मध्यंतरी
दोन – तीन दिवस महाविद्यालयातून बाहेर पडताना अगदी सांजवेळ झाली. गाडीवरून घरी
पोहोचायचे ते मावळत्या सूर्याचे दर्शन घेतच. तो आकाशातला केशरी गोळा, मनाला मोठा
आनंद देऊन गेला. तो हसरा, प्रसन्न सूर्य दिसला आणि दिवसभराचा कामाचा ताण सहजच
निघून गेला. वाटलं, जणू काही सूर्य सांगतो आहे, ‘तृप्त असावे मावळतीला!’
विचार
करायला लागले, ही तृप्तता केंव्हा शक्य होते? संपूर्ण दिवसाचे सूर्यचक्र झरकन
नजरेसमोरून गेले. उगवतीला कोवळ्या किरणांनी येणारा, आपली प्रकाश-पावलं घराघरात आणि
मनामनात नेणारा, माध्यान्हीला तप्त होणारा आणि मावळतीला तृप्त निरोप देणारा तेज:पुंज आणि संजीवक सूर्य. त्याची वेळ, कार्य, दिशा,
स्वरूप सारेच काही सुनिश्चित. आपले नियत कार्य करून मोकळा. कोणी आपली दखल घेतं की
नाही, याची नोंद घ्यायला त्याला फुरसतच नाही. सूर्याच्या साक्षीने उमलणारे,
मिटणारे फुलं, डोलणाऱ्या लता-वेली, जागणारे-झोपणारे पक्षी, सारेच मग या तृप्ततेची
साक्ष देऊ लागले. तृप्ततेचे रहस्य जाणून घेण्यास निसर्ग खुणवू लागला. दैनंदिन
जीवनात ही तृप्तता मिळू शकेल का, मनात विचार पेरला गेला.
या
विचाराने दैनंदिनीकडे वळवले. भिंतीवरचे कॅलेंडर गालातल्या गालात हसत निरोप घेण्याच्या
तयारीत होते. दिल्या-घेतल्या वचनांचे काय झाले, डोळे मिचकावून विचारत होते.
‘वचनांच्या नूतनीकरणासाठी’ नूतन वर्षाच्या शुभेच्छा तेच मला देत होते. मलाच खुद्कन
हसू आले. नवे वर्ष येणार, तेच ते संकल्प नव्याने होणार, नव्याचे नऊ दिवस संपताच, “ठरवलं
होतं, पण वेळच मिळत नाही हो”, अशी आपण
स्वत:ची आणि दुसऱ्याची समजूत घालणार. या विचाराने मावळतं वर्ष
मला बेचैन करायला लागले. खूप काही करायचे आहे, या आशावादाला ‘आयुष्यातले अजून एक
वर्ष कमी झाले’, हा वास्तववाद स्वीकारावा लागतो.
खरं म्हणजे कोणाच्या बळजबरीने आपण संकल्प करत नाहीत.
या संकल्पामागे आपली स्वत:ची गरज, आवश्यकता, इच्छाशक्ती, प्रेरणा, एखादी आस, एखादा
ध्यास हा कारणीभूत असतो. मग संकल्प पूर्ण करताना आपण कमी का पडतो? उत्साहात,
जोशात, भावनेच्या भरात निर्णय घेतल्याने असे होते का? काही ठरवताना आपल्या इतर
जबाबदाऱ्यांचा विचार आपण करत नाहीत का? की स्वत:लाच दिलेल्या वचनाबाबत आपण फारसे
गंभीर नसतो? आपण करत असलेल्या कामांवरील शेरे आणि ताशेरे आपल्याला कामापासून
परावृत्त करतात का? येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता आपल्यात नसते का?
असलेल्या कामांचा आपण कंटाळा करतो की स्वत:च्या क्षमतांपेक्षा जास्त काही ठरवतो?
‘वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता’, अशा अनुभवी विधानांचा
आधार घेत स्वत:चे सांत्वन करतो? की ‘आपण काय, आपल्या मनाचे राजे’ अशा स्वत:च्या
खुशामतीत जगतो. खरं म्हणजे आपल्या
सगळ्यांच्या बाबतीत यातील काहीही घडू शकते.
मी विचार करत
होते, अगदी संकल्पांनाही बाजूला
ठेवून दिले तरी, आपण आपल्या दैनंदिन जीवनात तृप्त असतो का? एकत्र कुटुंबपद्धतीनंतरची
रूजलेली विभक्त कुटुंबपद्धती, ‘ह्म दो, हमारे दो’ असे म्हणत चौकोनी, हळूहळू
त्रिकोणी कुटुंब, कुटुंबच नको म्हणत अवलंबलेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ पद्धती आणि
त्याच्याशी-तिच्याशी देखील पटत नाही, असे म्हणत स्वीकारलेला भकास
एकांतवास, व्यसनांशी केलेला
सहवास, मानवी जीवनाचा असा सगळा पट माझ्या डोळ्यांसमोरून सरकत गेला. पडणाऱ्या कष्टांबाबत, येणाऱ्या अपयशाबाबत, होणाऱ्या विरोधाबाबत,
मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टींबाबत, न पटणाऱ्या भूमिकांबाबत
आपण अखंड कुरकुर करत राहतो. आनंदी असण्यापेक्षा आनंदी असल्याचे दाखवण्यात आपण
समाधान मानतो. जिथे मुळातच आनंदाचे अस्तित्व नाही, तिथे तृप्ततेचा मागमूस तरी कसा
राहील?
दिमाखात
झालेल्या विवाहसोहळ्यांना घटस्फोटाचे ग्रहण कधी लागेल सांगता येत नाही.
वर्षानुवर्षे प्रेम केल्याचा भास झाल्याने केलेले प्रेमविवाह असोत की शोधून ठरवून
केलेली लग्न असोत, ती किती काळ टिकतील, याची शाश्वती देता येत नाही. अर्थसत्ता
असो, अधिकार असो त्यामागे अहंकार धुमसत राहतो आणि घरं पेटवत
राहतो. तोडता येत नाही म्हणून तड जाईल तिथे जोड देत टिकवलेल्या विवाहांमध्ये घुसमट
मोठ्या प्रमाणावर दिसते. या सगळ्याचाच गंभीर परिणाम नकळत पुढच्या पीढीला भोगावा
लागतो. घटस्फोटीतही सुखी नाहीत आणि घुसमटीत जगणारेही आनंदी नाहीत, हे आजचे वास्तव
आहे.
घरातल्या कटकटींना तोंड देत किंवा या कटकटी चुकवत कार्यालयात
जाणारे, नोकरी-धंदा करणारे, तिथे तरी सुखी आहेत का? वाढती स्पर्धा, बदलती आव्हाने,
बाजारातील तेजी-मंदी, करणाऱ्यांनी काम करावे; कामचुकारांनी
नवनवे मार्ग शोधावेत, अशा वाढत असलेल्या प्रवृत्ती, अस्थिर नोकरीत
कायम असलेल्या टांगत्या तलवारी, स्थिर नोकरीत कामचलाऊ पद्धतींचा धरला जाणारा
आग्रह, टाकला जाणारा दबाव, एकमेकांबाबतचे राग-द्वेष, हेवे-दावे...एक ना अनेक!
घर-नोकरीने
थकला - भागला माणूस सामाजिक -सांस्कृतिक कार्यात स्वत:ला गुंतवू पाहतो. वेळ जाईल
आणि काही समाजोपयोगी कार्य घडेल असा विचार त्यामागे असतो. थोड्याच दिवसात तिथे गट
- तट निर्माण होतात, मूळ उद्देश विसरला
जातो, नवी अर्थकारणे आणि राजकारणे डोकेदुखी ठरायला लागतात. तावातावाने मांडल्या
गेलेल्या भूमिका कार्य वाढवण्याऐवजी मने-माणसे तोडायला लागतात. कुठून या
लष्कराच्या भाकरी भाजायला आलो, असे वाटून माणूस खट्टू होतो. तृप्तता त्याच्यापासून
कोसो दूर जाते.
माणसाने मन
रमावे म्हणून, कामे सुलभ व्हावीत म्हणून ज्ञान – विज्ञान – तंत्रज्ञान पणाला
लावले. त्याला हवे ते, हवे तेंव्हा, हवे तिथे, हवे तसे मिळवण्याची सोय करून ठेवली.
पण म्हणून माणसाची ही हव्यासाची भूक शमली का? मला मिळाले असे म्हणून तो समाधानी
झाला का, की अजून काही निराळे हवे म्हणून भटकत राहिला ?
‘थांबला तो संपला’ हे अनुभवाचे तत्त्वज्ञान पुढे
करत माणूस चालत राहतो. जरूर चालावं, पण
थांबायचं कुठं हे कळले पाहिजे. काय धरायचे आणि काय सोडायचे,
केंव्हा सोडायचे याचा निर्णय करता आला पाहिजे. जीवनप्रवाह अखंड आहे. तो चालतच
राहावा. पण त्यातले आपले योगदान ठरवता यावे. फूल सुरेख दिसते ते अनेकविध पाकळ्यांमुळे. झाड डवरलेले दिसते ते अनेकविध
फांद्यांमुळे. फक्त एकच-एक फांदी अगदी आकाशापर्यंत लांब वाढली तरी ती झाडाला झाडपण
नाही देऊ शकणार. त्यामुळे आपल्याकडे जो सर्वंकष जीवनाचा विचार केला जातो, तो
महत्त्वपूर्ण आहे. त्याला सखोलता आणि व्यापकता असावी. म्हणजे मूळं जमीनीत घट्ट रुजतात आणि आकाशाकडे झेपावण्याचे बळ येते.
तृप्तता
प्रवासात आहे. प्रयत्नात आहे. यश-अपयश खिलाडूवृत्तीने पचवण्यात आहे. खरे म्हणजे
तृप्तता आपल्या कर्मात आहे. प्रत्येक कर्म आपण कोणत्या हेतूने, कोणत्या पद्धतीने
करतो त्यावर ते अवलंबून आहे. ताणरहित सहजता त्या कामात आली की कार्याचा आनंद
मिळायला लागतो. अधिक चांगले करुयात ही पूर्णत्वाकडची ओढ लागते. मिळणाऱ्या
फळापेक्षाही कर्माकडे, त्याच्या परिपूर्णतेतेकडे लक्ष केंद्रित होते. आणि मग सुरू
होते स्वत:ची स्पर्धा स्वत:शी! तिथे हरण्याची भीती नसते, जिंकण्यासाठीचा उतावीळपणा
नसतो, कोणालातरी हरवण्यासाठीची धोरणे नसतात. तिथे एक फक्त प्रामाणिक प्रयत्न असतो
आपल्या कर्मातून मांगल्यपूर्ण निर्मितीचा. आपला सभोवताल सुंदर करण्याचा. आपल्या
प्रत्येकाचे कर्म समाजाची उंची जोपासण्याचे, वाढवण्याचे किंवा घटवण्याचे कार्य करत
असते. म्हणून आपली आपल्या विचार आणि कृतींवर सख्त नजर असावी. ज्या समाजात आपल्याला
नांदायचे आहे; उद्याच्या पिढीसाठी
आश्वासक, निरामय भविष्य घडवायचे आहे तो सुदृढ समाज आपल्याला निर्मिता
आणि जोपासता आला पाहिजे. त्यासाठी कोणतेही रणमैदान गाजवावे लागत नाही. पराक्रम
करावा लागत नाही. फक्त स्वत:ला स्वत:शी प्रामाणिक राहता यावे लागते. स्वत:चे प्रत्येक
कर्तव्य-कर्म, स्वत:ची भूमिका याबाबत सजग-सक्रिय असावे लागते. आपल्यामुळे कोणाला नाहक
त्रास होणार नाही, विनाकारण दुखावले जाणार नाही एवढे सांभाळावे लागते. मूल्यनिष्ठ
पायावर ज्याने-त्याने स्वत:ची उंची जोपासली तर हा समाज कधीही गडगडणार नाही.
अतृप्ततेच्या भोवऱ्यात अडकणार नाही. लोखंड स्वत:ला भट्टीत भाजून घेते, सोने
स्वत:ला उजळवून घेते; असा तप्ततेचा मार्ग तृप्ततेच्या मुक्कामाला निश्चित
पोहचवेल.
दैनंदिन कर्म
करून प्रत्येक संध्याकाळी तृप्त राहणाऱ्या माणसाच्या आयुष्याची मावळती उद्याच्या
उगवतीचे रंग पेरत असते. त्या मावळतीला वंदन करून उगवतीला शुभेच्छा!
वृंदा
आशय

वाह..खूप छान 👌👌
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteकल्पना चांगली मांडलीय
समाधान आणि तृप्तता चांगले विशद केलेय
अनेक शुभेच्छा
सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंतच्या या निसर्ग चक्रासोबतच मानवी जीवनातील अनाकलनीय, विचार करायला लावणार्या अनेक बाबी यातून मांडल्यात...
ReplyDeleteअभिनंदन मॅडम 💐💐
अप्रतिम ! ! !
ReplyDeleteखूप छान मांडल
ReplyDeleteखूप छान आणि सत्य मांडले आहे. हीच जिवन कहाणी आपण पहातो.
ReplyDeleteखुप सुंदर आणि वास्तवीक मांडणी केली मॅडम अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteमहत्वपूर्ण माहिती ✌👌👌💐💐💐
Deleteसर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!
ReplyDelete