Monday, 20 September 2021

वारसा भक्तीचा ; वारसा शक्तीचा !

 


वारसा भक्तीचा ; वारसा शक्तीचा !


नेहमीसारखी आज पहाटेच जाग आली. पण मन सैरभैर झालं. रोजची शांतता हरवली. गणपतीचा कोपरा रिकामा झाला होता. मनामध्ये विलक्षण पोकळी जाणवली. रोज दुर्वा काढत हिरवं, प्रसन्न होणारं मन आज हैराण, परेशान झालं होतं. आता कोणाशी बोलायचं? गा-हाणं कोणाला सांगायचे? त्याला सजवताना, नटवताना, त्याच्यासाठी नैवेद्य तयार करताना दिवस कसा भुर्रकन उडून जायचा. शिवाय हा सारा आनंद दिवसाला समृद्ध करत राहायचा. त्याच्या आरतीनंतर होणारी चराचरी त्या आनंदाचा प्रत्यय ठरायची. आता काय?,  असा प्रश्न पडला  आणि मन एकदम भरून आलं.

         दु:खाच्या क्षणी रोजचाच देव जास्त जवळचा आणि आपला वाटला. त्याच्यासमोर जाऊन बसले. त्यानंही मोठ्या मायेनं कवेत घेतलं. काही म्हणाला नाही. प्रेमानं थोपटलं. त्याच्याजवळ मुसमुसून झालं आणि मन पिसासारखं हलकं झालं. मनातलं फुलपाखरू पुन्हा बागडू लागलं. म्हणाला, "अगं वेडी आहेस का, मीच तो अनादी-अनंत. मीच तो निर्गुण - सगुण. एक रूप विसर्जित झालं म्हणून मी थोडीच हरवलो!” त्याच्या या हाकेसरशी मी धावत दार उघडून अंगणात गेले आणि असीम आकाशाचं दर्शन घेतलं. ते आज गूढ नाही, मायाळू वाटलं. कधी नव्हे ते एवढ्या पहाटे झाडं सुद्धा हलत होती. त्यांच्या पानांचा आवाज येत होता. मला वाटलं या असीम आकाशानं त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचेही मन हलकं केलं. फुलपाखरासारखं बागडणारं माझं मन काल तन्मयतेने रंगलेल्या  चराचरी’कडे वळलं आणि  चराचरीतून पुन्हा एकदा खोलवरच्या मूळांकडे !

गणपतीची पूजा, आरती झाल्यावर ‘चराचरी’ म्हणण्याची प्रथा माझ्या आजोळची. म्हणजे आईच्या माहेरची. आईचे वडील, माझे आजोबा किशनराव अन्वीकर आणि आजी पद्माबाई अन्वीकर. अन्वीकर घराण्यामध्ये आजही चराचरी म्हटली जाते. गणपती हे त्यांचे कुलदैवत. हा गणपती केवळ पूजायचा असंच नाही. तर आपला गणपती आपणच निर्माण करायचा. बालपणी याचं मोठं कुतूहल वाटायचं. आणि या कुतूहलातून हे वेगळेपण कायम स्मरणात राहीलं. आजही माझी मामे भावंडं मोठ्या तन्मयतेनं घरातला गणपती दरवर्षी तयार करतात आणि त्याला पूजतात. आपला देव आपणच निर्माण करायचा हा विचारच किती आनंददायी आहे ! मूर्ती विकत आणताना, ही नको, ती अशी नको, अशा चॉईस करून आणलेल्या मूर्तीमध्येही, वा ! काय छान गणपती आणला आपण, असं वाटून घेणारे आम्ही! ज्या वेळेला मामे भावंडांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला गणपती पाहतो, तेव्हा खरोखरच आजही मन थक्क होतं. तृप्त होतं. आमची मूलंही आश्चर्यानं त्याकडे पाहत राहतात.  

न्वी एक छोटसं गाव. बसनी जायचं म्हटलं तर धडधडत खडखड करत जावं लागायचं. मात्र गढीवरचं अन्वीचं घर कायम आकर्षित करायचे. दिवाळीला तिथे अंगणभर सजणा-या रांगोळ्या, आजही डोळे मिटले की दिसतात. दादासाहेब अन्वीकर एक फार मोठी नावाजलेली, कर्तृत्ववान व्यक्ती! त्यांच्या  नावाचा दरारा पंचक्रोशीत पसरलेला होता. तोच वारसा कुमाकाकांनी चालवला. खरे तर नात्याने ते आमचे आजोबा. पण आईच्या पाठोपाठ आम्ही त्यांना कुमाकाकाच म्हणायचो. कुमाकाका आणि शैला काकू यांची छबी आजही मनावर ठसलेली आहे. माझ्यासाठी तर ती नेहमीच गृह्सौख्याची आदर्श जोडी होती. कुमारराव अन्वीकर हे नाव कृषिक्षेत्राला आणि साहित्याचा रसिक म्हणून उपासना करणाऱ्या साहित्य क्षेत्राला परिचित असे आहे. कुमाकाकांची आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री.ना.धो.महानोर यांच्या मैत्रीबाबत लहानपणापासूनच मला कुतूहल वाटत आले आहे.

या गढीच्या विस्तृत, व्यापक घराच्या एका कोपऱ्यामध्ये आमच्या आजोबांचे घर. घर दोन - तीन छोट्या खोल्यांचं. एकामागे एक असलेल्या छोट्या छोट्या खोल्या, थोडासा अंधार, न्हाणीघराच्या तिकडून थोडा येणारा उजेड. पण यातले उणेपण मनाला कधीच जाणवलं नाही. याचं कारण होतं आमच्या आजी-आजोबांच्या मायेची ऊब आणि आमचे उत्साही, खेळकर मामा-मामी. त्या घरी जाण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असायचो. आजोळी आम्हाला कधीही कोणी रागावले नाही, कधी कोणी काम सांगितलं नाही. वाटेल तशी दंगामस्ती करायची, वाटेल तसं राहायचं, .....आजोळ एक सुरेख संकल्पना !

चराचरीतून हे मन थेट आजोळापर्यंत पोहोचलं आणि मग सहाजिकच आठवणींचा एक फार मोठा पट उलगडला गेला. आजोबांना आम्ही आईच्या मागोमाग दादाच म्हणत होतो. वकिली व्यवसाय करत, एका विशिष्ट शिस्तीत जगणारे, गीतेचे नेहमी वाचन करणारे, पत्त्यांच्या नव-नव्या जादू शिकवणारे आणि मिश्किलतेचेही अंग जोपासणारे आमचे प्रेमळ आजोबा, आणि त्यांना अथकपणे, शांत चित्तानी साथ देणारी आमची आजी. मला आठवते ते तिचे मितभाषीपण आणि प्रसन्न स्मित. दादा- आजींच्या मायेची ही ऊब आजही जाणवते. स्नेहार्द्र करते. 

सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्याला जी शक्ती, जो आनंद मिळतो तो असा पूर्वापार कुठून तरी चालत आलेला असतो. आणि तो वारसा आपण जपत असतो. असीम आकाशाकडे पाहता-पाहता लक्षात आलं उगाचच अहंकार बाळगावा असं आपल्याजवळ आपलं  काही नसतं. आलेला असतो एक वारसात्याचं प्रतिबिंब आपल्यातून पडत असतं. खरं म्हणजे त्यामुळे आपण धन्य  झालं पाहिजे. आजोळाहून गणपतीची भक्ती, माहेराहून रामाची शक्ती आणि सासरी कृष्णाची भक्ती आणि शक्ती मिळालेली ! या समृद्ध वारशाच्या पाठीशी कर्तृत्ववान माणसे उभी आहेत. देवावर आणि देशाला देव मानून देशावर प्रेम करणारी माणसं आपल्या घराण्यामध्ये झालेली आहेत. मग ते माझे आजोबा विठ्ठलराव देसाई असो किंवा लढ्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या, असंख्य कार्यकर्त्यांना तृप्त करणारी आमची अन्नपूर्णा आजी (जिला आम्ही बाई म्हणत होतो.) यमुनाबाई देसाई असो. या दोन्ही आज्यांकडे पाहिलं की मन थक्क व्हायला लागतं. जगण्याची आणि लढण्याची अशी कोणती उमेद त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती? वास्तविक पाहता आर्थिक परिस्थिती आणि स्त्रियांना घरातून मिळणारा मान याबाबत तो काळ फारसा अनुकूल नव्हता. पण तरीही काळावर मात करत आपलं कर्तृत्व टिकवून ठेवणाऱ्या, आपल्या स्नेहाच्या धाग्याने पिढ्या बांधून ठेवणाऱ्या, अथक परिश्रमाची तयारी असणाऱ्या आणि आयुष्याबद्दल किंचितही तक्रार न करणाऱ्या या आज्या, आमची प्रेरणा नव्हे काय?

सारंच कसं थक्क करणारं ! मी नतमस्तक झाले आकाशापुढे आणि तो आकाशव्यापी अंधारही परमेश्वराशी नातं सांगू लागला.

अंधार...
डोळ्यांना सुखावणारा
मनाला विसावणारा
भक्क उजेडापासून दूर नेणारा
मंद दिव्यापुढे अंतर्मुख करणारा!
अंधार...
आल्हाददायी चांदणं
सावळ्या राम-कृष्णाचं नांदणं
काळ्या माझ्या विठ्ठलाचं,
आकाशव्यापी रूप देखणं!

लक्षात आलं,  शक्ती जेव्हा भक्तीतून निर्माण होते तेव्हा तिला ‘अधिष्ठान’ लाभतं. हे अधिष्ठान  माझ्या जीवनाचं संचित आहे. या संचिताशी मी आजन्म प्रामाणिक आणि कृतज्ञ राहिलंच पाहिजे.

वृंदा आशय

10 comments:

  1. सुंदर शब्द संकलन, मार्मिक... .... जीवनाचा सार्थ संस्कृत विचार आणि घडण....नवीन पिढीला प्रेरणादायी

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दात व्यक्त झालाय.छान

    ReplyDelete
  3. Mandani khoop sundar . Marmic vichar.

    ReplyDelete
  4. खूपच मनस्वी , हृदयातील आठवणीच्या सर्व कप्प्यात छान प्रवेश केलात.

    ReplyDelete
  5. आठवणींचे फुलपाखरु आजोळी जाते तेव्हा........

    ReplyDelete
  6. खुप छान. दादा आजी आणि बाई बाबा ची आठवण दाटून आली 👍👍

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर शब्दांत भूतकाळ जणू वर्तमानात अवतरला, लहानपणी च्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.
    -संजय देशपांडे

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...