Friday, 25 July 2025

प्रिय भाईजी,


 

प्रिय भाईजी,

प्रिय भाईजी’ हे शब्द मनामध्ये उमटले आणि क्षणभर मीच थबकले. कारण गोविंदभाई श्रॉफ म्हणल्यावर पाठोपाठ मनामध्ये ज्या भावना येतात त्यांचे निदर्शक केवळ ‘माननीय’, ‘वंदनीय’, आदरणीय हेच शब्द असू शकतात. माझा हा विचार सुरु असतानाच मन मात्र प्रचंड वेगाने धावत गेल आणि सुरु झाला संवाद थेट आतून, खूप खोलवरून प्रिय भाईंशी !

भाईजी, “मी तुमच्या संस्थेची एक छोटी विद्यार्थिनी. तिसरीच्या वर्गापासून इथे आले,” पाहता पाहता मन चार - साडेचार दशकं मागे गेलं. “आम्ही औरंगपु-यात  राहत असल्यामुळे, अगदी स्वाभाविकपणाने दररोज तुम्ही ठराविक वेळेला दिसायचा. तुम्हाला जाताना बघावं आणि घड्याळ लावून घ्यावं इतका नित्यनेम हा तुमच्या वाण्यामध्ये होता.” तुमची हातातील विशिष्ट ग, अंगातला तो विशिष्ट कोट, धोतर, चालण्याची ढब.. तुम्ही दिसला की वडील आम्हाला आवर्जून गॅलरीमध्ये बोलवत आणि म्हणत, फार मोठा माणूस आहे हा. अत्यंत काटेकोर, शिस्तीचा, देशप्रेमी...” कळत नकळत तुमच्या प्रतिमेनी आणि त्यांच्या शब्दांनी मनावरती एक खोल संस्कार केला. तो संस्कार सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत शिक्षण घेताना पदोपदी वृद्धिंगत होत गेला. तुम्ही भेटायचात, कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने, कधी विचारपूस करायला यायचात, कधी काही सांगायला यायचात, कधी आम्ही तुमच्याकडे काही विचारण्यासाठी येत होतो आणि प्रत्येक वेळेला तुमच्याबद्दलचा आदर हा वाढतच जायचा. आम्ही शिकत होतो तिथे सुद्धा प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये, भाई कसे मोठे आहेत, भाईनी काय कार्य केले आहे, याबद्दल विलक्षण आदर होता. आमच्यावर हा संस्कार झाला होता, नीट वागायचं, तुम्ही भाईंच्या संस्थेमध्ये शिकत आहात. आपल्या वागण्याने या संस्थेला गालबोट लागू नये.” भाईंनी दिलेल्या संस्काराला गालबोट लागू नये’, बालमनावर होणारा हा संस्कार आम्ही अगदी सोशीन पाळायचो. कधी खोटं बोलायचं मनामध्ये आलं तरी, आपण सरस्वती भुवन मध्ये शिकतो आहोत’, आमचं अंतर्मन आम्हाला तंबी देऊन सांगत होतं. तुमच्या आशीर्वादाने भाई आम्ही मोठे होत गेलो.

भाई, तुम्हाला आठवतं मी विद्यार्थिनी असताना तुमची मुलाखत घ्यायला आले होते. गप्पांच्या ओघात मी तुम्हाला म्हणाले, “भाई, स्वातंत्र्य तर मिळाले आहे मग आता आम्ही देशासाठी काय करावं? आमच्या पीढीसमोरचे प्रश्न काय आहेत,ताच्या काळाच्या समस्या काय आहेत, हे मला काही कळत नाही”, माझ्या मनातलं मी तुम्हाला भाबडेपणाने सांगून टाकलं. तुमची नजर गंभीर होत गेली. आवाज धरदार झाला आणि तुम्ही इतकच म्हणालात, “...समजायला पाहिजे. आपल्या काळाचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. त्यामुळे प्रश्न समजले पाहिजेत, उमजले पाहिजे आणि काय करायचं याचा कणखरपणे निर्णय घेता आले पाहिजे.”

तुमच्या या उत्तराने मी गोंधळले. माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही इतकच म्हणालात, बाळा, आपलं प्रत्येक काम म्हणजे देशसेवा असतं. सध्या तुम्ही विद्यार्थी आहात ना? मग तुम्ही तुमचा अभ्यास खूप प्रामाणिकपणानं करणं, ही झाली तुम्ही केलेली देशसेवा!” तुम्ही देशसेवेची किती साधी, सोपी, सुंदर अशी व्याख्या सांगितली होती! आपलं काम करणं म्हणजे देशसेवा’, इतकं साधं सोपं गणित होतं तुमचं देशसेवेच. भाई, सोप्या शब्दात तुम्ही समजावून सांगितलं आणि आत्मविश्वास जागा केलात मनामध्ये, हो, मी सुद्धा देशाची सेवा करू शकते. राष्ट्रसेवेचा आनंद आणि अभिमान मला देखील बाळगता येऊ शकतो.” तुमच्या त्या शब्दांनी माझ्या प्रत्येक कामाला मी, “देशसेवा करती आहेस ना,  कंटाळा करत नाही ना?” हा प्रश्न विचारत गेले आणि मग प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उभे राहण्याचं बळ येत गेलं. कारण इथले संस्कार मला सांगत होते,

हम ना सोचे, हमे क्या मिला है

हम ये सोचे किया क्या है अर्पण?

याच मानसिकतेत वयाने अजून मोठे होत गेलो. औपचारिक शिक्षण संपवून सुदैवाने नोकरीला लागले ती देखील इथेच. पीएच.डी. चा अभ्यास करत असताना, मराठवाडा समजावून घेत असताना, भाई, तुम्ही मला अधिक उलगडत गेलात. लौकिक अर्थाने तुमचे देहावसान झालेले होते. मात्र तुमचं विचारधन, तुम्ही घडवलेली संस्था आणि माणसं, तुमच्याबद्दलच्या आठवणी आणि किस्से माझ्या तुमच्याबाबतच्या आकलनात भरच टाकत होते.  

तुम्हाला माणसांची पारख होती, गुणांची कदर होती, विकासाचा ध्यास होता, भिन्न मतांची माणसं सांभाळण्याची - जोपासण्याची कला होती. तुम्ही देव मानतही नसताल कदाचित पण ‘उपेक्षू नको गुणवंता अनंता...’  हे तत्त्व तुम्ही प्राणपणानं जोपासलंत. मिळतील तिथून माणसं आणलीत आणि इथली जोपासलीत.

खरं तर त्या काळची माणसं अभ्यासान- व्यासंगान तीव्र बुद्धिमत्तेची झालेली होती. मनमोकळे वाद-संवाद व्हायचे, आपापल्या मतांचे टोकदार आग्रह धरले जात होते. मात्र हे मतभेद मनोभेदात बदलणार नाहीत याची तुम्ही काळजी घेतलीत. तुमच्या या दक्षतेने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला एक विस्तृत आणि भक्कम असा मूल्याधिष्ठित पाया लाभला. तुमच्या आधी आणि तुमच्यानंतरही अनेक माणसांनी त्याग आणि समर्पणाच्या भावनेने या संस्थेची जी सेवा केली, त्यामुळे इथले पावित्र्य वाढत राहिले, मांगल्य नांदत राहिले. त्याचा प्रकाश मराठवाडा प्रदेशभर पसरत गेला. इथल्या तेजस्वीतेची दखल महाराष्ट्राला घ्यावी लागली. तुमच्या निष्ठावंत आणि व्यापक कार्याने भारतीय राजकारणातल्या लोकांना शिक्षण क्षेत्रातल्या या पंढरीला यावे वाटले. तत्कालीन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तुमच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना जवळून पाहता आले. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी त्यांची सेवा इथं रुजू केली. इतक सगळ झालं, पण तुम्ही कधी बडेजाव मिरवला नाहीत. अनंतराव भालेरावानी ‘मांदियाळी’ मध्ये तुमचे वर्णन केले आहे, ‘... आशेचे हे शून्य केले आम्ही’, तुम्ही शेवटपर्यंत तसेच राहिलात ‘निर्मोही’!  

भाई, अखेरच्या श्वासानंतर तुम्ही इथेच विसावलात. लाल मैदानावर चितेच्या त्या उंच उंच जाणाऱ्या ज्वाळा कदाचित आकाशाला बजावत होत्या, या भूमीत जन्मणारी आणि नि:संगपणे कार्यरत राहणारी माणसे आकाशाला गवसणी घालतील.

भाईजी, आजही इथे तन्मयतेने काम करणारी अनेक माणसे आहेत. पण खर सांगू का, कधी कधी भीती वाटते, आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यालाच खाली बोलावलं जात की काय ?  

भाईजी, आज जीवनात आणि सगळ्याच क्षेत्रात इतक्या विसंगती दिसून येतात, जाणवतात, बोचतात... त्याबद्दल बोलाव कोणाशी, असा प्रश्न पडतो. तुमच्यासारखं समजून घेणार, वेगळ्या मताचा आदर करणार, मत वेगळं असलं तरी त्या माणसाला ते मांडता आलं पाहिजे, यासाठी भांडणार तुमच्यासारखं ताकदीच व्यक्तिमतत्व आता का दिसत नाही, हा प्रश्न मला सतावत राहतो.

समर्थ समाज घडवण्यासाठी तुम्ही शिक्षणाकडून सर्वांगीण विकासाची अपेक्षा केलीत. आता शिक्षण क्षेत्राचीच अवस्था अर्धांगवायूचा झटका आल्यासारखी झालेली आहे. तुम्ही आयुष्यभर गंभीर राहिलात आणि शिक्षणाक्षेत्र हसत - खेळत केलं. आम्ही हसत खेळत जीवन जगत, शिक्षणाची अवस्था गंभीर करून टाकलेली आहे. आमचे प्राध्यापक बाहेरच्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य व्हावेत आणि आमच्या इथले प्राचार्य आमच्याकडेच नाकारले जावेत ही विसंगती नव्हे का? कोणाच मन दुखावलं जाऊ नये म्हणून आम्ही गोडीगुलाबीने बोलतो किंवा गप्प बसतो. मतभेद व्यक्त होत नाहीत मनोभेद मात्र वाढतच राहतात.

भाईजी, कधी कधी तुमच्यावर संधी मिळूनही विस्तार न केल्याचा आरोप होतो, पण तुमच्यासारखी सखोलतेची जाण कोणातच नाही. मग विस्तारलं तरी सगळंच उथळ होत गेलं. निवड, अभ्यास, संशोधन...माहिती वाढली, ज्ञान हरपलं आणि शहाणपण तर कधीच विरलं... अशा परिस्थितीत आम्ही जगतो आहोत. अत्यंत सामान्य विषय एका विशिष्ट चौकटीमध्ये बसवून जेव्हा मांडण्याचा प्रयत्न केला जातो, त्या वेळेला महामहोपाध्याय ब्रम्हानंदजी देशपांडे सर यांनी अशा प्रकाराला दिलेली एक चपखल उपमा आठवते, ‘चिंधीच महावस्त्र करणे’! अशा अनेक चिंध्यांची महावस्त्र होताना आज आम्ही बघतो आहोत.

देशपांडे सरांनी आम्हाला जाणीव करून दिलेली होती, “देव तुमच्या हातात दररोज २४ हिरे ठेवतो. त्या हिऱ्यांचं तुम्ही काय करता?” भाईजी, आता हे हिरे मोजण्यासाठी मशीन आलेली आहे आणि आम्ही त्या मशीनचे सेवक झालेलो आहोत. विद्यार्थ्यांप्रतीचा आमचा विवेक आम्ही केंव्हाच बाजूला ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेत पास व्हावं हे आमचं ध्येय झालेलं आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांचा दर्जाच आम्ही कमी करून टाकलाय. परीक्षा व्यवस्था सोपी केलेली आहे. आलेला पेपर तपासून कसा पास करता येईल याचं उत्तर आम्ही पेपरमध्ये शोधत राहतो ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. भाईजी, तुम्ही कधी चक्कर मारायला आलात तर रिकाम्या वर्गामध्ये मुलांची वाट पाहत बसलेले प्राध्यापक तुम्हाला जरूर भेटतील.

मला वाटत शिक्षक – विद्यार्थ्याची आणि तुमची खरच भेट झाली पाहिजे म्हणजे शिक्षण व्यवस्थेला जाग येईल. तुमच्या कार्यातून तुम्ही जो एक धगधगता स्थंडील ठेवला होता तो आता मिणमिणता कंदील होण्याची वेळ आलेली आहे. पण भाईजी मला खात्री आहे, येणारी पिढी त्या कंदिलाचा वारसदार होत त्याच रुपांतर निश्चितपणाने मशालीत करेल, कारण तुमच्या संस्कारांचं पाणी आमच्यात मुरलंय.

भाईजी, खरं म्हणजे सकाळपासून विद्यार्थ्यांशी बोलताना, जयंतीनिमित्त त्यांना तुमची माहिती देताना ठरवलं होतं; तुमच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यायचं. मात्र दिवसभर त्याच परिसरात असूनही खरोखर येणं झालं नाही. मात्र तुमच्याशी या मनमोकळ्या गप्पा झाल्यावर जाणवत आहे, ‘खरं स्मृतिस्थळ तर मनातच आहे. जे मला तुमच्याबाबत ‘माननीय’, ‘वंदनीय’ या भावनेपासून ‘प्रिय भाईजी’ या भावनेपर्यंत पोहोचवत. तुमच्याजवळ आजही विश्वासाने मन मोकळ करू देत. भाईजी, अंतरातील हे स्मृतिस्थळ जागत राहू द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या, एवढीच प्रार्थना!

वृंदा आशय

 

 

 

 

4 comments:

  1. भाईंच्या जीवनाचे विविध पैलू आणि विचार किती सुंदर मांडले आहेत. आठवणी लिहून तुम्ही आमच्यासमोर भाईंना उभं केलं. मी कधीचं भाईंना पाहिलं नाही. पण त्यांना भेटण्याची इच्छा कायम बाळगत राहिलो. ते अशक्यचं आहे हे माहित होतं पण कायम वाटायचं भाईंना जर भेटता आलं असतं तर. खूप छान त्यांच्याबरोबर सुद्धा संवाद करता आला असता. त्यांच्या समोर घडता आलं असतं. पण काही गोष्टी कितीही जरी मनाला वाटलं तरी त्या होत नाहीत. याचं शल्य कायम असेल. पण आम्ही भाईंच्या विचाराच्या व्यक्तीने आम्हाला वाढवलं. मोठं केलं. आमच्या पंखांना बळ दिलं. याचा मनस्वी आनंद आणि अभिमान कायम आहेच. तूर्तास थांबतो.

    आज या लेखातून तुम्ही भाईंना आमच्यासमोर काही अंशी उभं केलं. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपला विद्यार्थी एवढी सुरेख आणि विस्तृत प्रतिक्रिया देऊ शकतो याचा आनंद काही औरच! लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. मन:पूर्वक आभार! तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

      Delete
  2. भाई ची शिस्त त्यांच्या विविध पैलू वर छान विचार मांडले आहेत सोबतच ढेपाळलेल्या शिक्षण प्रक्रियांचे विवेचन पण खूप सखोल आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! वाचकांना विचार भावतात तेव्हा लेखकही सुखावतात.

      Delete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...