Monday, 25 May 2026

सांजवात !

 


•| ॐ |•

सांजवात ! 

घरोघरी असावी ती सांजवात जी 

 सांज लांबवते अंधाराला थांबवते 

 देते हो उगवतीला विश्वासाचा हात 

गरज पडताच प्रकाशाची होते वात !


सुदैवाने माझ्या बालपणी मी माणसांनी श्रीमंत असलेली अशी घरं पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. माझ्या माहेरी आणि माझ्या आजोळी रग्गड म्हणजे भरपूर माणसं ! त्यामुळे नात्यांचा नुसता पाऊस पडायचा. हे याचे त्याचे आते - मावस - सख्खे - चुलत - मामे, हे अमके - तमके,  हे अमक्याचे तमके वगैरे वगैरे वगैरे... त्या काळामध्ये 'मनुष्यबळ विकास', 'ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट' अशी काही संकल्पना होती किंवा नाही - माहीत नाही. माझ्यापर्यंत तरी शास्त्रोक्त पद्धतीने पोहोचलेली नव्हती. मात्र माणुसकीचे शास्त्र जपत, आयुष्याच्या कलेकलेनं घेत माणसं जोडणारी 'कला' अनेक जीवनं समृद्ध करताना आम्ही जवळून अनुभवत होतो. आजचा त्याचा अभाव पाहिला म्हणजे ती 'माणुसकीची नाती' हाच मला भगवद्भाव वाटतो. 

       काही न सांगता, सवरता, न शिकवता तिथं माणसं अनुकरणातून घडत होती. आपण घडत आहोत हे देखील त्यांना कळत नव्हतं. पुढे कालानुरूप आपली आपली वाट गवसली की मग आयुष्याचा मागोवा घेताना आपण किती दूरवर, किती कष्टाने पण सभोवतीच्या माणसांमुळे किती सहजतेने चालून आलो हे कळत होतं. मूल्यांकनाचे कोणतेही शास्त्र त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे काठोकाठ समाधानानं ही माणसं तृप्त होत होती. आपल्याला घडवणाऱ्याला मनातल्या मनात हात जोडत होती. 

               आज हे सारं काही आठवण्याचं कारण तरी काय? आपलं  दैनंदिन जीवन. रोजच्याच आयुष्यातले प्रसंग, आणखी काय? 

           परवा चिरंजीवांना जरा मदतीला बोलावलं. योग्य ती मदत लवकर न मिळाल्यामुळे थोडंसं आवाज वाढवून बोलावं लागलं, तेही नेमकं घराचं गेट लावल्यावर, रस्त्यावर. तेव्हा माझ्या हातातलं ओझं पटकन न घेता माझं रस्त्यावर ओरडणं कसं चुकीचं आहे, आणि मी नेहमीच कशी चुकते, मी शांततेने कसं बोललं पाहिजे याचे उत्तम धडे त्याने मला दिले. त्याला माझ्या ओरडण्याचं जे भावनिक ओझं झालं होतं त्यापुढे माझ्या हातातलं प्रत्यक्ष ओझं शून्य होतं.  चूक कोणाची? सुधारायचे कोणी?

          काल माझे वडील माझ्या घरी आले होते. मन आनंदाने नाचत होतं. घरभर बागडत होतं. खळखळून हसत होतं. सुयोग्य ठिकाणी दाद देत होतं. मोठ्या समाधानाने ते झोपी गेलं. पहाट झाली. वडिलांची निघण्याची गडबड. माझा आग्रह. नाष्टा तरी करून जाच. त्यांना त्यांच्या कामाची ओढ. शेवटी तडजोड झाली. फक्त चहा पिऊन ते निघणार असं ठरलं. 

           बाहेरच्या खोलीत आल्यावर सासूबाईंनी त्यांना विचारलं, "मिळाली का परवानगी?" ते हसतच म्हणाले, "हो. पूर्वी त्यांना परवानगी द्यावी लागत होती, आता त्यांची परवानगी घ्यावी लागते." परीक्षेचा अभ्यास करत कोपऱ्यात बसलेली माझी लेक तत्क्षणी प्रतिक्षिप्त होत म्हणाली, "मी पण त्याचीच वाट पाहते आहे, अण्णा." तिचा मथितार्थ आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आला. पण प्रसंग हसण्यावरी नेला. कदाचित कृष्णाने दिलेल्या संयमानं, मला तिथेच जागं केलं आणि सांगितलं तिला बोलायची ही वेळ नव्हे. 

           तिच्या परीक्षेमुळे मी तिला बोलणार नाही. काही दिवसांनी जेव्हा हा विषय निघेल त्या वेळेला त्याचं काय आता? त्यात काय इतकं? असं म्हणून तो वरच्यावर उडवला जाईल. चुकलं तेव्हा सांगितलं तर परीक्षेच्या अभ्यासाचा मूड जाईल, नाही सांगितलं तर 'आपली चूक झालेली आहे ती स्वीकारणे आणि सुधारणे गरजेचे आहे; हे कळणारच नाही, हे वास्तव आहे.' माझ्यातली 'आई आणि बाई' कात्रीत सापडलेली पाहिली आणि कृष्ण गोड हसला. माझी उडालेली भंबेरी पाहून तो मला थेट भूतकाळात माझ्या मनातल्या 'देवघरा'त घेऊन गेला आणि एका बाजूला शांत उभा राहिला. त्या देवघरात गेल्याबरोबर मला आठवण आली सांजवातीची !

            माझ्या दोन्ही आज्या म्हणजे 'आईची आई' आणि 'वडिलांची आई' मला दीर्घकाळ अनुभवायला मिळाल्या. त्यात घरात मी सगळ्यात छोटी असल्यामुळे अगदी स्वाभाविकपणे लाडकी होते. आधीच दुधावरच्या सायीचं नातं आणि त्यात शेंडेफळ, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचे सुख मला भरभरून उपभोगता आले. खरं म्हणजे माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये एवढं अंतर होतं की 'वय आजीचं आणि माया पणजीची' असं एक सुरेख रसायन मला अनुभवायला मिळालं. ज्या वडिलांना, काकांना , मामाला, सगळे भितात त्यांना रागावणारं, वेळप्रसंगी धाक दाखवणारं आणि धकाधकीच्या जीवनामध्ये ते थकले तर आपला थरथरता हात त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने फिरवून त्यांना नवी उभारी देणारे, 'आजी - आजोबा' , 'पणजी - पणजोबा' ज्या घरामध्ये आहेत ना तिथली सांजवात कधीच विझत नाही आणि तिथला देव कधीच रुसत नाही. देव प्रसन्न राहिला की माणसांवर कृपा करतो आणि माणसांचा रस्ता कधीच चुकत नाही. मला 'सांजवात' हवी आहे त्या शाश्वत प्रकाशासाठी !

          'डस्टबीन' या संबोधनाने  हेटाळणी केल्या जाणाऱ्या या काळाला या 'सांजवाती'चे महत्त्व पटेल काय? काय करते ती 'सांजवात'? 

        त्या 'सांजवाती'ला ठाऊक असतं, 'मान सांगावा दुसऱ्याला अन् अपमान सांगावा स्वतःला' ; त्यांना ठाऊक असतं कधी, कुठे, कसं, केव्हा कोणत्या पट्टीत बोलायचं ? कोणाला काय सांगायचं ते. कारण अनुभवाच्या भट्टीतून ते शिकले, सवरलेले असतात. 'चारचौघात कौतुक करावं आणि घरातल्या घरात रागवावं' हे त्यांना सांगावं लागत नव्हतं. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पोटामध्ये जी एक निःस्वार्थ माया, कळकळ आणि आस्था विकसित झालेली असायची ती स्वतःच कार्यरत होत होती. त्यांनी किती पुस्तकं वाचले यापेक्षा त्यांनी किती माणसं वाचले, त्यांना ते समजले आणि काहीही झालं तरी आपलं घर तुटू द्यायचं नाही हा जो त्यांचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असायचा त्यासाठी मला 'सांजवात' हवीशी वाटते. 

        ती नातवंडांना जोजावते. आपल्या मुलाबाळांना रागावते. वयोमानानुसार शरीर थकलं असलं तरी परिस्थितीनुसार मनाला खंबीरपणे लढण्याची, जगण्याची अतूट ताकद देते. पिढ्यापिढ्यांचं मूल्य संचित स्वतःच्या जगण्यातून ते हस्तांतरित करत जातात माणसाच्या जगण्याला सोनेरी भरजरी किनार देत राहतात. 

        'सांजवात' जपूयात त्या वैभवासाठी, आयुष्य समाधानी होण्यासाठी! 

        आज 'असमाधानाच्या उंबरठ्यावर' उभी राहिलेली भारतीय कुटुंबव्यवस्था पाहिली की मला लक्षात यायला लागतं, हे प्रसंग आणि त्यांनी माझ्या मनामध्ये निर्माण केलेली वावटळ ही मर्यादित नाही. तात्पुरतं कोणालातरी सांगावं, कोणालातरी रागवावं यानं हा प्रश्न मुळापासून सुटणारा नाही. आपल्या नातेसंबंधांमध्ये पडत जाणार अंतर, होत जाणारी भांडणं, विलंबाने होणारे विवाह, घडत जाणारे घटस्फोट, तुटत जाणारी घरं, वाढती व्यसनाधिनता आणि दुरावत चाललेली माणसं दिसतात त्या सगळ्यांचा मूळ याच ठिकाणी मला सापडतं. 

           कदाचित तंत्रज्ञानाने आम्हाला आधुनिक करून आणि माहितीचा प्रचंड साठा एका क्लिकवर आणून ठेवून आम्ही शहाणे - सुरते झाल्याचा गोड गैरसमज आपल्यामध्ये निर्माण केलेला आहे. या सगळ्यांनी आपल्यामध्ये जागवलेला जो अहंकार आहे हा अहंकार वयाचं शहाणपण,अनुभवाचं संचित, पाहिलेले उन्हाळे-पावसाळे, खाल्लेल्या खस्ता आणि टक्के - टोणपे सारेच काही नाकारतो आहे. कदाचित या नकाराने अस्वस्थ होऊन पूर्वी जी नाती ऊब देण्याचे काम करायची ती देखील आता दुर्दैवाने स्वतःची 'स्पेस' शोधायला लागलेले आहेत. माझी सेकंड इनिंग माझी स्वतःची आहे, ज्याचा त्याचा संसार ज्यानी - त्याने करावा ही त्यांच्या दृष्टीने रास्त असलेली भूमिका घ्यायला लागलेले आहेत. प्रासंगिक चर्चेला आणि सल्ला- मसलतीला आपुलकीपेक्षा औपचारिकतेचा स्पर्श अधिक आहे. या दोन पिढ्यांमध्ये दुवा सांगणारी नातवंडांची पिढी 'टेनिसचा खेळ' पाहिल्यासारखं एकदा यांच्याकडे, एकदा त्यांच्याकडे पाहते आहे. त्यांच्या काळाने त्यांच्यासमोर अजस्त्र समस्या उभ्या केलेल्या आहेत. अशा काळात काय निर्णय घ्यावा, कोणाला अनुसरावे, आणि आपला मार्ग कसा शोधावा हा प्रश्न त्यांना चक्रव्यूहासारखा वाटला तर दोष कोणाला द्यायचा? अभिमन्यूला कोणी वाचवायचे? मार्गस्थ करायचे?

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् महाजनो येन गतः सः पन्थाः ।।

          

हे कृष्णाने युधिष्ठिरामार्फत दिलेले उत्तर स्वीकारायचे  का टाळायचे?


वृंदा आशय 

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

Thursday, 21 May 2026

थेंब अमृताचे - पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष लेखमाला - भाग ३

 

•| ॐ |• 

थेंब अमृताचे 

 ३.  शंभो तूच !


# पुरुषोत्तम मास कृष्ण संदेश 

ही रात्र काळी, तो चंद्र आभाळी

काय करतोस रे सख्या चंद्रमौळी?

का न उमले अजूनही ती चाफेकळी?

श्रीकृष्णार्पणमस्तु!


आज पहाटे असा कृष्ण संदेश आला आणि मला जराशी कृष्णाची थट्टा करावी वाटली. त्याला म्हणलं, "काय रे कृष्णा? काय प्रेमात - बिमात पडलास की काय? आज अगदी काव्यात संदेश दिलास ते सुद्धा चंद्र, चाफा या सगळ्यांना घेऊन. काय चाललंय काय तुझं? माझ्या या प्रश्नावर कृष्णानं माझ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि मला आपलं थेट चित्रपटातलं 'राधा क्यूं जले?' हेच गाणं आठवलं. 

      ......नाही म्हणजे माझी काही हरकत नाही, तुला वाटू शकतं असं. तसाही तू प्रेमासाठीच जास्त प्रसिद्ध आहेस. माझी आपली बडबड सुरू होती. 

       कृष्ण काहीच बोलेना. त्यामुळे त्याच्याकडे पाहिलं. तर त्याची मुद्रा अतिशय गंभीर झालेली. मला काही कळेच ना आपलं काय चुकलं? शेवटी काकूळतीला येऊन त्याला म्हणलं, "बाबा रे, काही चुकलं असेल तर माफ कर. पण तू माझ्यावर रागवू नकोस. हे बघ, सगळं जग माझ्यावर रागावलं तरी मला काही फरक पडत नाही, पण कृष्णा, तू रागावलास ना तर माझं काही खरं नाही बघ."

        कृष्ण गंभीरपणे एवढेच म्हणाला "अध्यात्म बदनाम होतं ते तुझ्यासारख्या लोकांमुळे." आता तर मी फक्त रडायची बाकी राहिले. 

"कृष्णा, मी काय केलं रे? तू सांगितलंस तसा 'सार्थ अमृतानुभव' सुद्धा रोज वाचते आहे. ज्या सरींमध्ये भिजती आहे त्याचे थेंब गोकुळामध्ये शिंपडती आहे. आता तुझा तो पाचवा श्लोक एवढा अवघड आहे की त्याचं काय स्पष्टीकरण लिहावं याचा प्रकाशच माझ्या डोक्यात पडेना तर मी लिहील काय?" मी जरा नाराज होऊनच त्याला विचारलं. 

         मी रडवेली झालेली पाहिली की कृष्णकळी खुलते. "अगं वेडाबाई, गेले दोन दिवस तुला हा पाचवा श्लोकच तर मी समजावून सांगतो आहे."

      "कसं काय? मला तर काहीच नाही कळलं, मी आपलं भाबडेपणानं त्याला म्हणाले."

          "सांग बरं मला तुझ्या सोबत दोन दिवस काय काय घडलं?"

     वा ! वा ! जसं काही तुला ठाऊकच नाही. कृष्णाचा बदलता रोख पाहून मी सुद्धा म्हणाले. 

          "विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं", मला जाणवलं कृष्णातला कडक शिक्षक जागा झालेला आहे. मी आपली नम्र विद्यार्थ्यासारखी त्याला सगळं काही सांगत सुटले -

           "परवा हे बघ, सकाळी हा पाचवा श्लोक  पुन्हा वाचला. आदल्या रात्री फारसं काही समजत नव्हतं. मला वाटलं सकाळी तरी समजेल पण दोन्ही वेळा नाही समजला रे कृष्णा. 

  पुढे? 

मग मी नेहमीसारखी बागेत गेले. भावगीतं ऐकत ऐकत तिथे व्यायाम केला. गंमत म्हणजे काय माहिती आहे का, 'चाफा बोलेना चाफा चालेना' हे गीत ऐकत होते आणि समोर चाफ्याचंच झाड होतं. त्यादिवशी आकाशवाणीने खरंच फारच छान भावगीतं ऐकवली. नारायण मुरलीधर गुप्ते,  बा.भ. बोरकर यांच्या रचना ऐकताना जीव कसा तृप्त झाला. मग नेहमीसारखी घरची, बाहेरची महाविद्यालयाची कामं आटपली. तो पाचवा श्लोक मनामध्ये घोळत होता रे, पण सरळ अर्थाशिवाय काही लिहिता येईल असं वाटेचना बघ. 

      पुढे? पुढे काय रात्र झाली आणि मी झोपले, आता मीही वैतागले होते. 

       दुसऱ्या दिवशी? 

....... पहाटे पहाटेच कळलं रे, कुमुद ताईंना तू तुझ्याकडे बोलवून घेतलेलं आहेस. ती बातमी वाचून 

 "देवा, तुझी ज्योत तुझ्यात विलीन झाली." - श्रीकृष्णार्पणमस्तु! 

     ही माझी पहिली प्रतिक्रिया उमटली बघ. त्यानंतर काल मी पूर्णपणे कुमुद ताईंमध्ये हरवून गेले होते. 

      हो ! पण स्वतःची कामे केली असशीलच ना? 

      Show must go on हे तुझं तत्त्व आम्हाला पाळावंच लागतं बाबा. त्यात काल काही महत्त्वाची कामं होती, ती यजमानांसोबत जाऊन निमुटपणे पूर्ण केली. तुला आठवूनच मनातलं दुःख वगैरे बाजूला ठेवलं बघ. 

        "कामं करायचीच असतात. ती तू करून आपसूक मोकळी होतेस. भावनांमधून मात्र तुला मोकळं होता येत नाही."  कृष्णानं आता अगदी माझ्या वर्मावर बोट ठेवलं होतं. 

      " खरंच नाही होता येत रे कृष्णा. तुला सांगू ,काल '... मैं हृदय की बात रे' हा लेख लिहिला आणि मग कुठे मन शांत झालं बघ. तोपर्यंत विनाकारण चिडचिड सुरू होती माझी." 

            आताही बघ ना. तुला काल कार्यालयीन कामाच्या ठिकाणी अगदी मध्यभागी 'चाफ्याचा वृक्ष' दाखवला, पण तू त्याचा उल्लेखही केला नाहीस. 

        अय्या, खरंच की कृष्णा! अशी कशी विसरले मी? मी तर काल आशय ला म्हणाले सुद्धा, "आयुष्यात पहिल्यांदाच मी चाफ्याचा वृक्ष आणि एवढा पूर्ण फुललेला चाफा पाहते आहे म्हणून." 

 हूं - कृष्णानं हुंकार भरला.

आणि माहिती आहे का कृष्णा, काल रात्री आम्ही दोघं फिरायला गेलो तेव्हा पुन्हा चाफा दिसला. चाफा , चंद्र आणि चांदणी तिघं एकत्र! आशयनेच न राहवून त्याचा सुंदर असा फोटो काढला बघ. मग तू एवढा काव्यात्मक संदेश त्यालाच बघून दिलास का रे? मी आपलं तेवढ्याच भाबडेपणानं त्याला विचारलं.  

         कृष्ण माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत होता. काय झालं रे? 

"काही नाही. पालथ्या घड्यावर पाणी काय असतं , ते मी अनुभवत होतो." कृष्णानं माझ्या अज्ञानाची एवढी जबरदस्त निर्भत्सना केली की,

"कोणीतरी असावं वेडू म्हणणारं

 आणि वेडू म्हणता म्हणता 

आपल्यातलं शहाणपण जाणणारं"

हा मनातला भाव मला अगदी गळून पडल्यासारखा वाटला. 

          पाचवा श्लोक सांग, त्या पाठोपाठ आलेल्या कृष्णाच्या करड्या आवाजानं माझे डोळे खाडकन उघडले -       

       

मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये। 

           क्षीणाग्रमूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥५॥ 

                                                                       (सार्थ अमृतानुभव)

विश्वमूलकारण होणाऱ्या,  स्थितिकली सृष्टीचे प्रशासन व सत्ता - स्फूर्ती प्रदान पूर्वक प्रशासन करणाऱ्या,  प्रलय कारण होणाऱ्या व परमार्थतः ज्याचे ठायी आदि स्थिती, अंत हे मुळीच नाहीत असा स्वरूपतः परिपूर्ण असा शंभू त्याला नमस्कार असो.  'पूर्ण शंभुरुपाने' अधिष्ठान 'पूर्ण परब्रम्हा'चे स्वरूप सांगून ते 'सगुण निर्गुण' असे उभय स्वरूपाचे असल्याचे या श्लोकात सांगितले आहे. 

मी पुस्तकातून अर्थासह त्याला श्लोक ऐकवला. .... आणि मला परवा सकाळी काना-मना-डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या चाफ्यापासून, संपूर्ण वृक्षात परिणत झालेला चाफा पुन्हा पुन्हा आठवला. कुमुदताईंच्या निमित्ताने जीवा शिवाचं एक होणं आठवलं. कृष्णाचा आजचा संदेश हा प्रेमात पडणारा किंवा पाडणारा नाही तर तो 'हरिहर संवाद' आहे हे कळालं. शैव आणि वैष्णव यांची संपूर्ण धारा क्षणभर डोळ्यांसमोर चमकून गेली. 

'हरिहरा नाही भेद' हे संत वचन डोक्यात चक्राकार फिरायला लागलं. 


तूच कृष्ण, तूच शिव 

तूच जीवनाची नीव

हवे तेव्हा पसरतो 

हवे तेव्हा गुंडाळतो 

कृष्णा तुला भेटताक्षणी 

आता मज शिवही कळतो ! 

संत ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद कुठेतरी उलगडत गेला आणि कुमुद ताईंच्या जाण्याचा दुःखातून कृष्णाचं बोट धरून मी बाहेर पडले. चाफ्याची वेगवेगळी रूपं मूल-अग्र-मध्य समजवत समजवत धूसर होत गेली ; आणि डोळ्यांसमोर पसरलं एक अनादी -अनंत विस्तीर्ण आकाश! 

त्या आकाशामध्ये आता किसन महाराज साखरे यांनी सांगितलेल्या पाचव्या श्लोकाचा अर्थ उलगडत होता ते लिहितात, 

"..... अतएव  विश्वाचे जे 'मूल' ती आत्मवस्तू होय,  दृश्य रूपाने आविर्भूत होणारे दृश्य-विश्व म्हणजे 'मध्य' ही ती आत्मवस्तूच होय आणि दृश्य - द्रष्टा यांचा विलय होऊन सारे विश्व विलय पावते ते 'अग्र' म्हणजे शेवटही उर्वरित राहणारी विशुद्ध संवित्  तीही आत्मवस्तूच होय. 

सारांश द्रष्टा - दृश्यात्मक जगत् क्रीडेच्या आदि मध्यांती एकमेव आत्मवस्तूच तत्वतः आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या ऐवजी अनुक्रमे मूल - मध्य - अग्र असे शब्द श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकात योजले आहेत आणि त्या तिघांना वेगवेगळे वंदनही केले आहे. 

त्याबरोबरच मूल,मध्य आणि अग्र ही तिन्ही मिळून पाहिले तर सारे विश्व परब्रम्हरूप पूर्ण शंभूहून वेगळे स्वतंत्र सत्तावान् असे नसल्यामुळे 'मूलमध्याग्रमूर्ती'लाही वंदन केले आहे. आणि सरते शेवटी हे विश्व लय पावते अर्थात् सारी दृश्य विश्वविलीन होऊन दृश्यसापेक्ष द्रष्टाही-द्रष्टेपणाही विलीन होतो. 

 तेव्हा तेथे मूल, मध्य आणि अग्र हे व या सम सर्वच भेद नाहीसे होतात, तेव्हा दृष्टीचा आश्रय असलेला लौकिक द्रष्टा, लोकिक दृष्टि-वृत्तिज्ञान आणि लौकिक सारे दृश्य जगत या सर्वांना बाजूला सारल्यावर जी 'द्रष्टा - दृश्य दशेहून  अतीत दृङ्मात्र वस्तूला अर्थात 'सगुण - निर्गुण' या उभयांहून अतीत असलेल्या 'अगुण' चिन्मय वस्तूला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 'पूर्ण शंभू' म्हटले आहे." 

सारांश सच्चिदानंद शिवाचे मूळस्वरूप अज्ञातत्व-ज्ञातत्व धर्मरहित सगुणत्व - निर्गुणत्व धर्मरहित, अध्यारोप - अपवादरहित आहे. अशा त्या सर्वत्र सदा - सम पूर्ण स्वरूप शंभूला मी नमस्कार करतो, असे श्री ज्ञानराज माऊली या श्लोकात म्हणतात. 

संपूर्ण समर्पण !


वृंदा आशय 

श्रीकृष्णार्पणमस्तु!

Wednesday, 20 May 2026

.... मैं हृदय की बात रे !


 

                                                                      ....मैं हृदय की बात रे !

                                     https://youtu.be/ipsbfYhv0AI?si=_WEIPPQHjhD2-Q74

आज कुमुद ताई गेल्या. नकळत मन त्यांच्या भोवती भिरभिरत राहिले. अनेक आठवणी. तो उत्साह, तो हसरा चेहरा ती सकारात्मकता, ती आस्था आणि ते वास्तवाचे भानही. मराठी भाषा आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणारे मन, त्याचा गांभीर्याने अभ्यास करण्याची प्रवृत्ती, हा वारसा आपण जपून-वाढवून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे ही सत्प्रवृत्ती, आणि याच सदगुणांमुळे त्यांचं कायम प्रफुल्लित असलेलं हिरवं मन! 


       माझ्या प्रत्यक्ष वाट्याला आलं ते ताईंचं पिकलं वय. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणानं त्याची मधुरताच माझ्या वाट्याला आली. खरं म्हणजे ताई निश्चितच करड्या शिस्तीच्या असणार. त्याशिवाय एवढा व्यासंग आणि तोही मानसिक दृष्ट्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जपणं म्हणजे चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही त्यांच्या दुःखाचा लवलेश देखील उमटलेला मला आठवत नाही. याचा अर्थ त्यांना दुःख नव्हतं असा होऊच शकत नाही. उलट मला वाटतं अशी माणसं दुःखाच्या अतिभारानं समुद्रासारखी खोल, विस्तीर्ण आणि अथांग झालेली असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ जातो त्याच्या वाट्याला माणिक मोतीच येतात. ते भाग्य माझ्या वाट्याला आलं. या भाग्याची आज नकळत उजळणी सुरू होती. या उजळणीची लय साधली गेली आणि मला आठवलं ते सुरेल गीत -

'तुमुल् कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे '

आशा भोसले यांचा सुरेल आवाज हे गीत आपल्या थेट हृदयामध्ये उतरवतो. कवी जयशंकर प्रसाद  यांची ही विलक्षण अर्थपूर्ण काव्यरचना आपल्याला आतून हलवून टाकते. अनेकवेळा हे गीत ऐकताना अंतरीचा दाटून आलेला उमाळा मी अनुभवलेला आहे. मध्यंतरी याच गीताबाबतची विरक्तीही मी फार जवळून अनुभवली. अगदी स्वतःला काय झालं हे तपासून पहावं वाटावं इतकी ती विरक्ती तीव्र होती.

 
        खरं म्हणजे खूप दिवसांपासून मला या गीतावर काहीतरी लिहावं या गीताचा रसग्रहण करावं अशी मनी मानसी इच्छा होती. पण थेट आतला आवाज निघत नाही तोपर्यंत लेखणी काही लिहीत नाही, लेखणीच्या या सद्गुणाबद्दल खरं म्हणजे मी तिची फार कृतज्ञ आहे. जेव्हा जेव्हा या गीताबद्दल लिहिण्याचा मी विचार करत होते तेव्हा तेव्हा त्यातील अलवार, नाजूक भावनांना शब्दांचा स्पर्श सोसवेल की नाही, आशाताईंच्या सुरांनी शब्दांना, त्याच्या अर्थवलयांना जो एक जबरदस्त न्याय दिलेला आहे त्याच्या काठावर तरी माझ्या शब्दांना उभे राहता येईल का नाही हा प्रश्न देखील मला सतावत असे.


                 आज मात्र कुमुद ताई गेल्या तेंव्हा अगदी आतून हे गीत माझ्या खूप जवळ आलं. त्यावर लिहावं अशी इच्छा झाली. कदाचित '... मैं हृदय की बात रे' असं न म्हणताही, कुमुद ताईंच्या शब्दांनी माझ्या हृदयाचे कोवळेपण जपण्याचे काम कळत - नकळत केले. खरं म्हणजे आम्ही दोघी परस्परांशी फार बोलत होतो, असं घडत नव्हतं. काही काम असेल तरच कामाच्या निमित्ताने एकमेकींना फोन व्हायचा. साहित्यातलं काही छान सापडलं की त्याची आपसूक देवाण-घेवाण व्हायची. मात्र त्याच धाग्यानं आमच्यातलं नातं अतूट केलं होतं एवढं मात्र निश्चित.

 
           दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर कुमुदताई अनेकांना सुविचार पाठवायच्या. सहज म्हणून ते वाचले जात होते. आपल्या अवतीभवतीची परिस्थिती सातत्याने बदलती असते. कदाचित आपण जे वाचतो त्याचा संबंध आपल्या परिस्थितीशी आपण नकळत जोडतो. माझंही आपसूक असं घडत गेलं असावं. एके दिवशी मात्र माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझ्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण व्हायचे, गोंधळ निर्माण व्हायचा, to be or not to be अशी मनाची स्थिती होऊन जायची ; अशा काळात दुसऱ्या दिवशी पहाटेच आलेला कुमुद ताईंचा संदेश मला स्पष्टपणे दिशा दाखवत असे. हे योगायोग म्हणून एक दोन वेळा नव्हे तर जवळपास पाच सहा महिने मी अनुभवलं. माझ्यासाठी हे खरोखर आश्चर्य होतं - कारण कुमुद ताईंना माझ्या प्रश्नांबद्दल मी कधी काही बोलले नव्हते, साहित्य सुखाशिवाय अन्य कोणत्या सुखदुःखांची देवाणघेवाण आम्ही कधी केलीच नाही. तरी हे असं घडत होतं. मग त्या मला

'तुमुल् कोलाहल कलह में,
मैं हृदय की बात रे '

अशा भासल्या तर त्यात आश्चर्य ते काय? त्यांच्या अशा भासण्याबद्दल मला त्यांच्याजवळ कृतज्ञता देखील व्यक्त करता आली, याचा मनाला आनंद आहे. अन्यथा आज मला रुखरुख लागून राहण्याचं आज तेच  एक फार मोठं कारण ठरलं असतं.


           त्यांच्या निमित्ताने मी विचार करायला लागले असं 'हृदय की बात' होण्याची क्षमता कोणामध्ये असते? जाणवायला लागलं, 'जो कोणी  नि:स्वार्थपणानं आपली काळजी करू शकतो, घेऊ शकतो अशी कोणतीही व्यक्ती 'हृदय की बात' होऊ शकते. तिथे स्त्री - पुरुष असणं, विशिष्ट नातेसंबंध असणं किंवा नसणं, वय, धर्म, जात भाषा अशा कोणत्याच गोष्टीचा काहीही संबंध नसतो. फक्त संत ज्ञानदेवांनी सांगितल्यानुसार 'ये हृदयीचे ते हृदयी' करण्याची क्षमता असावी लागते. ते हृदय संत मुक्ताबाईंनी केलेल्या अपेक्षेसारखं 'गंगाजळ' असावं लागतं. मग कोणताही कोलाहल तुम्हाला वेढू शकत नाही, संपवू शकत नाही.

 
             खरं म्हणजे या काव्याचं एक एक कडवं आपण जसं वाचत जातो तसं  कवीच्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हायला लागतो. या कडव्यांमधून फार सुंदर पद्धतीने ते मनाची जी स्थिती वर्णन करतात आणि 'हृदय की बात' होणा-या व्यक्तीसाठी ज्या प्रतिमांचा अवलंब करतात त्या प्रतिमांचे कौतुक करणे शब्दातीत आहे. इतक्या चपखल आणि मार्मिक प्रतिमा त्या आहेत की, 'या सम याच' असाच भाव रसिकाच्या मनामध्ये उमटतो.

 
           एखाद्याचे मन जेव्हा व्याकुळ होते, आणि ही व्याकुळता दीर्घकाळ टिकते तेव्हा खरंतर ती माणसाच्या जीवनातला रस शोषून घेत असते. काही घटना आयुष्याला कधी कधी अशी काही कलाटणी देतात की 'सर्वस्व वाटणारे आयुष्य अर्थशून्य वाटायला लागते' ; जीवन अशा धोकादायक वळणावर जेव्हा उभे असते तेव्हा केवळ माणूस नव्हे तर त्याचे सबंध आयुष्यच 'अस्वस्थ' झालेले असते , हे वास्तव आहे. ती अस्वस्थता त्याची झोप उडवते, थकवा आणते हे काही दृश्य परिणाम आहेत. खरं म्हणजे ती अवस्था हिमनगाच्या टोकासारखी असते. बरं जे काही दिसत असते त्याच्याखाली न दिसणारे, आकलन न होणारे पण प्रचंड परिणाम साधणारे, असे काहीतरी निश्चित रूपाने घडत असते. एक प्रकारे त्सुनामी आल्यानंतर समुद्रामध्ये जी काही खळबळ माजते तशा प्रकारची खळबळ संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होते. आयुष्याबद्दल वाटणारी उदासीनता त्याला नकारात्मकतेकडे नेते, इतर माणसं त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्याशी इतकी कोरडेपणानं वागायला लागतात की त्याचं आयुष्य त्याला वाळवंट वाटावं. अशा वेळेला 'हृदयकी बात' होणारी व्यक्ती मलया पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्यासारखी 'चंदनसुगंधी' आणि 'शीतल' होऊन त्याच्या आयुष्यात येते ; ती त्याला देव वाटली नाही तरच नवल!


          खरं म्हणजे 'विषाद' ही मनाची एक अवस्था आहे. उन्हानंतर सावली,  सुखानंतर दुःख यावे तसे आपले मन अधूनमधून विषादाकडे वळतच असते. मात्र ज्याच्या आयुष्यामध्ये त्सुनामी निर्माण झालेली आहे, अशा मनुष्याचे मन कवी वर्णन करतात तसे 'चीर विषादामध्ये' विलीन होते. जणू काही त्याच्यासाठी 'विशाद' हीच एकमेव अवस्था असते, सत्य असते. आपली व्यथा, आपली दु:ख त्याच्याभोवती एक घनघोर अंधार निर्माण करतात, जिथे त्याच्या मनाची अवस्था '...आता सगळं काही संपलं', अशी होऊन जाते. अशा वेळी 'हृदय की बात' होणारी व्यक्ती त्या गडद अंधाराला छेद देणारी प्रकाशरेषा होते. पणतीची मिणमिणती ज्योत होते. 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल' हा विश्वास देणारी झुंजुमुंजू पहाट, दिलासा देणारी सकारात्मकता होते.

 
           चैतन्याच्या अभावी झालेल्या रखरखीत जीवनाच्या वाळवंटात आपण मधोमध उभे आहोत अशी अवस्था झालेला हा माणूस खरं म्हणजे स्नेहाच्या, आपुलकीच्या थेंबासाठी आसुसलेला असतो. मात्र त्याच वेळेला आपली ही अवस्था कोणाच्याही लक्षात येऊ नये अशी त्याची तीव्र इच्छा असते. ती इच्छा प्रबळ ठरते. टणकपणाचे, कठोरतेचे आवरण धारण केलेला हा माणूस इतरांना त्रासदायक,बोचणारा असा वाटायला लागतो. खरं म्हणजे त्याला स्वतःला ज्या खोलवर जखमा झालेल्या असतात त्याचा हा परिपाक असतो. माणूस शेवटी तेच देऊ शकतो जे त्याच्या आतमध्ये खोलवर रूजलेले आहे. असे होणे हे मात्र चुकीचे आहे, हे त्याचा सद्सद्विवेक त्याला सांगत राहतो आणि जाणिवेच्या कात्रीत सापडलेल्या या माणसाला परिस्थिती मौनाकडे, निष्क्रियतेकडे वळवते. अशा वेळी 'हृदय की बात' होणारी व्यक्ती 'सरस बरसात' होऊन येते. जी केवळ सडा शिंपण्याचं काम करत नाही तर सारी नकारात्मकता धुऊन काढून सकारात्मकतेची बीजं पेरण्याचं काम करते. 'हृदय की बात में वह बात होती है| '


          एखाद्या ठिकाणी कोणाला बंदिस्त केलं आणि त्याला बाहेरून आग लावून दिली तर या जीवघेण्या कृत्याला आपण क्रूरता म्हणतो. कधी कधी जीवनात अशा अवस्था निर्माण होतात की, मानसिक प्रतिकूलतेच्या ज्वाळांमध्ये माणूस लपेटला जातो, मागे जाता येत नाही आणि पुढे हलता येत नाही अशा अवस्थेत तो जागच्या जागीच गुदमरायला लागतो अशा वेळी 'हृदय की बात' होऊन येणारी व्यक्ती , 'ज्वाळांच्या खोचक आणि बोचक प्रकाशाला मंद करत शांतता देणाऱ्या,  शीतल करणा-या, फुलवणा-या वसंत ऋतुतील रात्रीसारखी असते.'


          जिथे आकाशात काळ्याकुट्ट निराशेचे ढग भरून आलेले असतात, त्याची सावली माणसाला दुःखात लोटत राहते, अशा वेळी 'हृदय की बात' होऊन येणारी व्यक्ती, अशा एखाद्या पाण्याच्या तलावासारखी भासते जिथे कमळं उमलत आहेत, भुंगे आनंदाने गुंजारव करत आहेत. ही लक्षणं उमलत्या जीवनाची, प्रेममयतेची आहेत.

 
           मी जेव्हा विचार करायला लागते खरंच अशा व्यक्ती असतात का तेव्हा माझा कृष्ण हसून म्हणतो, "ही असते माणसाच्या मनातली दृढ श्रद्धा जी काही देवासारख्या वाटणाऱ्या माणसांच्या निमित्ताने जागी होते."
             कुमुद ताई माझ्यासाठी 'देवमाणूस' ठरल्या. कुमुद ताई, तुमच्या या वाटेवर चालताना मला निखळ माणूस होता आलं तरी आनंदच आहे.

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!
        

      

Tuesday, 19 May 2026

थेंब अमृताचे - पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष लेखमाला - भाग २

 



वर्णो वर्णेन वर्ण्यते वर्णज्ञो वर्णतत्त्ववित्।

          वर्णे जगदिदं भाति वर्णो ज्ञानप्रकाशकः॥          

एक वर्ण (अक्षर) के द्वारा दूसरे वर्ण का वर्णन किया जाता है। जो वर्णों के ज्ञाता हैं, वे ही वास्तव में तत्त्व (सत्य) को जानने वाले हैं। यह सम्पूर्ण संसार वर्णों (शब्दों/अक्षरों) में ही प्रकाशित होता है, क्योंकि वर्ण ही ज्ञान का प्रकाश फैलाने वाले हैं।


•| |•

 

थेंब अमृताचे

 

२. शिवशक्ती ऐक्य

 

पहिल्या लेखामध्ये आपण सार्थ अमृतानुभवातील जे संस्कृत श्लोक पंचक आहे त्यातील पहिले दोन श्लोक समजावून घेतले. श्रीगुरूंच्या कृपेने ब्रह्मविद्या संपादन करून सर्वांनी आपले परमहित करून घ्यावे असा एक संदेश कालच्या श्लोकांनी आपल्याला दिला.

 

आज त्या पुढच्या तीन श्लोकांचा आपण विचार करणार आहोत. या श्लोकांमधून 'शिव' आणि 'शक्ती' यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. अज्ञानी जीवाला शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद जाणवतो, परंतु परमार्थाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर शिव आणि शक्ती हे एकच आहेत ते इतके एकरूप आहेत की कोण कोणाशी संलग्न झालेले आहे हे त्यांच्या समरूपत्वामुळे कळू देखील शकत नाही. हे ऐक्य पटवण्यासाठी संत ज्ञानदेवांनी विविध दृष्टांत दिलेले आहेत. त्यातील एक दृष्टांत अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील आहे. आपण आरशामध्ये आपला चेहरा पाहतो आणि स्व-सौंदर्याने आपण आनंदित होतो. संत ज्ञानदेव म्हणतात यात, "बिंब व प्रतिबिंब यामध्ये भेद दिसला तरी तो वास्तविक सत्य नसून भास मात्र आहे. ती दोन्ही रूपे मूळच्या चेहऱ्याचीच असल्यामुळे मूळच्या चेहऱ्याशिवाय वेगळे असे काही तिथे नसते." माऊलींचा हा सोपा दृष्टांत आपल्याला मूळ चैतन्यतत्त्वाची एकता सहजतेने स्पष्ट करून सांगतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही सहजतेने या दृष्टांताचा अनुभव देखील घेऊ शकतो.

सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः।

ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः ॥३॥

  या श्लोकाचे विश्लेषण करताना किसन महाराज साखरे लिहितात,

सदाच एकरूप असणाऱ्या शिवशक्ती किंवा शिव आणि शिवा संयुक्त रूपामध्ये कोणाच्याद्वारे शिवशक्तीचे अर्ध अर्ध भाग संलग्न होतात आणि कोण कोणाचा अर्धा भाग होतो, त्यांना एकरूप मानावे का प्रतीतीप्रमाणे दोन मानावेत हे वारंवार विचार करूनही समजणे शक्य होत नाही. कारण त्यांचे समरूपाच्या ठायी दोन असल्याचा भास होत आहे . (अर्धनारी नटेश्वर स्वरूप हे असे संयुक्त स्वरूप असते.)

 "ब्रह्मवस्तू ही एकमेवाद्वितीय आहे. ती सशक्तिकही अनादीपणानेच आहे. ब्रह्मवस्तू व तिची शक्ती यात मुळीच भेद नाही. अद्वय ब्रह्मस्थितीत नेतृत्व, कर्तृत्व व भोक्तृत्व इत्यादी काहीही संभवत नाही. बहुभवनाच्या स्फुरणरूप इच्छेने ही ब्रह्मवस्तू शक्ती किंचित काहीशी पृथक झाल्यासारखी होते. तेव्हाच तिला 'शक्ती' ही संज्ञा प्राप्त होते व तत्सापेक्ष ब्रह्मास 'शिव' ही संज्ञा प्राप्त होते. या शक्तीलाच 'माया' नाव दिले म्हणजे ब्रह्मास 'ईश्वर' आणि या शुद्ध सत्त्वप्रधान शक्तीला 'प्रकृती' नाव दिले तर ब्रह्मास तत्सापेक्षतेने 'पुरुष' हे नाव प्राप्त होते. ईश्वर - माया, पुरुष - प्रकृती, शिव - शक्ती ही दोन तत्वतः कधीही भिन्न होत नाही सदा एकरूपच असतात. त्यांच्यातील संबंध हा कल्पित तादात्म्य संबंध आहे त्यामुळे वस्तूतः त्यांच्यात अद्वैत असूनही जगाची निर्मिती झाल्यावर त्यात द्वैताचा भास होतो या द्वैताभासामुळे शिव आणि शक्ती यांचे अद्वैतरूप लग्न, अभेदरूप तादात्म्य कळत नाही. शिव हा स्वतःच्या अस्तित्वात संशयविरहित असा स्वयंप्रकाश आहे, आनंदरूप आहे तर शक्ती ही त्याच्या प्रकाशाने शुद्ध सत्वगुण प्राधान्याने प्रकाशमान होते. शक्ती ही स्वतः सत्ता-स्फूर्ती-शून्य जड आहे. सच्चिदानंदाला परब्रह्मरूप शिवाला 'एकोSहम् बहुस्यां प्रजायेय' म्हणजे 'मी एक असलेला अनेक रूपांनी व्हावे' असे 'स्फुरण' झाले तेच 'शक्तिस्वरूप' आहे. ही शक्ती परब्रह्मरूप शिवाहून किंचितही भिन्न नाही. आपल्याच 'स्फूरणरूप इच्छे'च्या सहाय्याने शक्तिरूपाने तो भासमान भेदरूप दिसतो. तरीही तो भेद त्यांच्या ठिकाणी वास्तविक नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या एकत्र येण्याने निर्माण होणारे जगही भासमानच आहे. शिव - शक्ति अशा भासमात्र मिषाने एक परमात्म तत्त्वच विलसत आहे, हे सिद्ध होते.

 

अद्वैतमात्मनस्तत्त्वम् दर्शयन्तौ मिथस्तराम्।

तौवंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥४॥

        या वरील चौथ्या श्लोकामध्ये 'शिवशक्ती'चे अद्वैततत्त्वरूप 'द्वैत लीलेचे' तत्त्व किंवा तात्त्विक स्वरूप समजण्यासाठी श्री ज्ञानदेवांनी त्यांनाच वंदन केलेले आहे. शक्ती ही कल्पित म्हणजे अधिष्ठानभूत शिवाहून स्वतंत्र सत्तारहित असल्यामुळे ती शिवाधिष्ठानाविना स्वतंत्रतेने कार्यप्रवण होऊ शकत नाही. अधिष्ठानरूप, 'संवित' स्वरूप शिवाचेच आश्रयावर शक्तीचे स्फुरण होत असल्यामुळे तत्त्वत: ती शिवरूपच आहे. ती 'स्फुरण' रूपाने अभिव्यक्त होण्यापूर्वी अव्यक्त रूपाने शिवाचे ठायी शिवरूपच असते. शक्तीची अभिव्यक्ती ही शिवाची 'लीला' आहे, करमणुकीचा खेळ आहे. या क्रीडेचे लीला कैवल्य सोडण्याचा कंटाळा आला की तो शक्तीला आपल्या ठायी विलीन करतो. स्फुरणात जगाची उत्पत्ती, प्रतीती होते तर स्फुरणलयाबरोबर जगत् -प्रलय होतो, हीच त्या शिवाची स्वभावसहज क्रीडा आहे.

        द्वैत लिलेच्या आवडीने शिवशक्ती परस्परांना प्रगट करतात पण दिसायला जरी दोन दिसले तरीही ती एकमेकांमध्ये इतकी मिसळून राहतात की सहज कौतुकाने देखील ती दोघे आपले एकपण मोडू देत नाहीत आपल्या परस्परांच्या एकत्वाचा वियोग घडू नये, आपले समावेशन बिघडू नये म्हणून शक्तीने विश्वाएवढ्या बालकाला जन्म देऊनही, विश्व निर्माण करूनही  तिसरेपणाचा स्पर्शही होऊ दिला नाही. एकाच अद्वैत परब्रहम सत्तेवर दोघेही अधिष्ठित झाली आहेत. दिव्याचा सारा प्रकाश हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्यावर जसा दिवाच हाती येतो त्याप्रमाणे या विश्वरूपाने वाढ विस्तारा पावलेली शक्ती ती समग्र हाती घेतल्यानंतर शिवच हाती लागतो. अशी शिवशक्ती ही आपले अद्वैत स्वरूप दाखवितात. ही शिवशक्ती जगताचे आद्यकारण होय. विश्वाच्या प्रतीतीच्या संगतीसाठी शिव आणि शक्ती ही दोन तत्त्वे मानवी लागतात. अशी ही दोन तत्त्वे मानून मी त्यांना वंदन करतो, असा भाव संत श्री. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकातून व्यक्त करतात.

( किसन महाराज साखरे यांनी संपूर्ण विवेचनामध्ये 'शिव' आणि 'शिवा' असे शब्दप्रयोग अनुक्रमे 'शिव' आणि 'शक्ती' यांच्यासाठी केलेले दिसतात. त्यासाठी त्यांनी संस्कृत शब्दांचा व्याकरणिक आधार देखील स्पष्ट केलेला आहे. मराठी भाषेमध्ये मात्र 'शिव' या शब्दाचे सामान्य रूप करताना 'शिवा' हा शब्द तयार होतो आणि मग आकलनामध्ये त्रुटी राहू नये म्हणून मी 'शिवा' या शब्दाचा वापर न करता 'शक्ती' याच शब्दाचा वापर केलेला आहे.

       मात्र या निमित्ताने 'शिव'चे सामान्य रूप 'शिवा' आणि 'शिवा' म्हणजे 'शक्ती' यांची जी संगती लागते ती - शिव जेव्हा सामान्यांच्या रूपाने विलसत जातो तेव्हाच तो शक्तिरूप राहतो, ही संगती केवळ विलक्षण आणि आनंददायक आहे. भगवान शंकर 'शिव' असून पार्वती हीच 'शिवा' आहे. श्रीगुरु हे शिवस्वरूप आहेत तर ब्रह्मविद्या हीच 'शिवा' आहे. विवेकाने अंतःकरण विशिष्ट जीवस्वरूप शिवाचे मूळ आद्य विशुद्ध शिवाशी ऐक्य जाणावे.)

'शिव' आणि 'शक्ती' यांना सगुण स्वरूपात वंदन करण्याने त्यांचा कृपाप्रसाद होऊन अंत:करण शुद्धी होऊन जिज्ञासापूर्वक 'साक्षात शांकरी विद्या' प्राप्त होते आणि शिवशक्तीचे अभेद रूप तादात्म्य अचूकपणे समजते, म्हणून मी त्या दोघांना वंदन करतो असा संत ज्ञानदेवांच्या मनीचा भाव इथे व्यक्त होतो.

      या वंदनाचा पारमार्थिक सखोल अर्थ स्पष्ट करताना किसन महाराज साखरे लिहितात,

" येथे वंदन करणे म्हणजे केवळ नमस्कार करणे असा सीमित अर्थ अपेक्षित नाही. तर पंचकोशात्मक उपाधीचा निरास करून अहम् भावाचा परित्याग करून 'शिवशक्ती समावेश नमन केले' म्हणजे शिवशक्तीशी अभेदरूपाने समाविष्ट होऊन एक होऊन,  त्यांना आत्मत्त्वाने जाणणे, नित्य निरतिशय, स्वानंद सौख्यस्वरूप सदाचेच होऊन असणे हेच अद्वैतात पर्यवसित होणारे खरे वंदन होय. या अशा वंदनाने शिवशक्तीच्या तत्त्वाची अद्वैततत्त्वाची अभिपत्ती होते किंवा आपल्या अंतःकरणाच्या इंद्रियांच्या सर्वच्या सर्व वृत्ती परमेश्वरास सदाच्या समर्पित करून केवळ परमेश्वरैक शरण होणे, त्यामुळे त्याची कृपा होऊन, त्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होते. यालाच श्री ज्ञानराज माऊलींनी 'तत्त्वाभिपत्ति' म्हणले आहे व त्यासाठीच वंदन केले आहे."

आत्ता इथे थांबूयात. लेखाच्या विस्तार भयास्तव पाचव्या श्लोकाचे विवेचन स्वतंत्र लेखात करूया.

 

संपूर्ण समर्पण!

 

वृंदा आशय

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!

संदर्भ ग्रंथ

१. सार्थ अमृतानुभव - संपादक किसन महाराज साखरे

 

 

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...