Wednesday, 28 October 2026

विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 || ॐ ||

         




विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 

   आपला समाज सुदृढ आणि नीतिमान ठेवणारी संस्था म्हणजे 'विवाह संस्था' होय.  त्यातून आकाराला येणारे कुटुंब आणि कुटुंबसंस्थेतून घडणारा समाज ! मानवी समाजाच्या विकासाचा एक लेखाजोखा आपण मांडतो त्यावेळेला आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचे मनोमीलन हे विकासाच्या पायाशी असलेले दिसते. मनोमीलनाशिवाय कोणत्याही प्रकारचा झालेला विकास हा 'तडजोडी'च्या पायावर उभा असतो. तड जाऊन जाऊन, तडा जात नाही तोपर्यंतच जोडण्याची शक्यता असते. तडा गेलेलं भांड असू द्या किंवा तडा गेलेलं नातं असू द्या, त्यातला जोड दिसत राहतो, बोचत राहतो. काही केल्या मूळ घडणीची सर येत नाही. मग अशा वेळेला काय करावे? 

         आजच्या जगाचा विचार केला तर प्रत्येक नातं हे तडजोडीवर टिकलेलं आहे. आजच्या काळात अन्य नाती टिकली काय किंवा टाकली काय कदाचित फारसा फरक पडत नसावा. मात्र विवाह बंधनातून निर्माण झालेलं नवरा-बायकोचं नातं जर टिकलं नाही, टिकवलं गेलं नाही आणि टाकावं लागलं तर त्याचे परिणाम फार दूरगामी होतात. कारण कुटुंब संस्थेच्या मुळाशी या दोन व्यक्तींचे मनोमीलन कारणीभूत असते. मनं जुळली की शून्यातून विश्व उभारता येतं. त्यासाठी मन कळणं आवश्यक असतं. मनाकडे दुर्लक्ष करत गेले तर विश्वव्यापी शून्यता आयुष्यात येण्यास वेळ लागत नाही. 

  केवळ प्रेमविवाह झाला म्हणजे मनोमीलन होते आणि विवाह बंधन टिकते हे सामाजिक अनुभवाने साफ खोटे ठरवलेले आहे. आता त्यातील प्रेमाचे स्वरूप कसे हे चर्चा करण्याची जागा ही नव्हे. पूर्वीच्या काळात आपल्याकडे स्थळ पाहून केलेले विवाह टिकत होते किंवा कोणातरी एकाची घुसमट होऊन टिकवले जात होते. त्याला त्या काळची समाजरचना कारणीभूत होती. पटतच नसेल तरी आयुष्यभर सोबत राहा आणि कुढत जगत राहा; हे मान्य असण्याचा काळ आता संपलेला आहे. जे नातं आपण निर्माण करतो त्या नात्याला पूर्णविराम देण्याची शक्यता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. मात्र दूध पोळल्यामुळे ताक फुंकून प्यावे तसे दुसरे नाते जोडण्यापूर्वी माणसाची अवस्था होते. काही मनं हा आघात पचवून पुढचा प्रवास करतात आणि काही मनं तिथल्या तिथेच कोमेजून जातात. त्यामुळे आयुष्याचा हा निर्णय अत्यंत सजगतेने आणि परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून घ्यावा लागतो. त्यासाठी घर- शेतीवाडी, स्थावर संपत्ती, नोकरी - व्यवसाय, स्थिर वार्षिक उत्पन्न हे सगळे पूरक मापदंड असतात.

         पूर्वीच्या काळी नातेवाईक, हितचिंतक आणि पालक वर्ग लग्न ठरवण्यात अग्रेसर असायचे. अगदी लहान वयात कुल, घराणं यांची मानमर्यादा सांभाळून हे विवाह निश्चित होत होते. ठरवल्या गेलेल्या विवाहाला नकार देण्याची परवानगी मुलगा किंवा मुलगी कोणालाही नव्हती. त्यामुळे वडिलधाऱ्यांच्या आज्ञेत राहून संसार होत होते. मात्र बदलत्या युगात, शिक्षणाच्या प्रसाराने, तंत्रज्ञानाच्या वापराने; अनुभवाचे शहाणपण दुय्यम ठरवले आणि वयाच्या वडीलकीचा मान संपुष्टात आला. 

    विवाहेच्छूक मुले- मुली स्वतःचे लग्न स्वतः निश्चित करायला लागले. ट्रायल बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट,  लिव्ह इन रिलेशनशिप, करून पाहू,  राहून पाहू,  जमलं तर ठीक नाहीतर ब्रेकअप एन्जॉय करू ; अशी आजच्या काळाची युवा पिढीची मानसिकता आहे. जोपर्यंत या सगळ्यामध्ये बाळाची चाहूल लागत नाही तोपर्यंत हे सुरू राहतं. मात्र एकदा ही चाहूल लागली की पुढच्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. आपला विवाह केवळ दोघांपुरता मर्यादित नाही याची प्रखर जाणीव होते. या वस्तुस्थितीला जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सामोरा जातो किंवा तिच्यापासून पळ काढतो.

   या अधांतरी अशा भविष्यामुळे, जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि आपल्या मागे आपले कुटुंब नाही या जाणिवेमुळे ; ही जबाबदारीच स्वीकारू नये अशा प्रकारची अत्यंत धोकादायक अशी मानसिकता युवा पिढीची होत आहे. आपणच स्थिर नाहीत तर येणाऱ्या छोट्याशा जीवाला कोणतं स्थैर्य देणार हा प्रश्न त्यांना मुळातून अस्थिर करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा वयासोबत येणाऱ्या सहजीवनाच्या, मातृत्वाच्या नैसर्गिक प्रेरणांना नाकारत ही मुले स्वत:ला कामाला जुंपून घेतात, निर्णय टाळतात किंवा अन्य चुकीचे वाटतील असे निर्णय घेऊन बसतात. ज्यातून एकटेपणा, नैराश्य, व्यसनाधीनता यांनी घेरले जातात.    

        वास्तविक पाहता योग्य वयात, योग्य व्यक्तीशी विवाह होणे, हे माणसाच्या आयुष्यातील एक मनमोहक आणि मधुर असे वळण आहे. जे केवळ दोन मनांना किंवा तनांनाच जोडणारे नाही तर दोन कुटुंबांना जोडून ; नवे कुटुंब विस्तारित करणारे, या नव्या वळणावर त्या कुटुंबाला सुरक्षित आणि आनंदी करणारे असते. योग्य वयात विवाह झाला तर दोन्ही बाजूंना ती गोड हुरहूर, नाविन्याची ओढ असते. आपल्या किचकट  अटींमध्ये बसेल असा बाहुली / बाहुला जोडीदार शोधताना आयुष्य कटकटींचे होऊन जाते. वेळ कोणासाठी थांबत नसतो. हातातला वेळ पायाखालच्या वाळूसारखा सरकत राहतो. उत्सुकतेच्या उंबरठ्यावरचे माप ओलांडून जबाबदार जोडीदाराच्या हातात वेळीच हात द्यावा. अन्यथा समस्यांच्या भोवऱ्यात आई-वडिलांसह सारेच गरगरत राहतात. तडजोड प्रत्येकालाच करावी लागते. ती आपल्या चॉईसने करण्याची संधी असते  तोपर्यंत सुयोग्य निर्णय घेणे हितकारक ठरते.

                                                वृंदा आशय          

1 comment:

विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !

 || ॐ ||           विवाह : उत्सुकतेच्या उंबरठ्यापासून समस्येच्या भोवऱ्यापर्यंत !       आपला समाज सुदृढ आणि नीतिमान ठेवणारी संस्था म्हणजे...