Monday, 9 May 2022

वारसा अक्षय्य ज्ञानाचा ! -- पुनरुत्थान विद्यापीठ ज्ञानसागर महाप्रकल्प


वारसा अक्षय्य ज्ञानाचा !



     नुकतीच अक्षय्य तृतीया होऊन गेली. या सणाच्या निमित्ताने अनेक गोष्टी, परंपरा, संदर्भ  मनामध्ये तरळून गेले. माहीत असलेल्या काहींचा उजाळा झाला आणि काही पुन्हा नव्याने कळले. खरोखर हा मुहूर्त ज्ञानाचा, धनाचा, दानाचा ! आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे, अशाच ज्ञानाचा अक्षय्य वारसा लाभलेल्या पुनरुत्थान विद्यापीठाच्या 'ज्ञानसागर महाप्रकल्पाची'.

अहमदाबाद येथील पुनरूत्थान विद्यापीठात ज्यांचं बोट धरून मी गेले त्या गुरुवर्य कै. ल.का. मोहरीर गुरुजींच्या स्मृतीला मी प्रारंभी विनम्र अभिवादन करते. शासकीय अध्यापक महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या संस्कृततज्ज्ञ मोहरीर सरांचा निवृत्तीचा समारंभ मला आजही जसाच्या तसा आठवतो. निवृत्त होताना सर म्हणाले होते --

''मी बी. एड. मध्ये शिक्षणाची जी पंचपदी ३३ वर्षे शिकवत आलेलो आहे;  इथून पुढे ३३ वर्षे पुनरुत्थान विद्यापीठाचे कार्य केल्याशिवाय ते पाप धुवून निघणार नाही." सरांच्या या विधानानं मी अचंबित झाले होते. कारण शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना जे असमाधान मला स्वतःला सातत्यानं कुठेतरी जाणवत राहतं, खटकत राहातं त्या असमाधानाचा परिस्फोट या विधानातून मला जाणवला होता. ज्या माणसानं आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे, तन्मयतेने, एकनिष्ठेनेसर्वस्व अर्पण करून ज्ञानाची उपासना केली आणि विद्यार्थ्यांकडून करवून घेतली त्या माणसाच्या वाट्याला निवृत्तीच्या शेवटी अशा प्रकारचे असमाधान काय म्हणून यावे? या शिक्षणक्षेत्राच्याच  पाऊलवाटेने मी जात होते आणि अंतिमतः पोहचणार अशा असमाधानापाशी ! या कल्पनेनेच कदाचित पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला असावा; आणि त्या भीतीतून,  उत्सुकतेतून,  कुतूहलातून, जिज्ञासेतून पुनरुत्थान विद्यापीठाकडे माझी पावलं वळली असावीत. निवृत्तीनंतर निवांत राहायचं सोडून पुन्हा एकदा नव्यानं, सर्वस्व झोकून देऊन सरांना कार्य करण्याची प्रेरणा मिळावी असं या विद्यापीठात काय आहे ?

२०१८-१९ हे वर्ष माझ्यासाठी खरंच सुरेख होतं. आयुष्याला एक नवीन वळण देणारं होतं. माझी दृष्टी पालटणारं आणि माझ्या सभोवतालची सृष्टी बहरून टाकणारं होतं. एकामागून एक या विद्यापीठाचे तीन ‘ज्ञानसाधना वर्ग’ केले. या ज्ञानसाधना वर्गांनी खऱ्या अर्थाने मला माझ्या देशाची,  माझ्या भारताची,  भारतीय संस्कृतीची, या संस्कृतीतल्या ठेव्याची,  रंपरेची ज्ञानाची,  जीवनमूल्यांची ओळख करून दिली आणि आपल्या मुळांचं हे भान येऊन माझं आयुष्य नव्याने बहरत गेलं. साक्षात देवी सरस्वतीची कृपा लाभलेल्या ‘इंदूताईं’च्या वाणीतून हे ज्ञान ग्रहण करणं म्हणजे नव्या आयुष्यासाठी असं शिंपण होतं, ज्यानं माझ्या मातृभूमीतली माझी मुळं घट्ट केली. खरं तर नेहमीच्या शिक्षण प्रवाहातून माझी पीएच.डी. झालेली होती,  एक तपापासून ‘सरस्वती भुवन’ सारख्या मूल्यनिष्ठ संस्थेमध्ये  अध्यापनाचे कार्य निष्ठेने करत होते; पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने बहाल केलेली माझी त्रिशंकू अवस्था संपत नव्हती. त्याची जी काही काजळी मनावर चढलेली होती, ती काजळी दूर केली पुनरुत्थान विद्यापीठाच्या ज्ञानदीपाने ! अंतरीचा दिवा लागला आणि दिव्य जीवनाचा मार्ग गवसला. (बारावीच्या पाँडिचेरीच्या कँपने मला 'श्रीअरविंद' यांचे वेड लागले होते. ते श्रीअरविंद भारतीय संस्कृतीकडे परतून आल्यावर, चमत्कार वाटावा इतके परिवर्तित, रूपांतरित का, कसे झाले त्याचे उत्तर  देखील मला या मार्गाने समजावून सांगितलं.)

ज्या दिव्याच्या प्रकाशात मी आंतरिक सुख-समाधान  अनुभवत आहे; त्या प्रकाशाची ओळख माझ्या वाचकांना करून देणे हे मी माझं कर्तव्य समजते, म्हणून हा सारा प्रपंच. त्याला निमित्त आहे इंदूताईंचे औरंगाबाद शहरात होऊ घातलेलं आगमन. 'ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या' कार्याचा भाग म्हणून दिनांक १० आणि ११ मे रोजी इंदूताई औरंगाबाद शहरात येत आहेत.

काय आहे हा ज्ञानसागर महाप्रकल्प?

राष्ट्रभाषा हिंदीमधून साकारला जाणारा हा आहे १०५१ ग्रंथांचा संकल्प जो भारतीय दृष्टिकोनातून सृष्टी, समष्टी समजावून घेतो. भारताच्या वैभवशाली भूतकाळाचा शोध घेत, वर्तमानाची मीमांसा करत, विश्वकल्याणकारी भविष्याचा घेतला गेलेला हा वेध म्हणजे हा ज्ञानसागर महाप्रकल्प. संपूर्ण भारतातून अभ्यासकानी, तज्ज्ञानी, विशेषज्ञानी निरलसपणाने आपल्या विद्वत्तेचे दिलेले योगदान म्हणजे ज्ञानसागर महाप्रकल्प! जो केवळ आम्हालाच नव्हे तर अवघ्या मानव जातीच्या भावी पिढ्याना आंतरिक समाधानाचा, शाश्वत वैभवाचा राजमार्ग दाखवू शकेल, तो आहे ज्ञानसागर महाप्रकल्प!

‘ज्ञान’, ‘कर्म’ आणि ‘भक्ती’ हे शब्द आणि संकल्पना भारतीय माणसाच्या मनी-मानसी रुजलेल्या आहेत. निष्ठेने केलेले ज्ञानयुक्त कर्म हा आमच्या जीवनाचा गाभा आहे. आध्यात्मिकता हा भारतीय जीवनाचा मूलभूत पाया, त्यातूनच उत्तरोत्तर दृढ होत जातो; आमच्या दैनंदिन जीवनातून आपसूक प्रतिबिंबित होतो. औपचारिक व अनौपचारिक ज्ञानाची एक विशाल, समृद्ध परंपरा भारताला लाभलेली आहे. ही परंपरा कवेत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानसागर महाप्रकल्प! मूलभूत तत्त्वज्ञानाचा वेध घेत, त्यामागचे शास्त्र स्पष्ट करत हे शास्त्र दैनंदिन जीवनात ज्ञानयुक्त निष्ठेने, श्रद्धापूर्वक अंत:करणाने आचरणात कसे आणावे, याचे स्वच्छ आणि स्पष्ट दिशादर्शन म्हणजे ज्ञानसागर महाप्रकल्प.

पाच वर्षांच्या बालकापासून संशोधनात रममाण होणाऱ्या अभ्यासकांपर्यंत प्रत्येकाला आपल्यासाठीचे एक जहाज या ज्ञानसागरात गवसते. ज्याच्या आधारे आपण कृतार्थतेने भवसागर पार करू शकतो. मग वाट कसली पाहता आहात, खालील लिंकला क्लिक करून आपले जहाज, आपली पुस्तके, आपला मार्ग शोधून घ्या.

https://drive.google.com/file/d/1G_O4xOacPZM052utPeNRoMMTzzKELw0V/view?usp=drivesdk

( वर दिलेली लिंक पुनरुत्थान विद्यापीठाच्या ज्ञानसागर महाप्रकल्प ग्रंथसूचीची आहे.१०५१ ग्रंथांची यादी इथे आपल्याला मिळेल.)

 

संत ज्ञानदेवांनी, ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’ हा स्पष्ट आदेश १२ व्या शतकात दिला. तर १६ व्या शतकात

         जितुका भोळा भाव | तितुका अज्ञानाचा स्वभाव ||
              अज्ञाने तरी देवाधिदेव | पाविजेल कैचा ||


असा समर्थ रामदासांनी इशारा दिला आणि १९ व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी, “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली ...हे सांगत एवढे सारे अनर्थ, एका अविद्येने केले” हा निष्कर्ष दिला. ‘नॉलेज बेस्ड सोसायटी’कडे वाटचाल करणारा आमचा समाज यातलं मर्म समजून घेणार की नाही?

अकबर – बिरबलची प्रामाणिकपणाची परीक्षा पाहणारी, दुधाचा हौद भरण्यासाठी दवंडी पिटवणारी आणि शेवटी हौदभर पाणीच दिसणारी  गोष्ट सर्वपरिचित आहे. त्या गोष्टीतली सर्व कर्तव्ये पूर्ण करून, प्रामाणिकपणे चिमणी वाटीभर दूध टाकणारी म्हातारी मला अनुकरणीय व दिशादर्शक वाटते. राजदंडाच्या धाकापेक्षा अंतरीची सादच माणसाला माणूस राहू देते, उन्नत होण्याचा मार्ग दाखवते, हे त्रिकालाबाधित निर्विवाद सत्य आहे. प्रत्येक काळाने सामान्य माणसाकडून प्रामाणिकपणे टाकलेल्या त्या चिमण्या वाटीभर दुधाचीच अपेक्षा केलेली आहे. या ज्ञानसागर महाप्रकल्पात आपली चिमणी वाटी रिती करुयात, वाचक म्हणून आपले योगदान देऊयात, ज्ञानस्वरूप सागराचा थेंब होण्याची धन्यता मिळवूयात.

वाचकहो, शेवटी एकच नम्र आवाहन करते -  

घडावे सत्पात्री दान
राखावा ज्ञानाचा मान,
जे करे निर्मोही निष्पक्ष
का त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ?

लक्ष्मीने पायघड्या घालून सरस्वतीचे स्वागत केलं पाहिजे !

                                        वृंदा आशय

 

 

 

2 comments:

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...