Saturday, 4 July 2026

चिंतनाचे शुभचिंतन !


                                                     

                     चिंतनाचे शुभचिंतन ! 


जे नेतृत्व कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व या तिन्ही कसोट्यांना पुरून उरले ते नाव म्हणजे कै. गोविंदभाई श्रॉफ. एक काळ असा होता ज्या काळामध्ये 'गोविंदभाई श्रॉफ = मराठवाडा प्रदेशाचा विकास' हे सूत्र सर्वमान्य झालेले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना विशेष काळजी होती त्यामुळे त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, रेल्वे, इत्यादी दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले. एखादी गोष्ट करायची म्हणल्यावर भाई स्वतःला तन, मन, धनाने झोकून देत असत व कसल्याही परिणामाची चिंता न करता निष्ठेने कार्य करत. भाईजींच्या कार्यप्रणालीबाबत त्यांचे निकटचे सहकारी व झुंजार पत्रकार श्री अनंतराव भालेराव लिहितात,

 "प्रश्नांचा साकल्याने विचार करायचा, आपली बाजू पटवून देता यावी म्हणून आवश्यक ती आकडेवारी गोळा करावयाची, लोकशाही पध्दतीने सर्व युक्तिवादाची वस्तुनिष्ठने मांडणी करायची व सांसदीय पथ्ये सांभाळून प्रश्नाची सर्व पातळ्यांवर तड लावायची. हे सर्व करून झाले आणि अगदीच अनिवार्य झाले तर लोकशाहीला कौल लावायचा. हे सर्व करण्यात त्यांनी (भाईंनी) आपली हयात वेचली. वर्षानुवर्ष प्रश्नांचा पिच्छा करावा तो त्यांनीच." 

               भाईजींनी आपले सर्वस्व ज्या ठिकाणी अर्पण केले त्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने 'गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्र' यावर्षी सुरू केले. या अध्यासनामार्फत गतवर्षीच्या दहावीच्या परीक्षेत मराठी भाषा या  विषयाचा जो चिंताजनक निकाल आलेला आहे त्यावर आज विचारमंथन घडून येत आहे. भाईजींचा विचारांचा वारसा पुढे चालवणारी स.भु. शिक्षणसंस्थाच हे करू शकते याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. 

              माझा स्वतःचा मराठी भाषा व साहित्य हा अध्ययन व अध्यापनाचा विषय असल्यामुळे या अनुषंगाने आज मला काही मांडणी करावी वाटते आहे. वास्तविक पाहता मी गेली दोन दशके उच्च शिक्षणात कार्यरत आहे. त्यामुळे शाळांच्या बाबतीत मी काही बोलावे हा माझा अधिकार नाही. मात्र भाषा व साहित्य यांचा विचार नकळतपणे सुरू आहे. तो या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायला आवडेल.

               महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आणि राज्यभाषा म्हणून ओळखली जाते. ज्यांची ही मातृभाषा आहे त्यांना ती आपसूकच येते, ज्यांची मातृभाषा नाही ते मराठी माणसांच्या सहवासाने थोडीफार शिकत जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असले तरी देखील त्यांच्या घरी मराठी भाषा वापरली जाते, त्यांच्या आजूबाजूच्या घरांमध्ये, ते वावरतात त्या समाजामध्ये ही मुलं नकळत मराठी भाषा शिकत जातात. कोणतीही भाषा शिकण्यासाठी श्रवण - संभाषण - वाचन लेखन हा राजमार्ग आहे. जी व्यक्ती थोड्याबहुत गांभीर्याने या मार्गांचा वापर करते तिची भाषा बऱ्यापैकी चांगली असते. गतवर्षीच्या दहावीच्या निकालाने मात्र ही सर्व विधाने आणि त्याचा मथितार्थ निकालात काढलेला आहे. 

          मी महाविद्यालयात रुजू झाले त्यावर्षी मराठीचे तास कुठे करायचे असतात का? असं म्हणणारी अनेक माणसं भेटायची. आज वीस वर्षांमध्येच 'मराठी शिकवले गेलेच पाहिजे' ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. इतका मोठा पालट होण्याचे काय कारणं असू शकतात? सर्वसाधारणपणे आपण तंत्रज्ञानाकडे बोट दाखवतो आणि मोकळे होतो. मला मात्र हे फारसं पटत नाही. 

             माझे स्वतःचे असे प्रांजळ मत आहे, आजच्या परिस्थितीचे खरे कारण हे,  'मराठीचे तास कुठे करायचे असतात का?, या मानसिकतेमध्ये आहे.' पूर्वीच्या काळी अगदी सातवीचा वर्ग पास झालेल्या माणसांचे ज्ञान हे पदवी प्राप्त केलेल्या माणसांइतके असायचे ही वस्तुस्थिती आहे. कारण तत्कालीन शिक्षणाचा दर्जा त्याला कारणीभूत होता. अन्य साधने फारशी उपलब्ध नसल्यामुळे आणि 'वाचनाने माणूस वाचतो' हे कळल्यामुळे माणसं वाचत होती. अवांतर वाचन करा, असं सांगावं लागत नव्हतं. अशा माणसांनी 'मराठीचे तास कुठे करायचे असतात का?', असं म्हणलं तर कदाचित चालू शकेल. मात्र गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी जेव्हा एखादा अर्ज लिहिताना 'मी अचूक पद्धतीने अर्ज लिहू शकेल' हा आत्मविश्वास दाखवू शकत नसतील, तर तिथे केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून चालत नाही, तिथे शिक्षणाचाच दर्जा तपासावा लागतो. आठवीच्या वर्गापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना विनासायास पास करणार असू आणि दहावी मध्ये त्यांनी पास व्हावे, अशी अपेक्षा करणार असू तर हे कोणत्या गणितात बसते हे मला कळत नाही. खरं म्हणजे मी श्री अरविंदांची शिक्षण प्रणाली वाचलेली असल्यामुळे 'परीक्षा नाही' हे धोरण मला फार योग्य वाटते. मात्र सर्वसामान्यांमध्ये 


'परीक्षा नाही = अभ्यास नाही' 


असे एक सर्वमान्य सूत्र नकळत तयार व्हायला लागते. आजच्या काळात जेव्हा या विद्यार्थ्यांना मोह घालणारी अनेक व्यवधानं आहेत तिथे तर विचारायलाच नको. त्यामुळे परीक्षा द्यावी लागेल आणि विद्यार्थ्यांचा पुरेपूर कस लागेल अशा कसोटीवर ती घेतली जाईल अशी मानसिकता जेव्हा पालक आणि शिक्षक हे दोघेही स्वीकारतील तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकेल. 


            भाषा ही उच्चाराची आणि लेखनाची अशी दोन प्रकारची असते ती शिकत असताना प्रमाणभाषा, बोलीभाषा हा भेद आपल्याला दिसतो. बोलण्यामध्ये बोलीभाषा वापरण्यास हरकत नाही . लिखाणामध्ये मात्र आवर्जून प्रमाणभाषा शिकून घ्यावी याचं कारण आपल्याला प्रमाण भाषेतून अचूकपणे व्यवहार करता आला पाहिजे. मुळातच भाषा इतकी लवचिक असते की एक 'कायद्याची भाषा' जर सोडली तर आपली कोणत्याही क्षेत्रामध्ये वापरली जाणारी भाषा ही दुहेरी किंवा त्यापेक्षा अधिक अर्थाचे पदर व्यक्त करते. आपल्याला अचूक अर्थ लावायचा असेल तर भाषेबरोबर जीवनमूल्य, समाजस्थिती, प्रासंगिक परिस्थिती अशा सर्वच गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. व्यंग्यार्थ हे काव्य या प्रकाराचे वैशिष्ट्य असले तरीसुद्धा गद्य भाषेच्या माध्यमातूनही फार मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर आपल्याला दिसून येतो. ज्या वेळेला व्यक्ती बोलत असते त्या वेळेला तिचा आवाज, सूर, आरोह, अवरोह या सगळ्यांवरून आपण मथितार्थ समजावून घेतो. लिखित भाषेमध्ये ही सोय नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसमज होण्याची शक्यता असते. 'संवाद साधणे' हे भाषेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र हा संवादच जर संपुष्टात येत असेल तर आपण भाषा शिकलो का?, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 


          भाषा मरता देशही मरतो

           संस्कृतीचाही दिवा विझे 


हा धोका कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्याला पूर्वीच फार तळमळीने सांगितलेला आहे.

            भाषा - देश - संस्कृती 

यांचे इतके घट्ट नाते आहे की तिथे सरळ मार्गाने जा किंवा उलट मार्गाने जा ; त्यांचे केवळ परस्पर साहचर्य नाही तर परस्परावलंबन आणि एकमेकांच्या अस्तित्वाचे मूलभूत आधार म्हणूनच ते आपल्याला दिसून येतात.

         आजच्या प्रचंड गतिमान व आधुनिक जगामध्ये साता समुद्रापार असलेल्या व्यक्तीशीही सहज संवाद साधता येतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र घरामध्ये शेजारीच बसलेल्या माणसाशी आम्हाला क्वचितच बोलावे वाटते ही मनःस्थिती आहे. संवाद संपुष्टात येतो आहे याची प्रत्येकजणच चिंता व्यक्त करत आहे. केवळ ही चिंता करत बसण्यापेक्षा औपचारिक शिक्षणात आपल्याला भाषेच्या अभ्यासाबाबत काय करता येईल या चिंतनाला प्रवृत्त करणाऱ्या आजच्या 'चिंतन परिषदेस' हार्दिक शुभेच्छा!


वृंदा आशय 

               


 

No comments:

Post a Comment

चिंतनाचे शुभचिंतन !

                                                                            चिंतनाचे शुभचिंतन !  जे नेतृत्व कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व या...