प्रिय गणेशा,
तुझ्या सहवासात १० दिवस किती पटकन गेले रे! आला
आला, बसला म्हणेस्तोवर विसर्जनाचीही वेळ आली की!
किती काय काय घडलं या १० दिवसात. माझ्यासाठी तर खूप काही....तू येण्याच्या
आधीपासूनच असे काही पडघम वाजू लागले की बघता सोय नाही. तुझ्याशिवाय थाराच राहिला
नाही रे मला. कधीही न बोलणारी मी अनेकांशी बोलले. ‘दुर्लक्ष करा’ याशिवाय दुसरे
उत्तरच नव्हते कोणाकडे. जिथे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, तिथे दुर्लक्ष! हे माझ्या
गणितात बसणारे नव्हते... आणि कदाचित तुझ्याही....म्हणून तू माझ्या कवितेतून सांगत
आलास -
अवमानिली जाता माता
कृद्ध होतो बुद्धिदाता
म्हणे .....
कृष्ण रुपात प्रकटेल आता
!
तू माझ्यासाठी धावून आलास, कृद्ध होऊन घेतलंस ‘कृष्णरूप’ आणि सिद्ध केलंस
आजही जागृत आहेस म्हणून! आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होताना लज्जारक्षण करणारा तूच, याची ग्वाही तू
दिलीस. काळाला तू तुझा दरारा पुन्हा एकदा दाखवून दिलास. तुला प्रार्थना एकच आहे; आलास कृष्णरुपात
जाऊ मात्र कृष्णासारखा नकोस. स्वकुळात यादवी माजू देऊ नको. तुला प्रार्थना
आहे, “तू विसर्जन कर माणसाच्या अहंकाराचं! खरं म्हणजे तू इतका शस्त्रसज्ज आलेला होतास की
माणसाच्या अहंकाराला नेस्तनाबूत करून त्याला धडा शिकवणं, तुला कधीच अशक्य नव्हतं आणि नाही. मात्र तू देव आहेस आणि
म्हणून देवानं माणसासारखं वागू नये. देवानं सूड उगवू नये. देवानं फक्त ‘धडा’ द्यावा माणसाला ‘धड’ राहता यावं
यासाठी!
देवा, म्हणूनच तुला प्रार्थना आहे तू विसर्जन कर साहित्य, संगीत, शिक्षण या
क्षेत्रातल्या माणसांच्या अहंकाराचं! सामान्य माणसाचा प्रश्न नाही रे. त्याची विलक्षण
श्रद्धा असते तुझ्यावर. आजही तुला दंडवत घालत, तुला नवस बोलत, तुझ्याकडे तो धावत येत असतो. सातत्याने
प्रश्न निर्माण होतो तो फक्त बुद्धिजीवींचा!
सांग त्या बुद्धिजीवींना एका महाबुद्धिजीवीने - लोकमान्य टिळकांनी तुझी प्रस्थापना केली, ‘शिवजयंती’ आणि ‘गणेशोत्सवा’सारखे सार्वजनिक
उत्सव निर्माण केले तेच मुळी संघटनासाठी. हे संघटनाचे सूत्र लक्षात
ठेवून विघटन टाळावयाला शिकव लोकांना. सांग त्यांना त्यांची स्पर्धा स्वतःशी, सभोवतालाशी नाही रे. फार मोठी स्पर्धा
आहे इथे आज. कठीण आव्हाने आहेत. माणुसकी पणाला लागलेली
आहे. पणाला लागलेली माणुसकी सांभाळणं हे शिक्षण, साहित्य, संगीत या क्षेत्रात
वावरणाऱ्या साऱ्यांचे काम आहे. आद्य कर्तव्य आहे. ईश्वरा, त्या कर्तव्याची
जाणीव त्यांना करून दे. कधी वाटतं तू यांना आठवण दे तुम्ही एका ‘कुटुंबातले’ आहात. पण आज दुर्दैवाने कुटुंबातच इतके
मतभेद निर्माण व्हायला लागले की ‘कुटुंब’ ही संज्ञा प्रतीकासारखी, प्रतिमेसारखी वापरावी की
नाही हा प्रश्न पडावा! ‘मतभेद’ आणि ‘मनभेद’ हे समानार्थी शब्द झालेत रे! हे परमेशा, नको करूस असं. या कुटुंबाला तू
सुरक्षित ठेव. कारण तुझा देव्हारा त्या कुटुंबात आहे. तो देव्हारा सुरक्षित राहिला
पाहिजे. भारतीय संस्कृतीचा मंत्र आहे ‘आत्मविसर्जना’चा. हे आत्मविसर्जन अहंकाराच्या
बाबतीत असलंच पाहिजे. स्वाभिमान जरूर जोपासावा पण तो माणसे, नाती तोडण्याइतक्या टोकाला जेव्हा जातो ना त्या वेळेला तो
घातकच असतो.
हे बुद्धिदात्या तुझ्या ‘विसर्जना’त ‘सर्जन’ आहे. तुझ्या ‘निरोपा’त ‘रोप’ आहे. तुला प्रार्थना
करते जाता जाता तू ‘सर्जन’ कर सद्विचारांचं, तू सर्जन कर एकोप्याचं, तू सर्जन कर
नव्यानं शिकण्याचं, तू सर्जन कर कुतूहलाचं! हे परमेशा तुला प्रार्थना करते तू रोप लाव नाविन्याचे, तू रोप लाव
अनुकूलतेचे, तू रोप लाव युवांच्या नव्या दिशांचं! हे परमेशा, तू आशीष दे! तू आशिष देतच
असतोस. काय सांगू तुला, कलियुग आहे रे हे! कधी कधी संस्था एखाद्या व्यक्तीसारखी वागायला लागते. राग-लोभात, मद-मोहात अडकते. दूषित बुद्धीने आणि कलुषित मनाने निर्णय
घेतले जातात आणि मग तू निवडतोस अशा व्यक्तीच्या हातून उद्घाटित होणं, अशा व्यक्तीच्या हातून प्रकाशित होणं, ज्यानं आयुष्यभर एखाद्या
संस्थेसारखं काम केलेले आहे, तुला सलाम!
कधी नव्हे तो आज नंदादीप पहाटे विझलेला होता रे! काय, तुला सांगायचं
होतं का, “आता मी जातोय, माऊली यायला वेळ आहे अजून. थोडा काळ तरी
तुमचं तुम्ही सांभाळा आणि त्यासाठी पूर्वजांना शरण जात त्यांचे अनुभव विचारा! कदाचित हाच तुझा
संदेश असेल.. कदाचित...!
वृंदा आशय

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या
ReplyDeleteखूप सोंजवळ आणि मनाचे भाव शब्दातून व्यक्त केले आहेत.
ReplyDeleteखरच मनापासून धन्यवाद मॅडम.
अतिशय बोलकं, हृदयस्पर्शी, उत्तम दिशादर्शक आणि उदंड भावपूर्ण पत्र पावलं. खूपच भावलं. विशेष हार्दिक अभिनंदन आणि मंगलमय शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी. असंच दर्जेदारपणे लेखन, लोकप्रबोधन आपल्याकडून अविरत चालू राहावं. हीच सदिच्छा व प्रार्थना. धन्यवाद.
ReplyDeleteडॉ. कुमुद गोसावी, पुणे
अत्यंत हृदयस्पर्शी !
ReplyDelete