•| ॐ |•
शब्देविण संवादु !
https://youtu.be/QXa0WAAnIIQ?si=dZ_ZP74e2pPPxhlo
जरा निवांतपणे डायनिंग टेबलवर बसलेली होते. समोर 'सीडलेस ॲप्रिकॉट' चा पुडा दिसला. नकळत एक दोन तोंडात टाकले गेले. चव मस्तच होती, परिचित होती. पण या रूपात मी त्यांना प्रथमच पाहात आणि खात होते. 'ॲप्रिकॉट' हा शब्द सुद्धा कानावरून गेलेला होता. आठवत होता. मात्र काही केल्या त्याचा अर्थ आठवेना. तेवढ्यात आभा आतल्या खोलीतून बाहेर आली. तिला मी खात खातच विचारलं मनू, 'ॲप्रिकॉट' ला मराठीत काय म्हणतात? ती चटकन म्हणाली 'जर्दाळू'! मग डोक्यात प्रकाश पडला. अरे, आपण यांचं सबंध रूप नेहमीच पाहतो. नेहमी तसेच खातो. बी सह ते असतात. हे बी शिवाय. त्यामुळे फोडलेले. वाळवलेले. खरं म्हणजे चव तीच. पण शब्दात अडकल्यामुळे अर्थाचा प्रकाश काही पडला नाही. त्याबरोबर श्रीकृष्णाच्या संदेशाचा अर्थ उलगडला. आजचा त्याचा संदेश होता -
'मौन हेच अंतिम उत्तर !'
(शब्द निर्बीज होतात तिथे मौन फुलते.)
किती खरं आहे हे! संदेशाचा अर्थ मनामध्ये प्रकाशता क्षणी आपसूक ओठांवर शब्द आले - 'शब्देविण संवादू' ! संत ज्ञानदेवांच्या 'पांडुरंग कांती दिसे दिव्य शोभा' या आशाताईंच्या स्वरातील अभंगात चिंब न्हाले. मलाच माझं आश्चर्य वाटलं. कारण पहाटे चिदाकाशाने अभंग दिला होता 'चंदनाची चोळी'. मनामध्ये कृष्णाची कोणतीच ओढ नव्हती. मात्र आदेशानुरूप कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव मनामध्ये जागती होती. त्यामुळे चंदनाची चोळी हा अभंग ऐकला. त्या संदर्भातले विविध लेखन वाचले ; मात्र जाणवले नक्की काय झाले आहे, माहीत नाही ; परंतु आज संत ज्ञानदेवांचे शब्द आणि लताताईंचा आवाज मनाला स्पर्श करत नव्हता. जिथे संत ज्ञानदेवांचे शब्द आणि लताताईंचा आवाज पोहोचू शकत नाही तिथे मन अस्तित्वातच असू शकत नाही, या निर्णयापर्यंत आपसूक आले.
..... आत्ता 'बीजरहित सुकलेल्या जर्दाळू'तून मात्र कृष्ण पुन्हा भेटला. तो आला तेच 'मौना'चा अर्थ समजावत. मन मौन झालं की तिथे ; अमृतरेषही उमटू शकत नाही. अमृतस्वर कानांपर्यंत पोहोचला तरी मनाला स्पर्श करू शकत नाही. 'शब्दांमध्ये आणि स्वरांमध्ये आपण अडकून पडलो तर जीवनात वावरणारे अर्थाचे अमृत आपसूक निसटून जाते ; म्हणून मौन हेच अंतिम उत्तर!'
क्या बात है ! मौनाच्या शिक्षकाला शेवटी मी शब्दांमधूनच दाद दिली. ती त्याच्यापर्यंत पोहोचली की नाही, मला ठाऊक नाही. मात्र सकाळी प्रकाशित चंद्राचं, वाहत्या वाऱ्याचं, उगवलेल्या सूर्याचं, दूरवर दिसणाऱ्या डोंगराचं, शब्दांमृताचं, कोकिळस्वराचं कसलंच कौतुक वाटत नव्हतं. खरं म्हणजे कशाचाच स्पर्श होत नव्हता. त्या मनाला आता कावळ्याचा आवाज ऐकू आला तरी बरं वाटतं आहे. 'पांडुरंगकांती' तर वेधूनच घेईल ना मग !
'पैल तो गे काऊ कोकताहे' या अभंगामधून संत ज्ञानदेवांना मिळालेला शकुन आणि पाहुणा विठ्ठल येणार आहे, हा त्याने दिलेला निरोप ; संत ज्ञानदेवांचा हा काकसंवाद आपल्याला जीवनाच्या माधुर्याकडे वळवतो. निरोप देऊन कावळा उडून जातो. कवीला दर्शनाची आस लागते. हे दिव्य दर्शन जेव्हा घडतं तेव्हा काय होतं - पाहूयात या अभंगातून -
साक्षात पांडुरंगाचे दिव्य दर्शन झाल्यावर अनमोल रत्नांचे तेज फाकलेले आहे अशी जाणीव होते. 'अगणित लावण्य' असा शब्दप्रयोग संत ज्ञानदेव करतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो लावण्य कधी मोजता येतं का, त्याचं काही मोजमाप असतं का? मग अगणित असं का सांगावं लागलं असेल? आणि लक्षात यायला लागतं जे शक्यच नाही आपण त्यातच अडकतो. 'किती सुंदर', 'खूप सुंदर', 'अप्रतिम' असे काहीतरी म्हणत राहतो आणि त्या लावण्याचे , त्या सौंदर्याचे नेमके वर्णन करता येत नाही हे मान्य करूनही वर्णन करण्यातच अडकतो. म्हणून ज्ञानदेव सांगतात ते अगणितच आहे. त्याला मोजायचेच नसते. आपले शब्द तिथे थिटे पडतात, तोकडे होतात. लावण्यामधून जिथे तेजच प्रकाशित होत आहे त्याचे वर्णन तरी काय करणार? ते तेजस्वीपण आपल्याला नि:शब्द, निर्मोही आणि नतमस्तकच करते.
हा कानडा, हा कर्नाटकू असा काही वेध लावतो ; सगळी आवरणं, अच्छादनं तो काढून घेतो. सगळीच अच्छादनं काढल्यावर आपण पोहोचतो ते थेट मूळ आत्म्यापर्यंत. ज्याला ना रंग, ना रूप, ना पंचमहाभूताचा स्पर्श ! निर्गुण स्वरूपामध्ये परमेश्वर सामोरा येतो, आणि आपण त्याला त्याही स्वरूपात आळवतच राहतो. तो मात्र शब्दांमधून काहीच उत्तर देत नाही. या आळवण्याच्या पलीकडे गेलं की आपल्याला जाणवते ती सगुण - निर्गुणाची एकरुपता!
ही एकरूपता जाणवून आपण थक्क होतो. त्या परमेश्वरालाच प्रश्न करायला लागतो,
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे । परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
अरे देवा, शब्दाविना संवाद, दुसऱ्याशिवाय अनुवाद हे कसं शक्य आहे? जिथे परावाणीही खुंटली, तिथे वैखरीने तुझे काय वर्णन करावे? मौनाचे हे सामर्थ्य आहे. मौन माणसाला त्या अननुभूत, अवर्णनीय, अनिर्वचनीय आनंदाकडे घेऊन जाते. म्हणून 'मौन हेच अंतिम उत्तर'.
मौन म्हणजे संवादाचा अभाव का? नाही. मौन म्हणजे शब्दांशिवायचा संवाद ! मौन म्हणजे 'ये हृदयीचे ते हृदयी!' मौन म्हणजे मांगल्य. मौन म्हणजे पावित्र्य. जिथे सगळे काही पुसले जाते तिथे मौन शिल्लक राहाते. मन मौन होते. मन शिल्लक राहातच नाही, उरतच नाही. मन नुरते. मौन शिल्लक राहाते. मौन मौनात अस्तित्वात असते. ते निरव असते. तिथे ध्वनी नसतो. तिथला ध्वनी आनंदरूप होऊन जातो. ध्वनी आनंदरूप झाल्यावर, ध्वनी मौन झाल्यावर काय घडते -
पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे । समोर कीं पाठिमोरा नकळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
काय ही तादात्म्याची अवस्था आहे ! समोर साक्षात देव उभा आहे. तो स्वयंभू दर्शन देतो आहे. ज्याची उत्कटतेने वाट पाहिलेली आहे, ज्याच्यासाठी सर्वस्व समर्पित केलेले आहे, सगुणात - निर्गुणात, सजीवात - निर्जीवात ज्याचा अनुभव घेतलेला आहे तो साक्षात प्रकटलेला आहे! त्याला वाकून नमस्कार करावा तर पाऊलेच दिसत नाहीत. तो समोरा आहे का पाठमोरा आहे काहीच कळत नाही. अशी कशी भूल पडली जीवाला ? ज्या जीवाने त्या शिवाची आयुष्यभर उपासना केली, तप केले, साधना केली तो साक्षात समोर आलेला आहे ; आणि हा जीव मात्र भांबावला आहे. काय हे या जीवाचे वेडेपण? पाऊले दिसत नाहीत म्हणून वाकून नमस्कार बाजूला राहतो. भेटीची उत्कटता मात्र वाढलेली आहे. क्षेम- आलिंगन देऊयात त्याला, कडकडून मिठी मारूयात म्हणून मिठी मारायला जावे तर -
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
काय पंचाईत आहे ! स्वयंभू समोर आहे. मात्र नमस्कारही करता येईना आणि मिठीही मारता येईना. कुठे हा स्वयंभू? का असं घडतंय? ही उत्कटता, ही अनिवार ओढ अखेरीस कुठे दर्शन देते?-
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
आता थक्क व्हावे का गप्प व्हावे? हा स्वयंभू तर आपल्याच हृदयात, अंत:रंगात उभा आहे. आपणच आपल्याला कसं भेटायचं?
आपणच आपल्याला असंच भेटायचं. जिथे दृष्टी पालटते आणि सृष्टी अंत:रंगातून प्रकटते ! यातायात संपते. जीव तृप्तावतो. जीव शिव होतो. मन रमवते पण भटकवते ; मौन जीवाला शिवत्व देते.
मौन म्हणजे समर्थ सौंदर्य !
श्रीकृष्णार्पणमस्तु!

No comments:
Post a Comment