माझे आभादित्य !
काँग्रॅच्युलेशन्स आई ! तुझा आज
पहिल्या पानावर लेख आलेला आहे. लेकीच्या या सुरेख प्रतिक्रियेने माझ्या दिवसाची
सुरुवात झाली. ही प्रतिक्रिया होती, अर्थातच माझ्या लाडक्या
लेकीची, आभाची. आभा म्हणजेच टेंडर केअर होम या शाळेमध्ये शिकत असलेली आमची
कन्या श्रिया. घरातलं पहिलं मूल म्हणलं की प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं असं एक नाव
असतं. मला तर ‘आभा’ आणि ‘श्रिया’
ही दोन्ही नावं खूप आवडली. मग ठरवलं घरी म्हणायचं ‘आभा’ आणि शाळेत ‘श्रिया’. मात्र
ही आपली एक चूक आहे, हे लवकरच कळले. नुकतीच शाळेत जाणारी आभा, बावरल्यासारखी का
वागते, याबाबत तिच्याशी बोललो, तेव्हा ती म्हणाली, “आई, शाळेत मला भीती वाटते.
तिथे मला कोणीच आभा म्हणत नाही.” तिचे हे म्हणणे ऐकले आणि नव्या जागेत आपले नावही
आपल्यासोबत नाही, या कल्पनेने ती किती अस्वस्थ झाली असेल याची कल्पना करून,
माझ्याच पोटात गोळा आला. पुढच्या वेळेस चूक सुधारली. शर्विलचे एक नाव हौसेने
आदित्य ठेवले तरी घरी आणि शाळेत तो शर्विल
याच नावाने ओळखला जातो.
माहीत नाही का, पण मला आठवतं तसं माझ्या
लहानपणापासून मी देवाला प्रार्थना करायचे - मला समजून घेणारी अजून एक वृंदा माझ्या
आयुष्यात असली पाहिजे. आणि मला वाटतं माझ्या लेकीच्या रूपानं मला ती मिळाली. तिची
समज खूप थक्क करून टाकणारी आहे. तिच्या कवितांमधून, लेखांमधून, अभिव्यक्तीतून, सूत्रसंचालनातून ही समज व्यक्त होतेच होते. पण माझी
लहानशी आभा, गोड हट्ट करणारी, लोणी-श्रीखंड खाऊन कृष्णाच्या
अभिनयानं मन हरखून टाकणारी, इतकी भरभर मोठी खरं तर प्रगल्भ झाली आणि दहावीत गेली की, मला कळलंच नाही. इतर
वेळेला मी जी हूड, खोडकर आभा अनुभवते, ती हीच का ? असा प्रश्न मला स्वतःला अनेक वेळेला पडतो.
आभा आणि आमचा मुलगा आदित्य. आदित्य म्हणजेच टेंडर केअर
होम शाळेत सध्या सातवीत शिकत असलेला शर्विल आशय जोशी. आभा म्हणजे तेज आणि आदित्य
म्हणजे सूर्य.
माझं आयुष्य आशयमय झालं ते 2004 पासून. आणि
या आशयघन आयुष्याला आभा प्राप्त झाली 2006 व 2009 साली. श्रिया आणि शर्विल हे
माझ्या आयुष्यातलं असं सुख आहे, ज्याच्यासाठी मी आशयची कायम ऋणी राहिले पाहिजे. खरं
म्हणजे मातृत्व हे एक इतकं अनुपम सुख असतं ना की आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही.
जोपर्यंत प्रत्यक्षात हे वात्सल्य वाट्याला येत नाही तोपर्यंत मातृत्वाबद्दल
शब्दात लिहिणे मोठे कठीण आहे.
आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना आपला
अभिमान वाटतो,
असा जो क्षण असतो ना तो
क्षण विरळाच. आपल्या आई-वडिलांना आपला अभिमान असावा, आपलं कौतुक वाटावं हे स्वाभाविकच. पण आपल्या मुलांना
जेव्हा आपल्याबद्दल कौतुक वाटायला लागतं ना तो आनंद काही औरच असतो. तो त्यांच्या
डोळ्यातून झळकतो, त्यांच्या वागणुकीतून दिसतो आणि त्यांना आपल्याबद्दल खूप काही कळतंय, ती आकलनक्षमता आत्ताच
त्यांच्यामध्ये आहे, याचं जे सुख असतं ते जावे त्याच्या वंशा...
अगदी
बालपणात मुलांसाठी आई म्हणजे दैवत असते. माझ्या मुलांचंही असंच काहीसं होतं.
त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना, त्यांचे बोबडे बोल ऐकताना, आजी- आजोबांमध्ये त्यांना रमलेले पाहताना मी सुखावत
होते. शर्विल तर मला सतत , 'गिरिशिखरे चढणार... ही देशभक्तीपर कविता पुन्हा पुन्हा म्हणायला लावायचा आणि
महाभारतातल्या गोष्टी श्रिया जेव्हा
पुन्हा पुन्हा सांगायला लावायची, त्यावेळेला स्वाभाविकच
माझा ऊर आनंदाने भरून यायचा. साहित्य, देशभक्ती, भाषा प्रेम हे मुलांमध्ये उपजतच आहे. अर्थात माझ्या
सासूबाई स्वतः एम. ए. मराठी असल्यामुळे ती अनुवंशिकता या घरामध्ये होतीच.
पुढे मुलांच्या
शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न आला त्यावेळेला इंग्रजी माध्यम घरातून निवडलं जाणार, हे मला पक्कं ठाऊक होतं. कारण
स्वतः आशयचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं. शिवाय बाहेरचं वातावरण पाहता, मराठी माध्यमातून शिकवा असा आग्रह
धरण्याची क्षमता माझ्या स्वतःमध्ये नव्हती. महत्त्वाचे
म्हणजे काहीही झालं तरी मी मुलांना मराठी
भाषा उत्कृष्ट पद्धतीने शिकवू शकेल; इंग्रजी भाषेच्या बाबतीत ते मला जमणार नाही, याची मला एक नम्र जाणीव होती. मी
कोणताही हट्ट न धरता त्यांना ‘टेंडर केअर होम’ या भारतीय संस्कृती जपणाऱ्या
शाळेमध्ये सानंद प्रवेश दिला. फक्त मराठी भाषेमध्ये ही मुलं कच्ची राहणार नाहीत
याची मात्र काळजी काटेकोरपणाने घेतली. आज त्यांच्या शाळेतून कौतुकाचे बोल ऐकायला
मिळतात, दर वर्षी मराठी भाषा
दिनाचा कार्यक्रम अगदी ऐनवेळी सांगितला तरी श्रिया उत्कृष्ट पद्धतीने करणार, हा तिच्या मॅडमना असलेला विश्वास; शर्विल उत्तम पद्धतीने
मराठीतून विचार मांडतो, कोणाचं लेखन चुकलं, पुस्तकातला छापलेला शब्द चुकला, मॅडमचा फळ्यावरच्या शब्द चुकला तरी मला घरी येऊन, "आई, हे असं नाही लिहायचं ना, हे विचारतो." त्या क्षणी मी
खरोखर भरून पावते. मायबोलीपासून शिक्षणाने या मुलांना दूर केलं नाही, याचा मला निश्चितच आनंद झालेला
असतो.
शिक्षण
इंग्रजी माध्यमातून झालेलं असलं आणि परदेश वाऱ्या झालेल्या असल्या तरी सुद्धा
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसं याबाबतची आशयची
स्वतःची आस्था वाखाणण्याजोगी आहे. ही सगळी आस्था आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्राने
त्यांना दिलेली व्यावहारिकता, प्रॅक्टिकल दृष्टीकोण खरंतर मुलांना साहित्य आणि वास्तव
या दोन्हीमध्ये उत्तम पद्धतीने सांगड घालता येते, ती त्यामुळे. मला जाणवलं आपल्या साथीदाराची निवड आपण
आपल्यापेक्षा भिन्न अशा क्षेत्रातून केली आणि त्याच्यामुळं त्याची स्वतःची विचार
करण्याची, जगण्याची निराळी वृत्ती
आहे, स्वतंत्र दृष्टिकोण आहे
त्याचा मुलांच्या जीवनावर निश्चितच उत्तम असा परिणाम झालेला आहे. साहित्यातल्या
कल्पित जगामध्ये केवळ न राहता वास्तवाच्या प्रखर भानाची सांगड आयुष्याशी खूप
चांगल्या रीतीने मुलं घालू शकतात. अर्थात साहित्यातलं कल्पित जग जरी त्यांनी
नाकारलेलं असलं तरी भाषा आणि साहित्याने दिलेली मूल्यनिष्ठा मात्र आवर्जून
स्वीकारलेली आहे , याचं मला खरंच कौतुक आहे. त्यासाठी कलावती आईंची बालोपासना त्यांना
विशेष लाभदायक ठरली.
कोरोनाच्या
काळामध्ये जेव्हा सगळी मुलं, सगळी माणसं घरात होती तो एक प्रकारे भीषण काळ म्हणून आणि एक प्रकारचा
संधी देणारा काळ म्हणूनही आपण अनुभवला. असं होतं की आभा-शर्विलचं वय प्रत्यक्ष
मित्र-मैत्रिणींमध्ये रमणारे होते. कोरोनाच्या कारणाने मित्र मैत्रिणींच्या प्रत्यक्षात भेटी शक्य
नव्हत्या.त्यांच्या बाबांची आणि त्यांची मात्र या काळापासून विशेष गट्टी जमली.
आशयला मुलांच्या पातळीवर उतरुन त्यांच्याशी बोलता येतं, त्यांच्यासोबत खेळता येतं.
त्यांच्यासाठी नवनवीन खेळ तो शोधून काढतो. त्यांच्या शाळेच्या स्पर्धांमध्ये तो
त्यांना मदत करतो. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रयोगांमध्ये भाग घ्यायला प्रवृत्त
करतो. त्यासाठीच सगळं साहित्य उपलब्ध करून देतो. या काळामध्ये मुलं बाबांकडे अधिक
खेचली गेली.
अर्थात लहानपणापासून
मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने शनिवार-रविवारी बाबांशी त्यांची जास्त गट्टी जमत होती.
कोरोनाच्या
काळामध्ये मी स्वतः एक उदासपणा-भकासपणा अनुभवला. माझ्या मुलांच्या बालमनाला त्याची
दाहकता जाणवली. आपल्या आईकडे ती भयभीत नजरेने पहात होती आणि बाबांच्या सोबतीने
स्वतःला फुलवत होती. मला काय होतंय किंवा मी अशी का वागते आहे हे मलाच माझं कळत
नव्हतं तर त्या मुलांनी मला समजून घ्यावं अशी अपेक्षा मी करू शकत नव्हते. आज कळतंय, मला मुलांनी तेव्हाही खूप समजून
घेतलं. मी बाहेर यावी यासाठी आभा तर बाबांच्या बरोबरीने प्रयत्नरत राहिली. मग अगदी
पार्लरमध्ये जाऊन माझा लुक बदलणं असू द्या किंवा चष्मा लागलाच आहे तर तुझ्यासाठी
छान चष्मा घेऊयात, म्हणून तिने माझ्यासोबत चॉईस साठी येऊ द्या. मी चष्मा लावल्यावर ती
म्हणाली होती,
"आई
तू जीनियस दिसते आहेस. मी दिसती आहेस असं म्हणाले हं." अशी पुस्तीही तिने
पुढे जोडली. तिचं हे वाक्य मला खोलवर कुठेतरी हलवून गेलं. मला वाटतं या काळात खोल
गर्तेत मी हरवले होते त्या खोल गर्तेतून बाहेर येण्यासाठी जणू काही नियतीने माझ्या
हाती तो दिलेला एक दोर होता. त्या दोराला मी घट्ट पकडलं आणि अगदी प्रयत्नपूर्वक
स्वतःला बदलवत,
घडवत बाहेर येण्यासाठी
सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे आजचा दिवस...
काँग्रॅच्युलेशन्स आई!
- वृंदा आशय
Very nicely worded ... aabha keep motivating your mom 👩
ReplyDeleteSharveel I never knew your other name is Aditya 😀😀
खुप छान
ReplyDeleteअप्रतिम लेख ताई
ReplyDeleteछान ताई
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteखूप सुंदर लेख वृदा
ReplyDeleteतुझे, तुमचे सगळे गुण श्रिया ,शर्विल मधे दिसत आहेतच.
ReplyDeleteछान लिहीलेस. श्रेया बोलते ,कविता पण छान करते .अभिनंदन
धन्यवाद!
Deleteलेख खूप छान लिहीला आहेस.तुमचे चौघांचे bonding मस्त आहे.आणि हे अनुबंध असेच छान घट्ट राहोत.
DeleteVrunda khoop tu khoop chan lihtes . Apratim.
ReplyDeleteआभारी आहे.
Deleteखूप सुंदर लिहितेस
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमनःपूर्वक आभार!
ReplyDeleteआपणा सर्व रसिक वाचकांचे आभार व्यक्त करण्यास माझ्याजवळ खरोखर शब्द नाहीत. कन्येच्या व्यक्तिगत प्रतिक्रियेबद्दल उत्स्फूर्तपणाने जे वाटलं ते मी लिहित गेले. आपण भरभरून दिलेला प्रतिसाद माझं बळ वाढवणारा आहे. माझे वाचक माझे 'हृदयस्थ' आहेत. ऊर्जादायी आहेत. आपणा सर्वांना मनःपूर्वक वंदन !
ReplyDeleteखूपच सुंदर लेख..
ReplyDeleteवाचताना नकळत अश्रू ओघळले........ अत्यंत हृदयस्पर्शी !
ReplyDeleteवृंदा लेख खूप छान लिहीला आहेस.तुमचे चौघांचे bonding फार भावले.तुमचे हे अनुबंध असेच राहोत...श्रिया तर आत्ताच तुझी xerox वाटतेय...अजून खूप मोठी होणार आहे....शुभेच्छा
ReplyDeleteThanks a lot !
Delete...आपल्या वंश वृक्षाला मोत्याची कणसे लागली... अमृताच्या एका थेंबाने बहरलेले आयुष्य व्यक्त होतानाचा अनुभव खुपच छान.. हार्दिक अभिनंदन !
ReplyDeleteThat's super awesome!
ReplyDelete