Friday, 22 August 2025

बुगु....बुगु...

 


 








महाविद्यालयातून परतत होते. पावसाचा हलकासा शिडकावा सुरू होता. बाजार प्लास्टर ऑफ पॅरीसच्या आणि मातीच्या बैलांनी, गाय-वासरांनी सजलेला होता. मातीचा तो हलकासा गंध मला थेट माझ्या गावाकडे घेऊन गेला. हातवणला घराच्या मागच्या दारी गेले की गोठा ऐकू येई. गाई बैलांचे हंबरणे, गळ्यातल्या घुंगुरमाळाचा आवाज, वासरांनी गायींना लुचणे, दाव्याला हिसके देणे, वासरांचे हुंदडणे सार काही काना-मनात साठवून घेत होतो. बैलगाडीत फेरफटका मारणे हा तर आवडीचा कार्यक्रम असे.  त्यावेळी बैलगाडीची होणारी खडखड-धडधड, मध्येच झाडाची फांदी डोक्याला लागेल म्हणून खाली वाकून जाणे, बैलगाडी उतारावरून जाताना पोटात येणारा गोळा... सारेसे सहज डोळ्यासमोर येते.

आमचं बालपण तसं समृद्धच. आम्ही सशाशी खेळलेलो, हरीण पालेलं, गाई -बैलांमध्ये वावरलेलो, शेळ्या बकऱ्याना चुचकारलेले, तबेल्यातल्या घोड्याला कुतूहलाने न्याहाळलेले, गुऱ्हाळ अनुभवलेले आणि त्यामुळे शेतीशी-मातीशी आमचे एक नाते जडलेले. शेतीत राबणारा बैल खूप वेगवेगळ्या गोष्टींची आठवण देतो. मला आठवतं आमचे कै. महामहोपाध्याय ब्रह्मानंदजी देशपांडे सर नेहमी म्हणायचे अरे, बैल हे बुद्धी’चे आणि शक्ती’चे प्रतीक आहे. आपण एखाद्या माणसाला जेव्हा बैल म्हणतो ना त्या वेळेला खरं म्हणजे बैलाचा अपमान करत असतो”.

विद्यार्थीदशेत शिकलेली कवी विठ्ठल वाघ यांची बैल ही कविता मनावर कोरली गेलेली आहे.

बैल आभाळाची कृपा | बैल धरतीचा जप ||

काळ्या मातीची पुण्याई | बैल फळलेले तप ||

बैल घामाची प्रतिमा | बैल श्रमाचे प्रतीक ||

बैल माझ्या शिवारात | काढी हिरवे स्वस्तिक ||

बैलाच्या कष्टाचं, त्याच्या अस्तित्वाचं जे मांगल्यपूर्ण वर्णन त्यांनी केलेले आहे; त्यामुळे हे काव्य बैलाविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये जागवून जाते. बैल माझ्या शिवाराचे ‘हिरवे स्वस्तिक आहे ही कल्पना माणसाच्या संवेदनशीलतेची, समृद्धतेची, संपन्नतेची ग्वाही देणारी आहे. बैलाच्या कष्टातून ‘सृजन’ घडत आणि सृजनाच्या या संस्कारातून ‘सुजन’ घडतात. (शेवटी अन्न-पाण्याच्या संस्कारातूनच माणूस घडतोना.) मला हे ‘श्रमप्रतिष्ठे’चे फार मोठे तत्त्व वाटते. शरीराने कष्ट केले म्हणजे मन आपोआप निर्मळ होत जाते. निर्मळ मनात विचारांची शुद्ध बीज पडायला लागतात. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, ही शतकानुशतकांची ग्वाही तुकोबांनी देऊन ठेवलेली आहे. मात्र तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून आजही ‘सुजाण’तेचा अभाव फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.   

खर तर भारतीयांचे सारे जीवन निसर्गाशी नाते सांगणारे आहे. इथले दैनंदिन जीवन आणि उत्सव सृष्टीचक्राशी संबंधित आहेत. या सृष्टीच्या नियमांना आम्ही ‘धर्म’ म्हणतो. ‘धृ धारयति इति धर्म:’, ही श्रद्धा बाळगत समाज जीवनाची धारणा करतो. इथल्या मातीचा रंग काळा; इथले देवही काळया रंगाचे. आमचा विठ्ठल काळा, आमचे राम-कृष्ण सावळे. काळे ढग पाऊस घेऊन येतात. जमिनीला पेरते करतात. सृजनाचा उत्सव सारे हिरवंगार करतो. माणसाला आत्मनिर्भर करतो.

ही आत्मनिर्भरता कष्टातूनच फुलते. कोणत्याही योजनांमध्ये कष्टाची ताकद नाही. त्यामुळे मुळाशी नाते सांगत आमच्या कष्टकऱ्यांचा रंगही काळाच! कृष्णवर्णाची आणि ‘कृष्ण’मनाची ही माणसे धवल चारित्र्याची असतात. आपुलकी, जिव्हाळा, स्नेह त्यांच्या व्यक्तित्वातून सातत्याने पाझरत असतो. कष्टांशी प्रामाणिक राहात सामान्य माणसाचे ‘प्रमाण’ ते घडवत असतात. अंगण-ओसरीपासून माजघरापर्यंत वस्तूंचा किंवा प्रत्यक्ष वास्तुचाही अभाव असला तरी त्यांच्या मनातला भाव आणि हाताचे कष्ट देव शोधण्याचा आणि देव घडवण्याचा प्रयत्न करत राहतात. या मार्गावर अनेक खाच-खळग्याना, संघर्षाना, कसोट्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी सत्त्वपरीक्षा म्हणावी अशा घटना-प्रसंगांना प्रत्येकाला कधी ना कधी तोंड द्यावेच लागते. या सत्त्वपरीक्षेला जे पुरून उरतात ते उजळून निघतात. उजळून निघालेले ताठ मानेने जगत राहतात. त्यामुळेच कष्टकरी स्वाभिमानाने जगतात. ज्याना आपण असंघटित क्षेत्रातील कष्टकरी लोक म्हणून ओळखतो ते अत्यंत स्वाभिमानाने जगताना, वेळप्रसंगी स्वत:च्या अटींवर काम करताना दिसतात. अर्थातच त्यांच्या जीवनाचा दर्जा आणि प्रश्न निराळ्या स्वरूपाचे असतात.   

त्या तुलनेने संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची स्थिती निराळी आहे. जिथे संघटना आहे, तिची विशिष्ट उद्दिष्टये ठरलेली आहेत, तिथे लोक आपले हितसंबंध गटाच्या माध्यमातून जपत जगतात. बुद्धिजीवी वर्गाची परिस्थिति मात्र फार निराळी आहे. प्रत्येकाचे मत निराळे आणि त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते कधी टोकाला जाईल याचा नेम नसतो. इथे एकसंघ गटाने काम होण्याऐवजी एकटेपणाने किंवा छोट्या छोट्या गटातून काम होते. परिणामी प्रत्येकाचा स्वतंत्र असा सवतासुभा दिसायला लागतो. जेव्हा या सर्वांना हाताळणारी व्यवस्थापक मंडळी स्वत:चे बलीष्ठपण सिद्ध करू इच्छितात तेव्हा ते आपल्या ‘हो’ मध्ये ‘हो’ मिळवणारी, आपली री ओढणारी माणसे शोधायला लागतात, जवळ करतात.             

हा विचार मनात येताच मन पुन्हा लहानपणात गेले. गावातून शहरात राहायला आलेल्या आम्हाला गोठा दुरापास्त झालेला होता. पोळ्याच्या निमित्ताने कोणी सजवलेला बैल दारात आणेल का, याची वाट आम्ही पाहत होतो. अशी वाट पाहतानाच एकदा एकाने फार मोठा बैल आणला. मी तर दचकून मागेच सरकले. वडील म्हणाले, “अग घाबरू नको. हा नंदीबैल आहे”. अच्छा म्हणजे भोलानाथवाला का ? ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का’, हे गाणे तोवर मनात सुरु झाले होते. तोवर मागून दादा चिडवत आला नंदीबैल बुगु ..बुगु..  

पाऊस पडेल का, शेतात पीक येईल का असे प्रश्न नंदीबैलाला विचारले की तो ‘बुगु’ बुगु’ असे उत्तर देतो. अर्थात ही एक होकारात्मक, आशादायी अशा प्रकारची संज्ञा आपल्याला वापरलेली दिसून येते. नंदीबैलाला ते शोभते पण माणसाचा ज्यावेळेला नंदीबैल होतो आणि तो केवळ हो’, हो करत राहतो, तेव्हा समाजाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

माणसाच्या बाबतीत ‘बुगु बुगु’ संस्कृती त्याला स्वतंत्रपणे विचार करण्यापासूनच परावृत्त करते. आपलं काही वेगळे मत असू शकते आणि आपण ते मांडले पाहिजे याची जाणीव खरे तर प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मतभेद हे एखाद्या संकल्पनेचे, कार्यपद्धतीचे, प्रश्नाचे विविध पैलू समोर आणणारे असतात. संबंधित गोष्टीचा सर्वांगीण विचार करण्यास ते प्रवृत्त करतात. अर्थात जेव्हा आपण त्या बाबीकडे निखळ व निरामय पद्धतीने पाहतो, तिचा विचार करतो तेव्हाच हे शक्य होते. ज्यावेळेला आपल्या अन्य इंटरेस्टची सरमिसळ आपण त्या गोष्टीत करतो तिथे गडबड होण्यास सुरुवात होते. साधेसरळ आयुष्य गुंतागुंतीचे व्हायला लागते. ही गुंतागुंत एखादी सुरेख रचना निर्माण करणार असेल, विधायक कार्य करणार असेल तर गोष्ट निराळी. मात्र हा गुंता केवळ अडथळा वाढवणारा आणि मनात गाठी निर्माण करणारा असेल तर तो तुटूनच सुटू शकतो. हा गुंता असतो व्यक्तीव्यक्तीच्या आंतरसंबंधातला, भावबंधातला, कार्यशैलीतला. खरे म्हणजे बहुतांश वेळा आपली उद्दिष्टे समान असतात. तिथे कोणत्या मार्गाने पोहोचायचे याबाबत वाद असतात. थोडी संवेदनशीलता आणि सहनशीलता बाळगली; प्रत्येकाला मत आणि मन असते याचे भान आणि जाण बाळगली तर संवादातून प्रश्न सुटू शकतात. मात्र सभ्यतेच्या, उदात्ततेच्या बुरख्याखाली स्वत:चा अहंकारच आपण कुरवाळत राहिलो आणि आपल्याकडे सत्ता, पैसा किंवा तत्सम गोष्टी आहेत म्हणून इतरांकडूनही हा अहम जोपासण्याचा प्रयत्न करत राहिलो तर जीवन गढूळ व्हायला लागते. गाळ साचत जातो. त्यात माणूस रुतत जातो. कार्यहानी घडत राहते.         

त्या वेळेला लक्षात येते शिक्षणाने माणसाला विचार करायला शिकवलेले आहे. मात्र बऱ्याच वेळेला परिस्थितीशरणता स्वीकारत माणसाने तर्कशुद्धतेचा बळी देऊन अगदी मुक्तपणे नंदीपण स्वीकारलेलं असतं. दुर्दैवाने हे राजकारणाच्या, समाजकारणाच्या, कलेच्या, अध्यात्माच्या, खेळाच्या अशा सगळ्याच क्षेत्रात प्रत्ययाला येते आहे. ते शिक्षणाच्या क्षेत्रातही सुरु होते त्यावेळी मानवी जीवनात धोक्याची घंटा वाजत असते. वास्तविक पाहता शिक्षणामध्ये सर्व क्षेत्रातल्या समस्या सोडवण्याची ताकद असावी. मात्र अशा परिस्थितीमुळे शिक्षणक्षेत्रच एक मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर उभे राहते. सर्वसाधारणपणे ‘बुगु बुगु करणाऱ्यांना चुचकारले जाते आणि न करणा-यांची उपेक्षा होते. अर्थात हे प्रश्न प्रत्येक काळात आणि प्रत्येक क्षेत्रात निर्माण होतात. संत रामदासांना देखील उपेक्षू नको गुणवंता अनंता’ असे मागणे मागावे लागले. प्रत्येकच काळात कौरव – पांडव प्रवृत्ती असतात. प्रत्येक अर्जुनाला स्वत:तच कृष्ण शोधावा लागतो. तो स्वतंत्र, विधायक, सृजनशील विचारांनी, साधनेनी सापडू शकतो.  

मला वाटतं माणसाच्या आयुष्यात दोन पर्याय असतात नंदी व्हायचं की आनंदी व्हायचं? जो नंदी होतो तो दुसऱ्याची री ओढण्यात आपला आनंद मानतो आणि जो नंदी व्हायचं नाकारतो तो आनंदाच्या संघर्षशील वाटा स्वतंत्रपणे साकारतो. या सृजनात समाजाची 'सुजनता' आणि 'सुजाणता' वाढावी, एवढीच वृषभचरणी प्रार्थना!

 

वृंदा आशय

 

 

 

 

 

 

 

 

3 comments:

  1. फार छान ... बैलपोळ्या च्या निमित्ताने आज बैला पासून... बुगू बुगू पर्यंत चे विवरण खूप अभ्यासपूर्ण आणि कटू सत्य मांडणारे आहे

    ReplyDelete
  2. बैल बुद्धी आणि शक्तीच प्रतीक, हिरवे स्वस्तिक खूप भावले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण लेख .

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...