेल. 'कळी काळासी दरारा' वाटावा अशा पद्धतीने चरित्र आणि चारित्र्य जोपासून आम्हाला उभं राहावं लागणार आहे. 


 स्वार्थ साधना की इस आँधी में

 वसुधा का कल्याण  न भूले !


या मागणीला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागणार आहे.


 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम'  हे त्रिवार सत्य आहे. हे सत्य जागवलं पाहिजे. वर्ग ओस पडतात, प्राध्यापक उदास होऊन बसतात,  आणि ज्ञान कोसो दूर निघून जातं, हे चित्र आता फार काळ चालणार नाही. प्राध्यापकांच्या पगारावर बोलणारा समाज आपल्या पाल्यांच्या उपस्थितीवर प्रश्न निर्माण करणार की नाही ? आपल्याला आपला पाल्य घडवायचा आहे का आपल्या पाल्याचे कागदपत्र घडवायचे आहेत ?


आमचा पाल्य हा त्याच्या क्षेत्रातला मानदंड असावा, हीच त्याची खरी ओळख.  संत ज्ञानदेवांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करताना 'घरोघर ज्ञानेश्वर वाढती' ही भूमिका घेऊन भारतीयांनी ज्ञानाचीच उपासना करत राहावी.


अगा ज्ञानदेवा,

दे मज 'पसायदान' हे!


वृंदा आशय



 

2 comments:

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...