Wednesday, 28 October 2026

विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 || ॐ ||

         




विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 

   आपला समाज सुदृढ आणि नीतिमान ठेवणारी संस्था म्हणजे 'विवाह संस्था' होय.  त्यातून आकाराला येणारे कुटुंब आणि कुटुंबसंस्थेतून घडणारा समाज ! मानवी समाजाच्या विकासाचा एक लेखाजोखा आपण मांडतो त्यावेळेला आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचे मनोमीलन हे विकासाच्या पायाशी असलेले दिसते. मनोमीलनाशिवाय कोणत्याही प्रकारचा झालेला विकास हा 'तडजोडी'च्या पायावर उभा असतो. तड जाऊन जाऊन, तडा जात नाही तोपर्यंतच जोडण्याची शक्यता असते. तडा गेलेलं भांड असू द्या किंवा तडा गेलेलं नातं असू द्या, त्यातला जोड दिसत राहतो, बोचत राहतो. काही केल्या मूळ घडणीची सर येत नाही. मग अशा वेळेला काय करावे? 

         आजच्या जगाचा विचार केला तर प्रत्येक नातं हे तडजोडीवर टिकलेलं आहे. आजच्या काळात अन्य नाती टिकली काय किंवा टाकली काय कदाचित फारसा फरक पडत नसावा. मात्र विवाह बंधनातून निर्माण झालेलं नवरा-बायकोचं नातं जर टिकलं नाही, टिकवलं गेलं नाही आणि टाकावं लागलं तर त्याचे परिणाम फार दूरगामी होतात. कारण कुटुंब संस्थेच्या मुळाशी या दोन व्यक्तींचे मनोमीलन कारणीभूत असते. मनं जुळली की शून्यातून विश्व उभारता येतं. त्यासाठी मन कळणं आवश्यक असतं. मनाकडे दुर्लक्ष करत गेले तर विश्वव्यापी शून्यता आयुष्यात येण्यास वेळ लागत नाही. 

  केवळ प्रेमविवाह झाला म्हणजे मनोमीलन होते आणि विवाह बंधन टिकते हे सामाजिक अनुभवाने साफ खोटे ठरवलेले आहे. आता त्यातील प्रेमाचे स्वरूप कसे हे चर्चा करण्याची जागा ही नव्हे. पूर्वीच्या काळात आपल्याकडे स्थळ पाहून केलेले विवाह टिकत होते किंवा कोणातरी एकाची घुसमट होऊन टिकवले जात होते. त्याला त्या काळची समाजरचना कारणीभूत होती. पटतच नसेल तरी आयुष्यभर सोबत राहा आणि कुढत जगत राहा; हे मान्य असण्याचा काळ आता संपलेला आहे. जे नातं आपण निर्माण करतो त्या नात्याला पूर्णविराम देण्याची शक्यता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. मात्र दूध पोळल्यामुळे ताक फुंकून प्यावे तसे दुसरे नाते जोडण्यापूर्वी माणसाची अवस्था होते. काही मनं हा आघात पचवून पुढचा प्रवास करतात आणि काही मनं तिथल्या तिथेच कोमेजून जातात. त्यामुळे आयुष्याचा हा निर्णय अत्यंत सजगतेने आणि परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून घ्यावा लागतो. त्यासाठी घर- शेतीवाडी, स्थावर संपत्ती, नोकरी - व्यवसाय, स्थिर वार्षिक उत्पन्न हे सगळे पूरक मापदंड असतात.

         पूर्वीच्या काळी नातेवाईक, हितचिंतक आणि पालक वर्ग लग्न ठरवण्यात अग्रेसर असायचे. अगदी लहान वयात कुल, घराणं यांची मानमर्यादा सांभाळून हे विवाह निश्चित होत होते. ठरवल्या गेलेल्या विवाहाला नकार देण्याची परवानगी मुलगा किंवा मुलगी कोणालाही नव्हती. त्यामुळे वडिलधाऱ्यांच्या आज्ञेत राहून संसार होत होते. मात्र बदलत्या युगात, शिक्षणाच्या प्रसाराने, तंत्रज्ञानाच्या वापराने; अनुभवाचे शहाणपण दुय्यम ठरवले आणि वयाच्या वडीलकीचा मान संपुष्टात आला. 

    विवाहेच्छूक मुले- मुली स्वतःचे लग्न स्वतः निश्चित करायला लागले. ट्रायल बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट,  लिव्ह इन रिलेशनशिप, करून पाहू,  राहून पाहू,  जमलं तर ठीक नाहीतर ब्रेकअप एन्जॉय करू ; अशी आजच्या काळाची युवा पिढीची मानसिकता आहे. जोपर्यंत या सगळ्यामध्ये बाळाची चाहूल लागत नाही तोपर्यंत हे सुरू राहतं. मात्र एकदा ही चाहूल लागली की पुढच्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. आपला विवाह केवळ दोघांपुरता मर्यादित नाही याची प्रखर जाणीव होते. या वस्तुस्थितीला जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सामोरा जातो किंवा तिच्यापासून पळ काढतो.

   या अधांतरी अशा भविष्यामुळे, जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि आपल्या मागे आपले कुटुंब नाही या जाणिवेमुळे ; ही जबाबदारीच स्वीकारू नये अशा प्रकारची अत्यंत धोकादायक अशी मानसिकता युवा पिढीची होत आहे. आपणच स्थिर नाहीत तर येणाऱ्या छोट्याशा जीवाला कोणतं स्थैर्य देणार हा प्रश्न त्यांना मुळातून अस्थिर करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा वयासोबत येणाऱ्या सहजीवनाच्या, मातृत्वाच्या नैसर्गिक प्रेरणांना नाकारत ही मुले स्वत:ला कामाला जुंपून घेतात, निर्णय टाळतात किंवा अन्य चुकीचे वाटतील असे निर्णय घेऊन बसतात. ज्यातून एकटेपणा, नैराश्य, व्यसनाधीनता यांनी घेरले जातात.    

        वास्तविक पाहता योग्य वयात, योग्य व्यक्तीशी विवाह होणे, हे माणसाच्या आयुष्यातील एक मनमोहक आणि मधुर असे वळण आहे. जे केवळ दोन मनांना किंवा तनांनाच जोडणारे नाही तर दोन कुटुंबांना जोडून ; नवे कुटुंब विस्तारित करणारे, या नव्या वळणावर त्या कुटुंबाला सुरक्षित आणि आनंदी करणारे असते. योग्य वयात विवाह झाला तर दोन्ही बाजूंना ती गोड हुरहूर, नाविन्याची ओढ असते. आपल्या किचकट  अटींमध्ये बसेल असा बाहुली / बाहुला जोडीदार शोधताना आयुष्य कटकटींचे होऊन जाते. वेळ कोणासाठी थांबत नसतो. हातातला वेळ पायाखालच्या वाळूसारखा सरकत राहतो. उत्सुकतेच्या उंबरठ्यावरचे माप ओलांडून जबाबदार जोडीदाराच्या हातात वेळीच हात द्यावा. अन्यथा समस्यांच्या भोवऱ्यात आई-वडिलांसह सारेच गरगरत राहतात. तडजोड प्रत्येकालाच करावी लागते. ती आपल्या चॉईसने करण्याची संधी असते  तोपर्यंत सुयोग्य निर्णय घेणे हितकारक ठरते.

                                                वृंदा आशय          

Wednesday, 21 October 2026

अडकित्त्यातील गुलकंद! ('अडकित्ता' आणि 'गुलकंद' या मराठी चित्रपटांच्या निमित्ताने)



 



•|ॐ‌|•


श्री मॉं!


अडकित्त्यातील गुलकंद!


('अडकित्ता' आणि 'गुलकंद' या मराठी चित्रपटांच्या निमित्ताने)


 फुरसतीच्या वेळेला चित्रपट बघणे हा आता माझा आणि आशयचा एक छंद झालेला आहे. कोणता चित्रपट बघावा असं शोधत असताना 'गुलकंद' हे शीर्षक समोर दिसले. कलाकार सगळेच ओळखीचे म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील. खरं तर त्यामुळेच हा चित्रपट पाहण्याचे आम्ही निश्चित केले. कसं आहे ना, माणसं आपली वाटली तर तो गावच आपला वाटतो, तसेच काहीसे. 


                 'गुलकंद' या चित्रपटाचे कथानक तसे साधे-सरळ. साध्या अशा प्रश्नाला समस्या मानले आणि ती सोडवण्याचा प्रयत्न केला की कळत - नकळत किती गुंता निर्माण होतो, याचे हे उत्तम उदाहरण होय. एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा. मुलं परस्पर आपला विवाह ठरवतात आणि औपचारिक मान्यतेसाठी दोघांचे आई-वडील एकत्र येतात. ते 'हो' च म्हणणार असे गृहीत धरून चालणा-या मुलीची आई (सई ताम्हणकर - नीता) व्यावहारिक सल्ला देते, 


 "आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे तर घाई काही करायला नको."


तिच्या या सल्ल्यापाठीमागे कारणीभूत असतो तिचा 'पूर्वानुभव'. तिने तिच्या कॉलेजच्या वयात ज्या मुलावर मनापासून प्रेम केलेले असते, ( प्रसाद ओक - गिरीश) पाच वर्ष परस्परसंमतीने जे मानसप्रेम फुललेले असते तोच मुलगा, मुलीचा भावी सासरा म्हणून समोर येतो. मधल्या काळात त्याच्यावर पडत गेलेल्या जबाबदाऱ्या आणि संवादाचा अभाव यामुळे 'नीता'च्या मनात नवथर प्रेमाबद्दल एक कटुता निर्माण होते. अशा प्रकारचे प्रेम जबाबदारीने संसार सांभाळू शकेल की नाही, याबाबत ती साशंक होते. 


अर्थात याची कोणतीही कल्पना नसलेले तिचे कुटुंब तिच्या या सल्ल्याने गांगरते. 'प्रेमात यशस्वी होणे' आपल्याला शक्य होऊ शकले नाही,  मात्र आपल्यामुळे मुलांचे प्रेम अयशस्वी व्हावे, हे योग्य नव्हे ; या जाणिवेतून गिरीश नीताशी संवाद साधतो. मध्यंतरी काय काय घडले याची सगळी कल्पना देतो. परिस्थिती समजावून घेऊन नीताचे मन निवळते. ती मुलांच्या लग्नासाठी होकार देते. 


मात्र मध्यंतरीच्या काळात दोन्ही घरांमध्ये 'नीता आणि गिरीश' यांच्या पूर्वप्रेमाबद्दल सगळं काही कळतं. नीताच्या घरामध्ये अगदी मुलांशीही फार मोकळेपणाने यावर चर्चा होते. गिरीश मात्र अस्वस्थ मानसिकतेमध्ये त्याच्या मुलाकडून ( तेजस राऊत - ओंकार) काहीसा पकडला जातो. गिरीश त्याच्याशी मोकळेपणाने बोलतो आणि आईला (ईशा डे - रागिणी) याबद्दल काहीही सांगू नये, असे सूचवतो.


 या चित्रपटामधील 'रागिणी'चे पात्र अशा स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांची प्रगल्भता कमी असते, ज्यांच्याशी नवरा मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी शेअर करत नाही, त्यामुळे अशा स्त्रिया उथळ मालिकांमध्ये स्वतःचे विश्व शोधतात. रागिणीला सापडलेल्या एका फोटोवरून 'गिरीश आणि नीता' यांच्याबाबत समजते. ती अगदी स्वाभाविकपणाने बेचैन होते. तिच्या मैत्रिणीशी (वनिता खरात - धोणे बाई) ही वस्तुस्थिती ती शेअर करते. नवऱ्याला कसे मुठीत ठेवावे, त्याला कसे शरण आणावे याच्या ती तिच्या दृष्टीने भन्नाट अशा आयडिया रागिणीला देते. 


         रागिणी स्वतःच्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाळत ठेवते. संशयाचे भूत तिच्या मनामध्ये शिरते. 'माझ्या संसाराचे काय?' ही एक विलक्षण असुरक्षितता त्या पाठीमागे असते. आपल्या या पाळत मोहिमेमध्ये ती नीताचा पती (समीर चौघुले - मकरंद) यालाही सहभागी करून घेते. खरं म्हणजे नीता आणि गिरीश ची मैत्री त्याने निखळ मनाने स्वीकारलेली असते. मात्र रागिणी त्याच्या मनामध्ये जो संशय पेरत जाते त्यामुळे तोही नकळत या फेऱ्यात अडकतो.


निखळ प्रेमाच्या पाठीमागे लागलेला संशय, त्यातून घडत जाणाऱ्या विचित्र गमती जमती आणि रागिणीला आपलं कौतुक करणारा मकरंदमध्ये मिळणारा मित्रभाव, असा काहीसा आशय व्यक्त करणारे अनेक घटना प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळतात.


या सगळ्यांमध्ये ओढाताण होते ती मात्र युवा पिढीची. या ॲडव्हान्स्ड पिढीने नीता आणि गिरीशचे प्रेम समजून घेतलेले असते आणि त्यांची मैत्री स्वीकारलेली असते. मात्र मकरंद आणि रागिणी यांच्यामधले जे काही प्रसंग ते व्हिडिओच्या माध्यमातून बघतात त्यातून ते धास्तावतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय लग्नाला ते नकार देतात. अर्थात तो चित्रपटच असल्यामुळे रागिणी एका व्हिडिओद्वारे जे जे काही घडले ते स्पष्ट करते आणि शेवट गोड होतो.


'अडकित्ता' या चित्रपटाचे कथानक मला याच्यापुढची पायरी वाटते. कस्तुरी - सखी गोखले,  गौतम -  सिद्धार्थ चांदेकर -  ही जोडी आणि त्यांच्या बाळाला सांभाळणारी मंगल - सई ताम्हणकर ही या चित्रपटामधील प्रमुख पात्रे आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून कस्तुरी आणि गौतम विवाह करतात. कस्तुरीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते त्या वेळेला गौतममधला जबाबदार पिता आणि कस्तुरीमधली उत्सुक आणि चिंतित आई जागी होते. ही बातमी कळता क्षणी गौतमने 'सिगरेट पिणे' सोडून देण्याचा घेतलेला निर्णय आपल्याला त्याच्यातल्या जबाबदार जोडीदाराची फार उत्तम पद्धतीने जाणीव करून देतो. जुळं होणार असल्याची गोड बातमी येते पण प्रत्यक्षात मात्र एकच बाळ हाती लागतं. नव्या संसारातील त्या कोवळ्या मनांना हे सगळं पचवणं जड जातं. 


कस्तुरीसाठी तिचं बाळ हेच पहिलं प्राधान्य असतं. त्यासाठी ती नोकरी, तिने स्वप्न पाहिलेले प्रोजेक्ट्स सारं काही सोडायला तयार असते. या ठिकाणी गौतम आणि तिच्या ऑफिसमधला सहकारी तिला समजावून सांगतात. बाळ सांभाळण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय देतात. शेवटी बाळाला सांभाळण्यासाठी घरी बाई ठेवायची हे निश्चित होते. त्यादृष्टीने त्यांनी अनेक स्त्रियांचे घेतलेले इंटरव्ह्यू आणि त्यांना  आलेले अनुभव खरोखरच प्रेक्षणीय आहेत म्हणजे आजच्या प्रखर वास्तवाची जाणीव करून देणारे आहेत. 


या सगळ्यातून शेवटी त्यांना बाळाला सांभाळण्यासाठी 'मंगल' मिळते. मंगलचेही जातीबाह्य विवाहातील त्रिकोणी कुटुंब. त्यामुळे समाजाच्या त्या स्तरातही सासर माहेरच्यांनी नाकारलेले सहकार्य, गरिबीमुळे तिची होणारी ओढाताण आणि हृदयाला छिद्र असलेला चार वर्षांचा मुलगा अशी चित्रपटामधील मंगलची पार्श्वभूमी. 'मंगल'ला कामाची गरज असते आणि त्यापेक्षाही अधिक कामाची जाण असते, बाळांबद्दल तिच्या मनामध्ये प्रेम आणि संवेदनशीलता नांदत असते. थोड्याच दिवसात ती या दांपत्याचा विश्वास संपादन करते. 


            दुर्दैवाने तिच्या मुलाचे ऑपरेशनपूर्वीच निधन होते. त्याचा ठपका तिचा पती 'मंगल'वर आणि ती ज्या कुटुंबात काम करते, त्या कुटुंबावर ठेवतो. 'मंगल' चा मुलगा वारतो आणि उरला सुरला नवऱ्याचा आधार संपतो. ती अक्षरशः उघड्यावर येते. मुलाच्या तेराव्यानंतर ती पुन्हा एकदा याच घराच्या आश्रयाला येते. त्यांनी आपल्याला तिथेच राहू द्यावं म्हणून त्यांची विनवणी करते. त्यांनाही मंगल ची आवश्यकता असतेच, तिच्या परिस्थितीमुळे तिचे घरात राहणे ते अपरिहार्यपणे स्वीकारतात. त्यातून घडणारे जुजबी प्रसंग दोन स्तरांमधील व्यक्तींच्या विचारसरणीतील, श्रद्धांमधील, समजूतींमधील, कार्यपद्धतीतील फरक अधोरेखित करत जातात. छोटे मोठे ताणाचे प्रसंग उद्भवतात. 'आईपणातली मालकी' आणि 'बाईपणातली संवेदनशीलता' यांच्यातला संघर्ष दिसतो. मात्र 'गरज' सगळ्यांनाच समजूतदार करून जाते.


आजूबाजूच्या समाजातील घडणाऱ्या प्रसंगांमुळे मंगलच्या नकळत या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतो. कस्तुरीला हे पटत नाही पण गौतमला ते व्यवहार्य वाटते. महिनाभर तिच्यावर नजर ठेवली जाते, अर्थातच मन लावून काम करणारी मंगल त्यांना नेहमीच भेटते. एके दिवशी मुलाचा बॉल लागून कॅमेऱ्याची दिशा बदलते आणि आंघोळ करून बाहेर आलेल्या मंगलला गौतम पाहतो. त्या क्षणापासून तो अस्वस्थ होतो. आपण बघू नये ते बघितलं हा सल त्याच्या मनाला डाचत असतो. ते जेव्हा सुट्टी काढून फिरायला जातात तिथे देखील गौतमचे मन रमत नाही. शेवटी आपण कस्तुरीपासून लपवलेला हा प्रसंग तो तिच्याशी शेअर करतो. त्याचं मन हलकं होतं. 

               सहलीला ते मंगललाही बरोबर घेऊन गेलेले असतात. मंगल बाळाचा सांभाळ करते. बाळाची बाटली आणायला जाण्याच्या निमित्ताने ती कस्तुरी आणि गौतम यांचा एकांत पाहते. ती त्यात हरवून जाते. गौतमच्या हे लक्षात येताच त्याला ते फार लाजिरवाणे वाटते. रसभंग होतो. कस्तुरी मंगलवर चिडते. मंगल चुकीची कबुली देते. आजवरच्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य आपल्याकडून झाले याची कबुली देते. त्याच वेळेला कस्तुरी सुद्धा फक्त तुझ्याकडूनच नाही तर आमच्याकडूनही अशा प्रकारचं वर्तन झालेलं आहे, हे सांगत गेला महिनाभर घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे ही वस्तुस्थिती सांगते. महिनाभरातले प्रसंग 'मंगल'च्या डोळ्यासमोरून तरळतात.


 "अहो ताई, ... मग सारंच उसवलं की आता!" हा तिचा संवाद खूप काही व्यक्त करून जातो. ती स्वतःला या कुटुंबाने मोकळं करण्याची विनंती करते. खरं म्हणजे कस्तुरीचा संसार आणि नोकरी मंगलमुळे सुखरूप आणि सुरक्षित असते. तिची ही मागणी ऐकताच कस्तुरीवर 'आता काय?' या प्रश्नाचे जणू आकाश कोसळते. 

........ इतक्यात नुकतंच चालायला लागलेलं बाळ त्याच्या बाबांसोबत तिथे येतं आणि 'ममा ममा' असा आवाज देते. "अहो ताई, तुम्हाला बोलवतोय की तो असं म्हणणारी मंगल आणि तो त्याच्या मंगल मावशीला बोलवत असेल असं म्हणणारी कस्तुरी ; बाईने बाईला सांभाळून घेतलं की  जीवनात कसे मांगल्य भरुन राहते ", या जीवनसत्याचा प्रत्यय देणारा प्रसंग या चित्रपटाचा शेवट करतो.


कोणतीही पिढी आणि कोणताही समाजस्तर असला तरी 'संवादाचा अभाव' गुलकंदाला अडकित्त्यात पकडत राहणार. मनामधले सारे संशय कार्यरत झाल्यावर साधला गेलेला संवाद नेहमीच प्रश्न सोडवेल याची खात्री नसते. कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात 'वेळे'ला महत्त्व आहे. त्या त्या वेळी असलेल्या भावना, संवेदना पुन्हा नव्याने फुलतील याची शाश्वती नसतेच. 'गुलकंद' चित्रपटातून भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारी नीता आपल्याला हे कळत नकळत सांगून जाते.


या दोन्ही चित्रपटांमध्ये सई ताम्हणकर मला फार भावून गेली. खरं म्हणजे यापूर्वी मी तिचे चित्रपट पाहिलेच नव्हते. परंतु तिच्या निमित्ताने मराठी चित्रपटांमध्ये 'अभिनयाची ताकद' काय असते हे व्यक्त करणारी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा लाभलेली आहे. तिच्या 'बोल बोल राणी'या चित्रपटातील तिहेरी भूमिका याचा फार उत्कृष्ट प्रत्यय देतात. 


मराठी जीवनाचे वास्तव प्रश्न कुशलतेने मांडू पाहणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीला हार्दिक शुभेच्छा! ...आणि चित्रपट पाहून का होईना पण अडकित्त्यामध्ये गुलकंद पकडण्याऐवजी संवाद साधून मुहूर्तावर सुपारी फोडावी हे मराठी जनांनी मनावर घेतले तर त्यांच्या आयुष्यातले अनेक प्रश्न नकळतपणे सुटण्यासाठी मदतच होईल. शुभेच्छा त्या वाटचालीसाठी!


वृंदा आशय 


श्रीकृष्णजनार्पणमस्तु !


Tuesday, 13 October 2026

आगगाडी आणि जमीन - कवी कुसुमाग्रज

 

आगगाडी आणि जमीन - कवी कुसुमाग्रज 



नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून ||१||

धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून ! ||२||

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !||३||

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेभान होऊन ! ||४||

ढगात धुराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून - ||५||

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड ||६||

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन !धावेन !||७||

चला रे चक्रानो ,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपुला दरारा !||८||

शीळ अन कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून ||९||

शिरली घाटात
अफाट वेगात
मैलाचे अंतर
घोटात गिळीत !||१०||

उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन ||११||

"दुर्बळ भेकड !
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी! ||१२ ||

हवेत पेटला
सूडाचा घुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा ||१३||

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश !||१४||

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती !||१५ ||

- कवी कुसुमाग्रज 

खरं म्हणजे कुसुमाग्रजांच्या या कवितेवर भाष्य करण्याची आवश्यकताच पडू नये इतकी ही कविता स्वतःच बोलकी आहे. 'पृथ्वीचे प्रेमगीत' हे जसे एक भौगोलिक सत्य आहे, तसेच 'आगगाडी आणि जमीन' हे एक यांत्रिक सत्य आहे. भौतिक सत्य आहे. माणसाच्या भौतिक विकासाशी निगडित अशी ही आगगाडी आहे. सर्वसामान्य माणसांसाठी ती प्रवासाचे एक महत्त्वपूर्ण असे साधन आहे. (रूपकात्मक दृष्टीने विचार करता कुसुमाग्रजांच्या समकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे त्याला संदर्भ आहेत.)

           या कवितेमधली जमीन मात्र एक जैविक सत्य आहे. जिच्यावर आधारित विकास केला जातो, त्या जमिनीला गृहीत धरले किंवा तुच्छ लेखले तर काय होऊ शकते याचे फारच सुंदर चित्रण कवीने इथे केलेले आहे. 

         वास्तविक पाहता भारतीयांसाठी 'जमीन' ही कधीच नुसती जमीन नसते. तिला आपण मातेच्या स्वरूपातच पाहतो. शेतीच्या संदर्भात आपण तिला 'काळी आई' म्हणतो. तर राष्ट्राच्या संदर्भात तिचे पांग फेडण्यासाठी तिच्या आरतीला चंद्र, सूर्य, तारे आणण्यासाठी आपण तयार असतो. 'मातृभूमी' हा नेहमीच आपल्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय आहे. तिच्यावर आधारित विकासाला कोणाचाच विरोध नसतो. मग खाणीतून निघणारे वेगवेगळे धातू असू द्या किंवा तिच्या जीवावर बांधलेल्या मोठ मोठ्या इमारती असू द्या. इतकेच काय समुद्र जिच्या कुशीत वावरतो, आणि ज्या समुद्राला आपण समुद्रमंथनाचे, रामसेतूचे सांस्कृतिक सत्य, एक शाश्वत सत्य म्हणून स्वीकारलेले आहे त्या समुद्रामधील माणिक - मोती, विविध प्रकारच्या वनस्पती, विविध त-हेचे जीव या सगळ्यांचा आपण आनंदाने स्वीकार करतो. समुद्रामधली मासेमारी हा आपल्या उपजीविकेचा भाग आहे. समुद्राला वळसे घालून नवनवीन देश आपण पादाक्रांत करतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार - व्यवहाराचे अनेक दरवाजे खुले करतो. समुद्राला मागे हटवून तिथल्या जमिनीवर हवे ते बांधकाम करतो. तिच्या कुशीत  फुलणारी झाडे, वेली, वृक्ष त्यावरची पक्षी सृष्टी आणि जंगलामधली प्राणीसृष्टी या सगळ्यांशी आमचे देणे घेणे असते. ही प्राणी सृष्टी हिंस्त्र वाटली तरीही.

           जमिनीचे हे वैभव पाहिले की लक्षात येते, 'आगगाडी' हा तिचा आवश्यक पण एक छोटासा भाग आहे. कदाचित 'चलगती' प्राप्त झाल्यामुळे ती स्वतः हे विसरते. या विसरण्यातून तिच्यामध्ये 'उद्दामपणा' येतो. ती जमिनीकडे केवळ दुर्लक्ष करत नाही तर जमिनीची उपेक्षा करते. 'दुर्बळ - भेकड' या शब्दांनी तिची अवहेलना करते. आई क्षमाशील असते मात्र एका मर्यादेपर्यंतच. तिच्या जीवावर वावरणारे जेव्हा आपल्या मर्यादा विसरतात तेव्हा तिला स्वसामर्थ्याची जाणीव करून द्यावीच लागते. तिचं सामर्थ्य इतकं अफाट आहे, की एरवी अचल वाटणारी ही जमीन भूगर्भातून जेव्हा थोड्याशा हालचाली करते, तेव्हा विकासाचे सगळे डोलारे क्षणार्धात कोसळतात. म्हणूनच

आकाशाचे पंख असावे 
उंबरठ्यावर भक्ती 

याला चुकूनही कोणीच विसरू नये. मुळांशी, सामान्य माणसांशी नाते तोडून विकासाचे इमले रचू नयेत.

वृंदा आशय





**********************************************************************************

Monday, 12 October 2026

पृथ्वीचे प्रेमगीत!

 https://youtu.be/dbbbQF2ffoA?si=7ZJuF3kb6guAgxH6


पृथ्वीचे प्रेमगीत!


सध्या सूर्य सगळ्यांच्या डोक्यावर आलेला आहे. रणरणतं ऊन, पाण्याचा तुटवडा, पाण्याअभावी उदास होत चाललेली सृष्टी, माना टाकणारे झाडं, वणवण भटकणारे प्राणी, हैराण - परेशान होत जाणारा माणूस. साहजिकच जुने दुष्काळ आठवले जात आहेत. काय होईल याची चिंता भेडसावत आहे. या कात्रीत वर्तमानाला तोंड देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं 'जमीन भेगाळलेल्या' प्रत्येक गावाची आणि 'ऊन भोगणाऱ्या' प्रत्येक माणसाची ही गोष्ट आहे. 


भकास वाटणाऱ्या या जगण्यामध्ये मला बळ देते कुसुमाग्रजांची कविता 'पृथ्वीचे प्रेमगीत'. भौगोलिक सत्य काव्यात्मक पद्धतीने सांगणारी आणि प्रेमातली उदात्तता व्यक्त करणारी ही एक अप्रतिम कविता आहे.  


खरं म्हणजे इतक्या भीषण परिस्थितीमध्ये अशा प्रेम कवितेत रमावं ही गोष्ट काही बरी नव्हे. मात्र हेच साहित्याचे खरे बळ आहे, ही माझी प्रांजळ भूमिका आहे. प्रखर वास्तव जेव्हा दहा दिशांनी आपल्यावर आक्रमण करत असतं, तेव्हा दशाननाला न आठवता श्रीरामांचे भक्तिभावे स्मरण करावे, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ही सकारात्मकता माणसाला अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा निर्भयपणाने उभे राहण्याचे बळ देते.  देव माझ्या बाजूला असल्यावर दैव माझे काही बिघडवू शकत नाही, ही श्रद्धा आपल्या संस्कृतीने मनामनात पेरलेली आहे. त्यातून निष्काम कर्माचा वसा उचलून अविरतपणाने चालत राहणारी असंख्य मंडळी आहेत. त्यांच्या पुण्यबळाने या पृथ्वीचं अजूनही बरं चाललंय असं मला वाटतं. असो.


हे वर्ष 'सूर्य वर्ष' आहे. त्यामुळे अग्नी आणि तेजाचा काय काय प्रताप दिसणार आहे, त्यामुळे काय काय संकटे ओढवणार आहेत याची एक साधारण कल्पना ज्योतिष शास्त्राने देऊन ठेवली होती. संकटासाठी सिद्ध झालेला माणूस  जिवंत असेपर्यंत संकटाशी लढू शकतो. मात्र हळूहळू त्याची रसद कमी केली गेली की त्याचं लढण्याचं बळ मावळतं. नेपोलियन 'सैन्य पोटावर चालतं' असं म्हणायचे ते इथे शब्दशः खरे ठरते.  संकटाशी प्रत्यक्षपणे झुंज घेण्याची ताकद कमी पडायला लागली की गनिमी कावे शोधले जातात. काहीही करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करू अशी ती भूमिका असते. 'लढवय्या' या दृष्टीकोनातून ती सुयोग्य भूमिका असते. तर ज्याच्या विरोधात ही भूमिका घेतली जाते ते त्याला सोयीनुसार द्रोह, बंड, लढाई अशी हवी ती नावे वापरत असतात. परंतु हा आजच्या लेखनाचा विषय नसल्यामुळे त्याबाबत भाष्य करणे योग्य नव्हे.


मी जेव्हा कुसुमाग्रजांच्या दृष्टिकोनातून पृथ्वी आणि सूर्याकडे पाहते त्या वेळेला मला हे सूर्यवर्ष म्हणजे पृथ्वीच्या प्रेमाच्या सफलतेचे वर्ष वाटायला लागते.  कारण प्रेमाला हवा असतो केवळ दीर्घ सहवास.


 'पृथ्वीचे प्रेमगीत' या काव्यामध्ये पृथ्वी ही सूर्याची प्रेयसी होऊन आपला प्रेमभाव त्याच्याकडे व्यक्त करते.


युगामागुनी ही युगे चालली रे 

किती काळ भास्करा करावी वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी 

कितीदा करावी प्रीतीची याचना?


वास्तविक पाहता एखाद्या गोष्टीचं अमरत्व सांगताना आपण सहजच म्हणून जातो 'जब तक सुरज चांद रहेगा..' (पुढे आपल्याला जे काही म्हणायचं असेल ते.) तसे सूर्याभोवती पृथ्वीचे फिरणे हे अव्याहतपणे सुरूच राहणार आहे आणि हे राहिले तरच सृष्टी तगणार आहे. स्वतः सूर्य एक आगीचा प्रचंड मोठा गोळा आहे. त्याच्यापासून कैक योजने अंतरावर, 'पृथ्वी' या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण झाली. तिच्या ऋतुमती होण्यावर, दिवस आणि रात्र होते,  ऋतुचक्र चालत राहणे हे सूर्याच्या उष्णतेमुळे, उबेमुळे शक्य आहे. पृथ्वीवर जी जैवविविधता आपल्याला आढळते त्याच्याशी सूर्य - चंद्राचे फार जवळचे नाते आहे. 


अशी पृथ्वी जेव्हा सूर्याला विचारते 'कितीदा करू प्रीतीची याचना?' तेव्हा शास्त्रज्ञ म्हणतील, "बाई गं , बरं चाललंय ते चालू दे ना." कवी मनाची रसिक माणसं मात्र या संवादाने पार आतून  हलून जातात. प्रेमाचे पावित्र्य, मांगल्य, उदात्तता सांभाळणारी, वाढवणारी त्यागमयी आणि सृजनशील अशी स्त्री प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर नकळत उभी राहते. प्रेम या भावनेचे आणि कवीच्या सृजनशीलतेचे मूल्य या ठिकाणी अफाट वाढते.  जीवनमूल्यांना कलामूल्यची मिळालेली जोड एकूण सृष्टीचे सौंदर्य वाढवते. 


नव्हाळीतले ना उमाळे, उसासे

 न ती आग अंगात आता उरे 

विझूनी अता यौवनाच्या मशाली 

उरी राहिले काजळी कोपरे !


हा पृथ्वीचा भाव जेव्हा कुसुमाग्रज व्यक्त करतात तेव्हा एखाद्याच्या मनामध्ये पृथ्वीचे वय किती आहे? किती वर्षांपासून माणूस इथे अस्तित्वात आहे? अजून किती वर्षांनी पृथ्वीचा नाश होणार आहे? या सगळ्याची गोळा बेरीज करून 'पृथ्वीचे तारुण्याचे वय' ठरवावे असा तर्कशुद्ध विचार मनामध्ये येऊ शकतो. 

              रसिक आणि संवेदनशील मनाला मात्र लक्षात येते ते फक्त पृथ्वीचे थकले-भागलेपण. पृथ्वी स्वतः सूर्याला सांगत आहे - माझं प्रेम म्हणजे तारुण्यातलं, वयानुसार आलेलं, नवथर प्रेम नाही. त्या वयातल्या प्रेमाबरोबर जो एक आपसूक असा जोश अंगामध्ये संचारत असतो, तसंच या प्रेमाच्या अनुषंगाने अन्य पूरक भावना मनामध्ये निर्माण होत असतात त्या आता कोणत्याच निर्माण होत नाहीत. कदाचित सूर्यावरच्या प्रेमात पृथ्वी जी काही भाजून निघाली आहे त्याचेच आता काजळी-कोपरे शिल्लक राहिले आहेत. 


प्रेमातल्या या वेदनांमुळे पृथ्वीच्या संवेदनात संपुष्टात आलेल्या आहेत का? ती निराश झालेली आहे का? ती म्हणते- 


परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे 

अविश्रांत राहील अन् जागती

 न जाणे न नेणें कुठे चालले मी 

कळे तू पुढे आणि मी मागुती !


निःस्वार्थ आणि निर्मोही प्रेमाची अजोड-अतुलनीय अशी जी उंची कवी मनाने व्यक्त केलेली आहे, तिला खरोखर तोड नाही. मला सूर्यावर प्रेम करून काय मिळालं, काय नाही याचा कोणताच हिशोब पृथ्वी करत नाही. जे अव्याहत सृष्टीचक्र सुरू आहे त्याचंही तिला कदाचित ज्ञान नाही. तिचं एकमेव लक्ष हा दूरवरचा तेजस्वी गोळा आहे. तो पुढे जातोय आणि आपण त्याच्या मागे एवढ्याच एकमेव समाधानाने ती अखंडपणाने फिरत आहे.


ज्यांनी शारीर संभोगाला प्रेम मानलेले आहे ते प्रेमाची वेळ म्हणून रात्रीची नोंद घेतात. संध्याकाळपासून सुरू होणारी ही हुरहुर रात्री समेवर येते. पृथ्वीचं म्हणणं मात्र काही निराळंच आहे. सूर्याच्या प्रकाशानं दिवसा उजळून निघणारी पृथ्वी रात्रीच्या वेळेला नक्षत्र ताऱ्यांनी सजते. चंद्र चांदण्यांचा अल्हाददायक प्रकाश पृथ्वीवरचं जगणं अधिक सुंदर करतो, असं माणसाला वाटतं ; पृथ्वीला मात्र - 


परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा, 

मला वाटते विश्व अंधारले


सूर्याच्या अभावी असलेली स्थिती ही पृथ्वीसाठी केवळ अंधार आहे. या अंधारामध्ये काय काय घडतं हे ती सूर्याला सांगते - 


वास्तविक भौगोलिक सत्य असं आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्यप्रकाशाला तो परावर्तित करतो. कवीने मोठ्या लालीत्यपूर्ण पद्धतीने हे सत्य व्यक्त केले आहे - 


तुवा सांडलेले कुठे अंतराळी 

वेचूनिया दिव्य तेजःकण 

मला मोहवाया बघे सुधांशु 

तपाचार स्वीकारुनी दारुण 


पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो हे भौगोलिक सत्य या दारूण तपाचारामागे आहे. प्रेमाचा मानाला गेलेला दुसरा ग्रह म्हणजे शुक्र. पहाटे नीरव शांततेत चंद्र आणि त्याच्याजवळ शुक्राची चांदणी तन्मयतेने बघून आपल्या प्रेयसीची प्रियकराची आठवण करणारे अनेकजण असतील. पिसारा उभारून असलेला हा शुक्र किंवा उपजतच लाल असलेला मंगळ जणू काही प्रेमाच्या भावनेने लाल झालेला आहे अशी कल्पना कवी व्यक्त करतात. अढळ  तपश्चर्येने उत्तर दिशेला स्थित असलेला धृवतारा, जणू काही प्रेम नाकारले गेल्यामुळे पिसाट झालेला धुमकेतू या सगळ्यांनाच नाकारत पृथ्वी सूर्याला सांगते -


परी भव्य ते तेज पाहून पूजून 

घेऊ गळ्याशी कसे काजवे ! 

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा

 तुझी दूरता त्याहुनी साहवे !


अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन् 

मला ज्ञात मी एक धूलीकण अलंकारण्याला परी पाय तुझे 

धुळीचेच आहे मला भूषण !


असं हे उदात्त प्रेम जेव्हा, काय स्वीकारावे काय नाकारावे याचा सद्सद्विवेक बाळगत विनयशीलतेच्या वाटेवर जाते तेव्हा त्या उदात्त सौंदर्याकडे माणूस मंत्रमुग्ध होऊन पाहतो.


वृंदा आशय 


Saturday, 10 October 2026

पवते



 •| ॐ |•


श्री मॉं!


विसर्जन - स्थापन


उद्या घटस्थापना. घरोघरी त्यानिमित्ताने स्वच्छता सुरू असेल. जाळी जळमटी काढली जातील. काने-कोपरे स्वच्छ होतील आणि त्याबरोबर कदाचित मनंही. 


मला मात्र यावेळेस घटस्थापनेपेक्षाही अधिक ओढ लागली आहे ती पवतं विसर्जित करण्याची. खरं म्हणजे मलाच माझं त्यासाठी आश्चर्यही वाटतं आहे. पण आज सकाळपासूनच ही ओढ लागली खरी. 


पवतं - महालक्ष्मीचा प्रसाद. गणपतीच्या पाठोपाठ तीन दिवस गौरी येतात आणि आनंदानं नांदतात. त्यांची सरबराई करत त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको अशा आनंदानं सारं घर या उत्सवात रममाण होतं. प्रथे - परंपरेनुसार अनेक गोष्टी आपण त्यांना अर्पण करतो. पवतं - पिवळा धागा हा त्यातीलच एक. महालक्ष्म्यांना, त्यांच्या बाळांना हे धागे अर्पण केले जातात. पूर्वी पांढऱ्या दोऱ्याला हळद लावली जायची. आता पिवळा दोरा आणून तोच वाहिला जातो. गौरी विसर्जन होतं तेव्हा या धाग्याला गाठी पडल्या जातात आणि घरातल्या सदस्यांना तो धागा बांधण्यासाठी दिला जातो. कोणी हातात, कोणी गळ्यात पवतं बांधतं. लहान मुलांना आठ पदरी, तर मोठ्यांना सोळा पदरी पवतं, असं माझी काकू नेहमी सांगायची. 


गौरी विसर्जनानंतर पक्ष पंधरवडा लागतो. या संपूर्ण पक्ष पंधरवड्यात हे पवतं आपण धारण केलेलं असतं. घटस्थापनेच्या दिवशी आंघोळ झाली की हे पवतं काढून टाकायचं असा हा नियम. त्यामुळे आज सकाळीच काढून टाकाव वाटलेलं पवतं मी उद्यापर्यंत राहू देऊया असं ठरवलं. मात्र मनातली ही ओढ काही कमी होईना. मग शेवटी आपलं पवत्यावरच लिहायचं ठरवलं. काय आहे, जे काही उत्कटतेने वाटतं ते माय माऊलीच्या चरणी अर्पण करून मोकळं झालं की मला जरा बरं वाटतं.


.....पण मी आपला विचार करत बसले पवतं पक्ष पंधरवड्यात का बाळगत असतील? 


पवतं महालक्ष्मीचा प्रसाद. तो बाळगायचा पुन्हा देवीची स्थापना होईपर्यंत. मधला काळ पितरांना आठवण्याचा, त्यांचं पक्ष करून त्यांना जेवू घालण्याचा, त्यांना तृप्त करण्याचा. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. या काळात ते प्रत्यक्षात येतात, असा एक समज आपण बाळगतो. प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही गुणदोष असतातच. मला आपलं उगाच वाटतं जर पितरं खाली येत असतील तर त्यांचे गुणदोष, त्यांच्या धारणा, त्यांच्या वृत्ती - प्रवृत्ती या देखील त्यांच्यासोबतच असतील. कदाचित चुकीच्या प्रवृत्तींपासून वाचण्यासाठी म्हणून महालक्ष्मी जाता जाता सुरक्षेचा धागा म्हणून 'पवतं' प्रसाद रूपाने आपल्याला देत असेल. जेव्हा नवरात्रात नऊ रूपे प्रकटवत ती महिषासुरमर्दिनी येते, तेव्हा भय कसलं ? इडा - पीडा कसली ? कदाचित म्हणूनच 'पवतं' विसर्जित करत असतील.



वृंदा आशय 


श्रीकृष्णार्पणमस्तु!

           संपूर्ण समर्पण मॉं!

विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 || ॐ ||           विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !       आपला समाज सुदृढ आणि नीतिमान ठेवणारी संस्था म्हणजे...