Sunday, 8 January 2023




साद उगवतीला – आजच्या युवापिढीला !

 

रंगीबेरंगी पेहरावात, झगमगीत प्रकाशात, डी. जे. च्या तालावर पावल थीरकवत, पेल्यातले पेय उसळवत, जोश-जल्लोषात तरुणाईने २०२३ या नववर्षाचे स्वागत केले असणार. विविध माध्यमांमधून शुभेच्छांची बरसात करत इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले असणार. सेलिब्रेशन हा तुमचा स्वभाव आहे. ते उत्साहाने केले पाहिजे. १२ जानेवारीला येणारा युवक दिन देखील तुम्ही नक्कीच साजरा करताल. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती आहे. फेटे बांधून, बाईक गतिमान करत, झेंडे फडकवत ‘जय जिजाऊ – जय शिवाजी’, ‘स्वामी विवेकानंद की जय’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकताल. तुमच्या उसळत्या रक्ताला, उत्साहाला हे शोभतेही.

 फक्त एकच इच्छा - हा जयघोष जितका बाहेर जातोना तितकीच ती साद आत गेली पाहिजे. ही आत पोहोचलेली साद अधिक प्रभावशाली असते, याचा अनुभव समस्त तरुणाईने घेतला पाहिजे. बाहेरचा जल्लोष आणि आतला होश याचा सुमेळ समाजाला घडवत असतो. प्रत्येक काळात जिजाऊ, शिवराय, राजर्षी शाहू, स्वामी विवेकानंद, लो. टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर, म. फुले, डॉ. आंबेडकर यासारखे देशप्रेमी, जनकल्याणकारी नेते घडतील याची शाश्वती देत असतो. काय केले या लोकांनी ? एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘त्यांनी काळाची आव्हाने समर्थपणे पेलली’. स्वत:ची नीती-मती-गती राष्ट्रार्पण केली. त्यांचे वारसदार म्हणवणारे आम्ही आमच्या काळाची आव्हाने पेलणार की नाही?

सजग आणि सतर्क असलेली अशी तुमची पीढी; ‘तरुणांचा देश’ अशी भारताची ओळख जगाला करून देते. आज तुमच्याकडे सर्वच गोष्टींसाठी अनेक प्रकारचे स्त्रोत, साधने आणि मार्ग सहजपणे उपलब्ध आहेत. ‘अध्यात्म’ आणि ‘विज्ञान’ या दोन्हीच्या चरम सीमा गाठून त्याची फळे आधीच्या पिढ्यांनी चाखली आहेत आणि दुष्परिणामही भोगले आहेत. अनुभवाचे एवढे मोठे संचित आपल्या पाठीशी असताना संतुलित जीवन आपल्याला जगता आले पाहिजे. टीनएजनंतर सामंजस्याच्या उंबरठ्यावर उच्च शिक्षण, करिअर, जोडीदार, सेटलमेंट या सर्वच गोष्टींचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात.

भावनिक गुंता न करता, आवश्यक तटस्थता व व्यावहारिक जवळीकता यात तुम्ही वाकबगार होत आहात. माणसांशी औपचारिक नाते सांभाळत, स्वत:ची स्पेस जपणे तुम्हाला सहज जमते. उगाच ढोरमेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्यामध्ये तरबेज आहात. स्वत:ला हवे ते हव्या त्या मार्गाने मिळवताना तुमचे मन फारसे दोलायमान होत नाही. साधनाचा फारसा विचार न करता ‘बाय हूक ऑर क्रूक’ हा मंत्र तुम्ही जोपासता. तुम्ही मुले खूप focused असता. मला आता हे करायचे आहे, हे मिळवायचे आहे. या तुमच्या संकल्पना स्पष्ट असतात. त्यासाठी विविध स्त्रोत तुमच्याकडे उपलब्ध आहेत. याचा अर्थ सर्वच काही आलबेल आहे, अशातलाही भाग नाही.

अनेकांना विविध अडचणींना तोंड द्यावेच लागते. पण कधीतरी नैराश्य आले की तुम्ही एकदम आयुष्य संपवण्याच्या, दुसऱ्याला उध्वस्त करण्याच्या म्हणजे टोकाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचता आणि कृती करून मोकळे होता; हे बरं नव्हे. जे आपल्याला पुन्हा निर्मिता येत नाही त्याच्या विनाशाचा विचार देखील माणसाने करू नये. हे जीवन मिळालेली एक संधी आहे. ती आपल्याला सुंदर आणि आनंददायी करता यावी. टीनएज संपून समजसपणाच्या उंबरठ्यावर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे असते. जे हवं ते साधायचं असतं. त्यासाठी कदाचित काही गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरू शकतील.

 

 

·      अनावश्यक घाई टाळा-

टीनएजमध्ये I am someone special. मी म्हणजे जग. माझ्याभोवती सर्वांनी फिरावे, ही जाणीव प्रबळ असते. सगळे माझ्याकडेच पाहतात, असं वाटण्याच्या या सुंदर वयात आपण एक स्वयंकेंद्रित जग निर्माण करतो. तिथून सामजस्याच्या उंबरठ्यावर उभे राहात स्वत:ला घडवा, स्वतःला मोठं करा.  विलक्षण वेगवान अशा या जगात ‘घाई करू नका’ हे शब्द कदाचित कालबाह्य वाटतील. पण ज्याला मजबूतपणे उभं राहायचं आहे,  व्यापक आणि समृद्ध व्हायचे आहे त्यानं अनावश्यक घाई टाळली पाहिजे. आज प्रसारमाध्यमे तुम्हाला हात धरून, ओढून मोठं करत आहेत. एखादं फूल निसर्गतः फुलतं तेंव्हा ते फुलण्यासाठी तयार झालेलं असतं. वेळेच्या आधी बळजबरीने फुलवली गेलेली कळी सौंदर्याचे पूर्ण परिमाण व्यक्त करू शकत नाही. आतून विकसित होणं,  त्या प्रक्रियेला वेळ देणं महत्त्वाचं आहे.  घाई करू नका. मग तुम्हाला वाहवत नेण्याची ताकद ना व्यसनांमध्ये राहील ना माणसांमध्ये.

 

·      स्वतःला समृद्ध करा -

शरीर चुस्त, मन मस्त, बुद्धी सतेज, निर्णय रास्त असतील तर समृध्दतेचा मार्ग सहजच गवसतो. त्यावर थोडे निश्चयाने व सातत्याने चालावे लागते. मधल्या अनेक मोहांना बाजूला सारावे लागते. बौद्धिक संपन्नता आणि भावनिक संतुलन असेल तर हे सहज साधू शकतं. स्वावलंबनाने, सुयोग्य पद्धतीने पैसे कमावून आर्थिक समृद्धता जरूर मिळवावी. पैसा हे साधन आहे. ते साधन राहावे. आयुष्याचे तेच एकमेव साध्य झाले तर पैशाने श्रीमंत आणि मनाने दरिद्री असा समाज घडायला लागतो. सर्वांगाने समृद्ध होणारा संपन्न होतो.   

 

·      चुका सुधारा -

आपण माणूस आहोत. वर्तनात, कामात अनेक चुका होत असतात. चूक स्वीकारावी. चूक सुधारावी. आणि पुन्हा ती चूक होणार नाही या निश्चयाने पुढे चालत राहावे. स्वत:चा कान धरणारा मित्र स्वत:ला व्हावे लागते. आत्मपरीक्षण करत जागरूक राहावे. चुकलेल्या गोष्टींबाबत स्वतःला कायम कोसत राहणे हे जसे अयोग्य आहे, तसेच चुकांकडे दुर्लक्ष करत, ‘चलता है’ म्हणत स्वत:ला माफ करत राहणे ही वृत्ती जास्त धोकादायक आहे. आम्हाला एकत्र कुटुंबाचा आधार होता. समाजात कोण काय म्हणेल याचा धाक होता. विभक्त कुटुंबपद्धतीत व बिनचेहे-याच्या समाजात तुमच्यावरील जबाबदारी जास्त वाढते. सेल्फ कंट्रोल महत्त्वाचा ठरतो.

 

·      पंचज्ञानेंद्रियांचा स्मार्ट वापर करा -

स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार अशा वस्तू वापरण्याच्या नादात माणसाचे स्मार्टपण आपण विसरत चाललो. पंचज्ञानेंद्रियांचा स्मार्ट वापर ‘वह तीर क्या निकले जो कर हे लक्ष्य तक जाए नही..’
ही वृत्ती विकसित करते. या वृत्तीने माणूस अंतर्बाह्य स्मार्ट होऊ शकतो. हे स्मार्टपण वयाबरोबर वाढत जाणारे असते. त्यातूनच सजगता, अचूकता, नेमकेपणा या गोष्टी वाढतात. दैनंदिन जीवनात विनाकारण खर्च होणारी शक्ती या स्मार्ट वापराने सत्कारणी लागते.

कमी वेळेत, कमी साधनात उत्तम काम करता आले पाहिजे. तिथे आपल्या मेंदूचा आणि आपल्या अनुभवाचा खऱ्या अर्थाने वापर होतो. डोक्याचा आणि स्वानुभवाचा सातत्याने केलेला हा वापर माणसाला कालसुसंगत राहण्यासाठी पूरक ठरतो. काम करताना पंचज्ञानेंद्रियांपेक्षा-पंचकरणांपेक्षा आपण अन्य उपकरणांवर अधिक अवलंबून राहतो. आणि मग उपकरणेच आपल्यापेक्षा स्मार्ट होतात. आपले परावलंबित्व वाढते. आपण कालबाह्य होण्याची शक्यता वाढते.

 

·      कार्यनिष्ठा बाळगा –

कानिष्ठा कारयक्षमता वाढवते. कोणतेही काम करताना ते चांगले व परिपूर्ण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. वयासह सवय वाढत जाते व आपला स्वभाव म्हणून स्वत:ची ती ओळख बनते. आपल्या प्रत्येक कामावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटत असतो. आपण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कार्यात करता आला पाहिजे. कामाचे स्वरूप, त्याची व्यापकता, आवश्यकता हे तपासून कामांना कमी-अधिक वेळ देण्याचे तारतम्य बाळगावे लागते.

 आपण काम करतो तिथे आपल्या कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या इतर अनेक गोष्टी असतात. कार्यनिष्ठ माणूस इतर माणसांच्या वागणुकीचा परिणाम आपल्या कामावर होऊ देत नाही. त्यासाठी नियमाने काम करण्याची व व्यक्तिगत हितसंबंध कामाच्या आड येऊ न देण्याची सवय विकसित करावी लागते. ही सवय सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यास पूरक ठरते.

 

·      स्वस्थ राहा / बी कम्फर्टेबल विथ यूवरसेल्फ –

जो स्वत:सोबत कम्फर्टेबल असतो तोच इतरांशी नीट संवाद साधू शकतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी ‘स्वस्थ’ असणे, स्वत:मध्ये स्थित असणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक दृष्ट्या असलेली स्वस्थता आत्मविश्वास वाढवते. परिस्थितीचे व्यापक भान अतिआत्मविश्वासापासून दूर ठेवते. विषयज्ञान आणि व्यवहारज्ञान याची उत्तम सांगड आपल्याला कम्फर्टेबल राहण्यास शिकवते.

 

·      विचारांच्या चौकटी मोडा / कीप ओपन माइंड
ठरीव, साचेबद्ध पद्धतीने विचार करण्याची सवय लावून घेतली तर आपण नव्या अनुभवाला, नव्या दृष्टिकोणाला स्वीकारू शकत नाहीत. मुक्तपणे विचार करण्याला आपले पूर्वग्रह लगाम घालायला लागतात. आणि मग विशिष्ट रिंगणात, विशिष्ट चौकटीत आपण फिरत राहतो. अनुभवातून आपली भूमिका तयार होणे आणि आपण ताठर असणे या दोन गोष्टीत फरक आहे. तर्कशुद्ध आणि सर्वांगीण  विचार करण्याची सवय आपल्याला या मार्गावर पूरक ठरते.

      

·      मूळ स्त्रोतांना महत्त्व द्या

‘फास्ट’ आणि ‘इन्स्टंट’ या दोन सबबींखाली आपण जीवनातले मूलभूतपण, विश्वासार्हता गमावत चाललेलो आहोत. दुय्यम साधनांवर जगण्याची आपण सवय लावून घेत आहोत. त्यामुळे काम गतीने, सोप्या पद्धतीने झाल्याचा भास निश्चितच होतो. मात्र कामातून, अनुभवातून माणूस घडत असतो. ही ‘घडण’च आपण आयुष्यातून वजा करत आहोत. त्यामुळे हातांनी काम करणे आणि त्यातून मनाचा संयम, चिकाटी वाढत जाणे हे हरवत चाललेले आहे. ‘अस्वस्थ’ आणि ‘उतावीळ’ ही या पीढीची वैशिष्ट्ये होत आहेत. मूलभूत वाचनाच्या अभावी तर कोणीही यावे आणि भडकवून जावे, दिशाहीन करावे असे सुरू आहे. आपल्या सुशिक्षितपणावर आणि समंजसपणावर आपणच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत. महापुरुषांचे मूळ ग्रंथ वाचले तरच त्या विचारांची खोली आणि उंची समजण्याची पात्रता येईल. झेंड्यांचे वाहक होण्याऐवजी विचारांचे पाईक व्हा.

 

·      जोडीदार व कुटुंब –

‘कुटुंबातील अस्वस्थता’ हा आज घरोघरीचा प्रश्न आहे. अस्वस्थ कुटुंबातून स्वस्थ समाज जोपासण्याचे मोठे आव्हान समोर आहे. आई-वडिलांचे आपापसात पटत नाही आणि शॉक अॅबझॉर्बर म्हणून काम करणारी दुसरी कोणतीही व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. अशांत संसार बघत ज्यांचे आयुष्य जाते, त्यांच्याकडून शांत, स्वस्थ संसाराची अपेक्षा किती करावी हा एक प्रश्नच आहे. त्याग-प्रेम, स्वातंत्र्य (माझी स्पेस) यांच्या बदलत्या संकल्पनांनी कुटुंब सौख्य निकालात काढले आहे. अशा वातावरणात तुमची जोडीदाराची निवड, परस्पर सामंजस्य हे अत्यावश्यक ठरते.

जमिनीवर पाय ठेवून, डोळसपणे जोडीदार निवडावा. उगाचच परदेशातल्या ‘कॉंट्रॅक्ट बेस्ड मॅरेज’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या पद्धतींचे गोडवे गात स्वत:च्या व कुटुंबाच्या आयुष्याचा नाश करू नये. अवास्तव अपेक्षांना फाटा देऊन, वास्तव स्वीकारून, प्रसंगी योग्य तडजोड करत जगता आले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या टोकाच्या कल्पनांना बळी पडून आपल्या हाताने आपले घर उध्वस्त करू नये. दुसऱ्याला समजून घेण्याची सवय लहानपणापासून लावली तर संसार सुखाचा होतो. स्वत:च्या आयुष्यात होणाऱ्या या मोठ्या बदलाला सामोरे जात अनेक बदल मुला-मुलींना स्वत:मध्ये करावे लागतात. स्वत:च्या भल्यासाठी दोघांनीही ते केले पाहिजेत. तुमच्या वर्तमानाला आकार देताना तुमचा ‘काल’ आणि तुमचा ‘उद्या’ तुम्ही सांभाळत असता. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने समंजसपणा बाळगला तरच सौख्य राहते.

·      समाजभान   

धर्म-संप्रदाय,  भाषा,  जात, प्रांत, देश यापलीकडे जाऊन मैत्री करण्याची व निभावण्याची ताकद असलेली तुमची युवापीढी आहे. निखळ मानव मैत्र साधण्यासाठी ते आवश्यक देखील आहे. तिथे गरज असते दोघांचाही हेतू शुद्ध असण्याची. म्हणून समाजाचे वास्तव भान बाळगत सावधच राहावे लागते. बेसावधपणात आयुष्यच पणाला लागलेले पाहतो तेंव्हा हातात काहीच राहात नाही. कधीही इतके पुढे जाऊ नका, जिथून परतण्याचे सगळेच मार्ग बंद होतील. स्वत:वर, आयुष्यावर भरभरून प्रेम करा. दुसऱ्यानी काय करावे, हे तुम्ही ठरवू नका. आपल्या इतकाच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दुसऱ्यांनाही आहे, याचे भान बाळगा. स्वातंत्र्य अधिकारापेक्षाही जबाबदारी अधिक देत असते, ती निभावता आली पाहिजे. बाजारव्यावस्था जीवनाच्या केंद्रस्थानी आली आणि कोणीच कोणावर विश्वास ठेऊ नये, अशी दुर्धर परिस्थिती प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाली. एकमेकांना फसवून समाज म्हणून आपण नांदू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बी ऑनेस्ट, बी ट्रान्सपरंट अँड बी ट्रस्टवर्दी !

तुम्ही आज अशा काळात आहात जिथे धर्म, संप्रदाय, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा आवाका आणि मर्यादा या दोन्हीही, मानवी जगाच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याचे सुपरिणाम वाढवण्यासाठी व दुष्परिणाम कमी करण्यासाठी गरज आहे; ज्या मानवी वृत्तीमुळे, दृष्टिकोनामुळे हे परिणाम घडतात ती वृत्ती आणि दृष्टी मुळातून सुधारण्याची. तरच तुम्ही तुमच्या ताकदीवर नवे जग घडवताल. तुमच्या ताकदीबद्दल काय बोलावे, “इन हाथो मे तो स्वयं ब्रहमाड तुल जाता है|” शुभेच्छा त्या कर्तृत्वाला !

       

                                                                                                                                              वृंदा आशय



 

3 comments:

  1. अगदी समर्पक आणि योग्य मार्गदर्शन केले..

    ReplyDelete
  2. खुपच सुदंर आणि प्रेरणादायी असे लिखाण 💐💐

    ReplyDelete
  3. अत्यंत महत्त्वाचे

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...