Saturday, 28 March 2026

अश्वत्थाची सळसळ !

 


वर विठ्ठल खाली कृष्ण; जे सोडवतील माझा कूटप्रश्न !


        ‌‌.                 •|ॐ |•

                      अश्वत्थाची सळसळ 

माझं बालपण गेलं ते औरंगपुऱ्याच्या अंगणामध्ये. त्या मनमोहक अंगणामध्ये धुणं धुण्याच्या ओट्यावर मनसोक्त बसायचं आणि समोरचा पिंपळ आणि उंबर (माझं ते वय असं होतं की माझ्या दृष्टीने ते महावृक्षच) हे न्याहाळायचे हा माझा छंद. शेजारीच पाण्याचा मोठा हौद होता .त्या पाण्याच्या हौदाच्या काठावर बसून पुस्तक वाचन म्हणजे तर माझ्यासाठी 'अमृतयोग' असे. हे पुस्तक वाचत असतानाच तिथल्या ओट्यावरती खारुताई आणि साळुंक्या बागडत यायच्या. त्यांची जी काही शिवणसाई चाले ती पाहातच माझा अभ्यास व्हायचा. टून टून उड्या मारणारी साळुंकी आणि तिच्या मागे धावणारी खारुताई मोठंच मनोरम दृश्य असे ते.

अंगणामध्ये गुलाबाच्या कुंड्या असायच्या. त्याच्या भोवती चिमण्या चिवचिवत बसायच्या. त्यांना दाणे टाकायचे आणि टिपताना पाहात बसायचे, केवढा तो आनंद! 
अशातच एखादा महाळ्या ( मोठं माकड) झाडावर उडी मारून आलं की मग मात्र आम्हाला पळता भुई थोडी व्हायची. जिन्याच्या दहा पायऱ्या चढताना आम्हाला ब्रह्मांड आठवायचे. कसेबसे घरामध्ये पोहोचून मग दाराच्या फटीतून, खिडकीच्या भोकातून महाळ्याला पाहण्याचा आनंद आम्ही घ्यायचो. "दार उघडू नका गं पोरींनो, येईल महाळया आतमध्ये." हा आईचा आवाज आजही कानामध्ये सहजच उमटतो. मग दुसऱ्या दिवशी ही सगळी गंमत , सुपारी मारुतीच्या दर्शनाला आलेल्या माझ्या दादाला सांगायची आणि तीच गोष्ट पुन्हा जगायची ही गंमत तर खूपच भारी.

..... पिंपळ असा सळसळत राहतो, माझ्या मनामध्ये बालपणापासूनच.
 पिंपळाच झाड कसं 
कुठेही उगवतं 
कुठेही उगवतं म्हणून 
त्याचं कसंही निभावतं 
ही चारोळी कदाचित 'मी माझा' या काव्यसंग्रहातील चंद्रशेखर गोखले यांचीच असावी, ती मला आठवत राहते.
पिंपळाच झाड रस्त्यामध्ये कुठेही दिसलं तरी माझं मन आनंदून जातं. अगदी निराश झालेलं असेल तरीही त्याला एक नवी उभारी येते. मला वाटतं पिंपळाच्या झाडाबरोबर माझं बालपण माझ्या भोवती भिरभिरत असावं. 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असं का म्हणलेलं असावं; हे मला त्या त्या क्षणी कळायला लागतं. (लहानपण आणि बालपण यात फरक आहे हे सुज्ञास सांगणे न लगे) या लहानपणामध्ये बालपणीची निरागसता अनुस्यूत असते. ही निरागसता माझ्याजवळ रेंगाळत राहते. त्यातूनच माझं आयुष्य संज्ञाप्रवाही होत जातं.
पिंपळाच्या झाडावर पडणारं ऊन हे तर माझा अगदी वीक पॉईंट म्हणावं असं. हे ऊन पिंपळाच्या झाडाला सोनेरी करून टाकतं. सीतेला जसा सोनेरी मृगाचा मोह पडला होता ना तसा मला या सोनेरी पिंपळाचा मोह होतो. असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि इतक्यात मला रांजणगावच्या गणपती जवळ महावृक्ष म्हणावा असा सोनेरी पिंपळ दिसला. जीव आनंदून गेला. आणि या आनंदापाठोपाठ तिथल्या गजदर्शनाने मात्र मला आठवण दिली - 
  ऐरावत रत्‍न थोर ।
  त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
या गजदर्शनानं मी पुन्हा भानावर आले. गणपती माझा मित्र जिवाचा ज्याला म्हणती पुत्र शिवाचा या लहानपणच्या ओळी पुन्हा एकदा मनामध्ये रेंगाळायला लागल्या. 
आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळेच सण मोठ्या घरी व्हायचे पण  मुलांना आवडतो म्हणून, मुलांना बरं वाटावं म्हणून आमच्या आईनं आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती बसवायला सुरुवात केली. तेव्हापासून गणपती आमचं सर्वस्व झालं. दहा दिवस 'बाप्पा' आपल्या घरी राहणार या कल्पनेनेच मन हुरळून जायचं. सकाळ संध्याकाळ त्याची होणारी आरती माझ्या मनात आजही पिंगा घालते. मोदकाच्या नैवेद्याभोवती आजही माझं मन फेर धरून नाचतं. हे बाप्पा दहा दिवसांनी आपल्या घरी जायचे तेंव्हा भावूक झालेल्या आईला बघून आम्ही हमसून हमसून रडायचो. तेंव्हापासूनच बाप्पांशी आमचं असं प्रेमाचं नातं. मला अजून एक आठवतं, आमच्या मोठ्या काकांना आम्ही 'बाप्पा' म्हणायचो. ते स्वभावाने अतिशय तापट मात्र 'दिलवर के लिये दिलदार है हम, दुश्मन के लिये तलवार हैं हम' अगदी या वृत्तीचे. ज्या ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेले आहे, त्यांना आजही त्यांचे नाव काढताच आठवतो तो त्यांचा धाक आणि दरारा! 'कर्तृत्व असावे तर असे'.  तर ज्या ज्या अध्यात्मिक गटातून ते वावरले, त्यांना आठवते त्यांची सात्त्विकता. मग मला आपसूकच वाटते 'व्यक्तित्व असावे तर असे'. त्यांच्या या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे अजोड प्रत्यंतर आम्हाला कौटुंबिक जीवनात येत होते ते संपूर्ण परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणा-या धाकातून आणि आदरातून. त्यांच्यासाठी आम्ही वापरत असलेल्या 'बाप्पा' या संबोधनाचे आणि गणपती बाप्पाशी असलेल्या माझ्या नात्याचे काही परस्पर संबंध असतील का याचा माझं संशोधक मन आपसूक विचार करू लागतं. त्याचं उत्तर जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल; एक मात्र मला त्यांच्याकडे पाहून नक्की कळले, 
जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥

आणि कदाचित म्हणूनच माझ्या जीवाला 'लहानपणाचा' सोस असेल. आपण आपल्या आपल्या छोट्याशा जगात सुखी राहावे, असे मला नेहमी वाटते. मात्र आपल्याला जे वाटते ते घडतेच असे मात्र नाही. माझे माझे एक सुंदर जग होते, जिथे मी चिऊताईसारखी बागडत होते, हुंदडत होते, नाचत होते, गात होते. कोणी माझ्याकडे बघते आहे की नाही याच्याशी मला काहीच कर्तव्य नसायचे. कारण मला स्वतःलाच कोणाकडे विनाकारण बघण्याची सवय नाही. मी कामाशिवाय कधी कोणाशी बोलल्याचेही मला आठवत नाही. लोकांना माझी ही सवय हळूहळू 'ताठा' वाटायला लागली. माझ्यादृष्टीने मात्र विनाकारण कोणाच्या कामात नाक खूपसू नये, विनाकारणची औपचारिकता दाखवू नये, उगाचच कोणाचा वेळ घेऊ नये ( मी आमच्या गावाकडे आणि आजोळीही कारणांशिवाय तासन् तास रंगणाऱ्या गप्पा अनुभवलेल्या होत्या. ज्याचे आउटपुट माझ्या दृष्टीने शून्य असायचे.) हे माझे स्वभावपैलू त्यामागे आहेत. त्याचे कोणाला स्पष्टीकरण द्यावे, असेही मला वाटत नाही. 

..... माझ्याकडे माझ्या नकळत कोण बघत होते, आणि कोणाची मला दृष्ट लागली मला माहीत नाही. मात्र दोन वेळा मी अंधाराच्या खोल खाईत ढकलले गेले. माझ्या कुटुंबाच्या साथीने आणि देव कृपेने मी दोन्ही वेळा त्यातून सुखरूप बाहेर पडले. तिसरी वेळ आली तेव्हा आता मी खोल खाईतच गाडली जाणार अशी मला भीती वाटत होती. ...but you are not burried you are planted ही सकारात्मकता कोणीतरी मला दिली आणि संदेश मिळाला 'प्राणवान हो'; संदेशाबरोबरच ठिबक सिंचन झाले. कदाचित मीअंकुरत होते ; वठलेल्या मुळांना कोंब फुटले आणि मन पालवलं. मनाचा तो लुसलूशीत कोवळेपणा मी जपू पाहात होते; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. चिघळत्या परिस्थितीने पालवी कोमेजली नाही ; उलट बहरत गेली. 'प्रवाहाबरोबर वाहावे' हा सर्वमान्य नियम या बहराने मोडीत काढला. मी स्वतंत्र भारताची एक स्वतंत्र नागरिक आहे; माझी मला मते असू शकतात आणि ती मते ठामपणे व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे ; देशप्रेमाच्या या कौटुंबिक वारशाने डोके वर काढले. जणू काही हैदराबाद मुक्तिसंग्रामात लढलेले माझे आजोबा 'विठ्ठलराव देसाई' माझ्यामध्ये संचारले. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार कोणालाही बंडच वाटतो आणि मग येन-केन प्रकारेण परिस्थिती थंड करण्याचा प्रयत्न होतो. साम-दाम-दंड-भेद यांचा मुक्त वापर अशावेळी सर्वत्रच होतो. मात्र ही पेटलेली मशाल कशाचेच विझली नाही. हळूहळू सारे जग विरोधात गेले. या मशालीला वाचवण्याचा प्रयत्न करणारे निकालात निघाले. त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करणारे साक्षीभावात गेले. मात्र मशाल विझली नाही. कारण ती आता माणसाच्या हातात नव्हती तर देवाच्या मनात होती. 'देव तारी, त्याला कोण मारी' याचे प्रत्यंतर सर्वचजण / सर्व जन घेत आहेत.
        देव माणसासारखा नसतो. तो आयतं काहीतरी तयार करून माणसाच्या हाती देत नाही. तो माणसालाच 'तयार' करतो. म्हणून तर तो विज्ञान - तंत्रज्ञानाच्या पल्याड आहे. अनादी - अनंत आहे. सर्वज्ञ आणि अगम्य आहे. त्याचे यथार्थ वर्णन केवळ 'नेती' हा एकमेव शब्द करू शकतो. त्याचे शास्त्र फार निराळे आहे. माणसाने त्याच्या शास्त्राचे शस्त्र केले की तो अस्त्र काढतो - ज्ञानास्त्र ! ज्याच्यापुढे माहितीचे जग पुठ्ठ्याच्या बंगल्यासारखे क्षणार्धात कोसळते. अशावेळी माझा कोवळा पिंपळ प्रगल्भ होतो. बोधी वृक्षाखाली बसलेले गौतम बुद्ध मला आठवतात.  स्वधर्माकडे नेणारी संत-महंतांची शिकवण एकच आहे आणि कर्मयोग  साधणारा 'स्वधर्म'च ईश्वर आहे; हे मला पटते आणि आठवतात संत तुकारामांच्या अभंगाच्या राहिलेल्या ओव्या -

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥

आणि गोष्टीवेल्हाळ मुलीसारखी मी माझे 'लव्हाळपण' जपत राहते. वाटेतला भर माध्यान्हीचा सोनेरी पिंपळ अंगभर सळसळतो!

वृंदा आशय 

श्रीकृष्णार्पणमस्तु!




अश्वत्थाची सळसळ !

  वर विठ्ठल खाली कृष्ण; जे सोडवतील माझा कूटप्रश्न !         ‌‌.                 •|ॐ |•                       अश्वत्थाची सळसळ  माझं बालपण गेल...