Friday, 15 August 2025

स्वातंत्र्याला बंधमुक्त करणारे श्रीअरविंद !


श्री मॉं

(१५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यदिन आणि १५ ऑगस्ट हा श्री अरविंद घोष यांचा जन्मदिन. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्रीअरविंद यांनी स्वातंत्र्याचा उपासक म्हणून केलेल्या कामगिरीचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न याठिकाणी करत आहे.) 

    
      श्रीअरविंदांचे बालपण पाहिले तर सर्वसामान्य माणूस अचंबित होतो. गती, मती आणि प्रगतीचे धागे माणसाने कसेही विणले तरी नियती आपल्याला हवी असलेली सुसंगती कशी साधून घेते, याचा अद्भुत प्रत्यय म्हणजे श्रीअरविंद यांचे जीवन होय. लहानग्या अरुला भारतीय संस्कृतीचा वाराही लागू नये, म्हणून त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष यांनी सार्‍या कडेकोट व्यवस्था केल्या होत्या. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांच्या लाडक्या अरुची जडणघडण भारतामध्येच, पण संपूर्ण पाश्चात्त्य वातावरणात झाली.पुढची १४ वर्षे प्रत्यक्ष पाश्चात्त्य देशात, इंग्लंडमध्ये राहून अनेकविध जागतिक भाषांचा, साहित्याचा, शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. विद्यार्थी दशेतील अरविंदांची विद्वत्ता, तेजस्विता, त्यांच्या वाणी आणि लेखणीचे सामर्थ्य, जागतिक पातळीवरच्या प्राध्यापकांना आश्चर्यमुग्ध करणारे होते. मात्र त्याहूनही मोठे अद्भुत आश्चर्य तर पुढे घडायचे  होते.

     संपूर्ण पाश्चात्त्य जडणघडणीतला २१ वर्षांचा हा युवक १८९३ साली भारतामध्ये परतला. ज्याला मातृभाषेची ओळखही होऊ नये, असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, तो भावी काळात स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा उद्गाता झाला. आय.सी.एस. च्या नोकरीवर जाणीवपूर्वक पाणी सोडणाऱ्या या युवकाला पाश्चात्त्य देशातच मातृभूमीचे वेध लागले होते. ही आंतरिक ओढ एवढी जबरदस्त होती की, आपलं सर्वस्व त्यानी मातृभूमीच्या चरणी समर्पित केलं. त्यांच्या वाणी आणि लेखणीला तलवारीची धार होती. जहाल गटातून नेतृत्व करत अनेकांच्या नव्हे अवघ्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहात भारतीय स्वातंत्र्याचा कैवार त्यांनी घेतला. परदेशात राहून भारताच्या आणि भारतीयांच्या स्थितीबाबत जे काही कळत होतं, ते आत खोलवर पोहोचलं. वयाच्या  तेराव्या वर्षापासून क्रांतिकारी संघटनांशी आलेल्या संबंधाने स्वातंत्र्याची जाणीव प्रखर होत गेली आणि त्यातून जन्म झाला एका क्रांतिकारकाचा!

श्रीअरविंद यांचे जीवन म्हणजे स्थित्यंतराची एक कहाणी आहे. परदेशात प्रचंड अभ्यास केला पण ब्रिटिशांची नोकरी नाकारण्यासाठी शेवटची घोडेस्वारीची परीक्षाच टाळली. भारतात परतल्यावर त्यांनी सुरुवातीला महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे रु. २००/- एवढ्या अल्प मासिक वेतनावर नोकरी केली. या नोकरीत मूल्यांशी तडजोड किंवा तत्वनिष्ठेशी प्रतारणा नव्हती. तर एका गुणग्राहक राजर्षीची ती सेवा होती. सुरुवातीला श्रीअरविंदांना प्रत्येक प्रशासकीय विभागात आलटून पालटून काम करावे लागले. पत्रव्यवहार करणे, राजांची भाषणे लिहून देणे, राजांची करारपत्रे तपासणे अशी विविध कामे ते सांभाळत. यापैकी कोणत्याच कामात त्यांना विशेष रस नव्हता. मात्र कर्तव्यबुद्धीने आणि परिपूर्णतेने प्रत्येक काम घडत होतं.

पुढे त्यांनी बडोदा महाविद्यालयात फ्रेंच आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कामात त्यांना स्वधर्माचा साक्षात्कार घडला. या काळात त्यांच्या संपादक  मित्रानी त्यांना ‘इंदुप्रकाश’ या नियतकालिकातून लेखनाची विनंती केली. New Lamps for Old  या त्यांच्या लेखमालेने तत्कालीन काँग्रेसच्या मवाळ राजकारणावर टीकास्त्र सोडले. केवळ मध्यमवर्गीयांच्या वर्तुळात वावरणारा हा पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकेल का?, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. जनसामान्यांची जडमूढता दूर करून त्यांना जागृत आणि संघटित करून आपल्या सोबत घेतल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही, हे त्यांच्या प्रतिपादनाचे सार होते.

‘मुक्तिगाथा महामानवाची’ या श्रीअरविंद यांच्या चरित्रात ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले’ लिहितात, “राजकारणाच्या क्षेत्रातील भीरुता, दांभिकता व दुर्बलता दूर झाल्याशिवाय कोणताही कार्यभाग साधणार नाही, असे अरविंदांचे मत होते.... त्यांचे प्रखर विचार आणि परखड लेखन काहींना मनापासून आवडलं तर काहींना भयावह वाटलं. लेखनाची धार कमी करण्याची सूचना संपादकांकडून येताच त्यांना प्रश्न पडला, “जी मतं लोकनेत्यांनाही पेलत नाहीत, त्यांचं प्रतिपादन कोणापुढे आणि कशासाठी करावयाचे?” त्यांनी लेखन थांबवण्याचा निर्णय घेतला. पण वाचकांच्या आग्रहास्तव अजून एक लेखमाला लिहिली ती बंकिमचंद्र चटर्जी यांच्या साहित्यसृष्टीवरती. बंकिमचंद्रांच्या ऋणाचा अभिमानपूर्वक उल्लेख करून ते लिहितात, He was able to create a language, a literature and a nation. व्यक्तींच्या योगदानाच्या मूल्यमापनाचा श्रीअरविंदांचा दृष्टीकोण इथे स्पष्ट होतो. या लेखमालेच्या नंतर मात्र केवळ उदंड ज्ञानसंपादन हेच उद्दिष्ट त्यांनी मानले. भारतीय जीवन, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा सखोल व्यासंग घडला. वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत आणि संस्कृत महाकाव्ये यांचं परिशीलन झालं. बडोद्याच्या १३  वर्षांच्या वास्तव्यात श्रीअरविंदांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी झाले.

बंधू बारीन्द्र याच्या गूढविद्येच्या अभ्यासाने आणि प्लँचेटच्या प्रयोगांमुळे श्रीअरविंदांच्या मनात एक विचार वारंवार येऊ लागला तो म्हणजे, ‘या इंद्रियगोचर विश्वापलीकडे व आपल्या अनुभवापलीकडे आणखी काहीतरी असावे. सारे जग आपल्या अनुभवाच्या पारड्यात बसत नाही.’ या काळामध्ये श्री अरविंद यांनी काही अतींद्रिय अनुभव घेतले. १९०३  मध्ये सयाजी राजांबरोबर ते काश्मीरला गेले तेव्हा तिथल्या प्रसन्न परिसराच्या दर्शनाने देहभान हरपून गेले आणि क्षणात निर्मम आणि निर्मन झाले. असीम आणि अथांग अनंताचा त्यांना प्रत्यय आला. निर्गुण-निराकार ब्रह्माच्या या अनुभवाने श्रीअरविंद योगशास्त्राच्या अभ्यासाकडे वळले. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या मार्गावर त्यांचे मार्गदर्शक झाले. सारी भयभीत मानवता आत्मरक्षणासाठी भारताच्या आध्यात्मिकतेच्या आश्रयास येऊन उभी राहील, असे भविष्य या मार्गदर्शकांनी वर्तवले. या संदेशानी प्रभावित झालेल्या श्रीअरविंद यांनी आपल्या मनाशी निष्कर्ष काढला, भारताला आपलं गतवैभव पुन्हा प्राप्त झालं पाहिजे. ही पारमार्थिकाची भूमी स्वतंत्र झाली पाहिजे. देशाचे बंध विमोचन हेच आपलं जीवितकार्य झालं पाहिजे.’ श्रीअरविंदांनी भूमिगत चवळींचे सूत्रधारपद स्वीकारून, प्राणशक्तीसारखे अदृश्य राहून स्वातंत्र्यचळवळीला चैतन्य पुरवले. देशातील युवाशक्तीला जागृत, संघटीत आणि कार्यरत केले. वंगभंगाच्या घटनेकडे आध्यात्मिक सकारात्मकतेने पाहात, बंगालच्या कुरुक्षेत्रात ते उतरले. महाविद्यालयातून राष्ट्रीय शिक्षणाचे तर ‘युगांतर’, ‘वंदे मातरम्’ या वर्तमानपत्रांच्या अग्रलेख लेखनातून बिनभिंतींच्या उघड्या जगात लोकशिक्षणाचे कार्य केले.

याच काळात, राजकारणासाठी योगसाधना केली पाहिजे असा स्पष्ट निर्वाळा त्यांच्या अंत:प्रेरणेने दिला. योगी विष्णू भास्कर लेले या गुरूंच्या मार्गदर्शनाने अवघ्या तीन दिवसात योगशास्त्राच्या सामर्थ्याचा प्रत्यय श्रीअरविंद यांनी घेतला. या साधनेने मन कोरं करकरीत झालं आहे, ते निर्विचार शब्दरहीत दशेस येऊन पोहोचले आहे असा प्रत्यय त्यांना आला.

त्या नितळ मनात मग स्वच्छ आणि स्पष्टपणे उमटत गेले भगवंताचे आदेश. ज्यातून स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होत गेला, मानवाच्या असीम प्रगतीचा ! त्याचे प्रत्यंतर देणा-या उत्तरपारा येथील भाषण, अलीपूर कारागृहातील अनुभव या पाऊलखुणांचा वेध घेत थेट ‘सावित्री’ महाकाव्यातील अद्भुत आणि सर्व योगांच्या पलीकडे नेणा-या पूर्णयोगापर्यंत आपण पोहोचू शकतो. मानवी संस्कृतीचा, मूलभूत गाभ्यातून विचक्षणपणे शोध घेत, पूर्व-पश्चिमेला व्यापून राहिलेल्या जीवनशैली, धारणा आणि श्रद्धांना कवेत घेत, आत्मिक उन्नतीची अशी काही झेप ते घेतात की मानवतेचा प्रवासच महामानवाच्या दिशेने सुरू झालेला प्रत्ययाला येतो. या साऱ्या प्रवासातल्या संकल्पनाही तितक्याच विशाल, सघन आणि समृद्धतेची अपेक्षा करणाऱ्या. श्रीअरविंद अनेकांना दुर्बोध वाटतात, एक न उलगडणारं कोडं वाटतात ते कदाचित यामुळेच.
वृंदा आशय

(श्री अरविंद केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्याने पुनर्प्रकाशन)  

 

No comments:

Post a Comment

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...