Friday, 12 June 2026

....नुरे काही!

https://share.google/9Iswk7X8u8H9PiY6y 




.....नुरे काही!


जिथे शब्दांचा गाव संपतो आणि ती सीमारेषा आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन जाते, तिथे आपलं स्वागत करतो मधुर वारा ! आज बागेमध्ये याच वाऱ्याने माझे स्वागत केले आणि साहजिकच मनाला स्पर्शून गेला संत ज्ञानेशांचा अभंग 'अवचिता परिमळू' ! परमेश्वराच्या दर्शनाची उत्कंठा लागलेल्या मनाची ती काय सुरेख अवस्था असेल,  कुठून असा अवचितपणाने - अचानक सुगंध येतो. हा सुगंध कशाचा आहे ? हा फुलाचा नाही. हा मातीचा नाही. हा सुगंध आहे परमेश्वराच्या अस्तित्वाचा ! काय वर्णन आहे. सुगंध आल्याक्षणी मला वाटलं परमेश्वर आला की काय? मग या परमेश्वराने धारण केलेल्या किंवा त्याला वाहिलेल्या फुलांचा हा सुगंध आहे का? त्याला लावल्या जाणाऱ्या चंदनाच्या उटीचा हा सुगंध आहे का? मला वाटतं हा  सुगंध त्या दोन्हींचाही नाही. देवाला फुलं वाहून,  चंदनाचा लेप लावून जे मन सुगंधित झालेले आहे, जे मन इतरांच्या भल्यासाठी झीजण्याला सिद्ध झालेले आहे ; त्या मनाचा हा सुगंध आहे. त्या सुगंधीत मनामध्ये साक्षात परमेश्वर प्रकटत आहे. त्या परमेश्वराची लागलेली ही ओढ आहे आणि म्हणून 'अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू' परमेश्वर तुमच्या आमच्यासारखा दरवाजा वाजवून, आपली परवानगी घेऊन येणार नाही. तो अवचितपणेच येणार . तो सुगंध आपल्याला जे काही वेड लावतो त्याबरोबर आपण बघायला जातो, "माझा गोपाळ आला की काय? माझा कृष्ण आला की काय ? काय होतं पुढे? कुठे दिसतोआहे म्हणून शोधायला जावं तर केवळ थक्क होऊन जातो.

      ज्या परमेश्वराच्या दर्शनाची आस लागलेली आहे, तो आला की काय म्हणून घाबरत घाबरत त्याला पाहायला जावं. घाबरत का ? कारण आजवर केवळ आणि केवळ त्याचाच विचार केलेला आहे. जो विचार केलेला आहे तो साक्षात दर्शन देणार असेल तर जीवाची अवस्था भावविभोर अशी होऊन जाते. त्यामुळे हे भय आहे. हे भय नेहमीच्या प्रश्नातून , परिस्थितीतून निर्माण झालेले नाही. तर ज्याच्यासाठी प्रवास चाललेला होता, ते साक्षात सिद्ध होणार आहे !  हे सिद्ध झाल्यानंतर पुढे काय ? कारण आनंद प्रवासामध्ये असतो. पोहोचण्यामध्ये त्याचे सार्थक होते. सार्थक झाल्यावर पुढे काय? मला ठाऊक नाही.  कदाचित म्हणून हे बावरणं असेल, घाबरणं असेल, ठाऊक नाही.


तो सांवळा सुंदरू कांसे पीताम्बरू । 

लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥


संत ज्ञानदेवांना तो सावळा सुंदरू  प्रत्यक्ष रूपामध्ये दिसतो. ज्या रूपामध्ये तुम्ही आम्ही मूर्ती पाहतो, प्रतिमा पाहतो, छायाचित्र पाहतो हे कदाचित त्यांच्या या अभंगांमधूनच आपण निर्माण केलेले आहे ; त्या परमेश्वराने त्यांना साक्षात दर्शन दिलेले आहे. 

     वैखरी पासून सुरू झालेला माणसाचा प्रवास परावाणी पर्यंत जातो आणि परावाणीमध्ये गेल्यानंतर हे मौन कोणत्या दर्शनाला माणसाला सिद्ध करेल हे सांगता येत नाही. ते व्यक्तीच्या साधनेंनुरूप वेगवेगळ्या प्रकारचे देखील असू शकते. इथे ज्ञानदेवांना झालेले हे जे दर्शन आहे त्याचे दर्शन युगानुयुगे आपण घेत आलेलो आहोत आणि आजही नामाची तीच पंढरी आपल्याला आपल्या विठ्ठलापर्यंत पोहोचवते. त्यामुळे ज्ञानदेवांनी लावण्यमय दर्शनाचे हे जे वर्णन केलेले आहे त्याला वेगळ्या शब्दांमध्ये व्यक्त करताच येत नाही.

        या परमेश्वराचा, त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या साक्षात दर्शनाचा, या विश्वाच्या मूळ चैतन्याचा जेव्हा बोध होतो त्या वेळेला मन थक्क होऊन जातं. तोच श्वास होतो. श्वास होतो की श्वास थांबतो?  'सोकोनी घेतले प्राण माझे गे माये'  त्या शिवाचे दर्शन झाल्यानंतर जीव वेगळा कशाला राहील हो ?प्रवासात आनंद आहे हे खरंच पण पोहोचण्यात जी सार्थकता आहे ती शेवटी माणसाला आकर्षित करतेच ना. ...आणि मग आपल्याला दिसतात 'संजीवन समाधी'कडे वळालेले संत ज्ञानदेव. माझे कार्य आता संपलेले आहे आणि मी थांबलो पाहिजे ही जाणीव ज्याला होते आणि परमात्म्यामध्ये जो स्वतःहून विलीन होतो ; आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. तिथे आपण विनम्र भावाने केवळ वंदनच करावे. कोणताही तर्क तिथे पोहोचू शकत नाहीत. कोणतेही विज्ञान त्याला उलगडून दाखवू शकत नाही. विज्ञानाच्याही पलीकडे परमात्म्याचा, अनुभूतीचा असा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मौन होऊन जमलं तर त्या अनुभूतीतला अंश आपण उचलावा, अन्यथा मनाला रिते राहू द्यावे ,पण प्रश्न उपस्थित करू नयेत.


बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा । 

तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥


त्या परमेश्वराच्या दर्शनाने काय होते? ते दर्शन कायवाचामने वेधून घेते.  आमचे योगशास्त्र आम्हाला विचार करणे काय, आणि विचारातून स्फुरलेली कृती काय ती सुद्धा काय वाचा मनेच करण्यास सांगते. इथे परावाणीच्या प्रदेशात गेल्यानंतर, अनुभूतीच्या प्रदेशात गेल्यानंतर ; त्याच कायावाचामने  तो बाप रखुमादेवीवर विठ्ठल वेधून घेतो. त्याने वेधून घेतल्यावर काय शिल्लक राहणार आहे? काहीच नाही. काहीच नसणे हे  सगळे काही असण्याच्या पलीकडे जाऊन, मग काहीच नसणे. नुरे काही....


संपूर्ण समर्पण!


श्रीकृष्णार्पणमस्तु!

No comments:

Post a Comment

....नुरे काही!

https://share.google/9Iswk7X8u8H9PiY6y   .....नुरे काही! जिथे शब्दांचा गाव संपतो आणि ती सीमारेषा आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन जाते, तिथे ...