Tuesday, 16 June 2026

जीवलगा !

 

                                                  
                                             https://youtu.be/GcjlZ_JdYyA?si=3Cgz01ycRcqP580q

 

 जीवलगा !

 

                                  https://youtu.be/DQNxigVPh1s?si=IF-oUrPuW9BA7vEB

जीवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे !

         शांताबाईंचे हे आर्त काव्य, हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि आशाताईंचा भावव्याकूळ स्वर म्हणजे सत् चित् आनंद यांचा मेळच वाटतो. गीत ऐकता क्षणी सच्चिदानंदाची आठवण येते. व्याकुळ झालेला जीव शिवाला आर्त हाक मारतो, प्रार्थना करतो - काय प्रार्थना आहे ही ? अरे जीवलगा, चालता चालता पाऊल थकले आहे बघ. नुसतीच चालत नाही तर माथ्यावरती ओझे घेऊन चालते आहे. हे ओझे कशाचे आहे? हे ओझे दिसणारे आहे का ? निश्चितच नाही. अन्यथा ते कोणाच्याही मदतीने चटकन खाली उतरवून ठेवता आले असते, त्यासाठी शिवाला विनंती करण्याची आवश्यकता नव्हती. मग हे अदृश्य ओझे कशाचे आहे? हे जबाबदाऱ्यांचे ओझे आहे का? ते देखील शक्य नाही. कारण कोणतीही जबाबदारी तिच्या संदर्भातील कर्तव्य पार पाडण्यानेच पूर्ण होऊ शकते. कर्मसिद्धांत कुणालाही टाळता येत नाही. ज्या प्रश्नाचे कृष्णाने शाश्वत उत्तर दिलेले आहे त्यासाठी शिवाला त्रास देण्याची आवश्यकता नाही. मग हे अदृश्य ओझे नेमके कशाचे आहे? कदाचित ते ओझे 'पूर्वसंचिता'चे असावे. हिंदू धर्म हा पुनर्जन्म मानणारा धर्म आहे. मागच्या जन्मातील पाप-पुण्यांचा हिशोब बाकी राहिला तर तो पुढच्या जन्मात येऊन पूर्ण करावा लागतो ही आपली धारणा आहे, श्रद्धा आहे. असे जन्मोजन्मीचे ओझे डोक्यावर घेऊन चालत असताना, शिवाशिवाय कोणालाही हाक मारता येत नाही. 'घर दूर राहिले' म्हणजे अजून मोक्ष मिळालेला नाही ; त्याची ही खंत आहे. म्हणून त्या मोक्षदात्याला 'शिवामध्ये जीवाला' सामावून घेणाऱ्याला मारलेली ही आर्त हाक आहे.

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया,
पाचोळा वाजे

ज्या रानावनातून आपण जन्मोजन्मी हिंडत आलेलो आहोत ती वनराई आता इतकी दाट-घनदाट झालेली आहे की 'किर्र' हे विशेषण तिच्याशी होणाऱ्या संवादाला कवयित्रीला वापरावे वाटले. (माणूस त्रासला, वैतागला, त्याच्या सहनशक्तीच्या साऱ्या सीमा संपत आल्या म्हणजे तो मी 'कीर्र' झालो अशा प्रकारचा शब्दप्रयोग करतो. अन्यथा तात्पुरत्या स्वरूपातला 'किरकिर करू नको' हा आपला रोजचा शब्द.)
       
ती इतकी घनदाट झालेली आहे की प्रकाशरेषा दिसण्याच्या सगळ्या शक्यता संपुष्टात आलेल्या आहेत. म्हणून 'सांज सभोती दाटून येई'. कवयित्रीची विलक्षण सकारात्मकता या ठिकाणी आपल्या प्रत्ययाला येते. सांज आहे याचा अर्थ अंधुक प्रकाश आहे. अजून सांज पूर्णपणे रात्रीमध्ये परावर्तित झालेली नाही. या अंधुक  प्रकाशामध्ये कोणताही माणूस काम करू शकणार नाही इतका तो प्रकाश अंधुक आहे. त्यामुळे शिवाला ही हाक आहे. कारण 'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल' अशी घनदाट अंधारात देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता पेरणारी आपली साहित्य संस्कृती आहे.
           
सांज हे नाम दिवसभरातली एक परिस्थिती दाखवते. ते विशेषण म्हणून वापरले गेले तर 'आयुष्याच्या संध्याकाळी' अशा प्रकारचा अर्थ त्यातून व्यक्त होऊ शकतो. इथे ते कवयित्रीने मोठ्या खुबीने नाम आणि विशेषण या दोन्हींचा अर्थ व्यक्त करत वापरलेले असावे. कारण पुढच्याच ओळीत शांताबाई म्हणतात

'सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे'

         इथे त्यांना जे काही व्यक्त करायचे आहे, ते आयुष्याच्या संध्यासमयाबाबत असावे असे वाटते. कारण मुळातच 'आयुष्याची संध्याकाळ' अशी असते जिथे कोणालाही आपली आवश्यकता राहिलेली नसते. गात्रं थकतात, मन हळवे होते, कोणीतरी आपल्याशी संवाद साधावा म्हणून वाट पाहते; या वाट पाहण्याला उत्तर मिळेल की नाही हे आजूबाजूच्या व्यक्तींवर व परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजे इथे आपल्या हातात काहीच नसते. मग आपल्या हातात काय आहे, तर ज्या शिवाकडून जीव आलेला आहे त्या शिवाची आर्त आळवणी करायची, "बाबा रे, तू दिलेला जीव संचितासह आजवर सांभाळला. ते सारं संचित कर्मांमध्ये मिसळलं. मात्र या संचितातून तू पुन्हा जन्मच देशील. आता तरी तुला माझी दया येऊ दे आणि मला मोक्ष मिळू दे." असे म्हणून त्या मोक्षदात्याला, त्या शिवाला, जिथे आता 'जीव लागलेला' आहे  त्या 'जीव लगा' ला  मारलेली ही हाक आहे.

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई,
मिटले दरवाजे

आजवरचे जे काही जन्म होते, केलेले कर्म होते तो कर्मधर्माचा सगळा गावच्या गाव मागे पडलेला आहे. आता त्याची माझ्या आयुष्यातली उपयोगिता संपलेली आहे. मी जर कोणाला काही मदत केली असेल, तर त्याबद्दल कृतज्ञता बाळगणारे माझ्या आजूबाजूला राहीले नाहीत. मी माझे कर्तव्यच केलेले आहे याची मला पूर्ण जाणीव आहे मात्र ही जाणीव आता इतरांकडून दिली जाते. जेव्हा मुलं म्हणायला लागतात, "आम्हाला मोठं केलं म्हणजे फार काय वेगळं केलं? आई बापाचं ते कर्तव्यच असतं;" असं जेव्हा घडायला लागतं, तेंव्हा समजावं आपली आता निघून जाण्याची वेळ आलेली आहे. मुलांकडून आपल्याला कृतज्ञतेच्या पावतीची अपेक्षा नसते, वेळोवेळी आपण जणू काही त्यांच्यावर उपकार केलेले आहेत, अशा अविर्भावात त्यांनी वागावे हे तर आपल्याला कधीच वाटत नाही पण जे केलेले आहे त्याची किमान जाणीव बाळगावी इतकीच माफक अपेक्षा असते. लहानपणी ते अनेक प्रश्न विचारायचे आणि आपण न थकता उत्तर द्यायचो आता म्हातारपणामुळे आपल्याला विस्मरण होते म्हणून आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो दोनदा तीनदा मुलंही उत्तर देतात पण नंतर ती थकली की प्रश्नच निकालात काढण्याच्या मागे लागतात, असं जेव्हा घडतं तेव्हा आयुष्य खरोखर नकोसं वाटायला लागतं.
            
ही मनामध्ये वाढायला लागणारी नकारात्मकता म्हणजे पायतळीचा पथ, रस्ता अंधारात बुडणे आहे. तू जेवढ्या काळासाठी मला हे आयुष्य दिलेले होते, हे विश्रांतिस्थान दिलेले होते ; तो वेळ आता संपत आलेला आहे. इथल्या मुक्कामाचा वेळ संपत आलेला आणि तू अजून दरवाजेही उघडले नाहीस म्हणून

           निराधार मी, मी वनवासी
           घेशिल केव्हा मज हृदयासी?

हा विचारलेला प्रश्न आहे. माणूस एक पाय तेव्हाच उचलतो जेव्हा त्याला दुसरा पाय ठेवायला जागा असते. जेव्हा पायाखालची जमीन हलते आणि दोन्ही पावलं एका वेळेला उचलण्याची वेळ येते त्या क्षणी माणसाला भयंकर निराधार वाटायला लागतं. अन्यत्र कुठेच आधार गवसत नाही, जीवनात त्याला जागा राहत नाही तेव्हा तो वनवासी होतो आणि मग शिवाला हाक मारण्याशिवाय गत्यंतरच नाही, अशी अवस्था येते म्हणून 'घेशील केव्हा मज हृदयाशी?' हा प्रश्न कळवळून जीव विचारतो आहे.

         तूच एकला नाथ अनाथा,
           महिमा तव गाजे

तुलाच का आवाज देते तर तू मुक्तिदाता म्हणून तुझा महिमा अपार आहे. परंपरा, संस्कृती, धर्म, सारे सुजन त्याची साक्ष देत आहेत. म्हणून हा अनाथाजीव त्या नाथ शिवाला साद घालत आहे.

https://share.google/ABPoIX0dVAs5qWQg3

संपूर्ण समर्पण!

श्रीकृष्णार्पणमस्तु!


 











No comments:

Post a Comment

चिंतनाचे शुभचिंतन !

                                                                            चिंतनाचे शुभचिंतन !  जे नेतृत्व कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व या...