•| ॐ |•
श्री मॉं!
हे अथांग सागरा,
कसा आहेस रे तू ? आत्ता अगदी सहज तुझी आठवण झाली बघ. आपली सगळ्यात पहिली भेट झाली ती 'पॉंडिचेरी'च्या किनाऱ्यावर. एवढा विशाल अथांग शांत आणि निळसर पाण्याचा समुद्र पाहण्याची ती माझी पहिलीच वेळ. आश्रमातल्या पायऱ्यांवरचे बटाटे - पोहे अजूनही आठवतात. कारण बटाटे पोहे हा प्रकारच मी तिथे पहिल्यांदा खाल्ला. तोपर्यंत फक्त कांदे पोहे, दडपे पोहे, दूध पोहे एवढेच परिचित होते. आश्रमातील युवा शिबिरामध्ये, समुद्रकिनाऱ्यावरच्या त्या हॉलमध्ये आम्ही सूर्यनमस्कार करायचो आणि त्याच वेळेला समुद्रामधून सूर्य वर येताना दिसायचा. केवळ अविस्मरणीय!
त्यानंतर तुझी माझी भेट खूप ठिकाणी झाली. मुंबईला, अलिबागला, अंदमानला, गणपती पुळेला. मुंबईच्या चौपाटीवर कल्याणी - पवन आणि मुलांसोबत आम्ही मस्त रमलो. तिथल्या समुद्राच्या वाळूत वेगवेगळे आकार काढणे, शंखामधली गोगल गाय सापडणं आणि या सगळ्यामध्ये पवनचा ओसंडून वाहणारा उत्साह, त्यामुळे समुद्रा तू विशेष लक्षात राहिलास रे.
अलिबागला आमचं १४ जणांचं कुटुंब. आजही आठवतात रात्रीच्या वेळेला दुधासारख्या फेसाळून येणाऱ्या त्या स्वप्नील लाटा. पहाटेच्या ओहोटीने आम्ही मनसोक्त तुझ्या परिसरात फिरायचो आणि शंख शिंपले वेचायचो.तुझा कुलाबा जलदुर्ग शिवरायांची रोमांचकारी आठवण देऊन जायचा.
अंदमानला तुझं दर्शन पण आठवण मात्र सावरकरांची! तिथे पाण्याखालच्या पानवनस्पती पाहताना मौज वाटली पण अगदी मनापासून भीतीही तितकीच वाटली होती रे.
गणपती पुळेला तुझं शांत दर्शन सुखावून जाणारं होतं. तिथे बच्चे कंपनी सोबतच्या वॉटर स्पोर्ट्सनी धम्माल आणली.
सागरा, तुझं माझं नातं असं! तुझ्या पाण्यावर बुडबुडे, तरंग, लहरी आणि लाटा उठाव्यात पण असतं मात्र पाणीच. तसं तुझं माझं नातं खेळकर, खोडकर, 'बॉ उक' सारखी भीती दाखवणारं मात्र खोल नि अथांग!
तुझ्या माझ्या मधला एक समान धागा म्हणजे चंद्राला पाहून आपण दोघेही बहरतो. म्हणून खास तुझ्यासाठी ही - चंद्र कविता
•| ॐ |•
श्री मॉं!
लिंबाच्या सावलीत
चंद्राच्या पालखीत
मन माझं गाई
जाई जुई संगीत
पालवला चंद्र माझा
होऊन मोगऱ्याचा बहर
अंधारात मज दिसले
सारे उजळलेले शहर !
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
***********************************************************************************


