Wednesday, 3 June 2026

वक्त तो लगता है !

 वक्त तो लगता है !

(शुभमंगल सावधान!)

https://youtu.be/NTRPBuOa2yk?si=FhuC8LNXZTjNkQwC


            परवा मी आणि आशय चहा पिता पिता गप्पा मारत बसलो होतो. सहजच एक ज्वलंत विषय निघाला. आज काल उशिरा होणारी लग्नं आणि त्यामुळे निर्माण होणारे असंख्य प्रश्नं. आमच्या भावा बहिणींची मुलं - मुली  लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र अनेकविध कारणांनी अद्याप होकाराचे माप काही ओलांडले गेले नाही. त्यामुळे उत्सुकतेचा असलेला 'लग्न' हा विषय आता 'चिंते'ची बाब बनलेला आहे. त्यात आमच्या दोघांचं लग्न पंचविशीत झालेले असल्यामुळे आपल्याला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, असे आमचे प्रांजळ मत आहे‌. मग एकमेकांशी चर्चा करताना अनेक मुद्दे निघाले. मी या विषयावर लिहिले पाहिजे, असं आशयचे स्पष्ट मत. अर्थात मलाही ते मान्य होतेच. आज मुहूर्त (खरं म्हणजे मूड हाच माझ्या लेखनाचा मुहूर्त) लागला तेव्हा मनाला म्हटलं, "चला तुमच्या सगळ्यांपर्यंत हा विषय पोहोचवावा." 

           हल्ली लग्नं उशिरा का होतात याला अनंत कारणं आहेत. आम्हाला मात्र महत्त्वाचा मुद्दा वाटला तो हा, 'लग्न उशिरा व्हावीत का?' एकमताने याचे उत्तर 'नाही' असंच आलं. कारण लग्नासाठी 'वय' हा घटक जितका महत्त्वाचा आहे ; तितके अन्य घटक आम्हाला क्वचितच महत्त्वाचे वाटतात. कायद्याने विवाहाच्या ज्या वयाला मान्यता दिलेली आहे,  म्हणजेच मुलं-मुली सज्ञान झाल्यानंतर त्यांचा 'विवाह करणे' हा पहिला प्राधान्यक्रम असला पाहिजे. शरीराची पूर्ण वाढ झालेली असणे, मानसिक दृष्ट्या विवाहोत्सुक असणे, स्वतःचा साथीदार निवडण्याची क्षमता आलेली असणे, किमान आपल्या दोघांचा भार घरच्यांवर पडणार नाही , इतके तरी दोघांनीही  आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे नितांत आवश्यक आहे. इतके असेल आणि मनाच्या तारा जुळत असतील, एकमेकांचे विचार पटत असतील तर बिनधास्तपणे 'होकाराचे माप' ओलांडून गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. (मनाच्या तारा जुळणे याचा अर्थ चित्रपटात दाखवतात तसे हृदयात ' घंटी वाजणे', 'टिंग / ट्रिंग' वगैरे होणे नसते. आपण आपल्या मनाशी बोललो तर त्याचा खरा अर्थ आपल्याला निश्चित कळतो.)

         आता साहजिकच कोणालाही वाटेल,"बाई गं , अजून तुझ्या मुलांच्या लग्नाची वेळ आली नाही ना म्हणून तुला हे सगळे इतके बाळबोध वाटते आहे." तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. आज काल लग्न ठरणे आणि करणे इतके सोपे मुळीच राहिलेले नाही. आमच्या बाजारू जीवनशैलीने विवाहाला सुद्धा बाजारातच उभे केलेले आहे. तिथे कधी प्रतिष्ठा, कधी हुंडा, कधी शेतीवाडी, कधी करियर, कधी रंग - ढंग, कधी न जुळणाऱ्या पत्रिका, कधी न जुळणारे स्वभाव , कधी आडमुठी ठरणारी माणसे,  तर कधी आणखीन काही , आणखीन काही अशा अनंत अडचणी असतात. माझ्या सासूबाई वधू - वर मंडळ चालवत होत्या, त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर संवाद करताना या प्रश्नांच्या अनेक पैलूंची माझी ओळख झालेली आहे. शिवाय काळाचा महिमा म्हणून सांगते, 'वेल सेटल्ड' असलेल्या  मुला मुलींची पटकन लग्नं होतात का, तर त्याचंही उत्तर 'नाही' असेच आहे. शिवाय जेव्हा होतात त्यानंतर किती काळ टिकतात, हा तर केवळ प्रश्न न राहता एक गहन समस्या होत चाललेली आहे. 

         मग या सगळ्याची 'मेख' नक्की कुठे आहे? भाई ये 'दिल का मामला है', याचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे. खरं म्हणजे आपल्या समाजातली पूर्वीची विवाहाची पद्धत पाहिली तर आपल्याला लक्षात येते अगदी गरोदर असलेल्या बाईच्या पोटाला कुंकू लावून, "तुम्हाला जर मुलगी झाली तर ती आमची सून होईल", अशा पद्धतीने लग्न ठरत होती. शब्द दिले घेतले जात होते आणि जीवाच्या आकांताने पाळले जात होते. ती पद्धत योग्य होती असे माझे मत मुळीच नाही. त्यानंतर इतक्या कोवळ्या वयात लग्न ठरत होती की, 'लग्न म्हणजे काय' हे सुद्धा वधूवरांना कळत नव्हते.  उत्सुकतेपोटी, "आई माझ्या लग्नाला तू मला नेणार का?", अशा प्रकारचे बालीश प्रश्न आपसूक विचारले जात होते. हे देखील विवाहाच्या दृष्टीने वाईटच. फार हळूहळू , कुर्मगतीने आपण बदलत गेलो. विवाह मोठ्यांनी परस्पर ठरवावे इथपासून मीच माझे लग्न ठरवणार, मला माझा जोडीदार पसंत पडला नाही तर मी कोणाचेही ऐकणार नाही, अशा ठाम मतांपर्यंत आजची पिढी येऊन पोहोचलेली आहे. आनंद आहे. 

         आजची युवा पिढी विवाहाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकणारी, स्वतःच्या पैशाने लग्न करू शकणारी अशी निश्चितच आहे. मात्र घेतलेला निर्णय 'निभवायचा' असतो, याबाबतीत मात्र ती खूप कमी पडते. नाही पटलं की दिलं सोडून, आम्ही कुढत का जगावं? हा अत्यंत रास्त असा प्रश्न ही पिढी विचारते आहे. प्रश्न विचारण्याची सवय नसलेली पिढी त्यामुळे गोंधळून जाते. उगाच आपल्यावर ठपका नको म्हणून 'तुम्ही पसंत करा, आम्ही लावून देतो' अशी त्रयस्थाची भूमिका पालक देखील आता घ्यायला लागलेले आहेत. ज्यांना परस्पर लग्न ठरवता येत नाहीत, जे प्रेमात वगैरे पडू शकत नाहीत ते हतबल झालेले आहेत. त्या पाठीमागे आज असलेली एक फार मोठी 'सामाजिक असुरक्षितता' हे वास्तव आहे. पैसे घेऊन खोटं खोटं लग्न करून फसवायचं आणि चार दिवसात निघून जायचं, शिवाय कायद्यांचा धाक दाखवायचा यामुळे आता हळूहळू लग्न हा चिंतेचा झालेला विषय 'धाकाचा' , 'दहशती'चा होत चाललेला आहे. अगदी स्वाभाविकरीत्या हे दुखणं विकत घेण्यापेक्षा एकटं जगलेलं काय वाईट, म्हणून लग्नं टाळली जात आहेत. 'लिव्ह इन रिलेशनशिप',  'कॉन्ट्रॅक्ट बेस' याचा आधार घेत शरीर मनाच्या तात्पुरत्या गरजा भागवल्या जात आहेत. त्यामुळे 'आपलं बरं चाललंय' असे युवा पिढीला सध्या तरी वाटते आहे. याचे दुष्परिणाम किती मोठे आहेत याचा मात्र त्यांना खरोखर अंदाज नाही. कारण 'जावे त्याच्या वंशा' हे काही खोटे नाही. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' हे 'सामाजिक शहाणपण' आता कधीच मागे पडलेले आहे. त्याचे नाही जमत तर आपली तरी पोळी भाजून घ्यावी, ही प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. स्वतःच्या मुला-मुलींची लग्नं झाली की ही काही 'सामाजिक समस्या' आहे, याचे आमचे भानही संपून जाते. स्वतः दुष्परिणाम अनुभवल्यावरच कळत आहेत आणि मग पश्चात्तापाशिवाय हातामध्ये दुसरे काहीही शिल्लक राहात नाही. 

            गरज आहे ती मुलांना लग्नामध्ये 'वय' महत्त्वाचे आहे ही जाणीव करून देण्याची. शिवाय 'लग्नाचे वय' आणि 'सेटलमेंटचे वय' यात अंतर असते. खस्ता खाव्या लागतात, तडजोडी कराव्या लागतात आणि मग त्यातून तावून सुलाखून निघाले की 'संसार बहरतो' हे वास्तव स्वीकारले गेलेच पाहिजे. अगदी सगळा काही राजमहाल तयार असेल आणि मी फक्त 'राणी' म्हणून तिथे जाण्याचा अवकाश आहे, अशी भूमिका, समज अत्यंत चुकीचा आहे. तसेच मुलाच्या बाजूने सुद्धा आपण घरात बायको आणली म्हणजे 'सगळ्या घरकामांसाठी एक हक्काची बाई आणली' , 'आई-वडिलांची सेवा तिनेच करावी' , 'मी कमावतो, तिने कमवायची काय गरज?' असल्या पारंपरिक पुरुषी विचारांना फाटा देणे गरजेचे आहे. 

     भाई 'दिल का मामला है', एकमेकांना समजून घ्यावे लागेल. सहवासाने प्रेम वाढते ते केवळ शारीरिक पातळीवर नाही, तर विश्वासाच्या आणि समंजसपणाच्या पातळीवर वाढले पाहिजे. मग एकमेकांसाठी 'त्याग करा' असे सांगावे लागत नाही. तो आपोआप घडतो. अगदी जुना गृहस्थाश्रम काढून त्यातली कर्तव्ये वगैरे जर आपण आजच्या पिढीला दाखवायला लागलो, तर ती आपल्याला गुंडाळून ठेवेलच ; यात त्यांचे काही चुकते असेही नाही. कारण आजच्या काळाने त्यांच्यासमोर उभी केलेली आव्हाने फार निराळी आहेत. ही आव्हाने सांभाळत त्यांना कुटुंब व्यवस्था सांभाळायची आहे. 'आम्ही तुमच्या सोबत आहोत', 'जिथे कमी तिथे आम्ही', 'स्वातंत्र्य घ्या पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक लक्षात ठेवा' अशा प्रकारची वैचारिक, अनुभवी साथ जर या पिढीला मिळत गेली तर ती विश्वासाने संसार करेल, निभावेल आणि बहरेल. 

          संसार - सुख हे वस्तूंमध्ये नसते, रेडीमेड संसारापेक्षा चमचा-चमचा, वाटी-वाटी जमा करून आपला स्वतःचा संसार आपण उभा केला तर त्याची किंमत अधिक असते. त्यामुळे गाडी बंगला आहे का, शेतीवाडी आहे का, यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत जोडीदारासोबत उभे राहण्याची 'क्षमता' आणि 'मानसिकता' आहे का, हे तपासले गेले पाहिजे. सुयोग्य वयात तसे 'संस्कार' दिले गेले पाहिजेत. ते कोणत्याही कोर्समधून मिळत नसतात. तर घरातल्या आपल्या दैनंदिन जीवनातून, वागणुकीतून, मतमतांतरातून आणि निर्णयातून ते रुजवले जात असतात. जे रुजते ते आपसूक उगवते. त्याची वेगळी चिंता करावी लागत नाही. 

          तू सासरी गेल्यावर तुला काही त्रास झाला तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा सकारात्मक विश्वास निश्चित दिलाच पाहिजे. मात्र त्यामुळे 'त्रास म्हणजे काय' हे कळत नसेल किंवा 'माझ्या मनाविरुद्ध म्हणजे त्रास' असे वाटत असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नको तिथे आधार देऊन आपण आपल्या मुला मुलींना पंगू तर करत नाहीत ना, याचे परीक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. पैशांच्या मागे लागून 'सात पिढ्या बसून खातील' इतके कमावण्यापेक्षा, आमच्या हातातली पिढी आम्ही गमावणार नाही इतके जरी करता आले तरी पुरेसे आहे. कारण अनुकरणाने हेच ते पुढे करत जातील आणि नंदादीप तेवत राहील.


वृंदा आशय

श्रीहरिहरेश्वरार्पणमस्तु!

No comments:

Post a Comment

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...