Monday, 25 May 2026

सांजवात !

 


•| ॐ |•

सांजवात ! 

घरोघरी असावी ती सांजवात जी 

 सांज लांबवते अंधाराला थांबवते 

 देते हो उगवतीला विश्वासाचा हात 

गरज पडताच प्रकाशाची होते वात !


सुदैवाने माझ्या बालपणी मी माणसांनी श्रीमंत असलेली अशी घरं पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. माझ्या माहेरी आणि माझ्या आजोळी रग्गड म्हणजे भरपूर माणसं ! त्यामुळे नात्यांचा नुसता पाऊस पडायचा. हे याचे त्याचे आते - मावस - सख्खे - चुलत - मामे, हे अमके - तमके,  हे अमक्याचे तमके वगैरे वगैरे वगैरे... त्या काळामध्ये 'मनुष्यबळ विकास', 'ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट' अशी काही संकल्पना होती किंवा नाही - माहीत नाही. माझ्यापर्यंत तरी शास्त्रोक्त पद्धतीने पोहोचलेली नव्हती. मात्र माणुसकीचे शास्त्र जपत, आयुष्याच्या कलेकलेनं घेत माणसं जोडणारी 'कला' अनेक जीवनं समृद्ध करताना आम्ही जवळून अनुभवत होतो. आजचा त्याचा अभाव पाहिला म्हणजे ती 'माणुसकीची नाती' हाच मला भगवद्भाव वाटतो. 

       काही न सांगता, सवरता, न शिकवता तिथं माणसं अनुकरणातून घडत होती. आपण घडत आहोत हे देखील त्यांना कळत नव्हतं. पुढे कालानुरूप आपली आपली वाट गवसली की मग आयुष्याचा मागोवा घेताना आपण किती दूरवर, किती कष्टाने पण सभोवतीच्या माणसांमुळे किती सहजतेने चालून आलो हे कळत होतं. मूल्यांकनाचे कोणतेही शास्त्र त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे काठोकाठ समाधानानं ही माणसं तृप्त होत होती. आपल्याला घडवणाऱ्याला मनातल्या मनात हात जोडत होती. 

               आज हे सारं काही आठवण्याचं कारण तरी काय? आपलं  दैनंदिन जीवन. रोजच्याच आयुष्यातले प्रसंग, आणखी काय? 

           परवा चिरंजीवांना जरा मदतीला बोलावलं. योग्य ती मदत लवकर न मिळाल्यामुळे थोडंसं आवाज वाढवून बोलावं लागलं, तेही नेमकं घराचं गेट लावल्यावर, रस्त्यावर. तेव्हा माझ्या हातातलं ओझं पटकन न घेता माझं रस्त्यावर ओरडणं कसं चुकीचं आहे, आणि मी नेहमीच कशी चुकते, मी शांततेने कसं बोललं पाहिजे याचे उत्तम धडे त्याने मला दिले. त्याला माझ्या ओरडण्याचं जे भावनिक ओझं झालं होतं त्यापुढे माझ्या हातातलं प्रत्यक्ष ओझं शून्य होतं.  चूक कोणाची? सुधारायचे कोणी?

          काल माझे वडील माझ्या घरी आले होते. मन आनंदाने नाचत होतं. घरभर बागडत होतं. खळखळून हसत होतं. सुयोग्य ठिकाणी दाद देत होतं. मोठ्या समाधानाने ते झोपी गेलं. पहाट झाली. वडिलांची निघण्याची गडबड. माझा आग्रह. नाष्टा तरी करून जाच. त्यांना त्यांच्या कामाची ओढ. शेवटी तडजोड झाली. फक्त चहा पिऊन ते निघणार असं ठरलं. 

           बाहेरच्या खोलीत आल्यावर सासूबाईंनी त्यांना विचारलं, "मिळाली का परवानगी?" ते हसतच म्हणाले, "हो. पूर्वी त्यांना परवानगी द्यावी लागत होती, आता त्यांची परवानगी घ्यावी लागते." परीक्षेचा अभ्यास करत कोपऱ्यात बसलेली माझी लेक तत्क्षणी प्रतिक्षिप्त होत म्हणाली, "मी पण त्याचीच वाट पाहते आहे, अण्णा." तिचा मथितार्थ आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आला. पण प्रसंग हसण्यावरी नेला. कदाचित कृष्णाने दिलेल्या संयमानं, मला तिथेच जागं केलं आणि सांगितलं तिला बोलायची ही वेळ नव्हे. 

           तिच्या परीक्षेमुळे मी तिला बोलणार नाही. काही दिवसांनी जेव्हा हा विषय निघेल त्या वेळेला त्याचं काय आता? त्यात काय इतकं? असं म्हणून तो वरच्यावर उडवला जाईल. चुकलं तेव्हा सांगितलं तर परीक्षेच्या अभ्यासाचा मूड जाईल, नाही सांगितलं तर 'आपली चूक झालेली आहे ती स्वीकारणे आणि सुधारणे गरजेचे आहे; हे कळणारच नाही, हे वास्तव आहे.' माझ्यातली 'आई आणि बाई' कात्रीत सापडलेली पाहिली आणि कृष्ण गोड हसला. माझी उडालेली भंबेरी पाहून तो मला थेट भूतकाळात माझ्या मनातल्या 'देवघरा'त घेऊन गेला आणि एका बाजूला शांत उभा राहिला. त्या देवघरात गेल्याबरोबर मला आठवण आली सांजवातीची !

            माझ्या दोन्ही आज्या म्हणजे 'आईची आई' आणि 'वडिलांची आई' मला दीर्घकाळ अनुभवायला मिळाल्या. त्यात घरात मी सगळ्यात छोटी असल्यामुळे अगदी स्वाभाविकपणे लाडकी होते. आधीच दुधावरच्या सायीचं नातं आणि त्यात शेंडेफळ, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचे सुख मला भरभरून उपभोगता आले. खरं म्हणजे माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये एवढं अंतर होतं की 'वय आजीचं आणि माया पणजीची' असं एक सुरेख रसायन मला अनुभवायला मिळालं. ज्या वडिलांना, काकांना , मामाला, सगळे भितात त्यांना रागावणारं, वेळप्रसंगी धाक दाखवणारं आणि धकाधकीच्या जीवनामध्ये ते थकले तर आपला थरथरता हात त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने फिरवून त्यांना नवी उभारी देणारे, 'आजी - आजोबा' , 'पणजी - पणजोबा' ज्या घरामध्ये आहेत ना तिथली सांजवात कधीच विझत नाही आणि तिथला देव कधीच रुसत नाही. देव प्रसन्न राहिला की माणसांवर कृपा करतो आणि माणसांचा रस्ता कधीच चुकत नाही. मला 'सांजवात' हवी आहे त्या शाश्वत प्रकाशासाठी !

          'डस्टबीन' या संबोधनाने  हेटाळणी केल्या जाणाऱ्या या काळाला या 'सांजवाती'चे महत्त्व पटेल काय? काय करते ती 'सांजवात'? 

        त्या 'सांजवाती'ला ठाऊक असतं, 'मान सांगावा दुसऱ्याला अन् अपमान सांगावा स्वतःला' ; त्यांना ठाऊक असतं कधी, कुठे, कसं, केव्हा कोणत्या पट्टीत बोलायचं ? कोणाला काय सांगायचं ते. कारण अनुभवाच्या भट्टीतून ते शिकले, सवरलेले असतात. 'चारचौघात कौतुक करावं आणि घरातल्या घरात रागवावं' हे त्यांना सांगावं लागत नव्हतं. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पोटामध्ये जी एक निःस्वार्थ माया, कळकळ आणि आस्था विकसित झालेली असायची ती स्वतःच कार्यरत होत होती. त्यांनी किती पुस्तकं वाचले यापेक्षा त्यांनी किती माणसं वाचले, त्यांना ते समजले आणि काहीही झालं तरी आपलं घर तुटू द्यायचं नाही हा जो त्यांचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असायचा त्यासाठी मला 'सांजवात' हवीशी वाटते. 

        ती नातवंडांना जोजावते. आपल्या मुलाबाळांना रागावते. वयोमानानुसार शरीर थकलं असलं तरी परिस्थितीनुसार मनाला खंबीरपणे लढण्याची, जगण्याची अतूट ताकद देते. पिढ्यापिढ्यांचं मूल्य संचित स्वतःच्या जगण्यातून ते हस्तांतरित करत जातात माणसाच्या जगण्याला सोनेरी भरजरी किनार देत राहतात. 

        'सांजवात' जपूयात त्या वैभवासाठी, आयुष्य समाधानी होण्यासाठी! 

        आज 'असमाधानाच्या उंबरठ्यावर' उभी राहिलेली भारतीय कुटुंबव्यवस्था पाहिली की मला लक्षात यायला लागतं, हे प्रसंग आणि त्यांनी माझ्या मनामध्ये निर्माण केलेली वावटळ ही मर्यादित नाही. तात्पुरतं कोणालातरी सांगावं, कोणालातरी रागवावं यानं हा प्रश्न मुळापासून सुटणारा नाही. आपल्या नातेसंबंधांमध्ये पडत जाणार अंतर, होत जाणारी भांडणं, विलंबाने होणारे विवाह, घडत जाणारे घटस्फोट, तुटत जाणारी घरं, वाढती व्यसनाधिनता आणि दुरावत चाललेली माणसं दिसतात त्या सगळ्यांचा मूळ याच ठिकाणी मला सापडतं. 

           कदाचित तंत्रज्ञानाने आम्हाला आधुनिक करून आणि माहितीचा प्रचंड साठा एका क्लिकवर आणून ठेवून आम्ही शहाणे - सुरते झाल्याचा गोड गैरसमज आपल्यामध्ये निर्माण केलेला आहे. या सगळ्यांनी आपल्यामध्ये जागवलेला जो अहंकार आहे हा अहंकार वयाचं शहाणपण,अनुभवाचं संचित, पाहिलेले उन्हाळे-पावसाळे, खाल्लेल्या खस्ता आणि टक्के - टोणपे सारेच काही नाकारतो आहे. कदाचित या नकाराने अस्वस्थ होऊन पूर्वी जी नाती ऊब देण्याचे काम करायची ती देखील आता दुर्दैवाने स्वतःची 'स्पेस' शोधायला लागलेले आहेत. माझी सेकंड इनिंग माझी स्वतःची आहे, ज्याचा त्याचा संसार ज्यानी - त्याने करावा ही त्यांच्या दृष्टीने रास्त असलेली भूमिका घ्यायला लागलेले आहेत. प्रासंगिक चर्चेला आणि सल्ला- मसलतीला आपुलकीपेक्षा औपचारिकतेचा स्पर्श अधिक आहे. या दोन पिढ्यांमध्ये दुवा सांगणारी नातवंडांची पिढी 'टेनिसचा खेळ' पाहिल्यासारखं एकदा यांच्याकडे, एकदा त्यांच्याकडे पाहते आहे. त्यांच्या काळाने त्यांच्यासमोर अजस्त्र समस्या उभ्या केलेल्या आहेत. अशा काळात काय निर्णय घ्यावा, कोणाला अनुसरावे, आणि आपला मार्ग कसा शोधावा हा प्रश्न त्यांना चक्रव्यूहासारखा वाटला तर दोष कोणाला द्यायचा? अभिमन्यूला कोणी वाचवायचे? मार्गस्थ करायचे?

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् महाजनो येन गतः सः पन्थाः ।।

          

हे कृष्णाने युधिष्ठिरामार्फत दिलेले उत्तर स्वीकारायचे  का टाळायचे?


वृंदा आशय 

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

2 comments:

जांभूळ पिकल्या झाडाखाली....

                                                                              •| ॐ |•                                     https://youtu.be/W...