•| ॐ |•
# शब्दवेध
'वग', 'व्यंग' आणि 'व्यंग्य'
# शब्दवेध
'वग', 'व्यंग' आणि 'व्यंग्य'
आज महाविद्यालयातील सकाळ जरा चिंताजनकच सुरू झाली. इथे पोहोचल्यावर कशीबशी
मनाची तयारी करून कागदपत्रांचे काम करत होते. तेवढ्यात एक कागद 'दत्त' म्हणून हजर ! 'अरे देवा,
हे काय आता?' असे म्हणत दत्तात्रयांचे स्मरण करतच मी तो हाती घेतला. एका
विद्यार्थ्याच्या परीक्षेतील गुणांसंदर्भात तो चौकशी करणारा होता. मराठी व हिंदी
या दोन्ही पेपरच्या अनुषंगाने होता. आम्ही दोघींनी त्या प्रश्नाचे समाधानकारक
उत्तर यातायात करून शोधले. शेवटी 'हिंदी व्यंग्य
साहित्य' या प्रश्नपत्रिकेत त्या
विद्यार्थ्याला गुण मिळालेले आहेत हे पाहून झाल्यावर आम्ही हुश्श केले.
त्याच दरम्यान जो काही २ -४
मिनिटांचा वेळ मिळाला होता त्यात एक गंमतच झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
अनुषंगाने एक चिंताजनक पोस्ट मी पाहिली. त्याची शहानिशा करण्यासाठी, खरे काय आहे ते जाणून घेण्यासाठी संबंधित
व्यक्तींना ती पाठवली. दिवाकर दादांनी त्याचे तात्काळ आणि अत्यंत गंभीरपणे त्याचे
निराकरण केले.
वरील दोन प्रसंगांनी
माझ्या मनात 'वग' 'व्यंग' आणि 'व्यंग्य' हे शब्द पेरले. त्यामुळे मी ते घेऊन तुमच्या भेटीला आले. 'वग' हा शब्द मनात उमटताच माझ्या मनामध्ये आपसूकपणे उभे राहिले ते 'वगनाट्य'. तमाशा या कला प्रकाराच्या प्रारंभी हे असते याची मला जाणीव
होती मात्र याचे अजून काही अर्थ होतात का हे शोधण्यासाठी म्हणून मी ग्रंथालयामध्ये
गेले तेव्हा मराठी उत्पत्ती कोषात 'वग' या शब्दाचे सापडलेले अर्थ पुढीलप्रमाणे - आश्रय,
ओळख, परिचय, प्रतिष्ठा.
का कुणास ठाऊक, पण तमाशामध्ये जे 'वगनाट्य' आपण पाहतो
त्याच्या अगदी विपरीत असे हे अर्थ मला वाटले. कदाचित तमाशा या कलाप्रकाराबाबत जी
सामाजिक मानसिकता आहे त्यामुळेही असे घडत असेल. साधारणपणे तमाशाच्या उत्तररंगात विनोदी पद्धतीने वगनाट्य सादर होताना आपण पाहतो. अगदी
सुरुवातीच्या काळात पात्र उत्स्फूर्तपणे आपल्या संवादातून अभिनयातून हा वग रंगवत
होते. जेव्हा विशिष्ट विषयांच्या अनुषंगाने ते लिहिले जाते तेव्हा वगकार यामध्ये
समाजातील विसंगती, दांभिकता,
आणि अनिष्ट रूढी-परंपरांवर मार्मिक भाष्य करण्यासाठी
उपरोधाचा चतुराईने वापर करतात.
'व्यंग' हा शब्द साधारणपणे व्यवहारात वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ न्यून, उणेपणा, कमतरता असा होतो. 'व्यंग' हा शब्द मनामध्ये येताक्षणी मला आठवतात ती व्यंग्यचित्र. लहानपणापासून
वर्तमानपत्रांमध्ये ही व्यंग्यचित्र पाहण्याची सवय असल्यामुळे आधी ती आठवत असावीत.
त्यानंतर आठवतो तो साहित्यातील 'व्यंग्यार्थ'
ज्याचा अर्थ सूचकता असा होतो. वास्तवातील व्यंग
कलेच्या पातळीवर जाऊन 'व्यंग्य' होते, 'सूचक' होते. हे व्यंग्य
कलाकाराची सृजनशीलता, निर्मितिशीलता
व्यक्त करणारे असते. ज्या माध्यमातून आपला विषय तो अधिक प्रभावीपणे मांडू शकतो.
स्वत:च्या कल्पकतेचा परिचय देऊ शकतो. ही कल्पकता समाजाला दिशा देण्यास आपसूक मदत
करते. अर्थातच तो कलेचा हेतू मात्र नसतो. 'व्यंग्यचित्र' आणि 'वात्रटिका' हे दोन्ही कलाप्रकार या बाबतीत फार समर्थ दिसून येतात. त्यांनी
काळावर आपला ठसा देखील उमटवला आहे. व्यंग्यचित्रांच्या बाबतीत मराठी विश्वकोशात
मार्मिक शब्दात वर्णन केलेले आहे, ते असे -
"व्यंग्यचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी व टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील रूढ अपप्रवृत्ती, नेत्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी यांचे मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवते आणि कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध-उपहास यांचा यथोचित उपयोग करून चित्ररसिकाचे प्रबोधन करते. योग्य काय, अयोग्य काय याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडूवृत्ती आणि संवेदनक्षमता वाढवते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात; तर काही हसवताहसवता अंतर्मुख बनवतात. काही उघड संदेश देणारी असतात.व्यंग्यचित्र हसवणारे असेल किंवा नसेल; पण सुप्त वा उघड आक्रमकता मात्र त्यात जरूर असतेच. आक्रमकता हे व्यंग्यचित्राचे अविभाज्य अंग आहेच, तसेच अनपेक्षित कलाटणी हे आणखी एक".
तर 'उपरोधा'च्या बाबत हा विश्वकोश आपल्याला सांगतो - "उपरोध समाजातील विसंगतीचे मर्मग्राही दिग्दर्शन करतो. उपरोधाचा हेतू त्या विसंगतों दूर करण्याचाही असता. उपरोध हा एखादा विषय नसून कोणत्याही विषयाकडे पाहण्याचा व्यवहारातील दांभिकता, विसंवाद आणि इतर दोघांवर उपरोधाद्वारे एक दृष्टीकोन आहे. उपरोधाचे संदर्भक्षेत्र सामाजिक असते. सामाजिक नेमके बोट ठेवले जाते; परंतु उपरोधकाराची भूमिका बंडखोराची वा प्रेषिताची नसते. उपरोधकार विनोदाचा चतुराईने वापर करून सामाजिक ढोंगाचे वाभाडे काढतो. केवळ टर उडविणे, थट्टा करणे, टोमणे मारणे म्हणजे उपरोध नव्हे. विडंबन, उपहासिका, वक्रोक्ती, शाब्दिक कोटिक्रम ही विनोदसाधने व तंत्र असली, तरी त्यांचा उपरोधकारास उपयोग होतो. व्याजनिंदा आणि उपरोध यांतील सीमारेषा पुष्कळदा अस्पष्ट असतात. प्रभावी औपरोधिक आशय व अभिव्यक्ती साधण्यासाठी मार्मिक विचारशक्तीची व भाषाप्रभुत्वाची अत्यंत गरज असते."
या पार्श्वभूमीवर मी जेंव्हा समाजमाध्यमावर 'हेडगेवार यांचे पहिले भाषण' ही पोस्ट फिरताना पाहते तेंव्हा 'व्यंगात्मक आवृत्ती (SATIRE)' हेच मुख्य शब्द माझ्या नजरेतून सुटल्याचे व त्यामुळे मनात सर्व घोळ झाल्याचे माझ्या लक्षात आले. २८ सप्टेम्बर १९२७ रोजी प्रकाशित केल्या गेलेल्या या आवृत्तीला कदाचित तत्कालीन काही कारणेही असतील. मात्र विशिष्ट भाग चौकटीत टाकून समाजमाध्यमावर अशात फिरत असलेल्या या पोस्टमागे काय कारण असावे, हे काही मला कळाले नाही.
या पोस्टने मला 'वाचताना घाई करू नये', विनाकारण गैरसमज करून घेऊ नये, सुयोग्य माणसांकडून खात्री करून घ्यावी, हे मात्र शिकवले. याच पोस्टने आज मला लिहिते केले. माझ्या शब्दसंदर्भांसाठी भारतीय संस्कृतीकोश , मराठी विश्वकोश आणि मराठी व्युत्पत्तीकोश हाताळण्याची एक संधी दिली, त्याबद्दल पोस्ट टाकणाऱ्याची मी मनापासून आभारी आहे.
मात्र त्याचबरोबर सुजाण नागरिकांना मला एक नम्र विनंती करावी वाटते -
" नवी पीढी आधीच गोंधळलेली आहे. तिचा गोंधळ वाढवू नका. दिशाभूल करू नका. राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींचा - ती कदाचित आपल्याला न पटणाऱ्या मताची असली तरीही तिचा किमान आदर करावा; हा संस्कार हरपू देऊ नका , यासाठीच हा प्रपंच."
दिवाकर दादांसारखे सर्वस्व झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत
तरी, या संस्काराला मरण नाही ;
जमले तर आपण त्यांच्या मांदियाळीत जाऊयात.


No comments:
Post a Comment