•| ॐ |•
https://youtu.be/WOCbKdUXBeg?si=dzXz9dWnsmDqfr8-
जांभूळ पिकल्या झाडाखाली....
(शुभमंगल सावधान!)
सध्या बाजारामध्ये जांभळं आलेले आहेत. 80 रुपये पाव. 320 रुपये किलो. जांभळांची येण्याची वेळ, बाजारात राहण्याचा काळ आणि या फळाची स्वतःची वेगवान नश्वरता ; यामुळे जांभळं ज्याला आवडतात त्यांनी मिळेल त्या भावात घ्यावीत आणि खावीत असं हे सरळ गणित आहे. काही दिवसांनी भाव उतरून उतरून फार फार तर 60 रुपये. त्यामुळे जांभळासारखं फळ कदाचित 'हाजीर सो वजीर' असं मनातल्या मनात म्हणत असावं असं मला वाटतं.
आमच्या शेजारी जांभळांचं एक झाड आहे. तिथल्या बाईंनी काही जांभळं नमुना म्हणून दिले. ते टेबलवर ठेवलेले होते. त्यांच्याकडे पाहता पाहता बरंच काही जांभूळ पुराण मला आठवत गेलं. बेगमपु-यातील आमच्या माहेरचं जांभळाचं मोठं झाड, जांभळं झाडावरून काढताना करावी लागणारी कसरत, ते खाली पडताना आपटून फुटू नयेत म्हणून वापरावयाची संरक्षक जाळी ; असं बरंच काही काही....
आणि एकदम माझ्या कलासक्त मनाला कानात गाणं ऐकू आलं,
"जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..."
त्याचे स्वर, लय - ताल सगळं काही काना मनात घुमायला लागलं. कवी ना.धो. महानोर यांच्या शब्दांची आणि आशाताईंच्या स्वरांची अशी काही जादू आहे की आपण एकदम त्या वातावरणातच जातो. मंगलध्वनी ऐकू यायला लागतात, लग्नाची लगबग डोळ्यांसमोर दिसायला लागते आणि वधूवरांच्या उत्सुक मनांचा वेध आपण नकळत घ्यायला लागतो.
..... यंदा कोणाचाच 'ढोल वाजला' नाही. दुसऱ्या मनाने एकदम जागं केलं. अर्थात कोणाचंच लग्न ठरलं नाही. लग्नाच्या विषयावर आल्यावर परवा झालेली आपली भेट आठवली आणि आपसूकच लग्न ठरण्याच्या सगळ्या बाबींची उजळणी मनामध्ये झाली.
आपल्याकडे एक म्हण आहे - 'घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून!' माझ्या तोकड्या ज्ञानानुसार त्या काळात ही म्हण लग्न समारंभ करणाऱ्या आई-वडिलांच्या बाबतीत लागू होत असावी. याचे कारण असे की, आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थिती असताना विशेषतः आपल्या मुलीचे लग्न करून देणे ही अक्षरशः तारेवरची कसरत होती. मुळात आपल्या मुलीला कुणीतरी 'हो' म्हणलं पाहिजे, मुलीचा 'होकार' बऱ्यापैकी गृहीत धरलेला असायचा. एकदा तिकडून पसंती आली की मग त्यांचा मानपान राखणे, हौस मौज करणे अशा अनेक बाबी ओघा ओघाने येत असायच्या.
आता काळ पार बदललेला आहे. दोन्हीकडच्या मंडळींसाठी लग्न हा एक 'इव्हेंट' झालेला आहे. त्यामुळे एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे हा सोहळा देऊन वधू आणि वर पक्ष लग्न मस्तपैकी एन्जॉय करतात. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा खर्च उचलण्याची फार चांगली पद्धत विकसित झालेली आहे. प्री वेडिंग शूट नावाचं जे एक खूळ विलक्षण वेगाने वाढत चाललेले आहे, त्यामुळे आपण कोणीतरी सेलिब्रेटी आहोत असा एक सुंदर फील वधू - वर घेतात. जिथे पैसा असतो तिथे अमाप खर्च होतो. हौसेला मोल नसते. अशा लग्नांमुळे एक तात्पुरते वेगवान आर्थिक चक्र निर्माण होते. बाजारात होणारी उलाढाल पाहता, ज्यांना परवडते त्यांनी अशा प्रकारे लग्न करायला काहीच हरकत नाही. आयुष्यात लग्न सोहळा एकदाच होतो आणि त्यामुळे तो शक्य तितका 'मेमोरेबल' करण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रत्येकजणच आपापल्या परीने हा सोहळा संस्मरणीय करू पाहते.
अडचण कुठे सुरू होते, जिथे 'तुलना' व्हायला लागते तिथे. त्यांनी असं असं केलं लग्न, लग्नात एवढे दागिने दिले, फोरव्हिलर भेट दिली, काय मानपान केला, काय थाट केला ! माझ्या मुलाचं लग्न असंच व्हावं, अशी माझी इच्छा आहे.
मुलीकडचे लग्न सोहळ्यापेक्षा वराचं घर कसं आहे, घरात किती माणसं आहेत, कोणत्या सुख सोयी आहेत, विशेषतः पॅकेज किती आहे, याबाबत तुलना करत राहते. माझ्या मुलीला तुमच्या मुलीसारखंच छान सासर मिळालं पाहिजे, या 'छान' ची व्याख्या व्यक्तीनिरपेक्ष, कुटुंब निरपेक्ष, जात- धर्मनिरपेक्ष असते. त्याचा सर्वसाधारण आधार मात्र 'आर्थिक परिस्थिती' हा असतो.
आपल्या लक्षात येत नाही परंतु कळत - नकळत आपण आपल्याच मुला-मुलींकडे 'वस्तूच्या' नजरेने पाहायला लागतो. तुझ्या शिक्षणावर इतका खर्च झालाय, तुला डॉक्टर करताना काय खस्ता खाल्ल्या आम्ही, सासरकडच्यांना काही कौतुक नको का? ; अशा प्रकारच्या संवादामधून आपल्या छुप्या अपेक्षा नकळत व्यक्त होतात. आपण काय 'इन्व्हेस्ट' केलेले आहे आणि त्यावर 'रिटर्न्स' काय मिळणार, या पद्धतीने विचार करताना सहाजिकच भावना गढूळ व्हायला सुरुवात होते, मनातला 'भाव' संपतो आणि जनातला 'भाव' सुरू होतो.अशावेळी मला एखादी सवलतीची जाहिरात आणि त्या सवलतीपुढचा स्टारमार्क आठवतो.
नकळत मी ज्या काही लग्नांना पाहुणी म्हणून गेले होते ती लग्नं माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेली. एका लग्नामध्ये आपल्या सुनेचा 'वन पीस' चाळीस हजार रुपयांचा आहे, हे मला तिथल्या काकूंनी आवर्जून सांगितले. तिथला डामडौल, थाटमाट, स्वागताच्या पद्धती पाहून माझे डोळे दिपून गेलेच होते ; आता त्यांच्या सांगण्याने काहीच कारण नसताना माझ्यावरच दडपण आल्यासारखं वाटलं. ..... दुर्दैवाने काही महिन्यांमध्येच या जोडप्याच्या घटस्फोटाची बातमीही आमच्या कानावर आली. त्यांचं तरी 'ॲरेंज मॅरेज' होते. मी अनेक 'लव्ह मॅरेज' मध्ये सुद्धा कालांतराने घटस्फोट झालेले पाहिले आहेत. चार-पाच वर्षे एकमेकांवर प्रेम केलेली माणसं चार-पाच महिन्यांमध्ये जेव्हा घटस्फोट घेतात, तेव्हा नक्की कोणाचे चुकते आहे, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
मुळातच विवाहसंस्था ही दोन कुटुंबांना जोडणारी आहे. पूर्वीच्या काळात सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यामध्ये अंतर नव्हते. त्यामुळे लहान गावात होणारी लग्नं तर सबंध गावाच्या मुलीचे लग्न म्हणून पाहिलं जायचं. गावात येणाऱ्या सुनेचं कौतुक करायला सगळे गावकरी उत्सुक असायचे. आता बदलत्या परिस्थितीमध्ये ही अपेक्षा आपण बाळगणेच चुकीचे आहे. किमान दोन कुटुंबांना तरी जोडणारी ही विवाह संस्था राहिली आहे का, दुर्दैवाने याचे उत्तर 'नकारात्मक' दिशेने वळणारे आहे. वेगवान जीवनशैलीमध्ये आपले आयुष्य इतके बदलत चाललेले आहे की आपण सहाजिकच म्हणतो, " तुमच्या दोघांचं जरी एकमेकांशी पटलं ना तरी पुष्कळ झालं. हवं तर तुम्ही वेगळे राहा. पण तुमचा संसार सुखाचा करा." अशा माणसांचा संसार खरोखरच सुखाचा होतो का? याचे सर्वेक्षण केले तर मला वाटते त्याचे निकालही कदाचित धक्कादायक येतील.
मग मला वाटायला लागते, लग्न हा एक 'संस्मरणीय प्रसंग' करण्याच्या पाठीमागे आपण जितके लागतो ; त्याच्या किती टक्के वेळ, पैसा, संवाद आपण 'आयुष्याचा संग' कसा असतो, जीवनाचा साथीदार कसा असावा, कसा निवडावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 'कसा निभवावा' हे आपल्या मुलांना सांगण्यासाठी देतो? लग्न ही एक तडजोडच असते ; हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. अहो सख्ख्या आईशी - वडिलांशी, बहिणीशी, भावाशी आपले वाद होतातच ना ! मग विवाहबंधनाने ज्या अल्प ओळखीच्या किंवा अनोळखी घरामध्ये आपण जाणार आहोत, तिथे कोणाशीच आपले वाद होऊ नयेत अशी आदर्श अवस्था आपण का गृहीत धरतो? 'घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच' ; इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या म्हणी माणसांचे नातेसंबंध आपल्याला समजावून सांगतात. या भांड्यांचा आवाज किती होऊ द्यायचा, कधी होऊ द्यायचा, कुठे ऐकू जाऊ द्यायचा, तो आवाज कर्कश्श होणार नाही यासाठी काय काळजी घ्यायची, पुढे जाऊन हा आवाज मधुर होईल यासाठी मी काय योगदान द्यायचे? हा विचार घरातला प्रत्येक माणूस ज्या वेळेला करायला लागेल त्या वेळेला पुन्हा एकदा विवाहाला 'दोन कुटुंबांचे संबंध' ही अर्थपूर्णता लाभू शकेल.
'अर्थाच्या' मागे धावून जीवन अनर्थकारक करण्यापेक्षा त्यातली अर्थपूर्णता वाढवण्यावर संपूर्ण समाजाने समंजसपणे काम करणे आवश्यक आहे. जांभूळ पिकल्या झाडाखालचा ढोल आनंददायी होण्यासाठी इतके तर केलेच पाहिजे नाही का ?
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु !
.jpeg)