Tuesday, 12 August 2025

ते अमृताचे बोल



 

कालचा दिवस माझ्या आयुष्यातला फार सुरेख असा दिवस होता. क्षणभराची उसंत नाही आणि कणभराचा थकवा नाही, असा अनुभवलेला. 'अनिवार्यते'च्या दडपणापेक्षा 'अनिवारते'ची ओढ किती सुरेख असते, याचं मांगल्य अनुभवलेला; कालचा दिवस माझ्यासाठी खरोखर संस्मरणीय होता. पहाटे आठ वाजता महाविद्यालयात गेलेली मी थेट रात्री नऊ वाजता घरी आले. पण घरी आले ते ऊर्जेचा एक अखंड स्त्रोत घेऊनच !

दैनंदिन कामं सुरू होती. त्यानंतर प्रमाणपत्र वर्ग झाला आणि मग सरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाची वाट पाहत मी आणि माझी मैत्रीण दुसरी कामं करत राहिलो. थेट साडेपाच वाजता महाविद्यालयाच्या नाट्यगृहात गेलो. आमचा देव तिथे आधीच येऊन बसलेला होता. या देवाचे दर्शन घेतलं, भेट घेतली; मनोमन सुखावलो आणि कार्यक्रमाला जाऊन बसलो. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर झालाच पण तो रसाळ सरांसाठीचा कार्यक्रम होता; म्हणून उणिवांबद्दल, त्रुटींबद्दल कोणतीही तक्रार मनामध्ये नव्हती. ओढ होती केवळ आणि केवळ त्यांना ऐकण्याची.

कालच्या कार्यक्रमामध्ये अनेकांना ऐकता आलं. त्यात विश्वकोश मंडळाचे आणि इतिहास विषयाचे प्रा. डॉ. राजा दीक्षित सर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रभाकर बागले सर, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे सर अशी दिग्गज मंडळी होती. या पीढीने आपल्या भाषणामधून सरांचा गौरव करत जेव्हा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि स्वतःचं लहानपण व्यक्त केलं;  तेव्हा प्रकर्षाने जाणवलं, "खरोखर किती भाग्यवंत आहोत आपण!" नातवंड आणि आजोबा या पीढीचं नातं काय असतं,  त्या पीढीची माया काय असते, त्या पीढीची आतुरता आणि आशीर्वाद काय असतात हे आम्हाला रसाळ सरांमुळे सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनात अनुभवायला मिळालं.

 मला आठवतं सर निवृत्त झाले ते १९९४ साली. त्यावेळेला मी १० वी मध्ये होते. माझे वडील मला आवर्जून स.भु.च्या जालान सभागृहात सरांच्या सत्कार समारंभाला घेऊन गेले होते. वडिलांना कळत होतं, चांगल्या माणसांना ऐकण्याचे संस्कार या जीवावर जाणीवपूर्वक केले पाहिजेत. सरांना ऐकायला मिळालं. सरांचे पहिले वाक्य होतं, "माझा सत्कार का होतोय हे मला कळत नाही, कारण मी शिकवून फार काही वेगळं केलं नाही. मी केवळ माझं कर्तव्य केलेलं आहे. त्याच्यासाठी पगार घेतलेला आहे, त्यात सत्कार वगैरे करण्यासारखं काय आहे?”, आणि त्या दिवसापासून आजतागायत पाहते आहे; हा माणूस कधीच निवृत्त झालेला नाही. एखाद्या तपश्चर्येसारखी ज्ञानाची आवर्तनं एकापाठोपाठ चालू आहेत. आम्ही सरांकडे पाहतो आहोत, सरांना ऐकतो आहोत , सरांचं कार्य जवळून अनुभवत आहोत.

सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यावेळेला अभिनंदन करण्यासाठी म्हणून आम्ही घरी गेलो आणि सरांना म्हणलं, "अहो सर, काय हे किती काम करता? सर एकाच वाक्यात म्हणाले, "काम संपलं की माणूस संपतो". हे परमेश्वरा, तुझी मी खूप खूप आभारी आहे. ज्याला कलियुग,कलियुग म्हटलं जातं अशा या काळातही, 'बोले तैसा चाले; त्याची वंदावी पाऊले!', अशी माणसं तू आमच्या अनुभवासाठी ठेवलेली आहेत. जिथे नतमस्तक होत राहावं, भरभरून आशीर्वाद घेत राहावेत अशा जागा तू आमच्या आयुष्यात निर्माण केलेल्या आहेत. मी खरोखर कृतज्ञ आहे. सरांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रोत्साहनाने सरस्वती भुवन मध्ये जेव्हा 'जांभळा तांडा' सारखा प्रकल्प केला, कवी नारायण सुर्वे वारले तेव्हा त्यांच्यावरचे रूपक लिहून सादर केले, कै. प्रभाकरराव भालेराव यांच्या स्मृतिप्रत्यर्थ घेतल्या जाणाऱ्या 'पुस्तक परिचय' स्पर्धेचे एक तप मी साजरे करू शकले, याचा मला आनंद आहे. त्या प्रत्येक वेळेला सरांचे शब्द माझ्या कामाची प्रेरणा ठरले आणि सरांचा आशीर्वाद मला पुढे जाण्याचं बळ देत राहिला.

अगदी परवाचीच गोष्ट , सरस्वती भुवन मध्ये 'मुद्रितशोधन आणि माध्यमांसाठीचे लेखन' हा प्रमाणपत्र वर्ग सुरू केला. खरं म्हणजे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याआधी घरी जाऊन सरांचे आशीर्वाद घ्यावेत अशी उत्कट इच्छा होती; पण प्रत्यक्षात ते शक्य झालं नाही. तेव्हा सरांच्या अनिवार ओढीमुळे त्यांना फोन मात्र आवर्जून केला. सरांना माहिती दिली आणि सांगितलं, " सर, मला खरं तर तुमच्याकडे वर्ग सुरु करण्याआधीच यायचं होतं पण आज इतकी काम होती ना की खरंच जमलं नाही".  काय म्हणावं सरांनी, "तुम्ही फार चांगलं काम करत आहात, या कामाची खूप आवश्यकता आहे. हे काम तुम्ही दीर्घकाळ करत राहताल." हे भरभरून आलेले आशीर्वाद मला दहा हत्तींचं बळ देऊन गेले. छोट्याशा वैयक्तिक भेटीनंतर काल   त्यांना पुन्हा प्रत्यक्षात ऐकायला मिळालं. इतरांना ऐकण्याचा आनंद आहेच पण शेवटच्या १२-१३  मिनिटात सत्काराला उत्तर देत असताना, जे काही अमृताचे बोल या हृदयामध्ये पेरले गेले, पुढच्या कामाच्या दिशा स्पष्ट झाल्या, थेट आदेश आले ते प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवणं हे मी माझं पवित्र आणि पावन कर्तव्य समजते; म्हणून हा लेखन प्रपंच.

(साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर सुधीर रसाळ सरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन; सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी मुक्त सृजन या साहित्य संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नाट्यगृहामध्ये झाला. आपल्यापर्यंत पोहोचवत आहे सरांच्या भाषणातील शब्द अन् शब्द.)

सत्काराला उत्तर देताना सर म्हणाले, "मला जे बोलायचं आहे, ते मी मुद्द्यांच्या स्वरूपात आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिलं असं की NBT चे चेअरमन यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला याचा मला विशेष आनंद आहे, कारण मी जी सांस्कृतिक समीक्षा लिहितो त्यात माझा एक मुद्दा असा असतो, की जसं वाङ्मयाचे युरोपियन कुल आहे तसं वाङ्मयाचे एक भारतीय कु निर्माण झालं पाहिजे. ते जर निर्माण व्हायचं असेल तर भारतीय भाषांमधल्या उत्तम साहित्यकृती या सर्वच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे व्हायचं असेल तर एनबीटीचे कार्य मोठ्या प्रमाणात विकसित झालं पाहिजे. नेहरू सारख्या द्रष्ट्या पुरुषानं स्थापन केलेली ही संस्था आहे, आणि भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचं एक स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. त्यातून 'साहित्य अकादमी' आणि 'नॅशनल बुक ट्रस्ट' या संस्था स्थापन झाल्या, आणि म्हणून मला त्याचा विशेष आनंद आहे.

दुसर असं की ' मुक्त सृजन ' ही अशी कार्यकर्त्यांची संस्था आहे जी स्वत:हून  स्वयंप्रेरित अशा स्वरूपाच कार्य करते. मला दुर्गा भागवताचं मत या ठिकाणी सांगावसं वाटत,  "की ज्या सांस्कृतिक संस्था सरकारी अनुदान घेतात त्या साहित्य संस्था सरकारच्या विरुद्ध, सरकारनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरूद्ध बोल नाहीत, एक मिंधेपणा त्यांच्यामध्ये आलेला असतो. आणि म्हणून सांस्कृतिक संस्था या सरकारी अनुदान न घेता चालवल्या पाहिजेत. गांधीजीनी असं म्हणलेलं होतं की ‘महाराष्ट्र हे स्वयंसेवी कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, भारतात दुसऱ्या प्रांतात असं चित्र दिसत नाही, तेव्हा आपला प्रतिनिधी पुण्याला त्यांनी पाठवून हे कार्य कसं केलं जातं, याचा अभ्यास करायला त्यांनी सांगितलेलं होतं. 'मुक्त सृजन' ही अशी साहित्य संस्था आहे, जी स्वयंप्रेरित आहे. म्हणून मागच्या वर्षी त्यांची पारितोषिकं देताना मी महेश खरातांचं खास कौतुक केलं होतं. आजही या साहित्य संस्थेकडून पारितोषिक घेताना मला थोडा संकोच वाटतो की ही माणसं आपल्या खिशातल्या पैशातून ही संस्था चालवतात आणि आपण यातून पारितोषिक घ्यायचं, हे काही मला मान्य नव्हतं. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही मला पारितोषिक अजिबात देऊ नका. दुसरं असं की या संस्थेने दिलेलं पारितोषिक स्वीकारून, मी माझा गौरव करून घेतो, आणि म्हणून मी हे पारितोषिक घेतो.

माझा तिसरा मुद्दा असा की, "महाराष्ट्र हा प्रांत आपल्या संस्कृतीबद्दल अतिशय उदासीन आहे. आपल्या भाषेबद्दल अतिशय उदासीन आहे. 'त्रिभाषा सूत्र' लावलं गेलं आणि महाराष्ट्रातली संस्कृत विद्येची परंपराच नष्ट झाली. तिला ब्राह्मणी वगैरे म्हणून तोडले गेलं. कोणतीही भाषा एका जातीची नसते. अतिशय श्रेष्ठ असे संस्कृत पंडित महाराष्ट्रात होते. आज महाराष्ट्रात संस्कृत नाही, त्याचा परिणाम असा झाला की मराठी भाषेमध्ये वेगवेगळे नवे शब्द घडवण्याची जी प्रक्रिया चालू होती ती पूर्ण संपुष्टात आली. ती हिंदीमध्ये आहे. हिंदी समीक्षेमध्ये जे नवे नवे शब्द,  संज्ञा निर्माण केल्या जातात त्या संस्कृतमधून. आम्ही आपल्या इंग्रजी संज्ञा घेऊन कसंबसं भागवतो. तेव्हा ‘त्रिभाषा सूत्र आलं आणि आमचं नुकसान झालं.

हिंदी प्रदेशा हिंदी, इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा स्वीकारल्या. आम्ही इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषा स्वीकारल्या. त्यानंतर पाचवीपासून हिंदी सुरू झालं. हिंदी एक संपर्क भाषा म्हणून या देशात राहिली पाहिजे अशी सगळ्यांचीच भूमिका आहे, माझीही आहे. किंबहुना महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोधच केला नाही. मध्ययुगातील अनेक मराठी संतांनी हिंदीमध्ये काव्यरचना केली. गणपतीची सुप्रसिद्ध हिंदी आरती ही मराठी संतांनी लिहिली आहे. हिंदीला महाराष्ट्रनं कधी विरोध केला नाही. पण तुम्ही पहिलीपासून जेव्हा हिंदी लागू करायला पाहता तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुम्हाला मराठी भाषेचं अस्तित्व नको आहे’. लहान वयामध्ये भाषेभाषेमधला फरक मुलांना कळत नाही. हिंदी शब्द मराठीत ही लहान मुलं वापरायला लागतील. मराठी शब्द हिंदीमध्ये वापरायला लागतील. मराठी व्याकरण  हिंदीमध्ये घुसेल, त्यांच्या बोलण्यातून आणि हिंदी व्याकरण मराठीमध्ये घुसेल. याचा शेवटी परिणाम असा होईल की मराठी ही हिंदीची एक उपभाषा बनेल. 'बंबइया हिंदी' जशी निर्माण झाली किंवा महाराष्ट्रामध्ये 'दखनी भाषा' जी निर्माण झाली ती याच प्रकारे निर्माण झालेली आहे. अनेक राठी भाषक जेव्हा मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला लागले तेव्हा ते जे उर्दू बोलायला लागले त्यात मराठी मोठ्या प्रमाणात होतं. '' हा एक (प्रत्यय) दखनी भाषेत वापरला जातो, ते मराठीमधून आलं आहे. "मै खाताच नही", असा चा वापर केला जातो. मी उर्दूतून शिकलेलो आहे. तिसरीपासून आम्हाला उर्दू होतं. माझं मराठी उर्दू मिश्रित मराठी आहे. १९४८ साली जाणीवपूर्वक आमच्या पीढीने आमच्या भाषेतले उर्दू शब्द काढले . भाषा बिघडवण्यासाठी बालपणातच दुसरी भाषा मुलाला शिकवावी; म्हणजे मग तो जे भाषेचे मिश्रण करतो ते पाहण्यासारखं असतं. आणि जशी आज एक 'राजस्थानी' आहे किंवा या प्रकारच्या 'हिंदी उपभाषा' आहेत, तसं मराठीचं रूप हे ५०-६० वर्षांनी होणार; आणि तेव्हा 'ज्ञानेश्वर आणि तुकाराम' यांच्याशी तुमचं काय नातं राहणार ? , हा विचार तुम्ही केला पाहिजे.

याचा अर्थ असा की तुमची सगळी संस्कृती या शैक्षणिक धोरणामुळे धोक्यात आलेली आहे आणि याचं कुठलंही भान मराठी माणसाला नाही. तो अगदी निवांतपणे बसलेला आहे. दक्षिणेकडची राज्य हिंदीला विरोध करतात तसा विरोध आपण करण्याचं कारण नाही. पण आपल्या संस्कृतीवर जर एखादी भाषा आक्रमण करत असेल तर आपण उभं राहील पाहिजे, असं मला वाटतं. आणि दुर्दैवान हे होत नाही.

शेवटचा मुद्दा असा की, इंग्रजी भाषेमुळे आणि आता हिंदीमुळे मराठीमध्ये लेखकांच्या पिढ्याच निर्माण होत नाहीत. मी जेव्हा विचार करतो की १८-२० वर्षांची मुलं मराठी कविता लिहीत आहेत, कशा लिहीत आहेत, त्यामधल्या काहींच्यामध्ये  स्फुल्लिंग आहे, प्रतिभा आहे, विकास होऊ शकतो असे तरुण लेखक मला मराठीमध्ये दिसत नाहीत. विशी, बावीशीली मुलं मराठी लिहिणारी मला तरी दिसत नाहीत. मग आता जी पिढी लिहिते आहे ती अस्तंगत झाल्यानंतर तिची जागा घेणारा नवा लेखकांचा वर्ग मराठीमध्ये निर्माण झालेला असेल का? जर तो निर्माण होणार नसेल तर मराठी वाङ्मयाचं काय? हाही विचार आपण करत नाहीत. तेव्हा 'मराठी वाङ्मय आणि संस्कृती' ही एका भीषण अशा ऱ्हासपर्वात आलेली आहे. याचं भान मराठी लेखकांना नाही, मराठी भाषकांना नाही. सगळे स्तब्ध आहेत. कोणीही या सगळ्या परिस्थितीबद्दल एक अवाक्षरही काढत नाही. आणि जो समाज स्वतःच्या संस्कृतीबद्दल उदासीन असतो, त्या समाजाला त्याची संस्कृती कधीच राहात नाही. तेव्हा या निमित्ताने आपल्यासमोर एक दोन-चार मुद्दे मांडावेत आणि असं मला वाटतं की आपली संस्कृती टिकावी. जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत ही अशी अवस्था राहणार आहे, म्हणून हा विचार प्रत्येकाने करावा, अशी विनंती मी करतो.

मला हे पारितोषिक दिलं त्याबद्दल 'मुक्त सृजन' या संस्थेचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानून माझं हे भाषण संपवतो.

सरांचे भाषण संपले माझ्या मनात अनेक विचार पेरून...

वृंदा आशय  

 

 

 



33 comments:

  1. धन्यवाद मॅडम..! काल रसाळ सरांना ऐकता आलं नाही ही खंत तुम्ही हा लेख लिहून भरून काढलीत व सरांचे मार्गदर्शन सर्वां पर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...!

    ReplyDelete
  2. Dhanya te aapan and Dhanya te Rasal sir… 😊🙏

    ReplyDelete
  3. सरांनी खूप तळमळीने विचार मांडले आहेत...मराठी भाषा आणि मराठी संस्कृती वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत

    ReplyDelete
  4. या ठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया पाठवणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. काही वाचकांना तांत्रिक कारणामुळे ब्लॉग वरती आपली प्रतिक्रिया नोंदवता येत नाही असे लक्षात आले आहे. त्यांनी माझ्या व्हाट्सअप वर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या त्यांच्या नावासह मी स्वतः या ठिकाणी प्रकाशित करत आहे.

    ReplyDelete
  5. मराठी विषयाचं विदारक सत्य सरांनी मांडलं, CBSE शाळेत हे सतत पहायला मिळतं, तेव्हा वाईट वाटतं,
    तुझं लिखाण वाचताना एम. ए. चा सरांचा वर्ग आठवला.

    कल्पना खंडागळे

    ReplyDelete
  6. घरी राहून ही कार्यक्रमात बसून ऐकत आहोत असेच वाटले. धन्यवाद व अभिनंदन 👍🏻

    प्रा. रामेश्वर राठी

    ReplyDelete
  7. काल येणं झालं नाही ,पण तुमच्या मुळे हा आनंद मिळाला खूप खूप धन्यवाद 🙏

    दीपाली कुलकर्णी

    ReplyDelete
  8. भाषेविषयी अत्यंत समर्पक असं भाष्य आहे रसाळ सरांचं, तुम्ही हे पाठवलं म्हणून वाचता आलं धन्यवाद मॅडम 🙏त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा मी त्यांची मुलाखत घेऊन एक रूपक केलं होतं त्यांच्यावर आकाशवाणी साठी.
    मदालसा कानडे

    ReplyDelete
  9. प्रिय वृंदा मॅडम ,
    रसाळ सरांच्या कार्यक्रमाचा आणि भाषण ब्लॉग वाचला. नेहमीप्रमाणेच ब्लॉग अतिशय छान आहे. कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यामुळे सरांच्या भाषणाचा आणि सत्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला नाही. आपल्या ब्लॉगमधून या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि सरांच्या भाषणाचा काही प्रमाणात आस्वाद घेता आला
    देव शोधण्यासाठी प्रत्येक वेळेस धर्मग्रंथ वाचणे, मूर्तीची पूजा करणे, यज्ञ कर्म करणे अशा मार्गांचा अवलंब न करता जिवंत माणसांमध्ये देवत्व शोधले आणि त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवली, त्यांनी सांगितलेल्या मार्गांवर मार्ग क्रमण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर आपल्याला काही प्रमाणात त यशस्वी होता येते याचे उदाहरण प्रत्यक्ष आपल्या रूपाने व आपल्या कामातून पाहायला मिळते.
    सरांचे चिंतन, अभ्यास, विचार प्रगटन आजही तेवढ्यात जोमात सुरू आहे. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. नॅशनल बुक ट्रस्ट चे कार्य आणि महत्त्व त्यांनी थोडक्यात पटवून दिले.
    ज्या संस्थेने सरांचा गौरव केला त्या संस्थेमध्ये स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या लोकांचे कार्य आणि पुरस्कार स्वीकारण्याचा उद्देश सरांनी स्पष्ट केला. त्रिभाषा सूत्राचा अवलंब केल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर सरांनी मार्मिक असे भाष्य केले. हे सूत्र अवलंबल्यामुळे आपल्या भाषेवर आणि साहित्य निर्मितीवर जे आक्रमण चालू आहे याबद्दल सरांनी व्यक्त केलेली खंत रास्त आहे. युवक आणि तरुण वर्गाकडून मराठी साहित्या निर्मितीमध्ये जे भरीव योगदान व्हायला पाहिजे , हे कमी झाल्यामुळे आपल्या सांस्कृतिक जीवनावर याचे गंभीर परिणाम
    नक्कीच भोगावे लागतील या शेवटच्या मुद्द्यावर सरांनी जो प्रकाश टाकला हे अत्यंत कटू पण सत्य आहे.
    जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सरांचे आणि सरांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपले हार्दिक अभिनंदन
    अश्विनी जीवन देसाई
    सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय
    छत्रपती संभाजीनगर

    ReplyDelete
  10. खूपच सुंदर 🙏🙏

    रवींद्र भामरे

    ReplyDelete
  11. नमस्कार वृंदाताई,
    तुमचा सुधीर रसाळ सरांचा ब्लॉग वाचला खूपच सुंदर लेखन केल आहे. 👌👌 मी माझ्या काही सोबतच्या ज्या मराठी शिक्षक आहेत त्यांनाही तुमचा ब्लॉग शेअर केला त्यांनाही तो खूप आवडला. त्या म्हणाल्या की मराठी बद्दल भरभरून लिहिणारे असेच व्यक्ती असायला पाहिजेत 🙏🙏

    रोहिणी पोळ - मुळे

    ReplyDelete
  12. 👍🏻तू हा लेख लिहून सरांचे विचार आमच्या पर्यंत पोहोचविले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    माधुरी भावसार

    ReplyDelete
  13. वृंदाचे आवाहन 👍

    प्रा. सुभाष बागल

    ReplyDelete
  14. डॉ.रसाळ सरांचं भाषण या ब्लॉगमधून सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा प्रयत्न
    चांगला आहे, धन्यवाद.

    जीवन देसाई

    ReplyDelete
  15. खूप खूप उत्तम व अंतर्मुख।करणारी मांडणी
    प्रत्येकांनी।सरांचे हे भाषण ऐकायलाच पाहिजे. प्रशांत अपसिंगेकर

    ReplyDelete
  16. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर आणि महत्त्वाचे वाचनात आले.
    शुभम पाटील

    ReplyDelete
  17. फार हृद्य.
    सरांना भेटायची इच्छा आहे. परवाच्या कार्यक्रमाला येत आहेत असं वाटल्याने खुश होतो, पण त्यांना तब्येतीमुळे येता आलं नाही. पाहू, कसा योग येतो.

    हेमंत राजोपाध्ये, पुणे

    ReplyDelete
  18. खूपच छान शब्दांकन आणि तुला धन्यवाद की तू आदरणीय रसाळ सरांचे विचार आमच्यापर्यंत पोचवलेस.
    मनःपूर्वक अभिनंदन. 🌹🙏🏻🙏🏻

    अश्विनी यार्दी

    ReplyDelete
  19. उत्तम लिखाण,🌷

    भालचंद्र वायकर

    ReplyDelete
  20. माननीय रसाळ सर यांनी मांडलेले मुद्दे खरोखरच माझ्या उमलत्या मनाला भिडणारे होते. मी वयानी खूप लहान आहे. नव्या पिढीची असूनही मला हा लेख वाचताना खरोखर असं जाणवलं की, मराठी भाषेला आणि आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम आपलंच आहे. आपण ते जर अगदी नीट पार पाडू शकलो तरच आपण आपले कर्तव्य खऱ्या अर्थाने बजावले असे म्हणू शकतो.
    लहान तोंडी मोठा घास घेते आहे परंतु रसाळ सरांनी जे मुद्दे मांडले ते 'मुक्त सृजन' व त्यासारख्या संस्थांनी मनावर घेऊन आमच्यासारख्या छोट्या परंतु नव्या साहित्यकारांना एक संधी द्यायला हवी. ज्यात आम्हाला आमचे मत मांडण्याची आणि मराठी साहित्यासाठी आमचा खारीचा वाटा देण्याची सुवर्णसंधी मिळायला हवी.
    मला हा लेख वाचायला मिळाला आणि माझ्यापर्यंत त्या भावना अगदी सहजपणे पोहोचल्या त्यासाठी मी लेखिकेची अर्थातच वृंदा आशय यांची आणि रसाळ सरांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  21. निवृत्तीनंतर सत्काराला उत्तर देताना आदरणीय रसाळ सर म्हणाले होते, "मी सदगुणांच्या दारी माधुकरी मागितली... " त्यांची सगळी वाक्य आजही अंतर्मनात खोलवर रुजली आहेत. या वेळेसच्या भाषणातून

    ReplyDelete
  22. आदरणीय रसाळ सरांची मराठी भाषेविषयी कळकळ प्रकर्षाने त्यांच्या भाषणात दिसते मराठी वाङ्मय आणि संस्कृती याविषयी मराठी माणसाची उदासीनता त्यांना खंतावते. मराठी भाषा आणि संस्कृती तसेच संस्कृत भाषा विषयाचे सरांचे मत स्पष्ट झाले आहे. लेखकांच्या नव्या पिढ्या निर्माण व्हायला पाहिजे, अन्यथा मराठी भाषेतील साहित्य निर्मिती कशी होईल असा सवाल नेहमीच त्यांना अस्वस्थ करतो. धन्यवाद डॉक्टर वृंदा जोशी देशपांडे आपण आम्हाला रसाळ सरांचे विचार ऐकवलेत ,आम्ही धन्य झालो.

    अलका काथार

    ReplyDelete
  23. मराठी भाषेबद्दल सरांनी जी तळमळ व्यक्त केली तिचा विचार सर्वांनीच करायला हवा. वृंदा मॅडम आपले पण आभार आपल्यामुळे सरांचे म्हणणे सर्वांपर्यंत पोहोचले. तसेच आपण मराठी भाषेसाठी जे कार्य करत आहात त्यात आपल्याला आणखी यश मिळावे यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे. शुभेच्छूक मनानेच मराठी माणसे पुढे जात राहतील.

      Delete
  24. सप्रेम नमस्कार. आपण रसाळ सरांवरील ब्लॉगचा दुवा आठवणीने पाठवलात त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीचे जे वर्णन केले आहे ते खरेच. पण एकूण परिस्थितीच अशी आहे की इतर भाषांची मराठीवरील कुरघोडी येत्या काळात आपल्याला दिसून येईल. या करता दाक्षिणात्य भाषाभिमान्यांसारखे टोकाचे पाऊल उचलले तरच काही मार्ग दिसून येतो असे वाटते अन्यथा नाही. दुर्दैवाने (तांत्रिक अडचणीमुळे किंवा तो कसा मांडायचा हे न कळल्यामुळे असेल) मला ब्लॉगवर माझा विचार मांडता आला नाही.

    मुरारी तपस्वी

    ReplyDelete
  25. एक विदारक सत्य सरांनी मांडलेले आहे. सर्वांना जागरूक केले आहे. आमच्याही मनात सतत ही खंत आहे. पुढे काय आणि कसे करता येईल हे बघून सर्वांनी एकत्र पुढील वाटचाल करावी, हीच मराठी साठी शुभकामना ! 👍

    शैलजा देव

    ReplyDelete
  26. सरांचे भाषण अद्वितीयच. त्या बद्दल काय सांगावे. आपल्याअवती- भवती असे लोक हे आपले भाग्यच. त्यांचे विचार व अनुभव आपल्याला जगता आले पाहिजे.

    डॉ. साधना शाह

    ReplyDelete
  27. रसाळ सर म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ! त्यांनी मांडलेले विचार, विचारी मनाला जागे करणारे आहेत.

    भारतीय भाषांमध्ये निर्माण होणा-या साहित्यकृती सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत व्हाव्यात; म्हणजे संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एकजिनसीपणा आणि वैविध्य यांची ओळख होईल.

    तसेच दुसरे असे की सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांनी शासकीय अनुदानावर अवलंबून नसावे. तरच त्यांना स्वत्व व सत्त्व जपता व जोपासता येईल.

    संत परंपरेचा वारसा लोप पावू नये यासाठी सर्व भारतीयांनी व विशेषतः महाराष्ट्राने मराठी भाषा व संस्कृतीची अस्मिता जोपासावी व पुढील पीढीला हा वारसा द्यावा.

    अत्यंत उद्बोधक विचार देणारी माणसं कमी राहिली आहेत त्यात रसाळ सर एक आहेत.

    विजय देशपांडे

    ReplyDelete
  28. रसाळ सर आपल्याला आठवण देतात की,
    ज्या झाडांची मुळं खोलवर गेलेली असतात तेच आकाशात उंच झेपावतात. मुळांपासून तुटले तर झाडांच्या वाटेला येते केवळ सुकणे, संपणे आणि कोसळणे.
    आपण संपणार की सावरणार? - निवड आपली !

    ReplyDelete
  29. मातृभाषा अर्थातच आईची भाषा .
    मूल लहानपणापासून ज्या भाषेत बोलतं ते बोबडे बोल. मोठे झाल्यावर ते स्पष्ट बोलायला लागतात. आमची मातृभाषा मराठी, आम्हाला तिचा अभिमान आहे. पहिलीच्या वर्गापासून शाळेत हिंदी भाषा अनिवार्य करतात. आम्हाला दुसऱ्या भाषेचा द्वेष नाही पण मूल नुकतेच मातृभाषेत स्पष्ट अन चांगले बोलायला लागतात. दुसरी भाषा शिकायला लागलं की ते एक दोन शब्द मराठी अन एक दोन हिंदी असं सरमिसळ बोलतात. त्या भाषेची होते खिचडी, एक ना धड भाराभार चिंध्या ! अशी अवस्था होते. उदाहरणार्थ 'मुझे जेवण करना है', 'मला तेरे साथ डब्बा खायचा' ही काय भाषा झाली का? मूल मोठे झाल्यावर हळूहळू दुसरी भाषा शिकू शकतात. म्हणून शाळेत इतक्या लहानपणी कोणतीही भाषा अनिवार्य करू नये. दुसऱ्या भाषेला विरोध नाही पण हिंदी भाषा अनिवार्य केली तर त्या विरोधात आम्ही सर्व उभे राहू .

    सौ. जयश्री विजय देशपांडे

    ReplyDelete
    Replies
    1. मातेचा आणि मातृभाषेचा आशीर्वाद कायम मस्तकी राहावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना!

      Delete

.......ती प्रीत तू मागू नको

  आज वा. रा. कांत यांची पुण्यतिथी. खरं म्हणजे आपण वा. रा. कांत यांना एवढे विसरलेलो आहोत की 'पुण्यतिथी' हा शब्द सुद्धा मला फार कृत्रि...