Sunday, 16 August 2026

देश हा देव असे माझा !



 •| ॐ |•

#  'श्रवण' - 'श्रावण' 


श्रावण महिना सुरू झालेला आहे. मराठी मनांना 

        आला आषाढ श्रावण 
              आल्या पावसाच्या सरी 

हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही. सृष्टी हिरवाईने नटलेली असते. घराघरांमध्ये सणावाराची लगबग असते. मनामनांमध्ये उत्साह ओसंडून वाहात असतो. 'श्रावणात घननिळा बरसला', हा कधी पंचाईत करेल आणि कधी आल्हाददायक होईल याचा काही नेम नाही. नवोढांना सासर - माहेरची ओढ सारखीच असते. हातावरची मेंदी, गालावरची खळी, मनातल्या झुल्यावर झुलवत राहते. 

             या झुल्याला स्थिर करण्याचं काम मंत्रोच्चार करत असतात. पानाफुलांनी नटलेला देव, 'मी आहे, तू आहे, आपण आहोत' असा आधार देत आनंदाचे जग फुलवत असतो. कोSहम् ला सोSहम् चे उत्तर येते आणि तन्मयता जीवन जगण्याची तयारी करून घेते.

            ही तन्मयता कधी येते? कोणाला आनंद देते? असे प्रश्न विचारले तर आतून उत्तर येते, जो 'श्रवण' जोपासतो तो 'श्रावण बाळ' होतो आणि आयुष्याचा 'श्रावण' फुलवतो. हे त्रिकूट नक्की काय आहे, हे समजून घ्यायचं असेल तर 'श्रवण' म्हणजे काय याचं चिंतन करावं लागतं.

            'श्रवण' या शब्दातील मूळ धातू आहे 'श्रु'. 'श्रु' याचा अर्थ -  ऐकणे. हा शब्द उच्चारल्याबरोबर अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये फुलायला लागतात.
'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही सगळ्यात आधी समोर येते. 'जन' म्हणजे कोण आणि 'मन' म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे.
            आपल्या राष्ट्रगीतामध्ये हे दोन्ही शब्द अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात. या दोन्ही शब्दांच्या मध्ये येतो तो 'गण' हा शब्द. गण म्हणजे समूह. जनांचा गण म्हणजे लोकसमूह.

 'जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता'



राष्ट्रगीताचा अर्थ -



राष्ट्रगीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. सर्वसमावेशक अशा आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विचारधारा असल्यामुळे, काही प्रश्न आपसूकच निर्माण होतात. खरं म्हणजे वस्तुस्थितीकडे पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा जो दृष्टिकोन असतो, त्या दृष्टिकोनातून आपण परिस्थितीवर भाष्य करत असतो. हे भाष्य करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीत असतेच असं नाही, अनेकजणं ती क्षमता असूनही अव्यक्त राहणं पसंत करतात ; त्याला सभोवताल कारणीभूत असतो. 

            ज्यांच्यात भाष्य करण्याची क्षमता नसते, परंतु ज्याचे कोणाचे आपल्याला पटते त्याच्या बाजूने आपण उभे राहावे ; या न्यायाने जो नेता (पुढे घेऊन जाणारा) वाटेल त्याच्या मागे माणूस जातो. 

             जिथे मत असतं तिथे मतभेद असतात. आपण भूमिती शिकतो त्या वेळेला त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा अनेकविध आकृत्या शिकतो. त्या प्रत्येकाची वेगवेगळी सूत्रं, त्यातून निर्माण होणारी वेगवेगळी समीकरणं प्रत्येक जण स्वतःच्या आकलन कौशल्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो. तशी भारत देशाची परिस्थिती पाहिली तर सर्वसाधारणपणे 'गणित' या विषयाची भीती वाटते. त्यातली तार्किकता, सूत्रबद्धता, अचूकता, ज्याला कळते त्याला पायरी पायरीने (स्टेप बाय स्टेप) गणित व्यवस्थित सोडवता येते. गणितासारख्या विषयामध्ये प्रत्येक पायरीला गुण असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ज्याला गणित सोडवता येत नाही तो 'काही प्रश्न सोडून दिलेले बरे असतात' या न्यायाने गणिताकडे पाठ फिरवतो. खरं म्हणजे गणिताचा आणि आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. आपण तो फक्त आकडेमोड करत व्यवहारापुरता मर्यादित ठेवतो. वास्तविक पाहता भूमितीमधल्या विविध आकृत्या या जीवनमिती व्यक्त करणाऱ्या असतात. जीवनाचे हे पैलू ज्याला समजतात त्याला जीवन कळतं. 

            राष्ट्रगीताकडून मध्येच हे गणिताकडे कसं काय प्रकरण वळलं बुवा असा कोणी विचार करत असेल तर मला त्याला हे सांगायला आवडेल - 

'जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता'

हे आपले राष्ट्रगीत, पुढे देशातल्या विविध राज्यांची ओळख करून देत एकात्मतेची नांदी व्यक्त करते. ते शेवटी थांबते कुठे - 

'जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता'

असे म्हणून ते अंतिम जयजयकाराकडे वळते. जिथे मला पसायदान स्मरते.

काहींना प्रश्न पडतो, हा अधिनायक कोण? हा भारताचा भाग्यविधाता कोण? 

मला वाटते, "मातृभूमीची हाक ज्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते असा 'जनांचा समूह' हा अधिनायक होतो, तेव्हा भारताचे भाग्य उजळते. या समूहातील प्रत्येकाचे मत निराळे असते पण ते  
जनकल्याणाच्या एका व्यापक दिशेने जाते तेव्हा मांगल्य जन्मते."

हा गर्भितार्थ ज्याला कळतो त्याला आपली जीवनमूल्ये, आपली संस्कृती भारताच्या विकासासाठी आधारभूत कशी आहे ते स्पष्टपणे लक्षात येते. गरज असते राजकारण बाजूला ठेवून भारताचे सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व लक्षात घेण्याची, जोपासण्याची आणि वृद्धिंगत करण्याची. जे मातीत रूजते तेच आकाश व्यापते.


           संपूर्ण समर्पण! 
                                                       
                                                  श्रीकृष्णार्पणमस्तु! 

विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 || ॐ ||           विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !       आपला समाज सुदृढ आणि नीतिमान ठेवणारी संस्था म्हणजे...