•|ॐ|•
श्री मॉं!
अडकित्त्यातील गुलकंद!
('अडकित्ता' आणि 'गुलकंद' या मराठी चित्रपटांच्या निमित्ताने)
फुरसतीच्या वेळेला चित्रपट बघणे हा आता माझा आणि आशयचा एक छंद झालेला आहे. कोणता चित्रपट बघावा असं शोधत असताना 'गुलकंद' हे शीर्षक समोर दिसले. कलाकार सगळेच ओळखीचे म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील. खरं तर त्यामुळेच हा चित्रपट पाहण्याचे आम्ही निश्चित केले. कसं आहे ना, माणसं आपली वाटली तर तो गावच आपला वाटतो, तसेच काहीसे.
'गुलकंद' या चित्रपटाचे कथानक तसे साधे-सरळ. साध्या अशा प्रश्नाला समस्या मानले आणि ती सोडवण्याचा प्रयत्न केला की कळत - नकळत किती गुंता निर्माण होतो, याचे हे उत्तम उदाहरण होय. एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा. मुलं परस्पर आपला विवाह ठरवतात आणि औपचारिक मान्यतेसाठी दोघांचे आई-वडील एकत्र येतात. ते 'हो' च म्हणणार असे गृहीत धरून चालणा-या मुलीची आई (सई ताम्हणकर - नीता) व्यावहारिक सल्ला देते,
"आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे तर घाई काही करायला नको."
तिच्या या सल्ल्यापाठीमागे कारणीभूत असतो तिचा 'पूर्वानुभव'. तिने तिच्या कॉलेजच्या वयात ज्या मुलावर मनापासून प्रेम केलेले असते, ( प्रसाद ओक - गिरीश) पाच वर्ष परस्परसंमतीने जे मानसप्रेम फुललेले असते तोच मुलगा, मुलीचा भावी सासरा म्हणून समोर येतो. मधल्या काळात त्याच्यावर पडत गेलेल्या जबाबदाऱ्या आणि संवादाचा अभाव यामुळे 'नीता'च्या मनात नवथर प्रेमाबद्दल एक कटुता निर्माण होते. अशा प्रकारचे प्रेम जबाबदारीने संसार सांभाळू शकेल की नाही, याबाबत ती साशंक होते.
अर्थात याची कोणतीही कल्पना नसलेले तिचे कुटुंब तिच्या या सल्ल्याने गांगरते. 'प्रेमात यशस्वी होणे' आपल्याला शक्य होऊ शकले नाही, मात्र आपल्यामुळे मुलांचे प्रेम अयशस्वी व्हावे, हे योग्य नव्हे ; या जाणिवेतून गिरीश नीताशी संवाद साधतो. मध्यंतरी काय काय घडले याची सगळी कल्पना देतो. परिस्थिती समजावून घेऊन नीताचे मन निवळते. ती मुलांच्या लग्नासाठी होकार देते.
मात्र मध्यंतरीच्या काळात दोन्ही घरांमध्ये 'नीता आणि गिरीश' यांच्या पूर्वप्रेमाबद्दल सगळं काही कळतं. नीताच्या घरामध्ये अगदी मुलांशीही फार मोकळेपणाने यावर चर्चा होते. गिरीश मात्र अस्वस्थ मानसिकतेमध्ये त्याच्या मुलाकडून ( तेजस राऊत - ओंकार) काहीसा पकडला जातो. गिरीश त्याच्याशी मोकळेपणाने बोलतो आणि आईला (ईशा डे - रागिणी) याबद्दल काहीही सांगू नये, असे सूचवतो.
या चित्रपटामधील 'रागिणी'चे पात्र अशा स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांची प्रगल्भता कमी असते, ज्यांच्याशी नवरा मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी शेअर करत नाही, त्यामुळे अशा स्त्रिया उथळ मालिकांमध्ये स्वतःचे विश्व शोधतात. रागिणीला सापडलेल्या एका फोटोवरून 'गिरीश आणि नीता' यांच्याबाबत समजते. ती अगदी स्वाभाविकपणाने बेचैन होते. तिच्या मैत्रिणीशी (वनिता खरात - धोणे बाई) ही वस्तुस्थिती ती शेअर करते. नवऱ्याला कसे मुठीत ठेवावे, त्याला कसे शरण आणावे याच्या ती तिच्या दृष्टीने भन्नाट अशा आयडिया रागिणीला देते.
रागिणी स्वतःच्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाळत ठेवते. संशयाचे भूत तिच्या मनामध्ये शिरते. 'माझ्या संसाराचे काय?' ही एक विलक्षण असुरक्षितता त्या पाठीमागे असते. आपल्या या पाळत मोहिमेमध्ये ती नीताचा पती (समीर चौघुले - मकरंद) यालाही सहभागी करून घेते. खरं म्हणजे नीता आणि गिरीश ची मैत्री त्याने निखळ मनाने स्वीकारलेली असते. मात्र रागिणी त्याच्या मनामध्ये जो संशय पेरत जाते त्यामुळे तोही नकळत या फेऱ्यात अडकतो.
निखळ प्रेमाच्या पाठीमागे लागलेला संशय, त्यातून घडत जाणाऱ्या विचित्र गमती जमती आणि रागिणीला आपलं कौतुक करणारा मकरंदमध्ये मिळणारा मित्रभाव, असा काहीसा आशय व्यक्त करणारे अनेक घटना प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळतात.
या सगळ्यांमध्ये ओढाताण होते ती मात्र युवा पिढीची. या ॲडव्हान्स्ड पिढीने नीता आणि गिरीशचे प्रेम समजून घेतलेले असते आणि त्यांची मैत्री स्वीकारलेली असते. मात्र मकरंद आणि रागिणी यांच्यामधले जे काही प्रसंग ते व्हिडिओच्या माध्यमातून बघतात त्यातून ते धास्तावतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय लग्नाला ते नकार देतात. अर्थात तो चित्रपटच असल्यामुळे रागिणी एका व्हिडिओद्वारे जे जे काही घडले ते स्पष्ट करते आणि शेवट गोड होतो.
'अडकित्ता' या चित्रपटाचे कथानक मला याच्यापुढची पायरी वाटते. कस्तुरी - सखी गोखले, गौतम - सिद्धार्थ चांदेकर - ही जोडी आणि त्यांच्या बाळाला सांभाळणारी मंगल - सई ताम्हणकर ही या चित्रपटामधील प्रमुख पात्रे आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून कस्तुरी आणि गौतम विवाह करतात. कस्तुरीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते त्या वेळेला गौतममधला जबाबदार पिता आणि कस्तुरीमधली उत्सुक आणि चिंतित आई जागी होते. ही बातमी कळता क्षणी गौतमने 'सिगरेट पिणे' सोडून देण्याचा घेतलेला निर्णय आपल्याला त्याच्यातल्या जबाबदार जोडीदाराची फार उत्तम पद्धतीने जाणीव करून देतो. जुळं होणार असल्याची गोड बातमी येते पण प्रत्यक्षात मात्र एकच बाळ हाती लागतं. नव्या संसारातील त्या कोवळ्या मनांना हे सगळं पचवणं जड जातं.
कस्तुरीसाठी तिचं बाळ हेच पहिलं प्राधान्य असतं. त्यासाठी ती नोकरी, तिने स्वप्न पाहिलेले प्रोजेक्ट्स सारं काही सोडायला तयार असते. या ठिकाणी गौतम आणि तिच्या ऑफिसमधला सहकारी तिला समजावून सांगतात. बाळ सांभाळण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय देतात. शेवटी बाळाला सांभाळण्यासाठी घरी बाई ठेवायची हे निश्चित होते. त्यादृष्टीने त्यांनी अनेक स्त्रियांचे घेतलेले इंटरव्ह्यू आणि त्यांना आलेले अनुभव खरोखरच प्रेक्षणीय आहेत म्हणजे आजच्या प्रखर वास्तवाची जाणीव करून देणारे आहेत.
या सगळ्यातून शेवटी त्यांना बाळाला सांभाळण्यासाठी 'मंगल' मिळते. मंगलचेही जातीबाह्य विवाहातील त्रिकोणी कुटुंब. त्यामुळे समाजाच्या त्या स्तरातही सासर माहेरच्यांनी नाकारलेले सहकार्य, गरिबीमुळे तिची होणारी ओढाताण आणि हृदयाला छिद्र असलेला चार वर्षांचा मुलगा अशी चित्रपटामधील मंगलची पार्श्वभूमी. 'मंगल'ला कामाची गरज असते आणि त्यापेक्षाही अधिक कामाची जाण असते, बाळांबद्दल तिच्या मनामध्ये प्रेम आणि संवेदनशीलता नांदत असते. थोड्याच दिवसात ती या दांपत्याचा विश्वास संपादन करते.
दुर्दैवाने तिच्या मुलाचे ऑपरेशनपूर्वीच निधन होते. त्याचा ठपका तिचा पती 'मंगल'वर आणि ती ज्या कुटुंबात काम करते, त्या कुटुंबावर ठेवतो. 'मंगल' चा मुलगा वारतो आणि उरला सुरला नवऱ्याचा आधार संपतो. ती अक्षरशः उघड्यावर येते. मुलाच्या तेराव्यानंतर ती पुन्हा एकदा याच घराच्या आश्रयाला येते. त्यांनी आपल्याला तिथेच राहू द्यावं म्हणून त्यांची विनवणी करते. त्यांनाही मंगल ची आवश्यकता असतेच, तिच्या परिस्थितीमुळे तिचे घरात राहणे ते अपरिहार्यपणे स्वीकारतात. त्यातून घडणारे जुजबी प्रसंग दोन स्तरांमधील व्यक्तींच्या विचारसरणीतील, श्रद्धांमधील, समजूतींमधील, कार्यपद्धतीतील फरक अधोरेखित करत जातात. छोटे मोठे ताणाचे प्रसंग उद्भवतात. 'आईपणातली मालकी' आणि 'बाईपणातली संवेदनशीलता' यांच्यातला संघर्ष दिसतो. मात्र 'गरज' सगळ्यांनाच समजूतदार करून जाते.
आजूबाजूच्या समाजातील घडणाऱ्या प्रसंगांमुळे मंगलच्या नकळत या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतो. कस्तुरीला हे पटत नाही पण गौतमला ते व्यवहार्य वाटते. महिनाभर तिच्यावर नजर ठेवली जाते, अर्थातच मन लावून काम करणारी मंगल त्यांना नेहमीच भेटते. एके दिवशी मुलाचा बॉल लागून कॅमेऱ्याची दिशा बदलते आणि आंघोळ करून बाहेर आलेल्या मंगलला गौतम पाहतो. त्या क्षणापासून तो अस्वस्थ होतो. आपण बघू नये ते बघितलं हा सल त्याच्या मनाला डाचत असतो. ते जेव्हा सुट्टी काढून फिरायला जातात तिथे देखील गौतमचे मन रमत नाही. शेवटी आपण कस्तुरीपासून लपवलेला हा प्रसंग तो तिच्याशी शेअर करतो. त्याचं मन हलकं होतं.
सहलीला ते मंगललाही बरोबर घेऊन गेलेले असतात. मंगल बाळाचा सांभाळ करते. बाळाची बाटली आणायला जाण्याच्या निमित्ताने ती कस्तुरी आणि गौतम यांचा एकांत पाहते. ती त्यात हरवून जाते. गौतमच्या हे लक्षात येताच त्याला ते फार लाजिरवाणे वाटते. रसभंग होतो. कस्तुरी मंगलवर चिडते. मंगल चुकीची कबुली देते. आजवरच्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य आपल्याकडून झाले याची कबुली देते. त्याच वेळेला कस्तुरी सुद्धा फक्त तुझ्याकडूनच नाही तर आमच्याकडूनही अशा प्रकारचं वर्तन झालेलं आहे, हे सांगत गेला महिनाभर घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे ही वस्तुस्थिती सांगते. महिनाभरातले प्रसंग 'मंगल'च्या डोळ्यासमोरून तरळतात.
"अहो ताई, ... मग सारंच उसवलं की आता!" हा तिचा संवाद खूप काही व्यक्त करून जातो. ती स्वतःला या कुटुंबाने मोकळं करण्याची विनंती करते. खरं म्हणजे कस्तुरीचा संसार आणि नोकरी मंगलमुळे सुखरूप आणि सुरक्षित असते. तिची ही मागणी ऐकताच कस्तुरीवर 'आता काय?' या प्रश्नाचे जणू आकाश कोसळते.
........ इतक्यात नुकतंच चालायला लागलेलं बाळ त्याच्या बाबांसोबत तिथे येतं आणि 'ममा ममा' असा आवाज देते. "अहो ताई, तुम्हाला बोलवतोय की तो असं म्हणणारी मंगल आणि तो त्याच्या मंगल मावशीला बोलवत असेल असं म्हणणारी कस्तुरी ; बाईने बाईला सांभाळून घेतलं की जीवनात कसे मांगल्य भरुन राहते ", या जीवनसत्याचा प्रत्यय देणारा प्रसंग या चित्रपटाचा शेवट करतो.
कोणतीही पिढी आणि कोणताही समाजस्तर असला तरी 'संवादाचा अभाव' गुलकंदाला अडकित्त्यात पकडत राहणार. मनामधले सारे संशय कार्यरत झाल्यावर साधला गेलेला संवाद नेहमीच प्रश्न सोडवेल याची खात्री नसते. कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात 'वेळे'ला महत्त्व आहे. त्या त्या वेळी असलेल्या भावना, संवेदना पुन्हा नव्याने फुलतील याची शाश्वती नसतेच. 'गुलकंद' चित्रपटातून भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारी नीता आपल्याला हे कळत नकळत सांगून जाते.
या दोन्ही चित्रपटांमध्ये सई ताम्हणकर मला फार भावून गेली. खरं म्हणजे यापूर्वी मी तिचे चित्रपट पाहिलेच नव्हते. परंतु तिच्या निमित्ताने मराठी चित्रपटांमध्ये 'अभिनयाची ताकद' काय असते हे व्यक्त करणारी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा लाभलेली आहे. तिच्या 'बोल बोल राणी'या चित्रपटातील तिहेरी भूमिका याचा फार उत्कृष्ट प्रत्यय देतात.
मराठी जीवनाचे वास्तव प्रश्न कुशलतेने मांडू पाहणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीला हार्दिक शुभेच्छा! ...आणि चित्रपट पाहून का होईना पण अडकित्त्यामध्ये गुलकंद पकडण्याऐवजी संवाद साधून मुहूर्तावर सुपारी फोडावी हे मराठी जनांनी मनावर घेतले तर त्यांच्या आयुष्यातले अनेक प्रश्न नकळतपणे सुटण्यासाठी मदतच होईल. शुभेच्छा त्या वाटचालीसाठी!
वृंदा आशय
श्रीकृष्णजनार्पणमस्तु !

No comments:
Post a Comment