Saturday, 13 June 2026

 •| |• 

चहा - कॉफी 


चहा आणि कॉफी ही दोन्ही माझी आवडती पेये आहेत. मात्र मी यांच्यावर ब्लॉग वगैरे लिहील असा कधीही विचार केला नव्हता. मात्र आज दहा-साडेदहापासूनच 'कॉफी' या विषयावर ब्लॉग लिहिण्याची मनामध्ये तीव्र इच्छा होती. काय हा वेडेपणा ! असं मीच मला म्हणत थोडंसं त्या इच्छेला बाजूला ठेवून दिलं. अर्थात सकाळची वेगवेगळी कामंही सुरू होती. क्षणभर जरी उसंत मिळाली तरी 'कॉफी ब्लॉग' आपला डोकावून घ्यायचा. शेवटी मी विचार केला - एकदा कॉफी पिऊन घेऊयात म्हणजे लिहावं वाटणार नाही. दूध उकळायला ठेवलं आणि शोधाशोध केल्यावर कळलं, कॉफी संपलेली आहे. मनात मात्र कॉफी होती. त्यामुळे आता बाहेर गेल्यावर येताना घेऊन येऊ असं ठरलं. बुटीक मध्ये काम होतं तिथे गेले. चहाचा गाडा समोरच दिसला. बुटीक मधल्या माझ्या मैत्रिणीला मी म्हणाले घेणार का चहा, मी सांगते, मला घ्यायचा आहे. पण मी तिच्याकडे गेल्यामुळे तिनेच मला ऑफर देत विचारलं, " कॉफी घेणार का? सुंदर करतो तो." आहा. माझी अवस्था तर 'आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन' अशीच झाली. पुढच्या कॉफीमय अवस्थेत सगळीचं कामं व्यवस्थित आणि आनंदात झाली. इतकंच काय भर दुपारी दोन वाजता, ".... गडे उन्हाचे गोड चांदणे!" असं मला रस्त्यावरचं वातावरण भासायला लागलं. आता एक कॉफी इतकं काही करत असेल तर, 'ब्लॉग लिखना तो बनता है भाई' असं माझ्याशी पुटपुटत केव्हाच ब्लॉग लेखन सुरूही झालं. 

          गंमत अशी. 'कॉफी' हे शीर्षक लिहिणार तर हळूच चहा मनात डोकावला.''...ती कधीतरीची म्हणून तिला एवढा भाव का? ... आणि मी रोजचाच. म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष का?'', चहाचे हे मनोगत ऐकून मला हसूच आले. त्याच्या इच्छेचा सन्मान करत ब्लॉग शीर्षक झाले 'चहा - कॉफी'

 

             ये चाय हमे बहु चाहत है 

             दिल को बड़ी जो राहत है

 

असे घोषवाक्य बनवून, मी रोज दोन तीन कप चहा आनंदाने घेते. मात्र खरं सांगायचं तर चहा ताणातून मुक्त करतो. डोकं दुखत असेल तर चहाला पर्याय नाही. त्यामुळे 'दिल को' असं म्हणण्याऐवजी 'दिमाग को' असं म्हणायला पाहिजे. कॉफी मात्र खऱ्या अर्थाने 'दिल को बड़ी जो राहत है' अशीच आहे माझ्यासाठी. 

            खरं म्हणजे माझ्या नकळत्या वयापासून कॉफी मला आवडते. कदाचित माझी सर्वात मोठी बहीण छायाताई दररोज कॉफी घेते या गोष्टीचं एक अनाहूत आकर्षण मला होतं. त्या आकर्षणापोटी मी पण कॉफी कडे वळाले असेल असं वाटतं. अर्धवट वयात कॉफी माझ्यासाठी फक्त पेय नव्हतं. ती माझी सुखदुःखाची सोबती होती. आनंद वाटला. कॉफी प्या. साजरा करा. मन दुखावलं. कॉफी प्या. हलकं करा. इतकं आमचं सुखदुःखाचं गणित साधं सरळ. 

     मध्यंतरी विद्यार्थ्यांना 'जाहिरात' हा विषय शिकवायचा होता. मी आणि आशय त्यावर चर्चा करत होतो. त्याला म्हणलं, "मुलं उगीच थातूरमातूर काहीतरी लिहून आणतात. खरं म्हणजे 'जाहिरात क्षेत्रातल्या' विविध संधींचा विचार केला तर स्वतःची कौशल्य विकसित करून मुलं स्वावलंबनाचे अनेक मार्ग निवडू शकतात. आता या वेळेस मीच त्यांना काही जाहिराती लिहून दाखवेल. (रविराज ॲड एजन्सीमध्ये, अर्चना देशकर मॅडमच्या हाताखाली पाच महिने काम केल्यामुळे 'कॉपीरायटिंग' (जाहिरातीचे मसुदा लेखन) हा माझा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यादिवशी आम्ही कॉफी घेत होतो. म्हणलं कशी करूयात कॉफीची जाहिरात ? आमची आपली शब्दांची जुळवाजुळव सुरू झाली. 

तरुण मुलं, त्यांची मनं, कॉफी, कॅफे, काफी या शब्दांमधला रिदम असं बरंच काय काय एकमेकांना सांगत शेवटी दोन ओळी तयार झाल्या - 

 

एक ही कॉफी काफी है

      सारे गुनाहों को माफी है !

 

मग 'सारे' म्हणायचं की प्यारे की 'प्यार में' म्हणायचं, यावरही आम्ही चर्चा केली. त्यात आमची तारुण्याच्या उंबरठ्यावरची मुलं घरात असल्याचं भान जागल्याबरोबर ; कोणत्या गुन्ह्यांना माफी असू शकते आणि नसू शकते इकडे आमची चर्चा आपसूकच वळली.           

                चहाचा आणि माझ्या माहेराचा संबंध फार वेगळा. खरं म्हणजे माझे सर्वात मोठे ना.वि. काका यांनी कधीही चहाला स्पर्श केलेला नाही. त्यामुळे त्यांची मुलं ( माझे भाऊ) सुद्धा कधीही चहा घेत नाहीत. त्यामुळे एकूणच आमच्या घरामध्ये 'चहा घेणं' ही एक मोठी चूक समजली जात होती. मात्र जसजशी आधी आमच्या काकांची, आणि पुढे भावांची लग्नं होत गेली तसतशी ही समजूत शिथिल होत गेली. अन्यथा आमच्या घराबाबत इतरांच्या मनात ज्या अनेक आदराच्या गोष्टी होत्या, त्यात 'चहा न घेणे' ही पण बाब समाविष्ट होती. मी मात्र ही परंपरा राखू शकले नाही. 

       आताच्या काळात घरात काय आणि बाहेर काय, 'चाय पे चर्चा' असं म्हणत वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पा होतात. अर्थात म्हणून मला चहा कॉफीसाठी कंपनी लागतेच, असंही नाही. 'एकटा जीव सदाशिव' अशा मनोभावाने मी एकटीच अनेक वेळा चहा - कॉफी घेते. आजूबाजूची झाडं, पानं, फुलं, आकाश मला रमवण्यासाठी असतंच. चहा घेऊन झोप जाईल, असा विचार करत चहा घेतला की मला चहा घेतल्यावर उत्तम झोप लागते. त्यामुळे 'चहासाठी चहा' अशा निष्कर्षावर येऊन निखळ आनंदाने मी चहा पीत असते. उस्मानपुऱ्यामध्ये माझं आणि आशयचं एक चहाचं आवडतं ठिकाण आहे. मूड आला की आम्ही आवर्जून तिथे पोहोचतो. 

           सुरुवातीला नाही म्हणता म्हणता चहा कधी माझा झाला आणि मी कधी चहाची झाले ते मला खरंच कळलं नाही. आता पावसाळ्यामध्ये इतके विविध प्रकारचे चहा होतील की पाहता सोय नाही. चहाचं विशेष निमित्त करायला आम्हाला ढग आले तरी पुरतात. बाकी हवामान खात्याचा अंदाज काहीही असो आणि अन्यत्र कुठेही पाऊस पडला तरी त्याच्या आठवणीत का होईना, पण चहा घेतला पाहिजे ; उन्हाळ्यामध्ये सूर्याचे तापमान आणि आपल्या शरीराचे तापमान यात योग्य तो समतोल राखण्यासाठी चहा आवश्यक आहे, असाही स्वतःला अनुकूल तो निष्कर्ष मी काढलेला आहे. थंडीची कुडकुड तर चहाशिवाय थांबतच नाही. शेवटी काय तर - 

          असो ऋतू कोणताही 

           काही बिघडत नाही 

           चहा कॉफी शिवाय 

           खरंच करमत नाही.

 

वृंदा आशय 

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!

 


5 comments:

  1. इस बात पे चाय तो बनता है 😊😊

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर हलकं फुलकं मस्त लिहिलं आहे. आम्ही निसर्गोपचाराचा वर्ग करत असताना एक काका कुठलाही काढा दिला की म्हणायचे चहा नंबर एक आला, चहा नंबर दोन, चहा नंबर तीन आला!!!! त्यांना ते काढे घ्याव वाटत नसायचे... डॉक्टर म्हणतात भारत फक्त असा देश आहे जिथे दुधाचा चहा घेतल्या जातो.... असो पण आता आवळा चहा, आयुर्वेदिक चहा, सोयाबीन कॉफी , गव्हाची कॉफी , योगामृत असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

    ReplyDelete

'ज्येष्ठ' व 'ज्येष्ठ'

  •| ॐ |•   # शब्दवेध     ॐ नम: शिवाय !  सोमवती अमावास्या  ' ज्येष्ठ ' व ' ज्येष्ठ '   आज अमावस्या आहे. मराठी पं...