Sunday, 6 July 2025

आम्हा घरी धन...


 वारकऱ्यांच्या ‘ग्यानबा-तुकाराम’ या जपाने महाराष्ट्राचा कानाकोपरा फुलून येतो. मराठी माणसाच्या मनात पेरलेले आणि रक्तात भिनलेले ‘ज्ञानबा- तुकाराम’ दुथडी भरून वाहतात. सारा आसमंत चैतन्यानं भारून टाकत तना-मनाला पवित्र करतात. शतकानुशतकं संत साहित्याचे संस्कार माणसाला आकाशाची उंची आणि समुद्राची अथांगता बहाल करत आलेले आहेत. महाराष्ट्राच्या त्या आराध्यदैवतासमोर , कृपावंत दयाळू विठ्ठलासमोर नतमस्तक होते; आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जनी जनार्दनाच्या शब्दसेवेत पुन्हा एकदा रुजू होते. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' ही आठवण देणाऱ्या गुरुजनांना, आत्मीय सुह्र्दांना नमन करून प्रारंभ करते शब्दांच्या उपासनेला. 

 'शब्द' मुळातच अपार सामर्थ्याचे ! वाक् सामर्थ्याने साम्राज्य उभे करणारे आणि पाहता पाहता मदांध सत्ताधिशांना उद्ध्वस्त करणारेही. शब्द शस्त्रासारखे वापरले तर माणसाला विवस्त्र करणारे आणि शास्त्रासारखे वापरले तर संस्कृती उभे करणारे. शब्द करतात संस्कार, शब्द देतात आकार आणि निर्माण करतात विकारही. शब्द प्रवाही असतात. कधी झुळझुळ झऱ्यासारखे प्रसन्न हसतात तर कधी त्सुनामी सारखे रौद्ररूप धारण करतात. शब्द व्यक्त करतात अहंकारीपण, शब्दच दाखवतात निर्मळ - नितळ मन. शब्द निर्माण करतात विश्वास. शब्दच गुदमरवतात आणि देतातही श्वास ! शब्दांची ताकद अफाट असते. त्यांच्या वाटी जाऊ नये. शब्दांनी ईश्वराची पूजा बांधावी; माणसांची नाती सांधावी. 

शब्द माणसांचे सुखदुःख वेचतात. शब्दांमध्ये सामावतात नातीगोती. शब्दांमागे उभ्या असतात वृत्ती-प्रवृत्ती. शब्द घेऊन येतात विचार, मूल्य आणि संस्कृती. ते एकटे येत नाहीत, त्यामागे असतो इतिहास; त्यामध्ये असते मानवी मनाची आस. शब्द जोडून ठेवतात साता-समुद्रापारच्या माणसांना आणि शब्दच निर्माण करू शकतात शेजाऱ्यातही दुरावा, मैलोगणती अंतराचा! शब्द कधी ताठ उभे राहतात तर कधी लाचार होऊन बुडबुड्यासारखे विरून जातात. काय जोपासावं, काय टाकावं हेही शब्दच सांगतात - कधी कानात तर कधी जनात! 

 शब्द आपल्याला अस्तित्व देतात. सभोवतालच्या जगाला समजून घेण्याची आणि अर्थपूर्ण करण्याची संधी देतात. बोललेले-ऐकलेले शब्द माणसाच्या व्यक्तित्वाची ओळख पटवतात. शब्दांचे उच्चार आपले मनोभाव प्रकट करत येतात. आपली प्रसन्नता, नाराजी, उत्सुकता, साशंकता सारे काही सहज सांगून जातात. शब्दांमधून विजयाचा डंका सर्वत्र पिटला जातो. पराभवाचे शल्य मात्र आपल्या माणसांनाच सांगितले जाते. शब्द ऐकता आले पाहिजे. श्रवणातलं मर्म जाणलं पाहिजे. उन्नत मनानं ऐकलेले शब्द गती देतात; हलक्या कानानं जवळ केलेले शब्द अधोगतीकडे नेतात. ऐकून समजावून घेतलेले शब्द वात्सल्याने, प्रेमाने थोपटतात ; मैत्रीत धावून जातात. दुर्लक्षिले गेलेले शब्द अपमानित होऊन मौनाच्या किंवा विनाशाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकतात. शब्दच आहेत कारण वादाचे आणि संवादाचेही ! 

 शब्दांच्या मागे मौन तर पुढे कृती असते. कृतीच्या मागे संस्कृती असते. संस्कृती विसरली की विकृती निर्माण होते; प्रकृती बिघडते. शब्द देतात जबाबदारी लहान मोठ्यांना सांधणारी. मोठ्यांनी सांगावं लहानांनी ऐकावं हे अनुभवाने व्यक्त करणारी. मात्र असं प्रत्यक्षात क्वचितच घडतं. मग चूकभूल द्यावी-घ्यावी लागते. लहानांच्या चुका मोठ्यांनी पोटात घातल्या तर त्यांना क्षमाशील होता येतं. क्षमेने स्वतःला आणि दुसऱ्यांनाही उन्नत करता येतं. हे घडत नाही तेव्हा मोठ्यांच्या चुका लहानांच्या पदरात पडतात. लहाने सक्षम असतील तर पदर भरजरीत होतो आणि नसतील तर पदर झिरझिरीत होतो. मानवी स्वभावानुसार लहान मोठ्यांनीही भांडावं-तंटावं पण उंबरठ्याशी एकनिष्ठ राहावं ; इतकीच शब्दांकडून अपेक्षा ! 

 वृंदा आशय

17 comments:

  1. तुझे शब्द मला नि:शब्द करतात !!

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिले आहे. छानच.

    ReplyDelete
    Replies
    1. सर, आपली प्रतिक्रिया मिळणे हे माझे भाग्य आहे. मन:पूर्वक आभार!

      Delete
  3. खूपच सुंदर लेख! तुमची शब्दांची उपासना अविरत सुरू राहो..🌿

    ReplyDelete
  4. मॅडम तुमच्या शब्दांनी खरच निःशब्द केलंय. तुमच्या सोबत काम करायला भेटणं ही माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे असेच लेख अजून वाचायला खूप आवडतील.

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे. आपल्यासारखे सहकारी मिळणे ही उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

      Delete
  5. शब्दप्रभूचा श्री विठ्ठल चरणी शब्दाभिषेक! अप्रतिम ! अशीच प्रेरणा मिळत राहो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना !

    ReplyDelete
  6. शब्दांच सामर्थ्य आणि कर्तृत्व तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं मॅडम. मनःपूर्वक आभार. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत 😊🙏🏿

    ReplyDelete
  7. छान लिहिले मॅडम. अभिनंदन.
    पण वाटलं होतं विठुराया बद्दल, वारकरी , वारी बद्दल वाचायला मिळेल पण शब्दाची महती वाचायला मिळाली.
    धन्यवाद

    ReplyDelete
  8. शब्दाची महती छान वाचायला मिळाली असेच वेगवेगळ्या विषयावर लेख येऊद्या

    ReplyDelete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...