काल मी आणि माझी लेक मिस्टर डी. आय. वाय. या छोट्याशा
मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो. निमित्त होतं जवळ आलेल्या राखी पौर्णिमेचं! खरं सांगायचं ना तर आमच्या खरेदीला कोणतेही निमित्त नेहमीच
पुरतं. एखादा सण आला म्हणलं, की बाकी तयारी करण्याच्या ऐवजी, काय खरेदी करता
येईल हे पाहण्यात तिचा माझा दोघींचाही सेम इंट्रेस्ट असल्यामुळे आमच्या
दोघींचं फार छान जमतं. तर राखी पौर्णिमे निमित्तानं याच्यासाठी, त्याच्यासाठी असं करत करत छोटी मोठी खरेदी
झाली. आणि अर्थातच स्वतःसाठी ही चार गोष्टी नकळत घेतल्या गेल्या. खरेदीचा आनंद, दुसरं काय?
पण मला तुम्हाला
सांगायचंय ते दुसरंच काहीतरी. काय गंमत झाली
माहिती आहे का, ज्या वेळेला त्या तिकीट काउंटर वर मी पैसे देण्यासाठी
म्हणून थांबले; माझ्या पुढे दोन मुलं उभे होते. पोरगेलेश्या वयातले. त्यांच्या
हातातली खरेदी त्यांनी दुकानदाराकडे बिलासाठी दिली. हिशोब झाला. १४९ रुपयांची ती खरेदी. आणि खरेदी तरी
काय होती माहिती आहे, ८-१० छोट्या
कानातल्यांचं एक सुंदर पाकीट. एक मोठे कानातले. पण त्याहीपेक्षा मला मनमोहक आणि अनमोल वाटला तो
त्यांच्या चेहऱ्यावरचा अवर्णनीय आनंद! खरोखर कितीही प्रयत्न केला तरी मी त्याला
शब्दात पकडू शकत नाहीये. मी त्यांचा फोटो
काढला नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही हावभाव माझ्या मनामध्ये रेखाटले गेले
ना ते मात्र कोणालाही पुसता येणार नाहीत. अगदी फोनवर दाखवून दाखवून तिला काय आवडेल, तिला काय छान
वाटेल असं बोलत झालेली ही खरेदी हळूच मी डोळ्यांनी पाहिलेली होती. मग ती कदाचित
बहिणीसाठी असेल किंवा मैत्रिणीसाठी !
तो प्रसंग पाहिला आणि मनामध्ये आलं ‘प्रेम’ ही किती सुरेख
कल्पना आहे! या प्रेमावरच प्रेम करावं वाटलं मला आणि आले तुम्हाला भेटायला. मित्र
मैत्रिणींनो, माणसाचं आयुष्य सुंदर
करणारं जर काही असेल तर ते आहे प्रेम. निखळ, निरागस, सुंदर प्रेम ! प्रेमाची किती रूपं आपण
पाहतो. देवाच्या कृपेतून, आजी-आजोबांच्या मायेतून, आईच्या वात्सल्यातून, बहिणीच्या काळजीतून, बाबांच्या धाकातून, भावाच्या
हक्कातून, मैत्रीच्या संवेदनेतून, सहकाऱ्यांच्या सहकार्यातून, सुख-दु:खाला होणाऱ्या नातेवाईकंच्या
भेटीतून पाझरत असतं ते प्रेम, जाणवत असतं ते प्रेम. वेदना दूर करणारी संवेदना म्हणजे प्रेम. पण मजा काय आहे माहिती आहे का, आज-काल व्यावहारिक जीवनामध्ये आपण हे प्रेम नाकारायला शिकलो
आहोत. त्याचे फार मोठे पडसाद आपल्या कौटुंबिक जीवनात आणि समाज जीवनात उमटत आहेत.
का ते माहीत नाही, पण अशी काहीतरी
परिस्थिती झालेली आहे की आपल्याला प्रेम करणं हा गुन्हा वाटायला लागलाय. प्रेम करणं
वेडेपणा वाटायला लागलाय. ‘कोरडी माया’ असे म्हणून आपण या प्रेमाची उपेक्षा करायला
शिकलो आहोत. आपल्याला काय करायचं; त्याचं तो बघेल या वृत्तीतून स्वत:ला संकुचित
करायला शिकलो आहोत. शिवाय दुर्दैवाने ‘हनी ट्रॅप’, ‘लव्ह जिहाद’ या प्रकारातून
प्रेमाच्या नावाखाली जे काही घडत आहे, ते सामान्य माणसात भय निर्माण करणारं आहे. राजकीय लोकांच्या आणि धोरणांच्या या बाबी फिक्या
ठराव्यात अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या जोरावर आर्थिक फायद्यांसाठी प्रेमाच्या
नावाखाली सामान्य माणूसच एकमेकांची फसवणूक करत आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात
भक्तीच्या नावाखाली प्रेमाला तर धादांत खोटं ठरवण्यात आलेलं
आहे. मला प्रश्न पडतो प्रेमाचा वापर जर असा शिकारीसाठी होत असेल तर सामान्य माणूस
भयभीत होणार नाही का?
मी लहान असताना अनेक कवितांमधून मला प्रेम भेटत गेलं. ते आठवलं की जीव अक्षरशः उत्कटतेने भारून जातो. काय सुरेख कविता
होत्या त्या!
त्यातल्या काही ओळी सतत कानामानात गुंजत राहतात. प्रेमाचे भाव मनात पेरत राहतात. ‘स्वामी तिन्ही
जगाचा आईविना भिकारी’, ‘प्रेम म्हणजे काय
असतं, तुमचं आमचं सेम असतं’, ‘प्रेम कुणावरही करावं’, ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा’ प्रेमाच्या या कविता माझ्या
मनामध्ये फेर धरून नाचत राहतात.
प्रेम मला कधीच गुन्हा वाटत नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये ईश्वराचे प्रेमही
मोठ्या भक्तिभावाने वर्णिले गेले आहे. राधा–कृष्ण, राम-सीता, शिव-पार्वती, विठ्ठल-रुख्माई या सगळ्यांमध्ये प्रेमाची
उदात्त जाणीव परिणत झालेली दिसते. हे प्रेम आमच्या संत साहित्याने, पंत साहित्याने
वर्णन केलेले आहे. आमच्या समोर उलगडून दाखवलेले आहे. आणि तुमच्या
आमच्या सामान्य माणसामधलं प्रेम व्यक्त करण्याचं काम केलंय तंत साहित्याने. त्यामुळेच त्याला ‘मराठी काव्याची
प्रभात’ म्हणून ओळखलं जातं. पोवाडे आणि लावणी गाणारा महाराष्ट्र ‘रगेल’ आणि ‘रंगेल’ म्हणून ओळखला गेला. पण खरं सांगू
मित्रांनो, आज आपण हे दोन्ही हरवत चाललोय. आमचं रगेलपण गुंडगिरीच्या
पातळीवर चाललंय आणि आमचं रंगेलपण बीभत्सतेच्या पातळीवर चालले आहे.
त्यामुळे आम्ही प्रेमालाच
गुन्हेगार मानायला लागलेलो आहोत.
आपण थोडं थांबलं पाहिजे. विचार केला पाहिजे. एखादी कळी उमलून
यावी तसं मनामध्ये प्रेम उमलून येत असतं. बाळाच्या निरागसपणामध्ये आम्हाला प्रेम सापडतं, दोन पिढ्यांना
जोडणारा नाजूक धागा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. प्रेमातूनच जन्माला
आलेलो हे नि:सीम प्रेम आपल्याला प्रेमाने बांधून ठेवत असतं. ज्या वेळेला
कुसुमाग्रज सांगतात, ‘प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं; मातीमध्ये उगवून
सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं’ तेव्हा वाटायला लागतं हो यांनीच दाखवली
प्रेमातली निश्चितता आणि झेपही. ज्या वेळेला ‘पृथ्वीचे
प्रेमगीत’ ते गायला लागतात, त्या वेळेला लक्षात
यायला लागतं प्रेमाचे उदात्त, त्यागी, विरही पण
सामर्थ्यशाली असं रूप त्यांनी व्यक्त केलेले आहे. ‘नको
क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे’ असे सूर्याला
उद्देशून म्हणणारी पृथ्वी आम्हाला विरहातलं सौंदर्य आणि आत्मबळातील तेज दाखवणारी असते. आमचे बालकवी जेव्हा ‘फुलराणी’
मधून कळीचा आणि सूर्याचा विवाह लावतात ना, तेव्हा कोमलतेचं आणि दाहकतेचं हे मिलन काव्याला आणि
प्रेमाला अजरामर करून जातं.
काव्य ही एक ताकद आहे माणसाच्या
मनामध्ये प्रेम निर्माण करणारी. प्रेम परस्परांबद्दल, समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल आणि मानवतेबद्दल. ‘प्रेमात पडणे’
हा वाक्प्रचार आपल्याला ठाऊक आहे, पण प्रेमात पडून माणूस
जेव्हा उभा राहतो ना ते खरं प्रेम असतं. अहो, आपल्या प्रेमाची
व्यापकता आपल्याला पशु-पक्ष्यांवर, वृक्ष-वेलींवर इतकंच काय वस्तुजातावरही प्रेम करायला शिकवते. ‘सगुण-निर्गुण एकू गोविंदू रे’ ही
आमची धारणा आहे. ‘चराचर’ आम्हाला प्रेममय वाटतं ते त्यामुळेच.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, याचा शोध घेणारे माणसं आपल्याला सतत आजूबाजूला आढळतात. मर्सिडीज मधून
हिंडणारे ज्या वेळेला चुलीवरच्या भाकरीचा खमंग वास नाकात भरून घेतात आणि वेळात वेळ
काढून तिची चव पाहायला एखाद्या खेड्याच्या ठिकाणी थांबतात ना, तेव्हा कळतं, हो प्रेम ते हेच
असतं; आपल्या जुन्या आठवणींशी जोडणारं, आपल्या जीवनाशी, आपल्या मातीशी नाळ सांगणारं, आपली नाती जोपासणारं, मला स्वतःला ‘मी’ च्या पलीकडे
नेणारं, मला कोणाची तरी काळजी घ्यायला लावणारं, मला स्वतःला काय आवडतं याच्यापेक्षा, त्याला-तिला काय आवडतं
हे पाहणारे प्रेम माणसाला मोठं करतं.
घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या आणि
राष्ट्राच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून घेणारे जे कार्यकर्ते, समाजसेवक आहेत त्यांचा ‘मी’ विस्तारलेला
असतो. त्यामुळे आपण इतरांसाठी काही करतो आहोत अशी आढ्यतेची जाणीवपूर्वकता, परतफेडीची
अपेक्षा त्यांच्या आसपासही फिरकत नाही. ते अनुभवत असतात प्रेमातली निरंतरता आणि त्यातून अंतरी झरणारे अमृताचे झरे. करण त्यांना
उमजलेलं असतं, ‘प्रेम आहे माणसाच्या
संस्कृतीचा सारांश!’
मित्र-मैत्रिणींनो, प्रेमाने आयुष्यात सारे
होकार-नकार पचवण्याची ताकद द्यावी. पूर्णतेसारखंच सौंदर्य अपूर्णतेतही आहे, याची जाणीव विकसित करावी. इच्छापूर्ती म्हणजे
प्रेम नसतं. प्रेमाचा प्रवास
ओढीपासून सुरु होतो ते कारुण्यापर्यंत पोहोचतो. त्यात आपण कुठे बसतो हे सजगपणे
समजावून घ्यावे. उगाचच प्रेमाला बदनाम करू नये. प्रेम एक ऊर्जास्त्रोत आहे जगण्याचा आणि जागवण्याचा, त्याला जोपासूयात!
वृंदा आशय

खूप छान लेख..प्रेमाची खरी परिभाषा सांगितली आपण..👌🌿
ReplyDeleteआपण आवर्जून नियमित वाचता आणि प्रतिक्रिया देतात. धन्यवाद.
Deleteखूप सुंदर, खरच आहे..!
ReplyDeleteप्रेमात स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या इच्छा जपल्या गेल्या पाहिजे..!
आयुष्यात येणारे छोटे छोटे क्षण सहजगत्या अभ्यासून सरळ सोप्या भाषेत त्याचे विवेचन करण्याची कला खूप छान जमली आहे.....प्रेमाची विस्तृत परिभाषा सुंदर ....
ReplyDelete