Monday, 28 July 2025

संसाराचे ‘ज’मंत्र !


नेहमीप्रमाणे मी ब्लॉ रायटिंग करण्यासाठी म्हणून लॅपटॉप घेऊन बसले होते. मी शीर्षक टाईप केले संसाराचे जमंत्र. तेवढ्यात मागून चिरंजीव आले आणि म्हणाले, “अगं आई, टायपिंग मिस्टेक झाली आहे. मी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि ज ला एकेरी अवतरण चिन्ह दिल. त्याबरोबर तो म्हणाला, “अच्छा, तुला मंत्र मधून काहीतरी वेगळं सांगायचं आहे वाटतं. त्याला मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले याचा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद त्यानंच वाचून घेतला आणि गालातल्या गालात हस निघून गेला.

मित्र-मैत्रिणींनो आयुष्यात अशा गमती – जमती नेहमीच घडत राहतात. कधी वाटतं चुका होत आहेत, म्हणून लगेच बोट दाखवलं जात. कधी कधी चुका असतातही आणि त्या दाखवल्या गेल्या की मग मात्र आवडत नाही. अर्थात त्या चुका कोणी, कुठे, केव्हा आणि कशा दाखवल्या या ‘क’ पुराणावर सुद्धा बरच काही अवलंबून असत.

 “अहो, आईने सांगितलं तरच रुचत, सासुने सांगितलं की बोचत; बहिणीने सांगितलं की पटं, नणदेने सांगितलं की टोचतं वडिलांनी सांगितलं की हितकर वाटत, सासर्‍यांनी सांगितलं की सलत.” बर गंमत म्हणजे त्या सगळ्यांनी सांगितलच नाही तर, ‘हू ! एवढही सांगू नये का? लक्ष देऊ नये का ? अशी तक्रार करणारेही आपणच असतो. याचच नाव आहे संसार’ !

संसारातून नात्यातलं खट्टे-मिठेपण अविरतपणे व्यक्त होत राहतं. फक्त त्यातली खुमारी, त्यातली गोडी दोन्ही बाजूंनी जर समजावून घेता आली नाही तर मग मात्र वाटा वेगळीकडे जायला लागतात. काय आहे ना, माप ओलांडून घरामध्ये आलेली सून त्या घरामध्ये रुजायला जरा वेळच लागत असतो. आता जरा म्हणजे किती हे सांगणं खरंच कठीण आहे. काहीजणी लग्न झाल्या झाल्या इतक्या सहज वावरतात की म्हणावं, अग बाई, ही तर अगदी आल्या आल्या आमच्याच घरची होऊन गेली आहे.” आणि काही जणींना एखाद वर्ष लागतं, काहींना दोन-तीन, काहीच रुळून पुन्हा बिनसत, तर काही रूळतच नाहीत. याबाबतीत एका ठिकाणी मी खूप छान वालं होतं. “अहो, जी तुमच्या घरी मागचं सगळं सोडून, अगदी नव्याने आलेली आहे. जिचं कालपर्यतच जग वेगळ होत आणि आज एका नव्याच विश्वात तिन पाऊल ठेवलंय; शिवाय तुमच्या सारखंच तिन सगळं काही करावं अशी अपेक्षा आहे; तिला किमान पाच वर्षे तर द्या जरा रुळायला, घराला आपलंसं करायला. जरा हे पाच वर्ष देऊन पाहा आणि मग पुढचे पन्नास वर्षे कसे जातात ते अनुभवा.” मित्र-मैत्रिणींनो, अगदी खरं आहे बरं हे. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे प्रत्येकीला हा वेळ वेगवेगळा लागणारच. एका अंगणातली तुळस उपटून दुसऱ्या अंगणामध्ये लावली जाते तेव्हा तिला सुद्धा रुजायला, बहरायला वेळ लागतो. आपण तर हाडामासाची माणसं आहोत. न दिसणारे मन सातत्याने आपल्यावर अधिराज्य गाजवत राहतं. हे मन इतरांशी जुळवून घ्यायचं म्हणजे थोडी खडखड होणारच.

एकतर आताच्या काळात, मुळातच वयाच्या पंचविशीनंतर होणारी लग्न म्हणजे अगदी घट्ट आणि पक्की झालेली मतं घेऊन दुसऱ्या घरात नांदायला जायचं. दुसरी गोष्ट म्हणजे, ‘मीच का तडजोड करायची?’ हा प्रश्न स्वाभाविकरीत्या सगळ्या जणींना परेशान करत असतो. ज्या ठिकाणी अॅरेंज मॅरेज आहे तिथे तर एक प्रकारे, एक युद्ध स्वतः विरुद्ध अशा प्रकारचा प्रवास सुरू होतो. त्यात गोडी गुलाबीन बोलणारी, समजावून घेणारी, आपल्या मताला मान देणारी अशी जर माणसं मिळाली तर मग हळूहळू त्या घराबाबत मुलीलाही ओढ, आपुलकी, आत्मीयता आपसूकपणाने वाटायला लागते. पण हेच जर कुणी टाकून बोलत असेल, टोचून बोलत असेल, तिच्या माहेरचं उणदुण काढत असेल तर स्वाभाविकप तिला रुजायला वेळ लागतो.

छोट्या छोट्या खटकणाऱ्या गोष्टीमधून मोठे संघर्ष निर्माण व्हायला लागतात. अगदी तिखट मिठाच्या डब्यामध्ये चमचा कसा ठेवायचा, पदार्थात किती तिखट-मीठ टाकायचं, कोणतं तेल वापरायचं, भाज्या आणताना कशा आणायच्या, धान्य कसं साठवायचं... एक ना अनेक ! इतके दिवस ज्या स्वयंपाक घरात ति क्वचितच प्रवेश केलेला असतो ते स्वयंपाकर स्वतःच असं समग्र रूप तिच्यापुढे प्रकट करतं आणि मग चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यू सारखी तिची स्थिती होते. ती सक्षम आणि समर्थ असेल तर या चक्रव्यूहाला भेदून पुढे जाते आणि नसेल तर अभिमन्यू सारखी धारातीर्थी पडते. पण ती एकटी नाही काही काही वेळेला कुटुंबालाही धारातीर्थी पडावं लागतं. हे सगळं थांबवायचं असेल ना तर संसारातले मंत्र वापरलेच पाहिजेत.

 काय आहेत हे मंत्र? ते  आहेत जसेच्या तसे’, ‘जिथल्या तिथे’, जेव्हाच्या तेव्हा’. मला आठवतं माझं लग्न ठरलं त्या वेळेला माझ्या पीएच.डी. च्या मार्गदर्शिका डॉ. लता मोहरीर डम यांनी खूप सुंदर शब्दात संसार म्हणजे काय हे सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “अग काही नाही, प्रत्येक घराची एक चौकट असते; शिस्तीची किंवा बेशिस्तीची आणि आपल्याला त्या बसावं लागतं.” अनुभवान कळत ही शिस्त किंवा बेशिस्त समजून घेता घेता आणि अंगी बाणवताना माणसाचं आयुष्य निघून जातं.

खरी गंमत अशी आहे की प्रत्येक घरा थोड्या विसंगत अशा जोड्या पाहायला मिळतात. शेवटी आकर्षण जे असतं ते अधिक आणि उणे या भिन्न अशा चिन्हांमध्येच. त्यामुळे दोन वेगळ्या स्वभावाची, दोन टोकांवरची माणसं त्या विधात्याने एका गाठीत बांधलेली असतात. कधी कधी मला वाटतं आपल्याला फक्त आपल्या संसाराचं पडतं पण विधात्याला मात्र सबंध जगाचा संसार चालवायचा आहे. हा गाडा हाताना, एक दुसऱ्याला कसा पूरक ठरेल, एक जण दुसऱ्याला कसा सांभाळून घेऊ शकेल, हे सार बघून तो गाठी बांधत असावा. चांगला तावून-सुलाखून काढतो तो, कारण त्याला साता जन्मांच्या गाठी बांधायच्या असतात. संसारात आपले ‘ज’मंत्र वापरले तर मग मात्र या गाठी काचत नाहीत.

हे मंत्र आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडतात? तर अगदी पाहता क्षणी आपल्याला लक्षात येतं की घरातल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या, वेळेच्या वेळी वापरल्या, नीटनेटक्या केल्या तर संसार करणं सोयीचं आणि सोपं होतं. अगदी शंभर टक्के खरं आहे हे. सुरुवातीला माझ्या सासूबाई मला हे सांगायच्या तर मी गमतीने त्यांना म्हणायचे, ‘’अहो, वस्तूंची जागा बदलली गेली नाही तर तुम्हाला कसं वाटेल की नवीन मुलगी घराच्या बाहेरून आली आहे म्हणून? माझ्या सासूबाई खेळकर मैत्रीण असल्यामुळे त्या गप्प बसल्या. मात्र काही वर्षातच मला स्वतःलाही ते जाणवायला लागलं आणि वस्तू जागच्या जागी असावी हा आग्रह त्यांच्यासोबत मी सुद्धा धरायला लागले. काय आहे ना संसार म्हणजे मारुतीचे शेपूट ! अविरतपणे वाढतच जातो. वाढत्या पसाऱ्यामुळे इतका गोंधळ, गदारोळ आपल्या एकूणच घरामध्ये असतो, तिथे थोडक्या काळातच जाणवतं जर हे मंत्र आपण वापरले नाही तर अक्षरशः थकून जातो. आपली फजिती होते. ऐन वेळेचे पाहुणे आपण साजरे करू शकत नाहीत. विनाकारण चिडचिड आणि भांडण मात्र होतात. म्हणून वस्तूंच्या बाबतीमध्ये हामंत्र वापरलाच गेला पाहिजे. पण तो इतकाच मर्यादित आहे का? निश्चितच नाही.

 हा मंत्र एकूण जीवनाच्या बाबतीतच मला खूप महत्त्वाचा वाटतो. अगदी आपण आपल्या मनातल्या भावभावना सुद्धा वेळच्या वेळी व्यक्त केल्या पाहिजेत. बोलले पाहिजे. जर तसं केलं नाही ना तर एक प्रकारचं साचलेपण मनाला येतं. स्वतःचं प्रवाहि ते हरवून बसतं. आणि मग त्या साचलेपणाचे स्फोट वेळी वेळी घडत राहतात. असं होण्यापेक्षा, सुयोग्य पद्धतीने वेळेच्या वेळी संवाद साधला तर तेव्हा थोडासा राग येईल पण नंतरचे धुमसत राहणं कमी व्हायला जरा तरी मदत नक्कीच होईल. त्यामुळे  आपण मंत्र भावनांच्या बाबतीमध्ये वापरला पाहिजे. मात्र याचा अर्थ, ‘अरे ला का रे  करणे सा नक्कीच होत नाही. आपल्याला प्रतिक्रिया नाही प्रतिसाद द्यायचा आहे. रिक्शन नाही रिस्पॉन्स द्यायचा आहे. आपला रिस्पॉन्स आपल्याला रिस्पॉन्सिबल बनवत असतो, आपली रिस्पॉन्सिबिलिटी ठरवत असतो. म्हणूनच मंत्राचा वापर जसा घरात आवश्यक तसाच तो कार्यालयामध्ये देखील वापरणे सुयोग्य ठरते.

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये हे मंत्र अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, बैल गेला अन झोपा केला’ अर्थात वेळ निघून गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची काळजी करणे, त्याबाबत काही तजवीज करणे निरुपयोगी ठरते. त्यामुळे कोणतीही गोष्ट वेळेच्या वेळी करणे, योग्य पद्धतीने करणे हे अत्यावश्यक असतं. मग हे कर्तव्य घरातल्या व्यक्तींच्या बाबत असू द्या, कार्यालयीन असू द्या किंवा सामाजिक घटना घडामोडींच्या बाबतीत, ते केलंच पाहिजे. हे सगळ्यांनाच कळत. मात्र आपलं न दिसणार मन या ठिकाणी विविध भाव-भावनांच्या माध्यमातून आपल्याला मागे खेचत. कधी जुने राग-लोभ असतात, कधी कंटाळा, कधी अजून काही.  या नाठाळ मनाला आवर घालून आपल्याला पुढे चालावं लागतं. खरं तर अगदी ज्ञानदेवांचा संदर्भ येथे द्यायचा म्हणजे अरे अरे ज्ञाना झालासी पावन या अभंगामध्ये जो अनुभव व्यक्त झालेला आहे, ‘मुरडूनिया मन उपजलासि चित्ते’ तसं वागावं लागत. या मनाला मुरड घालून चित्तावरचे जे संस्कार आहेत त्यांना प्रमाण मानावे लागते. मग सगळं कसं सुरळीत होत.

चित्त जर फक्त वित्ताकडेच जायला लागले तर अनिष्ट घडायला वेळ लागत नाही. आयुष्यामध्ये पैसा जसा महत्त्वाचा आहे तसंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची नाती आहेत. ही नाती जोडताना आपल्यातला मी’पणा, अहंकार  बाजूला ठेवावाच लागतो. माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर, ‘‘पाण्यात साखर विरघळावी तसे माणसाला संसारात विरघळता आले पाहिजे.” एकरूप व्हावं आणि सारच गोड करावं. पण ते सोपं नाही, हे तितकच खर आहे. मला वाटत आपल्या आई - आजी यांच्या पिढ्यांचा जो त्याग होता ना तो कुठेतरी याच संकल्पनेशी संबंधित होता. त्यामुळे त्यांच्या त्यागावर आपली कुटुंब उभी राहिली आणि आपण मुक्तपणे आकाशात झेपावू शकलो. आपल्या पिलांना ती संधी आपण देऊ शकू की नाही, याची मात्र मला शंका वाटते. कारण ‘त्याग कोणी करायचा’ आणि ‘त्याग मीच का करायचा’ ही आताच्या नवरा-बायकोतली भांडण ' संपतच नाहीत. त्यामुळे ‘मंत्राचा वापर करून आपल्याला परस्पर विश्वास सांधावा लागेल, परस्पर सामंजस्य जोपासावे लागेल. हे जमलं की आमचं घर डळमळीत होणार नाही, कोसळणार नाही उलट त्याच्या उंबरठ्याला सक्षम पंख लाभतील. 

आजवर माझ्या आईला मी अनेक वेळा म्हणाले, “तू मला घरकामातलं हे शिकवलं नाही, ते शिकवलं नाही.” ती मात्र न चिडता फक्त आठवण द्यायची, कोणत्याही वयात काहीही शिकता येतं . तुमच्या काळात तर केवढी साधन आहेत शिकण्यासाठी. वेडी आहेस का तू? आई भेटल्यावर आपली फक्त चिडचिड चालू राहते, मैत्रिणींनो लक्षात ठेवा. कवी गोविंदाग्रज मला आठवत राहतात...

ते हृदय कसे आईचे, मी उगाच सांगत नाही

जे आनंदेही रडते, त्याचे दुःखात काय होई?

जशी आपल्या आईची आपल्याला काळजी वाटते ना तशीच नवऱ्याच्या आईची आपण काळजी घेतली ना तर सासू - सून नात्यात, - भावजय नात्यात मैत्री व्हायला वेळ लागत नाही. पुढे आपल्या मुलांचे सगळ काही वेळच्या वेळी झालं तरच समाजाची घडी व्यवस्थित बसेल ना? आश्रम व्यवस्थेचे (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम) स्वरूप बदलू शकते पण मर्म नाही.

संसाराचा ‘मंत्र प्रत्येक ठिकाणी कामाला येतो आणि आयुष्याचे सूर आपण सहज गुणगुणायला लागतो. असं झालं नाही की प्रश्नांच्या समस्या व्हायला वेळ लागत नाही. प्रश्न चुटकीसरशी सुटतात, समस्या गहन होत जातात, आयुष्याला गडद करतात.

चिता चिंता समाप्रोक्ता बिंदुमात्र विशेषता |

सजीव दहते चिंता निर्जीव दहते चिता ||

आपल्याला जळायचं नाही उजळायचं आहे. मोठे लोकं आपल्याला ‘वारसा’ देतात तो ‘वसा’ म्हणून आपल्याला जपता आला पाहिजे. संसाराचा ‘मंत्र त्यासाठी गुरुकिल्ली ठरेल.

 

वृंदा आशय

3 comments:

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...