Monday, 31 January 2022

माझे परात्पर गुरु : गुरुवर्य मांडे सर



                                                                                                                        गुरुवर्य डॉ. प्रभाकर मांडे सर 


माझे परात्पर गुरु :  गुरुवर्य मांडे सर

डॉ. प्रभाकर मांडे सर हे लोकसाहित्याच्या अभ्यासाक्षेत्रातले एक अत्यंत आदरणीय नाव. आपले सर्वस्व ज्यांनी ज्ञानक्षेत्राला वाहून घेतले,  प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जे श्रद्धेने, निकराने उभे राहिले आणि अगदी परवा-परवापर्यंत सातत्याने लिहीत राहिले, असे गुरुवर्य, ज्ञाननिष्ठ मार्गदर्शक, कै. ल. का. मोहरीर सरांचेही गुरू म्हणजे मांडे सर, त्यांना माझा साष्टांग दंडवत! सुदैवाने काल अहमदनगर येथे त्यांच्या राहत्या घरी उभयता जाऊन भेटण्याचा योग आला. त्यांच्या सुनबाई  सौ. वृषाली  आणि सुपुत्र श्री. अविनाश मांडे यांनी ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतलेली आहे, जपणूक केलेली आहे ते पाहून मनाला फार बरं वाटलं.

मी सार्वजनिक जीवनातल्या साहित्यक्षेत्रात पाऊल ठेवलं तेच मुळी डॉ. मांडे सर आणि डॉ. ल. का. मोहरीर सर यांनी दिलेल्या हाकेने, केलेल्या मार्गदर्शनाने आणि माझ्या उडत्या-पडत्या-झडत्या अशा सगळ्याच काळात अगदी ठामपणे,  खंबीरपणाने माझ्या पाठीमागे उभे राहिल्याने.

मला आठवतं माझे वडील श्री. विजयराव देशपांडे, मला अनेक वेळेला मांडे सरांकडे घेऊन जात होते. बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर पुढे कुठे शिक्षण घ्यावे, या मार्गदर्शनासाठी,पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर सुद्धा पीएच.डी. कोणत्या विषयावर करावी?, या विषयावर सरांशी चर्चा करायला आम्ही गेलो होतो. सरांनी अगदी व्यावहारिक आणि मोलाचा सल्ला दिला. ‘आयुष्यामध्ये आधी स्थिरस्थावर व्हा. पीएच.डी. हा आनंदाचा भाग आहे, तो नंतर’.परंतु नेट परीक्षेत JRF मिळालेली आहे,  आणि त्या अंतर्गत पीएच.डी. करावयाची आहे हे त्यांना सांगितले, त्यावेळेला ‘आनंदानं अभ्यास करा. जो काही विषय निश्चित करणार आहात त्याबाबत आपल्याला आत्मीयता असावी. संशोधनाचे क्षेत्र हे आनंददायी क्षेत्र आहे. निष्ठेने काम करा’, असा भरभरून आशीर्वाद दिला.

अधून मधून कधीतरी भेटी होत राहिल्या. त्यानंतर मधल्या काळात अनेक वर्षे भेटीशिवाय गेली. आणि एक दिवस मोहरीर सरांचा फोन आला. म्हणजे एका  नंबरवरून तीन-चार वेळा मिसकॉल दिसले. विद्यापीठाच्या ओरिएन्टेशन कोर्समध्ये असल्यामुळे, मी फोन उचलू शकले नव्हते...आणि हा कोणाचा नंबर आहे, हे बघण्यासाठी म्हणून मी फोन लावला. तो जेव्हा मला आदरणीय, वंदनीय असलेल्या संस्कृततज्ज्ञ मोहरीर सरांचा फोन आहे, हे कळालं त्यावेळेला मी थक्क झाले. माझी आणि त्यांची तोपर्यन्त व्यक्तिगत ओळख नव्हती. मोहरीर सरांशी फोनवर बोलले. सर म्हणाले, “आश्चर्य आहे बुवा, तुम्ही लवकर फोन उचलतही नाहीत आणि करतही नाहीत.” मी सरांना वस्तुस्थिती सांगितली, आणि क्षमा मागून कोणत्या कारणांनी त्यांनी फोन केला होता, हे जाणून घेतले. मांडे सरांच्या घरी एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये मला निमंत्रण होतं. ती आज्ञा शिरसावंद्य मानून मी बैठकीसाठी हजर झाले.

या बैठकीच्या काही दिवसांधीच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत मा.प्रा.बोरीकर सरांनी स्वातंत्र्यसेनानी ताराबाई परांजपे यांच्या कृतज्ञतापर सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात मा. ताराबाईंचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. या कार्यक्रमाला मांडे सर आणि मोहरीर सर आलेले  होते. त्या परिचय करून देण्यातून त्यांना काय जाणवलं, माहीत नाही. मात्र तेव्हापासून मांडे सरांनी, ‘ही मुलगी कार्य करेल, तिनं केलं पाहिजे. तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे. तिला उभं केलं पाहिजे’, अशा प्रकारचा एक ध्यासच जणू काही घेतला. त्या बैठकीमध्ये मला देवगिरी प्रांताच्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अस्थायी समितीचे सचिव पद देण्यात आले. कोणत्याही संस्थेचे अशा पद्धतीने मी काम केलेले नव्हते. त्यामुळे मी जरा बिचकले. थोडीशी वैतागले देखील. पण माझ्या सासरी – माहेरी सर्वांशी परिचय असलेल्या आणि कार्याविषयी, माणसांबद्दल  उपजत आस्था असलेल्या वंदनीय गुरूंचा आदेश मोडणे शक्यच नव्हते. माझ्या अनअनुभवीपणामुळे थकत होते, रुसत होते, न मिळणाऱ्या लोकप्रतिसादामुळे कोमेजून जात होते. पण मांडे सरांचे सांगणे होते, या निमित्ताने होणारा अभ्यास महत्त्वाचा, मांडणी महत्त्वाची, राष्ट्रीय परिषदांमधून आपण गेले पाहिजे, आपला अभ्यास पुढे चालवला पाहिजे, हे सांगत सांगत अनेक बैठकांमधून त्यांनी मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे ऐंशी वर्षांच्या अनुभवाचे संचित घेण्याची मलाही ओढ लागायची आणि दिवसभराच्या महाविद्यालयानंतरही, सर बोलावतील त्यावेळेला मी बैठकीला हजर राहायचे. मोहरीर सर आणि डॉ. मंगला वैष्णव मॅडम यांच्या अध्यक्षीय काळात थोडे-फार कार्य करू शकले. अर्थातच हे सगळं काही शक्य होतं केवळ घरच्यांच्या सहकार्यामुळे.

मी चित्रकूटच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पहिला पेपर हिंदीमधून वाचला, हे याचेच फलित. विषय होता, ‘रामवनगमन की मूल्यात्मक निष्पत्ती’ हा विषय ऐकून मी हादरूनच गेले. मी सबंध रामायण देखील वाचलेलं नाही आणि मूल्यात्मक निष्पत्ती मी काय सांगणार? मोहरीर सरांना मी विचारलं, “सर काय करू? काय वाचू? एवढ्या वेळात काय होईल? सर म्हणाले, “मूलभूत ग्रंथ वाचले पाहिजेत. त्या शिवाय दुसऱ्या कशाला हात लावू नका.” आठवी ते दहावी संस्कृत होते. पण वाल्मिकी रामायण कळावे इतके संस्कृत भाषेवर प्रभुत्व नव्हते. हे मी कसं करू शकेल? हे मला शक्य नाही. मी जाणार नाही. दोन्ही सरांना सांगून मी मोकळी झाले.

मांडे सर म्हणाले, “बाळ, असं करू नये. आपण गेलं पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर स्वतःला जोखलं पाहिजे. आपण किती पाण्यात आहोत आपल्याला अंदाज येतो”, गुरूंच्या मायेला पाझर फुटला “मी सांगतो कसं लिहायचं?” सरांसोबत बैठकी वाढल्या. मार्गदर्शन मिळालं. निबंध आकाराला आला. हिंदीमध्ये अनुवादित केला आणि राष्ट्रीय परिषदेमध्ये नावाजला गेला. मी करू शकणार नाही असं म्हणून जे बीज स्वतःला मातीमध्ये कोंडून घेऊ पाहात होतं त्या बिजाला अंकुरण्याची क्षमता गुरूंच्या कृपेने मिळाली. आपण राष्ट्रीय परिषदेमध्ये आत्मविश्वासाने बोलू शकतो, राष्ट्रभाषेतून बोलू शकतो, मराठीच्या एका विद्यार्थिनीला, मराठीच्या एका प्राध्यापकाला अजून काय हवं होतं?

मग ही गाडी थांबली नाही. काही ना काही चालू राहिले. कधी गती वाढायची, कधी कमी व्हायची. मात्र काम चालू राहायचे. मोहरीर सरांनी हात धरून अहमदाबादच्या ‘पुनरूत्थान विद्यापीठा’मध्ये नेले. या गोष्टीसाठी तर मी त्यांची आजन्म ऋणी आहे. इथेही नन्नाचा पाढा लवकर संपत नव्हता. प्रत्येक पावलावर सर मदतीला आले. एवढं वाचून या म्हणायचे. सर वाचून झालं नाही. मी नाही पुढचा ज्ञानसाधना वर्ग करत, माझे पालुपद सुरू राहायचे. ‘वाचून होईल, वर्ग करा.’ आज्ञा मिळत गेल्या, वर्ग होत गेले. तीन ज्ञानसाधना वर्ग करताना रजेसाठी तत्कालीन प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार सरांचं वेळोवेळी सहकार्य मिळत गेलं. महाविद्यालयीन अध्यापन की ज्ञानसाधना वर्गाचे अध्ययन यापैकी प्राधान्यक्रम कसे ठरवावेत, मनात निर्माण होणाऱ्या अनेक अनुषंगिक द्वंद्वांमधून मार्ग कसे काढावेत?, याबाबत डॉ. मकरंद  पैठणकर सरांचे मार्गदर्शन मिळत गेले आणि वाटचाल सुरू राहिली. या सगळ्यांमुळे मला ज्ञानतीर्थाचे वारकरी होता आले.  

 पुनरुत्थान विद्यापीठाच्या मा.कुलगुरू इंदूताई काटदरे म्हणजे मला एक ज्ञानतीर्थ वाटते. कारण माझ्या सबंध शिक्षण व्यवस्थेने माझ्याकडून देशाची ‘प्रतिज्ञा’ म्हणवून घेतली पण त्या प्रतिज्ञेचा इतकंच काय आपल्या ‘भारत देशा’चा अर्थही फारसा कधी उमगला नव्हता, हे वास्तव होतं. तो भारत मला इंदूताईंकडे, पुनरुत्थान विद्यापीठामध्ये कळायला लागला. देशासाठी कार्य केलेच पाहिजे हे संस्कार मूळ धरू लागले.

 सगळं काही बरं चाललं होतं. अचानक काय झालं कळलं नाही. गाडीला एकदम ब्रेक लागावा तशी गाडी एका जागी खिळली. थोडी-थोडकी नव्हे,चांगली दोन-अडीच वर्षे. आणि नुसती एका जागी खिळली इतकंच नाही. नैराश्याच्या खोल गर्तेत जाऊन आली. ही अवस्था न सांगताही समजावी, सुदैवाने अशा काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत. मी त्यांचे ऋण कोणत्याच जन्मात फेडू शकणार नाही, याची मला नम्र जाणीव आहे. मला खात्री आहे पार तळाला जाऊ पाहणारी माझी नौका या काळामध्ये तरली ते केवळ आणि केवळ या सर्व हितचिंतकांच्या माझ्या प्रतीच्या काळजीने, कृतीने आणि सकारात्मकतेने.

गुरुवर्य मांडे सर, त्यापैकीच एक. सर नगरला होते. अधून-मधून फोन येत असे. “बाळा, काहीच लिहीत नाहीस. काम का थांबले? मी म्हणलं, “मला माहीत नाही. पण काहीही करण्याची इच्छा नाही. करणार नाही.” ते अस्वस्थ व्हायचे, समजावून सांगायचे. का माहीत नाही पण आतले दरवाजे घट्ट लावून घेतलेले होते. दरवाजा किलकिला व्हायला पण तयार नव्हता. मात्र सर थांबले नाहीत. ते फोन करत राहिले. मी फोन उचलायचे, पण फार काही बोलायचे नाही. कधीतरी फोन उचललाही गेला नाही. मी सरांना म्हणायचे, मला नाही कळत पण माझ्या आवाजावरूनच  त्यांना खूप काही कळत असावं. ते बोलवायचे, “ये बेटा, नगरला ये”. काल वृषाली ताई सांगत होत्या, तुम्ही लिहीत नव्हता तेव्हा सरांना तुमची खूप काळजी वाटत होती. ते येणाऱ्या-जाणाऱ्याजवळ तुमच्याबद्दल बोलत राहायचे. चिंता व्यक्त करायचे. ती का थांबली, का थांबली?

माझी खिळलेली स्थिती संपल्यावर, गाडी रुळावर आल्यावर, मी प्रवाहीत झाल्यावरही करोनाच्या वातावरणाने प्रदीर्घ काळ जाता आले नाही. ...जीवाला ओढ लागली, काल योग जुळून आला. भेट झाली...

क्वचित स्वतःच्या मुलाचे नाव विसरणारे, समोर बसलेल्या सुनेला पुन्हा एकदा आवाज देणारे मांडे सर, माझ्याबद्दल साऱ्या संदर्भांसह अचूक पद्धतीने बोलत होते. मी प्रोफेसर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता, मी थांबले होते त्या काळातील दुःख त्यांच्या डोळ्यातून तरळत होतं. आता काही अडचण नाही ना, विचारणा चालू होती. घर संसाराचं बोलणं झालं. महाविद्यालयाची चौकशी झाली. ‘राजकारणाकडे लक्ष देऊ नका, सतत काम करत राहा. इकडे तिकडे धावू नका. एकानंतर एक प्रकल्प घ्या. कधीही अडल्यासारखे वाटलेच तर हक्काने या’. परात्पर गुरूंचा आदेश मिळाला. मार्गदर्शन मिळाले.

माऊली ज्ञानराया, ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या तुमच्या सांगण्याचा अर्थ कळाला. संत कबीरांच्या दोहयाचा अर्थ कळाला -

'गुरु गोबिंद दोऊ खड़े, काके लागू पाय |

 बलिहारी गुरु आपकी, गोबिंद दियो मिलाय ||'

सर, आपल्या कृपाशीर्वादाने सौ. वृंदा आशय अखंड कर्मरत राहण्यासाठी कटिबद्ध आहे.

वृंदा आशय

 



 

11 comments:

  1. फार सुरेख लिहिलंय मांडसरांविषयी, अभिनंदन मॅडम

    ReplyDelete
  2. Replies
    1. आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझं बळ वाढवणारी आहे. मनःपूर्वक आभार !🙏

      Delete
  3. अंतरंगातील तरंग !

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  4. भावना उचंबळून आल्या ........

    ReplyDelete
  5. अप्रतिम मनातील भावना शब्दबद्ध झाल्या

    ReplyDelete
  6. छान भावना व्यक्त केल्या

    ReplyDelete
  7. आपण सर्व रसिक आणि जाणकार वाचकांनी ज्या आत्मीयतेने या ब्लॉगला भेट दिलेली आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवलेलल्या आहेत त्यासाठी मी आपल्या सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद ! 🙏🙏🙏

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...