Tuesday, 2 November 2021

कृतज्ञ मी गावाची - गोमातेची !

 



कृतज्ञ मी गावाची-गोमातेची !

‘परतूर’ आणि ‘हातवण’ ही गावं म्हणजे आमच्या बालपणीच्या सुरेख आठवणी. हातवण आमचं शेतीचं गाव. परतूरला आजी-आजोबा, काका-काकू सगळे राहायचे. मोठं घर, मोठा वाडा! मध्यभागी एक पार आणि त्या पारावर उंबराचं झाड. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधलं आमचं हे आकर्षण विलक्षण असायचं. जसा ‘मामाचा गाव’ हे चिमुकल्यांचं स्वप्न असतं. तसं ‘काकाचं गाव’ आम्ही अनुभवलेलं.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लगेच कपडे पिशवीत भरून आम्ही आईसोबत गावाकडे रवाना व्हायचो. बैलगाडीतून भटकणे, अंगणामध्ये येणाऱ्या माकडांना शरद काकांसोबत केळी, कांदे देणं, श्याम काकांसोबत (आम्ही त्यांना ‘नाना’ म्हणतो) हातवणला घोड्यावरून रपेट मारणं, या सगळ्या माझ्या आकर्षणाच्या गोष्टी. गावाकडची माडी सुद्धा खूप काही स्वप्नं, आठवणी देऊन गेलेली. या सगळ्या आठवणी सांगताना अगदी आजही परतूर-हातवणच्या गच्चीवर बसल्यासारखं वाटतं आहे. त्या बालमनावर कोरलेलं सगळं काही स्पष्ट दिसतं आहे.

रेल्वेने प्रवास व्हायचा. तीन तासात परतूरला पोहचायचो. स्टेशनवर उतरले की आमचे डोळे मुनीर चाचांची सायकल रिक्षा शोधायचे. आम्ही येणार कळले की बहुतेक वेळा ते आवर्जून आम्हाला घ्यायला स्टेशनवर येत होते. तिथे आमचे घर पोलीस स्टेशन समोर आहे. त्यामुळे लहानपणी पोलिसांबद्दल जे एक आपसूक आकर्षण आणि भीती असते त्यातून मी बऱ्याच वेळा हे पोलीस स्टेशन न्याहाळत बसायचे.

रिक्षातून उतरून घरात गेले की पायरी चढून, उंच उंबरठ्यातून पाऊल आत टाकायचो. बाहेरच्या छोट्या खोलीतला बसण्याचा तक्ता आणि त्यावर ठेवलेला मोठा तक्क्या मला नेहमीच आकर्षित करायचे. तिथून बैठकीतला टीव्ही, त्याच्या आतल्या बाजूला, अंथरूणं ठेवण्याची असलेली छोटी खोली, मग आत एक मोठी खोली, जिथे आम्ही महालक्ष्म्या बसवत होतो. त्यालाच लागून असलेली दादा- वहिनीची छोटी बेडरूम म्हणजे आमच्या हमखास गप्पांचा आणि खोड्या काढण्याचा कट्टा! मोठ्या खोलीतून डावीकडे वळले की प्रशस्त देवघराची खोली. तिथे आमची जेवणे होत. त्याला लागून उजवीकडे असलेले छोटेसे स्वयंपाकघर, बऱ्याच वेळा चुलीच्या धुरात हरवून जायचे. देवघरामागच्या छोट्या खोलीला ‘अंधारी खोली’ असंच नाव होतं. तिथे बरंच काही अडगळीतलं सामान होतं. तसे या खोलीचे उपयोग अनेक. कोणाला काही खाजगी बोलायचे असेल तर, विशेषत: आमच्या घरातल्या बायकांची ती आवडती खोली. उभ्या उभ्या होणारी खुसफुस कोणाच्या तरी मनातली धुसफूस व्यक्त करून जायची. लहान मुलांनी फार गोंधळ घातला तर, “तुला अंधा-या खोलीत कोंडेन हं”, हा रामबाण उपाय ठरायचा.

बाकी त्या वाड्यातील इतर घरे भाड्याने दिलेली होती. वाड्याची गच्चीही फार आनंददायी. गच्चीवर रात्री चांदण्या मोजत झोपण्याची मौजच न्यारी. तो अनुभवलेला थंडगार पहाटवारा.. आजही अंगावर शहारा आतो! उन्हाळ्यातली सगळी वाळवणं गच्चीवर होत होती. त्या गच्ची वरती गप्पा मारत खारोड्या घालताना ऊनही चांदणं वाटायचं. वाळलेल्या खरोड्या - दही – कांदा - शेंगदाणे  खाण्याची लज्जत काही न्यारीच होती.

या सगळ्यांवर मस्त तडका असायचा आमच्या कुसुम काकुंच्या शिस्तीचा! लहानपणी भीती दाखवताना, “गोंधळ करशील तर डोळ्यात उडी मारेल हं”, असा धाक दाखवण-या काकू तितक्याच प्रेमळ. कधी आम्हा भावंडांमध्ये भांडण झालं आणि सगळ्यात लहान म्हणून माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं की लगेच, “रडू नको रे बाळा, काय झालं तुला?”, असं म्हणत डब्यातून रव्याचा लाडू माझ्या पुढ्यात येत होता. आम्हा मुलींना कामाला कसं लावावं, वळण कसं लावावं हे देखील त्यांच्याकडून शिकावं. त्यांची स्वच्छता इतकी कमालीची की कधी गचाळपणा हातून झाला तर लगेच आजही कुसुम काकू आठवतात. त्यांची स्वच्छता, त्यांचं सोवळं या सगळ्या बाबी मनामध्ये एक धाक निर्माण करतात.

हातवणला गेल्यानंतर श्याम काकांच (त्यांना आम्ही ‘नाना’ म्हणतो) उदंड प्रेम अनुभवायला मिळायचं. हातवणला लहानपणी पाहिलेले गुऱ्हाळ अजूनही डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं आहे. ताजा ताजा गूळ, गुळाच्या तयार होणाऱ्या भेल्या, आजही आठवतात. मंगला काकूंनी करून ठेवलेले डिंकाचे लाडू आम्हाला खूप खुणावायचे. काकू तर प्रेमाने खायला देतच होत्या, पण त्यांना कळायचं उन्हाळा आहे पोरांना सोसणार नाही, एकच लाडू द्यावा. आम्ही मात्र मोठ्या पाईपमधून आवाज करत ‘गमबॉल – गमबॉल’ असा जयघोष करायचो आणि डिंकाच्या लाडवांची आठवण काढायचो.

त्या घरामधल्या बंगईवरती सारी भावंडं मिळून खेळायचो. एकदा तर बंगई तुटून गेली आणि थेट कापसाच्या ढिगावर आम्ही जाऊन पडलो. शेतातल्या आंब्यांची अशी काहीच चळत लागत होती की त्या वासाने आजही मन कसं तृप्त होतं आहे. एखादा आंबा डागाळलेला निघाला की, नखरे चालायचे ‘हा अंबा नको मला, याला काळा काळा डाग आहे.’ आता आंबे विकत आणून खाताना एखादा किडका निघाला तरी तेवढा भाग काढून टाकायचा आणि बाकी आंबा मुकाट्याने खायचा. थोडा आंबट लागला तरी ! अशा वेळी त्या बालपणीच्या समृद्धीची हमखास आठवण येते.

 आमचे सगळ्यात मोठे ना. वि. काका स्वभावाने फार कडक होते. आम्ही दंगा केला किंवा काही चुकलो तर काका हातात काठी घेऊन आमच्या मागे लागायचे. आम्ही सगळेच या, त्या खोलीतून धूम पळत सुटायचो. आमची ही पळापळी चांगलीच रंगायची आणि काकांच्या खळखळाटी हसण्यानं थांबायची. आमची मंदा काकू, तिचं अस्तित्व म्हणजे अगदी एखाद्या देवीचं रूप पाहिल्याचं समाधान. साऱ्यांना सांभाळून घेण्याचं अजोड सामर्थ्य तिच्यामध्ये आजही आहे. या सार्‍या गतकाळाची आठवण येण्याचं कारण म्हणजे वसुबारस!

आजच्या वसुबारसेच्या निमित्तानं लक्षात येतंय, गोमाता आपल्या सार्‍या आयुष्याला किती व्यापून राहिलेली आहे. हातवणमध्ये आमची पहाट व्हायची तीच मुळी गाई-बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळांच्या नादानी आणि मग लगेच गोठ्याकडे पाय वळायचे. त्या गोधनाचं, त्या समृद्धीचं घेतलेलं दर्शन डोळ्यांचे पारणे फेडून जायचं. डौलदार शिंगांचे, भल्यामोठ्या उंचीचे ते  गाय-बैलं पाहून माझं बालमन घाबरायचं. मात्र एकदा गच्चीवरून पाहायचं, मग स्वयंपाक घराच्या मोठ्या उंबरठ्याच्या आतून वाकून वाकून पाहायचं, दर्शनाचे ते सुख काही आगळंच !

आम्ही परतूरला असताना आमच्या कुसुम काकू आम्हाला गाईचे शेण गोळा करायला रस्त्यावर पाठवायच्या. बैलगाड्या गेल्या की शेण पडलं असेल तर गोळा करून आणायचं. आधी वाटायचं, काय काकू आहेत पण त्या शेणानं सारवलेलं घर,  अंगणातला शेणाचा सडा तनामनाला सुगंधित करून जायचा. गोमातेचं शेण आपल्याला सगळ्या कीटकांपासून दूर ठेवतं. गोमूत्र अनेक आजारांपासून दूर ठेवतं. गाईच्या दूध – दही - तुपावरती आम्ही लहानाचे मोठे झालो. आजही आवडीने चीज, पनीर सगळे खात असतो. हे सगळं खाताना, हे शरीर मन घडवताना, या वसुबारसेच्या निमित्ताने या माझ्या गोमातेबद्दल किती म्हणून कृतज्ञता व्यक्त करू !

 गाईंच दर्शन मला आयुष्यामध्ये सातत्याने घडत राहिलं. ‘हम्मा – हम्मा ये गं, बाळाला दुधू दे गं’ असं म्हणतच पुढची पीढी आम्ही वाढवली. मुलांच्या एका शिबिराच्या निमित्ताने दत्ताश्रमातल्या गाईंच्या समवेत राहण्याचा योग आला. वेरूळच्या मुख्य मंदिरापासून एक-दीड किलोमीटरवर हा दत्ताश्रम आहे. तिथे चालणारी वेदशाळा, असलेली गोशाळा आणि अप्रतिम सौंदर्यप्रत्यय देणारी तिथली चित्रशाळा मनाला फार भावून गेली. अहमदाबादला ज्या वेळेला आम्ही पुनरूत्थान विद्यापीठातर्फे ‘ज्ञानसाधना वर्ग’ केला तेव्हा एका गोशाळेमध्ये हा वर्ग झाला. तिथल्या सगळ्या गीर गाई पाहून आणि ज्यानं व्यापार सोडून स्वतःला गोशाळेच्या सेवेसाठी वाहून घेतलं असा एक हिऱ्याचा व्यापारी, त्याला भेटून, त्याचं समर्पण पाहून, कृष्ण गोकुळामध्ये तन्मयतेनं गोमातेची सेवा करत होता, अगदी परमेश्वराचा तो भाव मनामध्ये स्मरून गेला. आमचे पोलीस कमिशनर मा. चिरंजीव प्रसाद सर यांचे जेव्हा गाईंबद्दलचे प्रेम पाहिलं आणि त्यांच्या भेटीच्या वेळेला त्यांच्या घरी जी गोसेवा दिसली, त्यातून खरोखर मन धन्य झालं. अगदी आजही घराच्या मागे जेव्हा देशमुख काकुंच्या घरी एक गाय सांभाळली जाते, तिला गोगिरास देताना, तिचं दर्शन घेताना, मनात या सार्‍या आठवणी दाटून येतात.  

साहित्याच्या अभ्यासातूनही गोमाता भेटीला येते. गवाक्ष, गवसणे, गोरज मुहूर्त, गोगिरास असे गायीच्या संदर्भातले अनेक शब्द, ग्रामीण साहित्यातील शेतकरी आणि पशुधनाचं चित्रण,  ‘गायी पाण्यावरी काय म्हणूनी आल्या?’ ही कवी बी यांची भावूक करून जाणारी कविता आणि पशुधनाचा अभिमान मनात जागवणारा कवी विठ्ठल वाघ यांचा बैलविषयक भाव, तर ‘सांज ये गोकुळी’ सारखं चित्रपट गीत, एक ना अनेक ! किती व्यापून टाकलं आहे, तिनं आयुष्याला !

मी थक्क होते आणि तिला नमन करते, तेव्हा तिच्यामागे उभ्या  असलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन घडते. मला वाटतं, कृष्णातल्या देवपणाचं कारण शोधत गेलं तर अनेक कारणांपैकी गोमातेची सेवा हे एक फार मोठं कारण असावं. ३३ कोटी देवांना सामावून घेण्याची शक्ती असलेल्या या माय- माऊलीला मन:पूर्वक वंदन !

                                                  वृंदा -आशय

 

            


1 comment:

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...