•| ॐ |•
क्षण विजयाचा !
आज पहाटे तीन वाजता जाग आली. उठल्यावर काय करावं हे तसं ठरत नव्हतं, म्हणून हेडफोन शोधायला गेले. तर तिथे आशय फुटबॉलची मॅच बघत बसलेला दिसला. स्पेन आणि अर्जेंटिना यांची 'एक्स्ट्रॉ टाईम' मधली चाललेली ती चुरशीची मॅच. कालच जिजूंनी या मॅचबद्दल बरंच काही सांगितलं होतं त्यामुळे हेडफोन शोधण्याच्या ऐवजी मी आपली निवांत मॅच बघत बसले. दीड तासामध्ये जे काही झालं होतं ते तोपर्यंत आशयने सांगितलं आणि आता मॅच कोणत्या मोडवर आलेली आहे इथपर्यंत मला आणून ठेवले. साहजिकच मीही त्याच्यासोबत मॅच मध्ये रमले.
अर्जेंटिनाचा अनुभवी खेळाडूंचा संघ आणि स्पेनचा अतिशय मेहनत घेऊन खेळणारा तरुण संघ - कोणीच कोणाला हार जायला तयार नाही. हळूहळू अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या आणि कोचच्या चेहऱ्यावर चिंता, चिडचिड दिसायला लागली आणि त्याची अभिव्यक्ती त्यांच्या खेळामध्ये व्हायला लागली. स्पेनचा संघ मात्र जोर लावून खेळतच होता. या खेळामधली एक सरळ गोष्ट अशी होती हरणे ही अर्जेंटिनासाठी, मेसीसाठी नामुष्कीची गोष्ट होती ; तर हरले तरी जबरदस्त संघर्ष केला ही थाप स्पेनला निश्चितपणाने मिळणार होती. त्यामुळे मला तरी अर्जेंटिना नामुष्की टाळावी या हेतूने खेळताना दिसत होता तर स्पेन मात्र 'जो भी होगा देखा जायेगा' या निर्धाराने खेळणारा दिसत होता.
अगदी स्वाभाविकरित्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंवरचा मानसिक दबाव वाढत गेला, मेसी जो संपूर्ण जगासाठी जणू काही फुटबॉलचा देव आहे हा निष्प्रभ होताना दिसला. स्पेनच्या खेळाडूंची सरशी होताना दिसली आणि स्पेनने खेळाच्या या ओघात आपसूक गोल केला. या विजयाबरोबरच महिला आणि पुरुष गटामध्ये फिफाचा विश्वचषक पटकावणारा स्पेन हा गौरवशाली देश ठरला.
मी फुटबॉल पहात होते खरी पण माझा कृष्ण मला तिथेही दिसतो ही वस्तुस्थिती आहे. नुकतंच माझं कृष्णाशी बोलणं झालं होतं आणि कृष्णाने मला सांगितले होते, "अगं आईने सांगितलेलं आहे ना तुला तर मग सकाळचे श्लोक म्हणूनच अंथरुणाच्या बाहेर पड. मी अर्थातच त्याचं ऐकलं. मी हेडफोन चा शोध घेत त्या खोलीत आले तेव्हा माझ्या मनामध्ये 'कराग्रे वसते' हा श्लोक घोळत होता. 'हात' हेच महत्त्वाचे असे पदोपदी वाटत होते. कारण आज या श्लोकाने माझ्याकडून फक्त श्लोक म्हणून घेतला नाही तर आपल्या आयुष्यातील 'हाताची सवय' फार स्पष्टपणे समोर आणली. त्याबरोबर 'हात हातात घेऊन' अनेक वाक्प्रचार, म्हणी माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागल्या.
हात हातात घेणे, हात देणे, हातोहात फसवणे - रातोरात श्रीमंत होणे, हात धुवून मागे लागणे, हाताची सगळी बोटे सारखी नसतात, हातचे राखून, हातावर तुरी देणे, या वाक्यांशांसोबतच, हातचा आला एक यासारखे नाटक तर,कर हा करी घेतला शुभांगी - यासारखे नाट्यगीत ; असे बरेच काही मनाभोवती रुंजी घालत होते.
या हस्तमहात्म्यामध्ये हस्तक्षेप केला तो स्पेन आणि अर्जेंटिनाच्या पदलालित्याने. साहजिकच 'समुद्र वसने देवी....' या श्लोकाने मनाचा ताबा घेतला. हाताच्या जोडीला पायही मनामध्ये पसरायला लागले. पाय धरणे, पायात पाय घालून पाडणे, पाय ओढणे, पायावर धोंडा मारून घेणे, ..... पाय लावून पळणे, हातापायी करणे या वाक्यांशासोबत 'मार दिया जाए या छोड़ दिया जाए' , 'पद घुंगरू बांध...' यासारखी गीते मनात फेर धरू लागली. 'समुद्र वसने' या श्लोकातील 'विष्णुपत्नी' हे पद महत्त्वाचे असल्यामुळे 'लक्ष्मीपूजन', संस्कार, विधी, लक्ष्मीचा अपहार, लक्ष्मीचा अपमान, लक्ष्मी - नारायण, सबसे बड़ा रुपैया असे एक ना अनेकजण डोकवायला लागले.
......... मात्र एका सत्यनारायणाव्यतिरिक्त कोणीच हितकारक न वाटल्याने मी बाकी सगळ्यांना सुट्टी दिली. आणि मस्तपैकी आशयसोबत स्पेनच्या 'विजयाचा क्षण' साजरा केला. त्या क्षणी मला कळाले कोणाच्याही विजयाचा क्षण हा आपल्या आनंदाचा सण होऊ शकतो. 'स्पेन'च्या नादात सगळेच 'पेन' विसरले त्यामुळे सध्या पेनही खाली ठेवते.
श्रीकृष्णार्पणमस्तु!


