•| ॐ |•
थेंब अमृताचे !
१. गुरूमहिमा
खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कृष्ण मला 'अमृतानुभव' वाचायला सांगत आहे. त्यानी सांगितलं की मी हातात घेते, थोडंसं चाळल्यासारखं करते आणि पुन्हा ठेवून देते; असं दोन-तीन वेळा झालं. मग आज पुरुषोत्तम मासाच्या प्रारंभी कृष्णानं हा 'अमृतानुभव' माझ्या हातात ठेवलाच. माझ्या बाजूला बसला आणि म्हणाला, "हं वाचा आता". कृष्णच बसला आहे म्हटल्यावर मीही वाचायला लागले. पण काय गंमत थोड्याच वेळात माझं आपलं लक्ष पुन्हा कृष्णाकडे जायचं.
शेवटी कृष्णानं रामबाण काढला. गीतेतला एक श्लोक मला ऐकवला -
"उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्| |
आत्मैव ह्यात्मनौ बन्धुरात्मैव रिपुरात्मन:|| ( अध्याय ६ , ओवी क्र.५)
अर्थात - आपणच आपले शत्रू किंवा मित्र असतो. आपण चांगल्या मार्गावरून चाललो तर आपला फायदा होतो. वाईट मार्गाने गेलो तर आपलेच नुकसान होते. आपला उद्धार करणं किंवा अधोगतीला जाणं हे आपल्याच हातात असतं. दुसऱ्या कोणी मला फसवलं हे म्हणणं चुकीचं, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
मग माझी काय बिशाद मी आपली निमुटपणं वाचू लागले. रामबाणाने मी घायाळ झाले हे कळणार नाही तर तो कृष्ण कसला ! मी वाचत राहावं यासाठी आता त्याने एक युक्ती केली आणि मला हळूच म्हणाला, "हे बघ, रोज वाचत जा हं,आणि ज्या सरींमध्ये तू चिंब भिजशीलना, त्याचे काही थेंब गोकुळामध्ये शिंपडत जा." हा कृष्णमंत्र बरोबर लागू पडला आणि माझा चेहरा फुलला. मी अधिकच मन लावून वाचू लागले. खरं म्हणजे 'अमृतानुभव' समजून घेणं आणि त्यावर लिहिणं म्हणजे दिव्यच. मात्र एखादं काम कृष्णानं सांगितलं आणि आपण ते जीव ओतून केलं तर जिथे अडेल तिथे तो धावत येईल यावर माझी ठाम श्रद्धा आहे. या श्रद्धेच्याच आधारे कृष्णाच्या गोकुळवासीयांसाठी लिहीत आहे, 'थेंब अमृताचे'!
'अमृतानुभव' हा ग्रंथ संत ज्ञानदेवांनी गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनुसार 'अद्वैत तत्त्वज्ञानावरील एक स्वतंत्र ग्रंथ' म्हणून लिहिलेला आहे. तू साधनेद्वारे अनुभवलेली 'शिवतत्त्वाची जाणीव', स्वतंत्रपणे लोकांना सांग या त्यांच्या आज्ञेनुरूप लिहिलेला हा ग्रंथ आहे.
'अमृतानुभव' किंवा 'अनुभवामृत' हा ८०० ओवीसंख्या असलेला ग्रंथ एकूण दहा प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी पहिले प्रकरण 'शिवशक्तिसमावेशन' या शीर्षकाचे आहे. या प्रकरणामध्ये वैश्विक ऊर्जा, शिवशक्तीचे वर्णन, विवेचन याबरोबरच शिवतत्त्वाची मानवी स्तरावरील गूढ अनुभूती शब्दांच्या माध्यमातून सांगितलेली आहे.
या ग्रंथाच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नमनपर असे पाच संस्कृत श्लोक लिहिलेले आहेत. स्वसंपादित 'सार्थ अमृतानुभव' या ग्रंथातील 'अनुभवामृतातील श्लोक पंचक विचार' या लेखामध्ये किसन महाराज साखरे लिहितात, "या श्लोक पंचकात संपूर्ण अनुभवामृताचे सूक्ष्म रूप साठवलेले आहे. ... ग्रंथारंभी या पाच संस्कृत श्लोक रचना म्हणजे सूत्ररूप 'अनुभवामृत' असून त्या पुढचा संपूर्ण मराठी ग्रंथ म्हणजे त्या सूत्रावरील भाष्य अगर विस्तृत विवरण होय". या पाच संस्कृत श्लोकांपैकी पहिल्या दोन श्लोकात अनुक्रमे 'श्री गुरु निवृत्तीनाथ यांचे यथार्थ स्वरूप' व 'श्री गुरु गौरव' यांचे कथन करून त्यांना वंदन केले आहे तर पुढील दोन श्लोकांमध्ये शिवशक्ती समावेशन सांगून त्या 'शिवशक्ती एकत्वाला' वंदन केले आहे आणि शेवटच्या पाचव्या श्लोकात 'पूर्ण शंभूला' वंदन केलेले आहे.
पहिल्या श्लोकामध्ये शिवस्वरूपाचा विचार त्यांनी अत्यंत मार्मिकपणाने केलेला आहे. 'शिव म्हणजेच ब्रह्म' आणि 'ब्रह्म म्हणजेच श्री गुरु निवृत्तीनाथ' होत असा विचार श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादलेला आहे. श्री निवृत्तीनाथ हे सगुण साकार दिसत असले तरीही ते निरुपाधिक, निर्गुण, निराकार, ब्रह्मस्वरूपच आहेत, असे श्री. ज्ञानदेव सांगतात. अर्थात सगुण - साकार आणि निर्गुण - निराकार हे तत्त्व एकच एक आहे, असे श्री ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे. हे गुरूंना त्यांनी दिलेल्या विशेषणांवरून सिद्ध होते. आपल्या गुरूंना विशेषणे लावताना ते लिहितात,
"जे स्वसंवेद्य, वाचतीत, अविनाशी, अनिर्वचनीय, आनंदरूप, जन्मविनाशरहित सततत्त्व आहे आणि यश, श्री औदार्य आदी षड्गुण ऐश्वर्यसंपन्न सर्व सापेक्ष प्रवृत्ती, निवृत्ती याहून अतीत सर्वगत, स्वयंप्रकाशी असं माझं परमदैवत, परब्रह्म श्री शिवस्वरूप, श्री गुरु निवृत्तीनाथ यांचा मी परम प्रेमलक्षणात्मक व ज्ञानलक्षणात्मक भक्तीवृत्तीने आश्रय घेतो." अर्थात संकल्पित ग्रंथ पूर्ण होण्यासाठी त्यांची कृपा लाभावी अशी प्रार्थना करतो, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे.
सौ योगेश्वरी भट ' श्रीमद् अमृतानुभव - आध्यात्मिक व वैज्ञानिक गुढार्थ विवेचन' या आपल्या ग्रंथामध्ये हाच अर्थ सोप्या पद्धतीने स्पष्ट करताना लिहितात,
"सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, निराकार, अनंत, शब्दातीत आणि आनंदमय गुरुतत्त्वाचा मी आश्रय घेतला आहे. आणि माझ्याकरिता हे गुरुतत्त्व म्हणजे श्री निवृत्तीनाथ आहेत. गुरू हे एक असे तत्त्व आहे ज्याचं अस्तित्व सर्वव्यापी आहे. ते अनादी अनंत आहे. माणसाने आपल्या अंतरंगामध्ये स्थित होऊन म्हणजेच 'स्वस्थ' राहून सदा सुखी कसे व्हावे हे चिरंतन सत्य सांगण्याकरिता हे गुरुतत्त्व मानवी रूपात व्यक्त होते या तत्त्वाला स्थळ काळाच्या सीमा नाहीत."
दुसऱ्या श्लोकामध्ये गुरु-गौरव करताना ते लिहितात, "या लोकी 'गुरु' या नावाने 'साक्षात शांकरी विद्या' ही त्या आद्य देवाची आज्ञाच आहे. तिचा श्रीगुरु मुखाने सदाच जय जयकार होत असतो. ती भरीव ज्ञानरूप असून दयार्द्र आहे. तिला निरंतर नमस्कार असो."
मानवाने आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी साक्षात शिवशंकराने अनेकविध तंत्र,विद्या आणि क्रिया यांची निर्मिती केलेली आहे. ती 'शांकरी विद्या' या नावाने प्रसिद्ध आहे. हे गूढ ज्ञान आत्मसात करून अनेक योगी जनांनी मोक्षप्राप्ती करून घेतली आहे. जे योगी आपल्या मधील हे शिवतत्त्व अनुभवतात आणि मुमुक्षु साधकांकरिता ज्यांनी ज्ञानाची ही परंपरा युगानुयुगे जिवंत ठेवली आहे अशा योग्यांना सिद्ध असे म्हणले जाते. ही 'शांकरी विद्या' आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम झालेल्या श्री गुरुनिवृत्तीनाथांप्रती श्री. ज्ञानदेव महाराज सदैव नतमस्तक आहेत.
श्री गुरु म्हणजे साक्षात 'शांकरी विद्या' अर्थात 'ब्रह्मविद्या'च होय, असा भाव या ठिकाणी व्यक्त होतो. ब्रह्मविद्येने जीवाची वृत्ती अखंड चैतन्यकार होते. स्वयंप्रकाश असलेल्या ब्रह्मतत्त्वाचे आत्मतत्त्वाने ज्ञान होते. ही 'पराविद्या' म्हणून ओळखली जाते. 'ब्रह्मविद्या' ही परमेश्वराची शक्ती असून ती त्या देवाहून भिन्न नाही. 'श्रीगुरु' म्हणजे त्या आद्यदेवाची विद्यारुपी शक्ती अभिव्यक्त होण्याचे माध्यम होय. कोणतीही शक्ती, कोणत्यातरी माध्यमातून अभिव्यक्त होऊनच उपाधीद्वारा कार्यकारी होत असते. त्याप्रमाणे 'गुरु' ही देखील देवाची एक महान शक्ती आहे. श्री गुरूंच्या मुखातून बोध - प्रबोध - ज्ञानोपदेशाच्या रूपाने अभिव्यक्त होणारी ही 'ब्रह्मविद्या' म्हणजे प्रत्यक्ष 'परब्रह्मा'ची 'आज्ञा' होय असा आशय श्री ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात.
या ओवीचे स्पष्टीकरण करताना श्री किसन महाराज साखरे लिहितात, "या शांकरी विद्येने 'आ' आसमंतात 'ज्ञा' प्रत्यक्षानुभूती येते. अर्थात सर्व देश-काल-वस्तू केवळ स्वयंप्रकाश प्रभारूप आहेत, असे सर्वस्पर्शी, सर्व व्यापक ज्ञान होते. या 'आज्ञे'चा जयजयकार असो. अशा ज्ञानी पुरुषास भूतमात्री सदयता निर्माण होते. सर्व भूतमात्रांविषयी तो द्वेषरहित असतो व देहाविषयी 'अहमबुद्धिरहित' असतो. असा ज्ञानी पुरुष म्हणजे एकंदर मानव समाजाचे परमभाग्य होय.
गुरूंविषयीचा हा महिमा समजावून घेऊन मी थक्क झाले आणि रोज 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:....' हा जो श्लोक मी म्हणते त्यातली अर्थपूर्णता मला प्रत्ययास आली.
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संदर्भ ग्रंथ
१. सार्थ अमृतानुभव - संपादक किसन महाराज साखरे
२. श्रीमद् अमृतानुभव - आध्यात्मिक व वैज्ञानिक गुढार्थ विवेचन डॉ. सौ. योगेश्वरी भट

No comments:
Post a Comment