Monday, 15 June 2026

'ज्येष्ठ' व 'ज्येष्ठ'

 

•| |•

 

# शब्दवेध

 

 ॐ नम: शिवाय ! सोमवती अमावास्या 


'
ज्येष्ठ' 'ज्येष्ठ'

 

आज अमावस्या आहे. मराठी पंचांगानुसार उद्या नवीन महिना सुरू होणार. तो आहे ‘ज्येष्ठ’. ज्येष्ठ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला जे दोन अर्थ प्रतीत होतात त्यातला एक म्हणजे मास किंवा महिना आणि दुसरा ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ व्यक्ती.

           आज ज्येष्ठ व्यक्तींवर, वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातला दिन जागतिक पातळीवरती साजरा होत आहे. तेव्हा आजच्या आणि उद्याच्या निमित्ताने मला 'ज्येष्ठ' या शब्दाचा वेध घ्यावासा वाटला. माझ्या मते 'ज्येष्ठ' आणि 'वृद्ध' यांच्या वयपातळीमध्ये अंतर असावे. इथे मी 'ज्येष्ठ व्यक्ती' म्हणजे सर्वसाधारणपणे साठीच्या पुढे गेलेल्या व्यक्ती किंवा औपचारिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर कार्यालयीन कामकाजातून निवृत्त झालेल्या व्यक्ती, असं आपल्याला संदर्भापुरते समजता येईल. 

                 आधी 'ज्येष्ठ' मासाचा विचार करूयात. कारण अधिक महिन्यामुळे त्याला बिचा-याला आधीच या वर्षामध्ये उशीरा प्रवेश मिळतो आहे. तेव्हा उद्या तो येण्याआधीच आपण आज त्याची दखल घेतली म्हणजे कदाचित त्यालाही जरा बरं वाटेल. ज्येष्ठ महिना हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. गंगा दशहरा, वटसावित्री पौर्णिमा हे सण तर 'निर्जला एकादशी' चा उपवास एरवी ज्येष्ठ महिन्यामध्ये येतात. यावेळेस ‘गंगा दशहरा’ अधिक महिन्यामध्ये येऊन गेला. अधिक महिन्याला एक पर्यायी नाव ‘मलमास’ असे देखील आहे. त्यामुळे मला आपलं 'पापियों के पाप धोते धोते गंगा मैली हो गई' या गीताची आठवण आली. मात्र खरंच गंगा मळत असेल का, पापमय होत असेल का असा विचार करताना मला आपली ती 'कृष्णामाई' सारखी संथ वाटते. 'संथ वाहते कृष्णामाई काठावरच्या सुखदुःखांची तिजला जाणीव नाही.' आपण आपला चेतनगुणोक्तीअलंकाराचा आधार घेत त्यांच्यावर मानवी भावभावनांचे आरोप करत राहतो. तर असो. ती बिचारी मळत जरी असेल तरी 'सावित्री' सारखी तेजस्वी कन्या याच महिन्यात येत असल्यामुळे हा महिना 'सत्यवाना'सारखा तेजस्वी होतो. महाराष्ट्रीयन माणसांना एकादशीचे महत्त्व सांगण्याचे काहीच कारण नाही. नुकताच अधिक मास झाल्यामुळे तर आपण कृष्णपुण्याची उजळणी आपापल्या आयुष्यात केलेली आहे. 

              तेव्हा आता वळूयात ज्येष्ठ व्यक्तींकडे. मराठी पंचांगानुसार 'ज्येष्ठ' महिन्याचा क्रमांक तिसरा लागतो. याची सांगड ज्या वेळेला मी 'ज्येष्ठ' व्यक्तींच्या वयाशी घालते त्या वेळेला मला असे लक्षात येते, माणसाच्या वयाची समाजव्यवस्थेतील चार आश्रमांनुसार आपण विभागणी केली तर 'तिसरा आश्रम' अर्थात 'वानप्रस्थाश्रम' आणि 'ज्येष्ठ' महिन्याचा तिसरा क्रमांक असणे हा मला एक योगायोग वाटतो. 

             बदलत्या काळानुसार वानप्रस्थाश्रमाचा अर्थ 'संसारातील आपले लक्ष काढून घेणे' असा होतो. माणसाच्या वयाची '१०० वर्षे' जर आपण गृहीत धरली तर पहिली २५ वर्षे 'ब्रह्मचर्याश्रम' , त्यानंतर पुढची २५ म्हणजेच वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत 'गृहस्थाश्रम', त्यापुढची २५ म्हणजे ७५ व्या वर्षापर्यंत 'वानप्रस्थाश्रम' आणि ७५ पासून पुढचे उर्वरित सर्व आयुष्य म्हणजे 'संन्यासाश्रम' असे गृहीत धरण्यास हरकत नसावी. वानप्रस्थाश्रमामध्ये घरातल्या जबाबदा-या, निर्णयांसह 'सून - मुलगा' यांच्यावर सोपवून द्यावेत. मात्र हवा असेल तिथे सल्ला देखील अवश्य द्यावा. या नात्यामध्ये मैत्रभाव विकसित व्हावा. संन्यासाश्रमामध्ये 'आता उरलो उपकारापुरता' अशी भावना असावी. 

             थेअरी आणि प्रॅक्टिकल यामध्ये नेहमीच अंतर असते. या अवकाशामध्ये या दोन पिढ्यांच्या मधल्या समस्या निर्माण व्हायला लागतात. 'घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच' ; हे विसरूच नये. आवश्यकता असते ती ते प्रश्न समस्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच जाणून घेण्याची, त्याप्रती संवेदनशील राहून ते सोडवण्याची. मनमोकळेपणाने असे केले तर जटील समस्या उद्भवत नाहीत. दुर्दैवाने आजकाल प्रश्न आहे का नाही असा प्रश्न पडावा ; इतक्यात जटील समस्या समोर ''वासून उभी राहिलेली दिसते. काळाच्या या गुहेमध्ये प्रवेश करण्याची कोणाचीही हिंमत होत नाही आणि मग प्रश्न सोडवण्याऐवजी माणसंच सोडली जातात. मला तरी आज जितक्या काही म्हणून आपल्या मानवी समाजाच्या समस्या आहेत त्याच्या मुळाशी हीच मुख्य समस्या वाटते. जिथे हा प्रश्न सोडवला जातो तिथे माणसं बऱ्यापैकी आनंदानं नांदत असतात. आयुष्यामध्ये निखळ आनंद नसला तरी सुखाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न विविध तडजोडी करून केला जातो ही वस्तुस्थिती आहे आणि ते घडणे आवश्यक आहे. या तडजोडी कमी शिकलेल्या माणसांमध्ये चटकन होतात, दुर्दैवाने या निष्कर्षावर मला स्वतःला माझ्या अनुभवांवरून यावे लागलेले आहे. खरं म्हणजे मी स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे हा निष्कर्ष स्वीकारताना मला त्रास होतो. मात्र सत्य कटू असते, ते पचवता आले पाहिजे ; अशी मी माझ्या मनाची समजूत काढते.

उच्चशिक्षित माणसांमधल्या अडचणी सुटल्या तर फार उशिरा सुटतात. याचे कारण शिकलेल्या त्या सर्वांचा 'अहंकार' मध्ये आडवा येतो. खरं म्हणजे 'अहम्' ला 'स्वतः'ला आकार देण्यासाठी 'अहंकारा'चा फार मोठा उपयोग आहे. मात्र याचा उपयोग जेव्हा आपण दुसऱ्याचा आकार बिघडवण्यासाठी करतो तेव्हा अहंकार हा ब्रह्मास्त्राप्रमाणे विनाशक ठरतो. मग ते घर असू द्या, कार्यालय असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिक संबंध असूद्यात ; मला वाटते हे चित्र सर्वत्र दिसते. त्याला देश,भाषा, वेश, धर्म, लिंग कशाचाही भेदभाव नाही. 'समता' आणि 'समानता' स्वीकारण्यात आणि प्रस्थापित करण्यात अनेकांचे जन्म गेले. ती या विघातक क्षेत्रामध्ये मात्र माणसाने कोणी न सांगता स्वीकारलेली आहे. 

              'तरुण उसळते रक्त' आणि अनेकविध कारणांनी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून 'वानप्रस्थाश्रमातला असमाधानी माणूस' असा विलक्षण संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. इथे अडचण निर्माण होते 'नमते घ्यायचे कोणी?' खरं म्हणजे युद्ध हे नेहमी समस्तरियांमध्ये होत असते. पण इथे मात्र वयाने लहान आणि मोठे असलेले एकमेकांमध्ये भांडत असतात. पारंपरिक शहाणपणानुसार लहानांनी माफी मागावी आणि मोकळे व्हावे हा जगण्याचा नियम आहे. क्षमा मागितली तर शत्रूला देखील अभय द्यावे, हे आपली संस्कृती आणि परंपरा सांगते. इथे मात्र आपलीच माणसं असल्यामुळे, उघडपणे कोणीच कोणाचे शत्रू नसल्यामुळे फार मोठी अडचण निर्माण होते. तक्रार करताही येत नाही आणि प्रश्न सोडवतही येत नाही अशा द्विधा स्थितीमध्ये माणूस अडकून जातो. 'आपलेच दात अन् आपलेच ओठ' , 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशा अनेकविध म्हणी ही स्थिती स्पष्ट करू शकतात. घरातले कोणते लोक कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे त्या त्या घरातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तिथल्या रीतीभातींवर अवलंबून असते. रीतीभाती या मूल्यसंस्कृतीमधून विकसित झालेल्या असतात. 'दुधावरची साय' म्हणजेच नातवंड हे दोन पिढ्यांमधला फार महत्त्वाचा असा दुवा असतो. या नातवंडांवर जेव्हा समजदार होण्याची वेळ आलेली मी पाहते ; तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या एका ललित लेखामध्ये , " मोठ्यांचे प्रश्न छोट्यांना कळायला लागले (आणि ते समजून वागायला लागले) तर जगातले बाल्य नष्ट होईल." या अर्थाचे जे विधान केलेले आहे ते मला प्रत्ययाला येताना दिसते. इथे माझ्या मनाला इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होतात. मी आता त्याही कौशल्याने बाजूला ठेवायला शिकले आहे. मात्र, "मोठ्यांनो मोठे व्हा, ही नम्र विनंती मला आवर्जून करावी वाटेल ; जगातलं बाल्य संपू नये, कळी उमळण्यातलं सौंदर्य हरपू नये यासाठी."  

               ज्येष्ठ व्यक्तींसमोर हे नाते जोपासण्याचे जसे एक आव्हान आहे, तसेच दुसरे आव्हान आहे ; तंत्रज्ञानाशी सामना करण्याचे. ज्ञान विज्ञानाच्या पाठोपाठ आलेल्या तंत्रज्ञानाने आज आमचे आयुष्य व्यापून टाकलेले आहे. अनेक सोयी सुविधांचा उपभोग त्यामुळे आपण घेत आहोत. यंत्र असावे की नसावे , त्याचा वापर किती करावा, हे आमचे बाळबोध प्रश्न सोडवण्याइतकी आमची वैचारिकता प्रगल्भ झालेली नसतानाच, तंत्रज्ञानाने आमच्यावर हल्लाबोल केलेला आहे. आज तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या मुळाशी जाऊन बसलेले आहे. त्यामुळे ते वापरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भ्रमणध्वनीला आपले सहावे इंद्रिय म्हणून स्वीकारून आपणही सर्वजण काळाला प्रतिसाद देत आहोत. या माध्यमातून खरं चाललंय आणि बरं चाललंय तोपर्यंत ते वापरण्यास काहीच हरकत नाही. पण एकदा यामध्ये खोटं शिरलं की उद्ध्वस्त होण्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. मल्लिका अमरशेख यांचे 'मला उद्ध्वस्त व्हायचंय' या शीर्षकाचे आत्मकथन आहे. इथे वेगवेगळ्या संदर्भांनी प्रत्येकालाच उद्ध्वस्त व्हावे वाटले तर समाजाचे काय व्हावे ? समाजव्यवस्थेने दिलेल्या मातृऋण, पितृऋण , गुरुऋण - कर्तव्याच्या या तीन भक्कम आधारांना आम्ही कधीच निकालात काढले आहे. स्वतःचीच बाळे स्वतःच्या आयुष्यातला अडसर ठरताच फार सहजतेने (की निर्दयपणाने) आपण त्यांचा काटा काढू शकतो हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले आहे. त्या मानवी संवेदनशीलतेकडून कोणती अपेक्षा करावी? आयुष्य संपवणं असो किंवा तळमळत जगायला भाग पाडणे असो 'क्षणात मारायचं' की 'कणाकणानं मारायचं' याची निवड केल्यासारखं आपण जगतो आहोत. जे व्हिडिओ कॉल आपण प्रत्यक्ष अंतर मिटवण्यासाठी 'आभासी भेटी'सारखे वापरत होतो ते आता आपल्याला 'डिजिटल अरेस्ट' करायला लागलेत. बँकेच्या रांगेत उभं राहणं नको म्हणून डिजिटल व्यवहार आम्ही करायला लागलो आहोत. मात्र कोणता ओटीपी आम्हाला कधी आपटवेल आणि आटपवेल याची खात्री देता येत नाही ही आर्थिकदृष्ट्या निरक्षरांची आणि साक्षरांची सारखीच अवस्था आहे. आपल्या नावे सोशल मीडियावर कोणीही फेक अकाउंट उघडू शकते, त्या आधारे फसवणूक करू शकते, तंत्रज्ञानाने तुम्हाला कितीही सुरक्षित असल्याची खात्री दिली तरी तुम्ही स्वतःसाठी डिलीट केलेले मेसेज इतरांना कळतात तिथे अन्य कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? तंत्रज्ञान सोयीचे आहे सुरक्षित मात्र निश्चितच नाही ; या ठाम मतापर्यंत मी त्यामुळेच पोहोचलेली आहे. माहितीच्या या भस्मासुराने वयाचे, अनुभवाचे शहाणपण कधीच गिळून टाकले आणि 'तुम्हाला काहीच समजत नाही' असे मत असणारे 'टीन एज' आपल्यासाठी परमनंट करून टाकले. आम्ही मनाने 'टीन एजर्स' च राहिलो तर ज्येष्ठ कधी होणार ? क्षमा कोणी कोणाची मागायची? माफी कोणी कोणाला द्यायची

            ...... कदाचित त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्याला 'कृष्णज्ञान' खुणावत आहे भस्मसुरासारख्या वाढलेल्या तंत्रज्ञानाला आणि त्यावर पोसलेल्या माणसाच्या अहंकाराला काबूत ठेवण्यासाठी. माणसाला पुन्हा एकदा माणूस करण्यासाठी!

 

शुभं भवतु !

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!

              

 

No comments:

Post a Comment

'ज्येष्ठ' व 'ज्येष्ठ'

  •| ॐ |•   # शब्दवेध     ॐ नम: शिवाय !  सोमवती अमावास्या  ' ज्येष्ठ ' व ' ज्येष्ठ '   आज अमावस्या आहे. मराठी पं...