Tuesday, 22 July 2025

‘बातमी’ / ‘बात’ ‘मी’ / बात ‘मी’


                        

सकाळीच डॉ. सविताताई पानट निवर्तल्याची बातमी आली. मन कळवळलं. निसर्गनियम आहे, आला तो कधी ना कधी जाणारच. पण माझ्यासाठी अण्णाची (कै. अनंत भालेरावांची) लेक गेली. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीसाठी मी अनंत भालेरावांच्या समग्र साहित्याचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून मला मराठवाडा प्रदेश उमगत आणि उलगडत गेला.

अण्णाचे मराठवाडा प्रदेशासाठीचे योगदान पाहिले असता लक्षात आले, त्यांचे कुटुंब घरादाराच्या भिंतींशी नाते सांगणारे, एका विशिष्ट चौकटीपुरते मर्यादित नव्हते. या घराच्या उंबरठ्याने कुटुंबजीवन आणि समाजजीवन यातलं अंतर मिटवले होते. अनेकानेक कुटुंबांना सामावून घेत, वारकरी निष्ठांशी तद्रूप होत मूल्यसंस्कारांची बीज पेरली होती.

अण्णाच्या कारकीर्दीने हा वारसा केवळ माणसांनाच नव्हे तर पत्रकारितेच्या क्षेत्राला दिला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेची जी तेजस्वी परंपरा त्यांनी अनुभवली होती; तिच्याशी एकनिष्ठ राहात, स्वातंत्र्योत्तर काळात देखील मूल्यजोपासनेसाठी तुरुंगवास पत्करला होता. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या या माणसाने हाती अंगार धरला होता. दुर्दैवाने बदलत्या काळाबरोबर पत्रकारिता क्षेत्रात होत गेलेल्या मूल्यांच्या घसरणीविरुद्ध त्यांना लेखणी चालवावी लागली. ज्या जीवनमूल्यांच्या वैभावापुढे संपत्ती आणि भौतिक सुखसोयी कस्पटासमान मानणारी पीढी त्यांनी अनुभवली होती तीच जीवनमूल्ये रसातळाला घेऊन जाणारा समाज त्यांना पहावा लागला. त्यांच्या लेखनातून जागोजागी त्याविषयी  व्यक्त होणारी खंत माझ्या मनात या दु:खाला धगधगत ठेवते.

सविताताईच्या निधनाची बातमी आली आणि अण्णाच्या पत्रकारिता क्षेत्रातली ‘बातमी माझ्याभोवती पिंगा घालत नाचू लागली. लहानपणापासून माझं आणि बातम्यांचं जे नात  आहे, ते मलाच नव्याने उलगडत गेल.

 लहानपणी वर्तमानपत्रातून बातम्या वाचलेल्या, आकाशवाणीवर ऐकलेल्या आणि दूरदर्शनवर पाहिलेल्या आहेत. आजही बातम्यांची ती सिग्नेचर ट्यून काना- मनात गुंजत राहते. त्या बातम्यांची ती ठराविक वेळ, बातमीदाराच्या आवाजातील गांभीर्य आणि गोडवा, पोशाखातील सौम्यता, दृश्यातील संयम, बातम्यांची लेखन- निवेदनातील अचूकता, वस्तुनिष्ठ तटस्थता या सर्वानीच बातम्यांच्या बाबतीत जनमनात एक प्रचंड विश्वासार्हता निर्माण केलेली होती.

 बातम्यांची वेळ झाली की घराला चिडीचूप केलं जात होत. लहान मुलांची रवानगी अंगणात व्हायची. स्वयंपाकघरातून कुकरची शिट्टी त्यावेळी वाजू नये, भांड्या-कुंड्यांचा आवाज होऊ नये याचे नियोजन केले जायचे. “श.....! बाप्पा (माझे मोठे काका) बातम्या ऐकत आहेत. आवाज करायचा नाही.” हे वाक्य तर मला आजही कानात ऐकू येते. आणि या वाक्यानीच त्या नकळत्या वयातही ‘बातम्या’ म्हणजे खूप काही तरी महत्त्वाचे आहे, हे मनावर कायमचे कोरले गेले.

महाविद्यालयीन शिक्षण घेताना घडणाऱ्या घटना, येणाऱ्या बातम्या आणि अभ्यासक्रम यांची जी सांगड अध्ययन – अध्यापनात घातली जात होती त्यातून कार्यकारणभाव, ‘रिडिंग बिट्वीन द लाईन’, तार्किकता, एककल्लीपणाचा अर्थ, निष्पक्षता असे बरेच काही कळत गेलं. कै. अनंत भालेरावांच्या समग्र लेखनाचा अभ्यास करताना पत्रकारितेतील ‘ध्येयवाद’ आणि ‘धंदा’ यावरची त्यांची परखड मतं वाचायला मिळाली. बदलत्या काळानुरूप पत्रकारिता एक धंदा झालेला असला तरी देखील तो प्रामाणिकपणे का करता येऊ नये ?, या प्रश्नाने अंतर्मुख केले.

काळ सातत्याने पुढे जात राहिला. विज्ञान – तंत्रज्ञानाने त्याची गती वाढवली. साध्या वर्तमानपत्राबरोबर इ – वर्तमानपत्र आले, रेडिओ आणि दूरदर्शनवर विविध वाहिन्या (चॅनल्स) सुरु झाल्या. बातम्याचे स्वतंत्र चॅनल्स आले. २४ तास बातम्या सुरु राहू लागल्या. अगदी 'अभी तक' अशी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत विश्वासार्हता कधीच मागे पडली. आवाजी आणि भडक बातमी हे बातमीच नवीन वैशिष्ट्य जन्माला आले. बातमीच्या स्त्रोतासह सर्वच क्षेत्रात आपलेच अधिराज्य राहील असा प्रयत्न धनसंपन्न प्रसारमाध्यमांकडून होऊ लागला. पैशांच्या जोरावर संपादकाचे स्वातंत्र्य, धोरणाची दिशा, लोकशाहीचा आवाज, स्वस्तुतीचे भोंगे विकत घेतले जाऊ लागले. पैशांचा माज इतरांच्या स्वातंत्र्याची बूज ठेवेनासा झाला. बाणेदार संपादक पायउतार होऊ लागले. वर्तमानपत्राच्या जन्माबरोबर तेजस्वीतेचे बाळसं धरलेल्या पत्रकारितेला ग्रहण लागू लागले. सुविधा वाढत गेल्या आणि सत्त्व हरपत गेले. प्रामाणिकतेचा -हास झाला. लोकशाहीचा चौथा खांब डळमळीत होऊ लागला.

हे सारं कमीच होते बहुदा. त्यामुळे विकसित तंत्रज्ञानाने आता माणसाच्या हाती कोलीतच दिलं. समाजमाध्यमांवरून स्वत:च्या बातम्या स्वत:च प्रसिद्ध करण्याची, ऑडिओ - व्हिडीओ पोस्ट करण्याची सोय झाली. बातमीतील बात, वार्ता लोप पावून ‘मी तेवढा सगळीकडे दिमाखात वावरू लागला आहे. काही केलं नाही तरी चालत पण सांगितलं गेलं पाहिजे, हा आग्रह वाढीस लागला आहे. आभासी जीवन जगण्याच्या नादात बुद्धी आणि विचार हे आपले वैशिष्ट्य आहे हे विसरलेला माणूस पोस्ट दिसताक्षणी अंगठे दाखवून, लाईक करून मोकळा होतो. सुशिक्षितपणाकडून अंगठेबहाद्दरतेकडे आपली पुन्हा वाटचाल सुरु झाली आहे.

  चांगल्या गोष्टींचै कौतुक करण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टींचा निषेध करत त्यांना धाक दाखवण्यासाठी संघटित होणारा समाज संघटनाचे सूत्रच विसरला. एकटा पडलेला माणूस भयभीत होऊन, होयबा व्हायला लागला. माझं मत व्यक्त केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल या भीतीने त्याचा स्व, त्याचा स्वाभिमान, त्याची अस्मिता हिरावून घेतली. कटपुतली होण्याला मान्यता देऊन सुरक्षित पिंजरा विकत घेण्याला त्यानं प्राधान्य दिले. काहींनी पिंजरे नाकारले तरी उदासीनता किंवा मौन स्वीकारलं. क्वचित बोलणारे उरले त्यांची सगळे उपेक्षा करू लागले. हे चित्र नसणारे क्षेत्र आज सापडणे केवळ अशक्य आहे. आणि आमची अपेक्षा मात्र सांगते, समाज असावा गुणी; प्रश्न आहे तो करावा कोणी? कारण आम्हाला सवयच लागली आहे, आमच्यासाठी इतरांनी काहीतरी करावे. आपल्या मात्र केसालाही धक्का लागू नये. सुरक्षिततेच्या नावाखाली आम्ही षंढपणाने जगणे मान्य करतो, त्याला व्यावहारिक शहाणपणाचे गोंडस नाव देत !

ताई, तुम्ही अण्णाकडे गेला आहात. त्यांना सांगा, “आता तरी मनाला फारस लावून घेऊ नका; तब्येतीला जपत जा म्हणावं. कारण हे असच चालायचं. आमच्या सुखाच्या व्याख्या सुविधेपुरत्या मर्यादित झाल्या आहेत. मूल्यांशी नात ठेवून जीवन होरपळून घ्यायला आम्ही वेडे नाहीत म्हणावं.”

 

वृंदा आशय

  


10 comments:

  1. अतिशय सुरेख शब्दात तुम्ही लिहिलेला लेख मनाला भावणारा आहे मॅम. खूपच छान.
    वाचकांना प्रेरित करणारा लेख
    आहे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. मनाला अंतर्मुख करणारा लेख........

    ReplyDelete
  4. बातमी चा बात ' मी' पर्यंतचा प्रवास अंतर्मुख करणारा ....

    ReplyDelete
  5. वृंदा, नियमित वाचत आहे तुझा "ब्लॉग". Gifted तर तू आहेसच पण आता व्यक्त होत आहे हे आम्हा वाचकांसाठी चांगलं आहे. कधीतरी तुझ्या वर्गात बसून तुझ्याकडून एखादी चांगल काव्य पण शिकायचं आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आत्मीयतेने दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे.

      Delete
  6. सर्व वाचकांचे व मार्मिक प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

    ReplyDelete
  7. सहजच बदलत असलेला काळ उभा केलात. छान Mam

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...