Wednesday, 20 May 2026

.... मैं हृदय की बात रे !


 

                                                                      ....मैं हृदय की बात रे !

                                     https://youtu.be/ipsbfYhv0AI?si=_WEIPPQHjhD2-Q74

आज कुमुद ताई गेल्या. नकळत मन त्यांच्या भोवती भिरभिरत राहिले. अनेक आठवणी. तो उत्साह, तो हसरा चेहरा ती सकारात्मकता, ती आस्था आणि ते वास्तवाचे भानही. मराठी भाषा आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणारे मन, त्याचा गांभीर्याने अभ्यास करण्याची प्रवृत्ती, हा वारसा आपण जपून-वाढवून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे ही सत्प्रवृत्ती, आणि याच सदगुणांमुळे त्यांचं कायम प्रफुल्लित असलेलं हिरवं मन! 


       माझ्या प्रत्यक्ष वाट्याला आलं ते ताईंचं पिकलं वय. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणानं त्याची मधुरताच माझ्या वाट्याला आली. खरं म्हणजे ताई निश्चितच करड्या शिस्तीच्या असणार. त्याशिवाय एवढा व्यासंग आणि तोही मानसिक दृष्ट्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जपणं म्हणजे चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही त्यांच्या दुःखाचा लवलेश देखील उमटलेला मला आठवत नाही. याचा अर्थ त्यांना दुःख नव्हतं असा होऊच शकत नाही. उलट मला वाटतं अशी माणसं दुःखाच्या अतिभारानं समुद्रासारखी खोल, विस्तीर्ण आणि अथांग झालेली असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ जातो त्याच्या वाट्याला माणिक मोतीच येतात. ते भाग्य माझ्या वाट्याला आलं. या भाग्याची आज नकळत उजळणी सुरू होती. या उजळणीची लय साधली गेली आणि मला आठवलं ते सुरेल गीत -

'तुमुल् कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे '

आशा भोसले यांचा सुरेल आवाज हे गीत आपल्या थेट हृदयामध्ये उतरवतो. कवी जयशंकर प्रसाद  यांची ही विलक्षण अर्थपूर्ण काव्यरचना आपल्याला आतून हलवून टाकते. अनेकवेळा हे गीत ऐकताना अंतरीचा दाटून आलेला उमाळा मी अनुभवलेला आहे. मध्यंतरी याच गीताबाबतची विरक्तीही मी फार जवळून अनुभवली. अगदी स्वतःला काय झालं हे तपासून पहावं वाटावं इतकी ती विरक्ती तीव्र होती.

 
        खरं म्हणजे खूप दिवसांपासून मला या गीतावर काहीतरी लिहावं या गीताचा रसग्रहण करावं अशी मनी मानसी इच्छा होती. पण थेट आतला आवाज निघत नाही तोपर्यंत लेखणी काही लिहीत नाही, लेखणीच्या या सद्गुणाबद्दल खरं म्हणजे मी तिची फार कृतज्ञ आहे. जेव्हा जेव्हा या गीताबद्दल लिहिण्याचा मी विचार करत होते तेव्हा तेव्हा त्यातील अलवार, नाजूक भावनांना शब्दांचा स्पर्श सोसवेल की नाही, आशाताईंच्या सुरांनी शब्दांना, त्याच्या अर्थवलयांना जो एक जबरदस्त न्याय दिलेला आहे त्याच्या काठावर तरी माझ्या शब्दांना उभे राहता येईल का नाही हा प्रश्न देखील मला सतावत असे.


                 आज मात्र कुमुद ताई गेल्या तेंव्हा अगदी आतून हे गीत माझ्या खूप जवळ आलं. त्यावर लिहावं अशी इच्छा झाली. कदाचित '... मैं हृदय की बात रे' असं न म्हणताही, कुमुद ताईंच्या शब्दांनी माझ्या हृदयाचे कोवळेपण जपण्याचे काम कळत - नकळत केले. खरं म्हणजे आम्ही दोघी परस्परांशी फार बोलत होतो, असं घडत नव्हतं. काही काम असेल तरच कामाच्या निमित्ताने एकमेकींना फोन व्हायचा. साहित्यातलं काही छान सापडलं की त्याची आपसूक देवाण-घेवाण व्हायची. मात्र त्याच धाग्यानं आमच्यातलं नातं अतूट केलं होतं एवढं मात्र निश्चित.

 
           दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर कुमुदताई अनेकांना सुविचार पाठवायच्या. सहज म्हणून ते वाचले जात होते. आपल्या अवतीभवतीची परिस्थिती सातत्याने बदलती असते. कदाचित आपण जे वाचतो त्याचा संबंध आपल्या परिस्थितीशी आपण नकळत जोडतो. माझंही आपसूक असं घडत गेलं असावं. एके दिवशी मात्र माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझ्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण व्हायचे, गोंधळ निर्माण व्हायचा, to be or not to be अशी मनाची स्थिती होऊन जायची ; अशा काळात दुसऱ्या दिवशी पहाटेच आलेला कुमुद ताईंचा संदेश मला स्पष्टपणे दिशा दाखवत असे. हे योगायोग म्हणून एक दोन वेळा नव्हे तर जवळपास पाच सहा महिने मी अनुभवलं. माझ्यासाठी हे खरोखर आश्चर्य होतं - कारण कुमुद ताईंना माझ्या प्रश्नांबद्दल मी कधी काही बोलले नव्हते, साहित्य सुखाशिवाय अन्य कोणत्या सुखदुःखांची देवाणघेवाण आम्ही कधी केलीच नाही. तरी हे असं घडत होतं. मग त्या मला

'तुमुल् कोलाहल कलह में,
मैं हृदय की बात रे '

अशा भासल्या तर त्यात आश्चर्य ते काय? त्यांच्या अशा भासण्याबद्दल मला त्यांच्याजवळ कृतज्ञता देखील व्यक्त करता आली, याचा मनाला आनंद आहे. अन्यथा आज मला रुखरुख लागून राहण्याचं आज तेच  एक फार मोठं कारण ठरलं असतं.


           त्यांच्या निमित्ताने मी विचार करायला लागले असं 'हृदय की बात' होण्याची क्षमता कोणामध्ये असते? जाणवायला लागलं, 'जो कोणी  नि:स्वार्थपणानं आपली काळजी करू शकतो, घेऊ शकतो अशी कोणतीही व्यक्ती 'हृदय की बात' होऊ शकते. तिथे स्त्री - पुरुष असणं, विशिष्ट नातेसंबंध असणं किंवा नसणं, वय, धर्म, जात भाषा अशा कोणत्याच गोष्टीचा काहीही संबंध नसतो. फक्त संत ज्ञानदेवांनी सांगितल्यानुसार 'ये हृदयीचे ते हृदयी' करण्याची क्षमता असावी लागते. ते हृदय संत मुक्ताबाईंनी केलेल्या अपेक्षेसारखं 'गंगाजळ' असावं लागतं. मग कोणताही कोलाहल तुम्हाला वेढू शकत नाही, संपवू शकत नाही.

 
             खरं म्हणजे या काव्याचं एक एक कडवं आपण जसं वाचत जातो तसं  कवीच्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हायला लागतो. या कडव्यांमधून फार सुंदर पद्धतीने ते मनाची जी स्थिती वर्णन करतात आणि 'हृदय की बात' होणा-या व्यक्तीसाठी ज्या प्रतिमांचा अवलंब करतात त्या प्रतिमांचे कौतुक करणे शब्दातीत आहे. इतक्या चपखल आणि मार्मिक प्रतिमा त्या आहेत की, 'या सम याच' असाच भाव रसिकाच्या मनामध्ये उमटतो.

 
           एखाद्याचे मन जेव्हा व्याकुळ होते, आणि ही व्याकुळता दीर्घकाळ टिकते तेव्हा खरंतर ती माणसाच्या जीवनातला रस शोषून घेत असते. काही घटना आयुष्याला कधी कधी अशी काही कलाटणी देतात की 'सर्वस्व वाटणारे आयुष्य अर्थशून्य वाटायला लागते' ; जीवन अशा धोकादायक वळणावर जेव्हा उभे असते तेव्हा केवळ माणूस नव्हे तर त्याचे सबंध आयुष्यच 'अस्वस्थ' झालेले असते , हे वास्तव आहे. ती अस्वस्थता त्याची झोप उडवते, थकवा आणते हे काही दृश्य परिणाम आहेत. खरं म्हणजे ती अवस्था हिमनगाच्या टोकासारखी असते. बरं जे काही दिसत असते त्याच्याखाली न दिसणारे, आकलन न होणारे पण प्रचंड परिणाम साधणारे, असे काहीतरी निश्चित रूपाने घडत असते. एक प्रकारे त्सुनामी आल्यानंतर समुद्रामध्ये जी काही खळबळ माजते तशा प्रकारची खळबळ संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होते. आयुष्याबद्दल वाटणारी उदासीनता त्याला नकारात्मकतेकडे नेते, इतर माणसं त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्याशी इतकी कोरडेपणानं वागायला लागतात की त्याचं आयुष्य त्याला वाळवंट वाटावं. अशा वेळेला 'हृदयकी बात' होणारी व्यक्ती मलया पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्यासारखी 'चंदनसुगंधी' आणि 'शीतल' होऊन त्याच्या आयुष्यात येते ; ती त्याला देव वाटली नाही तरच नवल!


          खरं म्हणजे 'विषाद' ही मनाची एक अवस्था आहे. उन्हानंतर सावली,  सुखानंतर दुःख यावे तसे आपले मन अधूनमधून विषादाकडे वळतच असते. मात्र ज्याच्या आयुष्यामध्ये त्सुनामी निर्माण झालेली आहे, अशा मनुष्याचे मन कवी वर्णन करतात तसे 'चीर विषादामध्ये' विलीन होते. जणू काही त्याच्यासाठी 'विशाद' हीच एकमेव अवस्था असते, सत्य असते. आपली व्यथा, आपली दु:ख त्याच्याभोवती एक घनघोर अंधार निर्माण करतात, जिथे त्याच्या मनाची अवस्था '...आता सगळं काही संपलं', अशी होऊन जाते. अशा वेळी 'हृदय की बात' होणारी व्यक्ती त्या गडद अंधाराला छेद देणारी प्रकाशरेषा होते. पणतीची मिणमिणती ज्योत होते. 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल' हा विश्वास देणारी झुंजुमुंजू पहाट, दिलासा देणारी सकारात्मकता होते.

 
           चैतन्याच्या अभावी झालेल्या रखरखीत जीवनाच्या वाळवंटात आपण मधोमध उभे आहोत अशी अवस्था झालेला हा माणूस खरं म्हणजे स्नेहाच्या, आपुलकीच्या थेंबासाठी आसुसलेला असतो. मात्र त्याच वेळेला आपली ही अवस्था कोणाच्याही लक्षात येऊ नये अशी त्याची तीव्र इच्छा असते. ती इच्छा प्रबळ ठरते. टणकपणाचे, कठोरतेचे आवरण धारण केलेला हा माणूस इतरांना त्रासदायक,बोचणारा असा वाटायला लागतो. खरं म्हणजे त्याला स्वतःला ज्या खोलवर जखमा झालेल्या असतात त्याचा हा परिपाक असतो. माणूस शेवटी तेच देऊ शकतो जे त्याच्या आतमध्ये खोलवर रूजलेले आहे. असे होणे हे मात्र चुकीचे आहे, हे त्याचा सद्सद्विवेक त्याला सांगत राहतो आणि जाणिवेच्या कात्रीत सापडलेल्या या माणसाला परिस्थिती मौनाकडे, निष्क्रियतेकडे वळवते. अशा वेळी 'हृदय की बात' होणारी व्यक्ती 'सरस बरसात' होऊन येते. जी केवळ सडा शिंपण्याचं काम करत नाही तर सारी नकारात्मकता धुऊन काढून सकारात्मकतेची बीजं पेरण्याचं काम करते. 'हृदय की बात में वह बात होती है| '


          एखाद्या ठिकाणी कोणाला बंदिस्त केलं आणि त्याला बाहेरून आग लावून दिली तर या जीवघेण्या कृत्याला आपण क्रूरता म्हणतो. कधी कधी जीवनात अशा अवस्था निर्माण होतात की, मानसिक प्रतिकूलतेच्या ज्वाळांमध्ये माणूस लपेटला जातो, मागे जाता येत नाही आणि पुढे हलता येत नाही अशा अवस्थेत तो जागच्या जागीच गुदमरायला लागतो अशा वेळी 'हृदय की बात' होऊन येणारी व्यक्ती , 'ज्वाळांच्या खोचक आणि बोचक प्रकाशाला मंद करत शांतता देणाऱ्या,  शीतल करणा-या, फुलवणा-या वसंत ऋतुतील रात्रीसारखी असते.'


          जिथे आकाशात काळ्याकुट्ट निराशेचे ढग भरून आलेले असतात, त्याची सावली माणसाला दुःखात लोटत राहते, अशा वेळी 'हृदय की बात' होऊन येणारी व्यक्ती, अशा एखाद्या पाण्याच्या तलावासारखी भासते जिथे कमळं उमलत आहेत, भुंगे आनंदाने गुंजारव करत आहेत. ही लक्षणं उमलत्या जीवनाची, प्रेममयतेची आहेत.

 
           मी जेव्हा विचार करायला लागते खरंच अशा व्यक्ती असतात का तेव्हा माझा कृष्ण हसून म्हणतो, "ही असते माणसाच्या मनातली दृढ श्रद्धा जी काही देवासारख्या वाटणाऱ्या माणसांच्या निमित्ताने जागी होते."
             कुमुद ताई माझ्यासाठी 'देवमाणूस' ठरल्या. कुमुद ताई, तुमच्या या वाटेवर चालताना मला निखळ माणूस होता आलं तरी आनंदच आहे.

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!
        

      

No comments:

Post a Comment

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...