Monday, 22 June 2026

मोल शब्दांचे - दिल्या घेतल्या वचनांचे !

 

 

मोल शब्दांचे

        दिल्या घेतल्या वचनांचे !

 

झाशीच्या राणीची पुण्यतिथी होती त्यादिवशी 'वीज म्हणाली  धरतीला' हे नाटक वाचण्याची इच्छा झाली म्हणून ग्रंथालयात गेले होते. हे पुस्तक तर काही मिळालं नाही पण 'कैकयी' मात्र हाती लागली. नि:सीम रामप्रेमाने ते पुस्तक उचलले गेले. आज निवांत वाचले.

            प्रभू श्रीराम हे भारतीयांचे आद्यदैवत. उत्कट प्रेमाने आपण 'राम' म्हणतो त्याचवेळी तो प्रत्येकाचा जीवलग झालेला असतो. या जीवलगाच्या मातेला आणि तेही मराठी साहित्यातल्या दैवताकडून अर्थातच वि.वा. शिरवाडकर यांच्या भावसमृद्ध लेखणीतून तिला समजावून घेता यावे यासारखा दुग्धशर्करा योग तो दुसरा कोणता ?

          वास्तविक पाहता 'नाटक' हा सादरीकरणाचा, प्रयोगाचा, रंगमंचावरील दृक्श्राव्य असा कलाप्रकार आहे. इथे मात्र माझ्या हातात केवळ नाट्यसंहिता आहे. सादर केल्या जाणाऱ्या नाटकाचा 'अभिनय' हा प्राण असतो तर लिखित संहितेमध्ये 'संवाद' हा नाटकाचा प्राण असतो ; असे मला वाटते. या नाटकातील संवादाने मला वेधून घेतले.आधीच शब्दांचे वेड त्यात ते शब्द कुसुमाग्रजांचे आणि तेही रामजीवनावर मग या वेडाला वेड लागलं नाही तरच ते नवल!

            यापूर्वी मी नाटकावर कधी लिहिलेलं नाही. मात्र या संवादांनी मला ज्या भावविश्वात फिरवून आणले ते तुमच्या समोर उलगडण्यास मला आवडेल.

           हे तीन अंकी नाटक आहे. पहिल्या अंकात एक प्रवेश, दुसऱ्या अंकात दोन प्रवेश, तर तिसऱ्या अंकात तीन प्रवेश असे एकूण सहा प्रवेश त्यामध्ये समाविष्ट आहेत. 'कैकयी' हे नाटकाचे शीर्षकच आपल्याला नाटकाचा विषय सांगून जाते. 'रामाला झालेली  वनवासाची आज्ञा' ही या नाटकाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

        नाटकाच्या सुरुवातीलाच - म्हणजे अगदी पहिला अंक सुरु करण्यापूर्वी लेखकाने खालील ससंदर्भ संवाद नोंदवलेला आहे.  

राम :

भरता, पूर्वी आपल्या पित्याने जेव्हा तुझ्या मातेचे पाणिग्रहण केले, तेव्हा हिचे ठिकाणी जो पुत्र होईल त्याला मी राज्य देईन' अशी आपल्या पित्याने तुझ्या आजापाशी प्रतिज्ञा केली आहे.

[श्री वाल्मीकी रामायण अयोध्याकांड, सर्ग १०७, मराठी भाषांतर, चिपळुणकर कंपनी ]


            मला वाटते, हा संवाद म्हणजे लेखकाची पात्राकडे पाहण्याची निरपेक्ष भूमिका आहे.‘कैकयी’ हे नाव उच्चारता क्षणी जी ‘कुमाता आपल्या नजरेसमोर उभी राहात असते, तो पूर्वग्रह बाजूला सारून, ‘थोडेसे कैकयीचेही म्हणणे ऐकून घ्यावे’ अशी काहीशी वाचकांची मनोभूमिका हा संवाद निर्माण करतो. ही सर्वपरिचित अशी कथा असल्याने लेखक अनावश्यक अशा कोणत्याच तपशिलांमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे या नाटकाला आलेला वेग नाटक वाचताना आपसूक जाणवतो. शिवाय यामध्ये पात्रांचे केवळ संवाद आहेत. लेखकाचे भाष्य कुठेही नाही. त्यामुळे पात्रच स्वत:ची, स्वत:च्या भूमिकेची ओळख करून देताना दिसतात. त्यातून त्यांचे विकसित झालेले भावबंध रसिकाला नाट्यरसाचा अनुभव देतात. 

        पहिल्या अंकाची सुरुवातच होते ती रामाचे मनोभावे कौतुक पाहणा-या आणि करणा-या कैकयीच्या नाट्यप्रवेशाने. तिच्या दोन दासींशी रेवती आणि विशेषत: मंथरेशी तिचा झालेला 'संवाद' तिचे व्यक्तिमत्त्व एकदम पालटून टाकतात. ज्या सत्याशी, दशरथ राजाने तिच्या वडिलांना दिलेल्या वचनाशी ती अवगत होते, त्याबरोबर 'भरताची आई' म्हणून ती जागी होते. अयोध्येची राणी, राजाची पत्नी, भरताप्रमाणेच अन्य तीन पुत्रांचीही 'माता' ही सर्वच नाती ती मानसिक पातळीवर संपुष्टात आणते. हक्कासाठी द्वेषाने झगडणारी आणि त्याचबरोबर विवेकाला तीलांजली देऊन कोणत्याही थराला जाणारी एक संकुचित विचारांची स्त्री आपल्यासमोर उभी राहते. ती भाषा, ते संवाद वाचकाच्या मनामध्ये बेचैनी निर्माण करतात. एका राजघराण्याच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला पूर्णपणे विसंगत असे ते दृश्य समोर येते. मात्र तटस्थ वाचक या नात्याने आपल्याला दशरथ राजाची चूक देखील स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे आपण कोणालाही दोष न देता, तीव्र आणि सौम्य भावभावनांचा संघर्ष शांत चित्ताने अनुभवत राहतो. संयत राम, संतापी लक्ष्मण आणि पारदर्शी भूमिकेच्या सीतेची प्रचिती आपल्याला येते. ते तिघेही वनवासाला निघतात. 'तुमच्या पायाखाली निखाऱ्यांचीही फुलं होतील' हा राजा  दशरथाचा आशीर्वाद त्याच्यातील संवेदनशील पित्याचे, त्याच्या तळमळणा-या मनाचे दर्शन घडवतात.

        दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशामध्ये निरोप गेलेले बंधू 'भरत' आणि 'शत्रुघ्न' अयोध्येच्या सीमेवर पोहोचलेले आहेत. राजदरबाराच्या रीती- रीवाजाप्रमाणे आपल्याला घेण्यास कोणी कसे आले नाही, हा प्रसंग त्यांच्या मनात अनेकविध भावतरंग निर्माण करतो. आश्चर्य, शंका-कुशंका, चिंता, अविश्वास या सा-या भावभावनांचे दर्शन घडते. त्यातूनही भरताची संयमी वृत्ती तर शत्रुघ्नची आक्रमकता आणि काही प्रमाणात अपरिपक्वता दिसून येते. 

        या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशामध्ये 'कैकयी' आणि 'भरताची' भेट होते. राजधानीत आल्यावर राजपुत्र या नात्याने सर्व कर्तव्य पूर्ण करून मग दोन दिवसांनी भरत कैकयीला भेटतो. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेला 'कर्मधर्म' इथे आपल्याला भेटतो. या संवादामध्ये 'मी वेशीतून आत येतानाच मला खरे चित्र स्पष्ट झालेले आहे,' ही जी भूमिका भरत घेतो, त्यावरून त्याचे आकलन अनुभवाला महत्त्व देणारे आहे, सांगोवांगीच्या गोष्टी त्याचे मत तयार करू शकत नाहीत, हा भरताच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्यावर उमटतो. वि. वा. शिरवाडकरांची सामर्थ्यशाली भाषा भरताच्या मनामध्ये झाल्या घटनेची विकसित होत गेलेली घृणा व्यक्त करतात. तो जेव्हा आईच्या अधिकारांबाबत बोलतो तेंव्हा आईचे आंधळे पुत्रप्रेम आणि मुलाचा सद्सदविवेक याचे दर्शन त्यांच्या संवादातून घडते. तुझ्या माझ्यावरील प्रेमामुळे किंवा अधिकारामुळे, 'तू माझ्या जीवनाची राखरांगोळी करू शकत नाहीस' हे जेंव्हा भरत कैकयीला ऐकवतो तेंव्हा 'रामविहीन राज्या'कडे बघण्याची त्याची भूमिका स्पष्ट होते, त्याला राजेपद मिळणार असले तरीही ! सत्तेचे दुय्यमत्व इथे आपसूक दृगोचर होते. कैकयीची भूमिका समजावून घेतल्या नंतरही, आपल्या आईच्या वागण्यावर प्रतिक्रिया देताना, 'ती राजकर्तव्ये विसरली' हा त्याच्या संवादांचा ठसा आपल्यावर उमटतो. "प्रजेच्या हितावर खाजगी संबंधाना मात करू देणे, हे राजाच्या आणि त्याच्या आप्तांच्या जीवनातील सर्वात मोठे पाप आहे." ही त्याची भूमिका सत्तेचा अन्वयार्थ हक्काशी, अधिकाराशी जोडण्यापूर्वी कर्तव्याशी, जनकल्याणाशी जोडते. मंथरेला त्याने दिलेली माफी त्याची क्षमाशीलता तर कैकयीला केलेले शासन त्याची कर्तव्यकठोरता व्यक्त करते.

        या नाटकाच्या तिस-या अंकात तीन प्रवेश आहेत. चित्रकूट इथे होणारी 'राम-भरत' भेट ही या अंकातील मध्यवर्ती घटना आहे. त्या निमित्ताने राम-सीतेच्या जीवनातील लाघव, गुहक राजाची मदत मागण्याच्या प्रसंगाने जनतेचे राममय असणे, राम आणि सीतेचा भरतावरील नितांत विश्वास आणि प्रेम, लक्ष्मणाचा शंकेखोर स्वभाव व त्यामुळे अखंड सजगतेचा हट्ट, रामावरचे क्वचित आततायी होणारे प्रेम यांचे मनोज्ञ दर्शन घडते. 

        निरोपाच्या वेळी 'राम-भरत' यांच्यातील भ्रातृभावाचा संवाद आणि 'कैकयी-राम' यांचा 'माता-पुत्र' संवाद नातेसंबंधविषयक जीवनमूल्ये पेरणारे आहेत.

        आपण सर्व श्रीरामांचे नि:सीम भक्त आहोतच. त्यांनी संबंध राखता राखता सबंध देश जोडला. आजच्या काळात त्यांचा आदर्श बाळगत आपल्याला आपले घर राखता आले तरी ती ओंजळ आपल्या रामप्रेमाची खरी साक्ष ठरेल.


शुभं भवतु !

           श्रीकृष्णार्पणमस्तु!            


No comments:

Post a Comment

चिंतनाचे शुभचिंतन !

                                                                            चिंतनाचे शुभचिंतन !  जे नेतृत्व कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व या...