Tuesday, 9 September 2025

.......ती प्रीत तू मागू नको

 


आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रिम वाटतो. वा. रा. कांत यांनी ज्या अलवार मनाने, संवेदनशीलतेने, नाजूक -साजूक शब्दांनी भावगीते लिहिलेली आहेत,  त्यांचा आस्वाद घेताना तर 'पुण्यतिथी' हा शब्द तर मला फारच जड वाटायलालागतो.  असो, वा. रा. कान्ताना आठवूयात आणि त्या सुरेख , सुरेल आठवणीत हरवूयात, एवढेच या निमित्ताने मी म्हणेल.  वा. रा. कांत आपल्या नांदेडचे. त्यांचा जन्म आणि प्राथमिक , माध्यमिक शिक्षण तिथलेच. पुढचे इंटरपर्यंतचे शिक्षण मात्र हैद्राबाद येथे झाले. पुढे सरकारच्या आकाशवाणी केंद्रात मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. १९७० साली मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी 'विहंगमाला' या  नियतकालिकाचे संपादन देखील केलेले आहे. १९३० ते  १९८८ या काळात त्यांचेजवळपास १० काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची भावगीते सुधीर फडके यांच्या आर्त आणि गोड गळ्यानेअजरामर केलेली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ वाड्मयसेवेसाठी महाराष्ट्र  शासनाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. इतका श्रेष्ठ साहित्यिक अभ्यासक्रमात मात्र क्वचितच सापडतो. आज वा.रा. कांतांना आठवताना मला आठवते त्यांची ती कविता, 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' कवी वा. रा. कांत यांनी इतक्या नजाकतीने  प्रेमाला या कवितेतून व्यक्त केलेलं आहे की, खरोखर  ही कविता उकलण्याला घ्यावी, तिच्याबद्दल काही लिहावं याच्यासाठी मन धजावत नाही. एखादी  गुलाबाची नाजूक कळी नुकतीच फुललेली असावी आणि आपण तिच्या पाकळ्या मोजाव्यात; अशी काहीशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. त्या पाकळ्यांना स्पर्श करताना त्यांचा जो मऊ लुसलुशीतपणा, ताजेपणा त्यांचा गंध आपल्या मनभर पसरत जातो आणि नकळत अंग शहारतं, तशी अवस्था ही कविता वाचून आणि सुधीर फडके यांच्या गळ्यातून ऐकताना होऊन जाते. हे जे वाचकाचं, श्रोत्याचं, रसिकाचं भावविभोर होणं आहे ; हे जेव्हा कवीला साधतं त्यावेळेला त्याची कविता काय उंचीवर गेलेली असते, याची कल्पना आपण खरोखर करू शकत नाही. एक अप्रतिम असा कलात्मक आविष्कार वा.रा.कांत यांच्या या काव्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो. ही कविता वाचत जाताना, हे गाणं ऐकताना आपल्याला लक्षात येतं,  "अगदी सुरुवातीचं, 'नवथर' असं प्रेम या कवितेतून व्यक्त झालेलं आहे. कळी फुलताना, मुलं वयात येताना प्रेमाची जी नाजूक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्या प्रेयसी सोबत, प्रियकरा सोबत या सुंदर भावनेचा जो पहिला अनुभव ते घेतात त्या पहिल्या अनुभवाचं शब्दीकरण किंवा पहिल्या अनुभवाला शब्दात पकडण्याचं विलक्षण कौशल्य कवीने दाखवलेलं आहे. सांजवेळी चाफ्याकळीचे 'चुटपुटीचे भेटणे'; पानजाळीतून झिरपणारे 'बावरेसे चांदणे'; या प्रतिमांमधून हे नजाकतीने व्यक्त होतं.

तिनं नि:श्वास टाकताच 'पाकळ्यांचे शब्द' व्हावेत आणि 'देहाची सतार' व्हावी ही कल्पना तर  अफलातूनच ! 

पण या कवितेची मेख इथेच आहे. कवी कवितेच्या सुरुवातीला सांगतोय, आपल्या प्रेयसीची कुठेतरी समजूत घालतो आहे, 'पूर्वीची प्रीत तू मागू नकोस', कालच्या फुलांचे शब्द, हळव्या क्षणातल्या चांदण्यांचे स्पर्श आणि देह सतारीचे गीत तू मागू नकोस. कधीही भुरळ घालणारं, हवंस वाटणारं, मोहात पाडणारं, आकर्षित करून घेणारं हे प्रेयस कवी का नाकारतो आहे ? आयुष्याच्या अशा कोणत्या वळणावरून तो या मधाळ आठवणींकडे पाहतो आहे ? कविता पुढे वाचत असताना अगदी सहजच जाणवतं संसारातली सुखदुःख भोगून झाल्यानंतर, जगाच्या व्यवहाराचे टक्के टोणपे खाल्ल्यावर  एक आलेलं जे वैराग्य आहे, जीवनाबाबतची उदासीनता नाही म्हणता येणार पण डोळ्यातून आसवं न गाळता पचवलेले आयुष्याचे घाव आणि मग त्या सुखाचं झालेलं मीठ आयुष्याची लज्जत वाढवत आहे; अशा एका वळणावरती ते आहेत. अगदी सहजच 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले', ही  मनाची स्थिती झालेली आहे, हे सहजतेने लक्षात येते . आणि मग 'तो मोत्यांचा चारा आता मागू नको' अशी आपल्या हंसिणीला, प्रेयसीला कुठेतरी विनंती होते. 

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का? हा कवीचा प्रश्न रसिकाच्या काळजाला हात घालून जातो. मुळामध्ये बोलण्याची जी प्रक्रिया घडते, ती प्रक्रिया उच्छ्वास टाकताना अर्थात माणूस श्वास सोडत असताना. मात्र त्या श्वासभराने आठवांचं ते शीतल, दुधाळ चांदणं ढवळेल का, हा प्रश्न कवीला सतावत आहे; आणि कदाचित तो मौन स्वीकारण्याकडे झुकतो आहे. एकदा उमलून , फुलून सर्वस्व अर्पण केलेल्या आणि परिस्थितीनं अकाली कोमेजलेल्या या फुलाला प्रश्न पडला आहे, आता पुन्हा फुलण्याची संधी आहे मात्र ते 'फुलणं' या फुलाला सोसवेल का ? कारण आता वय बदललेलं आहे. आयुष्याच्या सांजवेळेकडे आपण झुकत चाललेलो आहोत, मग आता फुलावं का ? कदाचित त्याचा सद्सदविवेक हे फुलणं नाकारतो. आणि बिनदिक्तपणे तो आपल्या प्रेयसीला सांगतो -

नीत् नवी मरणें मराया जन्म तूं मागू नको.

पण मला वाटतं, परिस्थितीने हताश झालेल्या, व्यवस्थेने होरपळलेल्या,या समाजात राहून वाढणाऱ्या, स्वतःला घडवणाऱ्या माणसानं मुळातच 'प्रेम' ही माणसाला अमर करणारी गोष्ट आहे, प्रेम संजीवक आहे हे विसरू नये, आणि प्रेमाला नाकारू नये. फक्त आवश्यकता असते, ते प्रेम निखळ, निर्मळ आणि नितळ असण्याची ! मग सहजच म्हणता येतं - 

ना उम्र की सीमा हो 

ना देश का हो बंधन 

जब प्यार करे कोई 

तो देखे केवल मन

 असं कोणाला म्हणता येतं? काय हे फक्त गाण्यात आणि चित्रपटातच असू शकतं की वास्तवातही घडू शकतं? वा. रा. कांतांची ही कविता विचारांच्या अशा अनेक दिशा मला देऊन जाते. आणि कदाचित एका अशा उत्तरापर्यंत पोहोचवते, जिथे समाजाची मानसझेप जाणं अत्यावश्यक आहे...

त्या नत्याला नसते नाव 

त्या जीवांना नसतो गाव

तेथ केवळ मधुर भाव !


वृंदा आशय


   

Saturday, 6 September 2025

एक पत्र विसर्जित्या बाप्पास.....

 




प्रिय गणेशा,   

तुझ्या सहवासात १० दिवस किती पटकन गेले रे! आला आला, बसला म्हणेस्तोवर विसर्जनाचीही वेळ आली की! किती काय काय घडलं या १० दिवसात. माझ्यासाठी तर खूप काही....तू येण्याच्या आधीपासूनच असे काही पडघम वाजू लागले की बघता सोय नाही. तुझ्याशिवाय थाराच राहिला नाही रे मला. कधीही न बोलणारी मी अनेकांशी बोलले. ‘दुर्लक्ष करा’ याशिवाय दुसरे उत्तरच नव्हते कोणाकडे. जिथे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, तिथे दुर्लक्ष! हे माझ्या गणितात बसणारे नव्हते... आणि कदाचित तुझ्याही....म्हणून तू माझ्या कवितेतून सांगत आलास -

अवमानिली जाता माता

कृद्ध  होतो बुद्धिदाता

म्हणे .....

कृष्ण रुपात प्रकटेल आता !

तू माझ्यासाठी धावून आलास, कृद्ध होऊन घेतलंस कृष्णरूप आणि सिद्ध केलंस आजही जागृत आहेस म्हणून! आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होताना लज्जारक्षण करणारा तूच, याची ग्वाही तू दिलीस. काळाला तू तुझा रारा पुन्हा एकदा दाखवून दिलास. तुला प्रार्थना एकच आहे; आलास कृष्णरुपात जाऊ मात्र कृष्णासारखा नकोस. स्वकुळात यादवी माजू देऊ नको. तुला प्रार्थना आहे, तू विसर्जन कर माणसाच्या अहंकाराचं! खरं म्हणजे तू इतका शस्त्रसज्ज आलेला होतास की माणसाच्या अहंकाराला नेस्तनाबूत करून त्याला धडा शिकवण, तुला कधीच अशक्य नव्हत आणि नाही. मात्र तू देव आहेस आणि म्हणून देवानं माणसासारखं वागू नये. देवानं सूड उगवू नये. देवानं फक्त धडा द्यावा माणसाला धड राहता यावं यासाठी!  

देवा, म्हणूनतुला प्रार्थना आहे तू विसर्जन कर साहित्य, संगीत, शिक्षण या क्षेत्रातल्या माणसांच्या अहंकाराचं! सामान्य माणसाचा प्रश्न नाही रे. त्याची विलक्षण श्रद्धा असते तुझ्यावर. आजही तुला दंडवत घालत, तुला नवस बोलत, तुझ्याकडे तो धावत येत असतो. सातत्याने प्रश्न निर्माण होतो तो फक्त बुद्धिजीवीचा!

सांग त्या बुद्धिजीवीना एका महाबुद्धिजीवीने - लोकमान्य टिळकांनी तुझी प्रस्थापना केली, शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे सार्वजनिक उत्सव निर्माण केले तेच मुळी संघटनासाठी. हे संघटनाचे सूत्र लक्षात ठेवून विघटन टाळावयाला शिकव लोकांना. सांग त्यांना त्यांची स्पर्धा स्वतःशी, सभोवतालाशी नाही रे. फार मोठी स्पर्धा आहे इथे आज. कठीण आव्हाने आहेत. माणुसकी पणाला लागलेली आहे. पणाला लागलेली माणुसकी सांभाळणं हे शिक्षण, साहित्य, संगीत या क्षेत्रात वावरणाऱ्या साऱ्यांचे काम आहे. आद्य कर्तव्य आहे. ईश्वरा, त्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून दे. कधी वाटतं तू यांना आठवण दे तुम्ही एका कुटुंबातले आहात. पण आज दुर्दैवाने कुटुंबातच इतके मतभेद निर्माण व्हायला लागले की कुटुंब ही संज्ञा प्रतीकासारखी, प्रतिमेसारखी वापरावी की नाही हा प्रश्न पडावा! ‘मतभेद’ आणि ‘मनभेद’ हे समानार्थी शब्द झालेत रे! हे परमेशा, नको करूस असं. या कुटुंबाला तू सुरक्षित ठेव. कारण तुझा देव्हारा त्या कुटुंबात आहे. तो देव्हारा सुरक्षित राहिला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा मंत्र आहे आत्मविसर्जनाचा. हे आत्मविसर्जन अहंकाराच्या बाबतीत असलंच पाहिजे. स्वाभिमान जरूर जोपासावा पण तो माणसे, नाती तोडण्याइतक्या टोकाला जेव्हा जातो ना त्या वेळेला तो घातकच असतो.

हे बुधिदात्या तुझ्या विसर्जनासर्जन आहे. तुझ्या निरोपारोप आहे. तुला प्रार्थना करते जाता जाता तू सर्जन कर सदविचारांचं, तू सर्जन कर एकोप्याचं, तू सर्जन कर नव्यानं शिकण्याचं, तू सर्जन कर कुतूहलाच! हे परमेशा तुला प्रार्थना करते तू रोप लाव नाविन्याचे, तू रोप लाव अनुकूलतेचे, तू रोप लाव युवांच्या नव्या दिशांचं! हे परमेशा, तू आशीष दे! तू आशिष देतच असतोस. काय सांगू तुला, कलियुग आहे रे हे! कधी कधी संस्था एखाद्या व्यक्तीसारखी  वागायला लागते. राग-लोभात, मद-मोहात अडकते. दूषित बुद्धीने आणि कलुषित मनाने निर्णय घेतले जातात आणि मग तू निवडतोस अशा व्यक्तीच्या हातून उद्घाटित हो, अशा व्यक्तीच्या हातून प्रकाशित होणं, ज्यानं आयुष्यभर एखाद्या संस्थेसारखं काम केलेले आहे, तुला सलाम!

कधी नव्हे तो आज नंदादीप पहाटे विझलेला होता रे! काय, तुला सांगायचं होतं का, आता मी जातोय, माऊली यायला वेळ आहे अजून. थोडा काळ तरी तुमचं तुम्ही सांभाळा आणि त्यासाठी पूर्वजांना शरण जात त्यांचे अनुभव विचारा! कदाचित हाच तुझा संदेश असेल.. कदाचित...!

 

वृंदा आशय

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...