Thursday, 21 May 2026

थेंब अमृताचे - पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष लेखमाला - भाग ३

 

•| ॐ |• 

थेंब अमृताचे 

 ३.  शंभो तूच !


# पुरुषोत्तम मास कृष्ण संदेश 

ही रात्र काळी, तो चंद्र आभाळी

काय करतोस रे सख्या चंद्रमौळी?

का न उमले अजूनही ती चाफेकळी?

श्रीकृष्णार्पणमस्तु!


आज पहाटे असा कृष्ण संदेश आला आणि मला जराशी कृष्णाची थट्टा करावी वाटली. त्याला म्हणलं, "काय रे कृष्णा? काय प्रेमात - बिमात पडलास की काय? आज अगदी काव्यात संदेश दिलास ते सुद्धा चंद्र, चाफा या सगळ्यांना घेऊन. काय चाललंय काय तुझं? माझ्या या प्रश्नावर कृष्णानं माझ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि मला आपलं थेट चित्रपटातलं 'राधा क्यूं जले?' हेच गाणं आठवलं. 

      ......नाही म्हणजे माझी काही हरकत नाही, तुला वाटू शकतं असं. तसाही तू प्रेमासाठीच जास्त प्रसिद्ध आहेस. माझी आपली बडबड सुरू होती. 

       कृष्ण काहीच बोलेना. त्यामुळे त्याच्याकडे पाहिलं. तर त्याची मुद्रा अतिशय गंभीर झालेली. मला काही कळेच ना आपलं काय चुकलं? शेवटी काकूळतीला येऊन त्याला म्हणलं, "बाबा रे, काही चुकलं असेल तर माफ कर. पण तू माझ्यावर रागवू नकोस. हे बघ, सगळं जग माझ्यावर रागावलं तरी मला काही फरक पडत नाही, पण कृष्णा, तू रागावलास ना तर माझं काही खरं नाही बघ."

        कृष्ण गंभीरपणे एवढेच म्हणाला "अध्यात्म बदनाम होतं ते तुझ्यासारख्या लोकांमुळे." आता तर मी फक्त रडायची बाकी राहिले. 

"कृष्णा, मी काय केलं रे? तू सांगितलंस तसा 'सार्थ अमृतानुभव' सुद्धा रोज वाचते आहे. ज्या सरींमध्ये भिजती आहे त्याचे थेंब गोकुळामध्ये शिंपडती आहे. आता तुझा तो पाचवा श्लोक एवढा अवघड आहे की त्याचं काय स्पष्टीकरण लिहावं याचा प्रकाशच माझ्या डोक्यात पडेना तर मी लिहील काय?" मी जरा नाराज होऊनच त्याला विचारलं. 

         मी रडवेली झालेली पाहिली की कृष्णकळी खुलते. "अगं वेडाबाई, गेले दोन दिवस तुला हा पाचवा श्लोकच तर मी समजावून सांगतो आहे."

      "कसं काय? मला तर काहीच नाही कळलं, मी आपलं भाबडेपणानं त्याला म्हणाले."

          "सांग बरं मला तुझ्या सोबत दोन दिवस काय काय घडलं?"

     वा ! वा ! जसं काही तुला ठाऊकच नाही. कृष्णाचा बदलता रोख पाहून मी सुद्धा म्हणाले. 

          "विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं", मला जाणवलं कृष्णातला कडक शिक्षक जागा झालेला आहे. मी आपली नम्र विद्यार्थ्यासारखी त्याला सगळं काही सांगत सुटले -

           "परवा हे बघ, सकाळी हा पाचवा श्लोक  पुन्हा वाचला. आदल्या रात्री फारसं काही समजत नव्हतं. मला वाटलं सकाळी तरी समजेल पण दोन्ही वेळा नाही समजला रे कृष्णा. 

  पुढे? 

मग मी नेहमीसारखी बागेत गेले. भावगीतं ऐकत ऐकत तिथे व्यायाम केला. गंमत म्हणजे काय माहिती आहे का, 'चाफा बोलेना चाफा चालेना' हे गीत ऐकत होते आणि समोर चाफ्याचंच झाड होतं. त्यादिवशी आकाशवाणीने खरंच फारच छान भावगीतं ऐकवली. नारायण मुरलीधर गुप्ते,  बा.भ. बोरकर यांच्या रचना ऐकताना जीव कसा तृप्त झाला. मग नेहमीसारखी घरची, बाहेरची महाविद्यालयाची कामं आटपली. तो पाचवा श्लोक मनामध्ये घोळत होता रे, पण सरळ अर्थाशिवाय काही लिहिता येईल असं वाटेचना बघ. 

      पुढे? पुढे काय रात्र झाली आणि मी झोपले, आता मीही वैतागले होते. 

       दुसऱ्या दिवशी? 

....... पहाटे पहाटेच कळलं रे, कुमुद ताईंना तू तुझ्याकडे बोलवून घेतलेलं आहेस. ती बातमी वाचून 

 "देवा, तुझी ज्योत तुझ्यात विलीन झाली." - श्रीकृष्णार्पणमस्तु! 

     ही माझी पहिली प्रतिक्रिया उमटली बघ. त्यानंतर काल मी पूर्णपणे कुमुद ताईंमध्ये हरवून गेले होते. 

      हो ! पण स्वतःची कामे केली असशीलच ना? 

      Show must go on हे तुझं तत्त्व आम्हाला पाळावंच लागतं बाबा. त्यात काल काही महत्त्वाची कामं होती, ती यजमानांसोबत जाऊन निमुटपणे पूर्ण केली. तुला आठवूनच मनातलं दुःख वगैरे बाजूला ठेवलं बघ. 

        "कामं करायचीच असतात. ती तू करून आपसूक मोकळी होतेस. भावनांमधून मात्र तुला मोकळं होता येत नाही."  कृष्णानं आता अगदी माझ्या वर्मावर बोट ठेवलं होतं. 

      " खरंच नाही होता येत रे कृष्णा. तुला सांगू ,काल '... मैं हृदय की बात रे' हा लेख लिहिला आणि मग कुठे मन शांत झालं बघ. तोपर्यंत विनाकारण चिडचिड सुरू होती माझी." 

            आताही बघ ना. तुला काल कार्यालयीन कामाच्या ठिकाणी अगदी मध्यभागी 'चाफ्याचा वृक्ष' दाखवला, पण तू त्याचा उल्लेखही केला नाहीस. 

        अय्या, खरंच की कृष्णा! अशी कशी विसरले मी? मी तर काल आशय ला म्हणाले सुद्धा, "आयुष्यात पहिल्यांदाच मी चाफ्याचा वृक्ष आणि एवढा पूर्ण फुललेला चाफा पाहते आहे म्हणून." 

 हूं - कृष्णानं हुंकार भरला.

आणि माहिती आहे का कृष्णा, काल रात्री आम्ही दोघं फिरायला गेलो तेव्हा पुन्हा चाफा दिसला. चाफा , चंद्र आणि चांदणी तिघं एकत्र! आशयनेच न राहवून त्याचा सुंदर असा फोटो काढला बघ. मग तू एवढा काव्यात्मक संदेश त्यालाच बघून दिलास का रे? मी आपलं तेवढ्याच भाबडेपणानं त्याला विचारलं.  

         कृष्ण माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत होता. काय झालं रे? 

"काही नाही. पालथ्या घड्यावर पाणी काय असतं , ते मी अनुभवत होतो." कृष्णानं माझ्या अज्ञानाची एवढी जबरदस्त निर्भत्सना केली की,

"कोणीतरी असावं वेडू म्हणणारं

 आणि वेडू म्हणता म्हणता 

आपल्यातलं शहाणपण जाणणारं"

हा मनातला भाव मला अगदी गळून पडल्यासारखा वाटला. 

          पाचवा श्लोक सांग, त्या पाठोपाठ आलेल्या कृष्णाच्या करड्या आवाजानं माझे डोळे खाडकन उघडले -       

       

मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये। 

           क्षीणाग्रमूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥५॥ 

                                                                       (सार्थ अमृतानुभव)

विश्वमूलकारण होणाऱ्या,  स्थितिकली सृष्टीचे प्रशासन व सत्ता - स्फूर्ती प्रदान पूर्वक प्रशासन करणाऱ्या,  प्रलय कारण होणाऱ्या व परमार्थतः ज्याचे ठायी आदि स्थिती, अंत हे मुळीच नाहीत असा स्वरूपतः परिपूर्ण असा शंभू त्याला नमस्कार असो.  'पूर्ण शंभुरुपाने' अधिष्ठान 'पूर्ण परब्रम्हा'चे स्वरूप सांगून ते 'सगुण निर्गुण' असे उभय स्वरूपाचे असल्याचे या श्लोकात सांगितले आहे. 

मी पुस्तकातून अर्थासह त्याला श्लोक ऐकवला. .... आणि मला परवा सकाळी काना-मना-डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या चाफ्यापासून, संपूर्ण वृक्षात परिणत झालेला चाफा पुन्हा पुन्हा आठवला. कुमुदताईंच्या निमित्ताने जीवा शिवाचं एक होणं आठवलं. कृष्णाचा आजचा संदेश हा प्रेमात पडणारा किंवा पाडणारा नाही तर तो 'हरिहर संवाद' आहे हे कळालं. शैव आणि वैष्णव यांची संपूर्ण धारा क्षणभर डोळ्यांसमोर चमकून गेली. 

'हरिहरा नाही भेद' हे संत वचन डोक्यात चक्राकार फिरायला लागलं. 


तूच कृष्ण, तूच शिव 

तूच जीवनाची नीव

हवे तेव्हा पसरतो 

हवे तेव्हा गुंडाळतो 

कृष्णा तुला भेटताक्षणी 

आता मज शिवही कळतो ! 

संत ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद कुठेतरी उलगडत गेला आणि कुमुद ताईंच्या जाण्याचा दुःखातून कृष्णाचं बोट धरून मी बाहेर पडले. चाफ्याची वेगवेगळी रूपं मूल-अग्र-मध्य समजवत समजवत धूसर होत गेली ; आणि डोळ्यांसमोर पसरलं एक अनादी -अनंत विस्तीर्ण आकाश! 

त्या आकाशामध्ये आता किसन महाराज साखरे यांनी सांगितलेल्या पाचव्या श्लोकाचा अर्थ उलगडत होता ते लिहितात, 

"..... अतएव  विश्वाचे जे 'मूल' ती आत्मवस्तू होय,  दृश्य रूपाने आविर्भूत होणारे दृश्य-विश्व म्हणजे 'मध्य' ही ती आत्मवस्तूच होय आणि दृश्य - द्रष्टा यांचा विलय होऊन सारे विश्व विलय पावते ते 'अग्र' म्हणजे शेवटही उर्वरित राहणारी विशुद्ध संवित्  तीही आत्मवस्तूच होय. 

सारांश द्रष्टा - दृश्यात्मक जगत् क्रीडेच्या आदि मध्यांती एकमेव आत्मवस्तूच तत्वतः आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या ऐवजी अनुक्रमे मूल - मध्य - अग्र असे शब्द श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकात योजले आहेत आणि त्या तिघांना वेगवेगळे वंदनही केले आहे. 

त्याबरोबरच मूल,मध्य आणि अग्र ही तिन्ही मिळून पाहिले तर सारे विश्व परब्रम्हरूप पूर्ण शंभूहून वेगळे स्वतंत्र सत्तावान् असे नसल्यामुळे 'मूलमध्याग्रमूर्ती'लाही वंदन केले आहे. आणि सरते शेवटी हे विश्व लय पावते अर्थात् सारी दृश्य विश्वविलीन होऊन दृश्यसापेक्ष द्रष्टाही-द्रष्टेपणाही विलीन होतो. 

 तेव्हा तेथे मूल, मध्य आणि अग्र हे व या सम सर्वच भेद नाहीसे होतात, तेव्हा दृष्टीचा आश्रय असलेला लौकिक द्रष्टा, लोकिक दृष्टि-वृत्तिज्ञान आणि लौकिक सारे दृश्य जगत या सर्वांना बाजूला सारल्यावर जी 'द्रष्टा - दृश्य दशेहून  अतीत दृङ्मात्र वस्तूला अर्थात 'सगुण - निर्गुण' या उभयांहून अतीत असलेल्या 'अगुण' चिन्मय वस्तूला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 'पूर्ण शंभू' म्हटले आहे." 

सारांश सच्चिदानंद शिवाचे मूळस्वरूप अज्ञातत्व-ज्ञातत्व धर्मरहित सगुणत्व - निर्गुणत्व धर्मरहित, अध्यारोप - अपवादरहित आहे. अशा त्या सर्वत्र सदा - सम पूर्ण स्वरूप शंभूला मी नमस्कार करतो, असे श्री ज्ञानराज माऊली या श्लोकात म्हणतात. 

संपूर्ण समर्पण !


वृंदा आशय 

श्रीकृष्णार्पणमस्तु!

No comments:

Post a Comment

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...